काका माई आणि सदू.

Submitted by Charudutt Ramti... on 26 October, 2018 - 00:48

तेंव्हा मी लहान होतो. खरं म्हणजे, लहान ही नव्हतो तसं म्हणायला गेलं तर. अर्धवट वयातला होतो असं म्हणलं तर जास्त योग्य ठरेल. नुकतीच समज यायला लागावी, पण तरीही अवती भवती घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी ‘न’ उमजाव्यात अशी काहीतरी अर्धवट मनाची अवस्था. खिडकीत अभ्यासाला बसायचो. एकटाच. कधी मन लागायचं अभ्यासात. कधी नाही. लागलं मन तर अर्धा पाऊण तास डोकं वर काढत नसे. पण नाही लागलं अभ्यासात मन, तर मग मात्र खिडकीतून बाहेर दिसणारं जग निरखत बसायचं. किती वेळ ते मलाच ठाऊक नसायचं. त्याच खिडकीच्या गजांना मग कपाळ आणि डोकं टेकवून बाहेर दिसणाऱ्या दृश्यांचा मला जमेल तेव्हडा अर्थ लावत मग बराच वेळ वाया जायचा अभ्यासातला.

कवठेकरांच्या घरातली सोप्याची खोली मला आमच्या त्याच खिडकीतून दिसायची. त्या काळी अलीकडच्या सारखं, प्रायव्हसी वगैरे प्रकरण फार महत्व धरून नसायचं. एकमेकांच्या घरातून शेजाऱ्याचं स्वयंपाक घर वगैरे अगदी सहज दिसायचं. आम्ही अलीकडेच आलो होतो इथे राहायला. पाच एक महिने झाले असावेत. नुकत्याच ओळखी होऊ लागल्या होत्या.

असाच एकदा खिडकीत बसलो होतो आणि एकदम कसलातरी दचकवून टाकणारा गलका ऐकू आला. कवठेकरांच्या घरातून काहीतरी किंवा कुणीतरी पडल्याचा. रडल्याचा किंवा आरडा ओरडा केल्याचा. आणि मग अचानकपणे…

'सदू रिक्षा बोलsव , रिक्षा बोलवss ताबडतोssब' , - कवठेकर काकांनी सदूला म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलाला ओरडत ओरडत सांगितलं. सदू घरात होता त्या कपड्यांनिशी , अगदी गंजीफ्रॉक आणि गुडघ्यापर्यंत घातलेल्या अर्ध्या चड्डीवर जिवाच्या आकांतानं पळत सुटला घरातून आणि गल्ली बाहेरच्या रस्त्यावर दिसेल त्या रिक्षाला थांबवायचा प्रयत्न करू लागला. दोन तीन रिक्षा न थांबताच निघून गेल्या. दीड दोन मिनिटांनी मग कशीतरी करून एक रिक्षा थांबली. इकडे कवठेकर काकांची अक्षरश: गाळण उडाली होती. काकांचं वय नाही म्हणायला गेलं तरी बावन पंचावन्न च्या घरात सहज असेल. ह्या वयात आता स्नायूंमध्ये पूर्वी इतकी ताकद नव्हती कवठेकर काकांच्या. सदू ला मदत करायला सांगावी तर सदू रिक्षा आणण्यासाठी साठी बाहेर अडकलेला. काकांची अक्षरश: त्रेधा झाली. नशिबानं तेवढ्यात धापा टाकत सदू दरवाज्यात येऊन पोचला.

' अरे सदू तो टॉवेल घे पटकन, आणि बांध तिचे हात ' - काका धापा टाकत सदूला बोलले. “आणि पटकन पाण्याचा ग्लास घे, जरा साखर मीठ टाक आणि ढवळून दे , तिला प्यायला देतो.” एव्हाना काका आणि सदू दोघांचीही अगदी अवस्था बिकट झालेली.

सदूला बिचार्याला नक्की काय आधी काय करावं आणि काय नंतर तेच समजेना. त्याचं ही वय अर्धवट. माझ्यापेक्षा अवघा तीन चार वर्ष मोठा असेल वयानं. त्यानं टॉवेल घेतला. आणि काकांना दिला. आणि पळत पळत पाण्याचा ग्लास आणण्यासाठी आत स्वयंपाक घरात पळाला. पळता पळता स्वयंपाक घरातल्या उंबऱ्याची ठेच त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला लागली. त्या ठेचेची कळ क्षणार्धात त्याच्या मस्तकापर्यंत विजेसारखी गेली. पण त्याला किंचितसा दम खायलाही उसंत वा अवधी नव्हता. अश्या वेळी आई च्या पदरात जावं असं कुणालाही वाटेल पण कितीही मोठं झालं तरीही, पण ही वेळच मोठी वाईट होती. नख आणि पायाच्या बोटाच्या बरोबर मधोमध भेगेतून वाहणाऱ्या रक्ताकडे दुर्लक्ष करत त्यानं चटकन माठातलं पाणी फुलपात्रात घेतलं, त्यात ओट्यावरच्या सटामधलं अर्धा चमचा मीठ आणि दीड दोन चमचे साखर घालत झट दिशी ढवळलं. आणि परत पळत पळत बाहेरच्या खोलीत आला.

आप्पांनी तोवर माईचं अक्ख: शरीर टॉवेलनी बांधून ठेवलं होतं. तिचे दोन्ही हात तिच्या पोटावर आवळून घट्ट करकचून बांधले होते. आणि तेंव्हा कुठे आता माई त्यांना जरा आवरत होती. तरीही अजून काका आणि सदू दोघांना माईचं बेफाम शरीर आवरता आवरता नाकी नऊ येत होते. काकांनी मग पटदिशी, सदूनं एकच मिनिट आधी फुलपात्रात करून आणलेलं पाणी, साखर आणि मिठाचं मिश्रण माईला प्यायला म्हणून तोंडाला लावलं. माईने दोन घोट पीत उरलेलं मग थुंकून दिलं. काकांनी तसंच उरलेलं भांड्यातलं ते मिश्रण तळ हातात घेत तिच्या माथ्यावर पटापट थापलं. माईचा माथा चांगलाच गरम झाला होता. तापानं शरीर फणफणावं एखाद्याचं आणि दुसऱ्यानं स्पर्श केल्या केल्या त्याच्या बोटांना चटका बसावा तसा चटका काकांच्या तळहाताला बसला क्षणार्धात, इतका माईचा माथा गरम झाला होता.

सदू आणि काकांनी दोघांनी मिळून कशी बशी माईला रिक्षात घातली आणि दोघं रिक्षातून तिला दवाखान्यात घेऊन गेले. सगळा पंधरा वीस मिनिटांचा खेळ, पण अक्षरश: मती भ्रमिष्ट करून टाकणारा प्रकार.

माईला हे असं वरचेवर होऊ लागलं होतं. पूर्वी सुद्धा व्हायचं. पण प्रमाण कमी होतं. पण अलीकडे अलीकडे प्रमाण फारच वाढायला लागलं. डॉक्टर म्हणाले, वय वाढेल तसा हा त्रास वाढत जाणार. काकांनी पुण्याच्या डॉक्टरांपर्यंत दाखवून आणलं माईला. पण पुण्याचे डॉक्टर म्हणाले, “तुमच्या डॉक्टरांनी केलंय ते निदान योग्यच आहे. सध्यातरी काही उपाय दिसत नाही.” काका त्यादिवशी पूर्णपणे हताश होऊन घरी परत आले होते.

माई आणि काकांचं लग्न होऊन चार एक वर्षच झाली असतील आणि माईला ला असा त्रास पहिल्यांदा झाला. काकांनी मग डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी “आधीची काही हिस्टरी आहे का?” असं विचारल्या मुळे , काकांनी माईच्या माहेरच्या माणसांना विचारलं. कुणी काही धड उत्तर देईनात माई च्या माहेरचे. माईचे वडील माई सात आठ वर्षाची असतानाच गेलेले. आई होती पण आईचं घरी काही चालायचं नाही. माईला दोन मोठे भाऊ. एक मुंबईला असे तो धाकटा. थोरला गावी म्हणजे माईच्या माहेरी. माईचं लग्न थोरल्या भावानंच लावून दिलं काकांशी. माई अठरा वीस वर्षांची असेल लग्नावेळी. नक्की वय काकांनाही माहिती नाही आणि माईलाही!

माई पहिल्यापासून अतोनात प्रेमळ. कुणावरही पोट तिडिकीनं माया करायची. माहेरी घरी पाळलेल्या मनीमऊ वर तितकीच माया करायची, जितकी परसातल्या जाईच्या वेली वर. माणसांचा तर तिने जीव लावलेल्या, हिशेबच नाही. पण परसातल्या बागेतल्या खारुताइंवर आणि सगळ्या झाडांवर तिचं भारी प्रेम. रमली असेल स्वतःमध्ये तर मग परसातल्या अनेक झाडांपॆकी एखाद्या फुलझाडाचा बुंधा गदा गदा हलवायची आणि खाली सांडली सगळी फुलं एकदा फांदीवरची, की पदरात गोळा करायची आणि मग तिचा गजरा माळत बसायची. कधी तिला मधेच एखादी कविता सुचायची, ती ‘सवु’च्या म्हणजे तिच्या भाच्चीच्या पाटीवर पांढऱ्या पेन्सिली ने लिहून काढायची आणि झाली लिहून की झर्रर्र दिशी पुसून काढायची कुणी दुसऱ्यानं वाचू नये म्हणून. नेहमी स्वतःतच हरवलेली असायची सोळा सतरा वर्षाची माई! वय कोवळं असल्यामुळं दिसायचीही अगदी गोड. एखाद्या गोष्टीत रंगवलेल्या अवखळ आणि निरागस अश्या नायिकेसारखी. दोन वेण्या. परकर पोलक्यातून नुकतीच साडीत आलेली. स्वतः शरीराची आणि सौंदर्याची सुद्धा जाणीव अर्धवट. काय होतंय काही कळायचं नाही तिला स्वतःमध्ये. नुसतीच हसायची एकट्यानं. स्वतःचा बांधा आणि शरीर आरश्यात पाहून खुद्कन लाजायची. कळशीतून परसातल्या विहिरीचं पाणी ओढून झालं की चटकन कळशी हौदात रिकामी न करता ती कळशी तशीच जमिनी वर ठेवायची. आणि तिच्यातल्या हेंदकाळणाऱ्या पाण्याला स्थिर होऊ द्यायची. जरा स्थिर झालं पाणी की मग त्यावर एक अलगद टिचकी मारायची आणि मग त्या पाण्यात निर्माण होणाऱ्या वर्तुळाकार वलयांमध्ये स्वतःच्या चेहऱ्याचे हालणारं प्रतिबिंब पाहत बसायची तासंतास. कुणीही पाहील आणि चटदिशी तिला लग्नाची मागणी घालेल अशी होती त्या वयात ती. माईच्या भावांना एखादं दोघांनी विचारल पण होतं तिच्या लग्नासाठी पण त्यांनी उडवूंन लावलं म्हणतात. उद्धटपणे! माई जितकी प्रेमळ म्ह्णून सगळ्यांना ठाऊक तितकेच तिचे भाऊ उद्धट म्हणून अख्या: पंचक्रोशीत प्रसिद्ध.

माईचं माहेरच घर होतं तो परिसर ही खूप छान होता. माईंचं घर, माईचे वडील गेले तेव्हा थोडं वादातलं होतं. भावकीच्या तंट्यात. माईच्या भावानं मात्र अगदी नेटानं कोर्ट केस जिंकत घर मिळवलं. "माझ्या वडिलांची आठवण आहे... मेलो तरी नाही विकू देणार” असं वदत शेवटी एकदा केस जिंकली तेंव्हा गावातल्या सवळोबा ला पाचशे एक नारळ वाढवले माईच्या दोन्ही भावांनी मिळून. शेजारपाजारच्या भावकीतल्या आणि आळीतल्या लोक्कानी त्यावेळी मात्र 'फुकटची इष्टेट गिळली' करत माईच्या भावाच्या नावाने दोन्ही हाताची बोटं मोडली. कारण माई चा भाऊ हा तिच्या वडिलांच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा. पण तो काळच तसा होता. माई आणि भाऊ जरी सावत्र असले तरी प्रेम मात्र दोघांच्यात अगदी सक्ख्यापेक्षा जास्त.

स्वप्नाळू माई विशीत कवठेकरांच्या घरी आली. तिथेही प्रेम दिलं सासरच्यांना. अगदी माया लावली सगळ्यांना. पण तरीही कुठेतरी हरवल्यासारखी जगत असे. वेगळ्याच कुठल्यातरी जगात. लग्नानंतर दीड वर्षात तिला दिवस गेले. सदू झाला. गोड होता सदू अगदी. कवठेकर काकाही खुश होते स्वतः वर आणि माई वरही, सदू झाल्यापासून. पण माई चं स्वतःत हरवलेपण संपेना. भानावर असली तर नशीब. तीचं स्वप्नाळू पण काकांना आताशा त्रासदायक होऊ लागलं. स्वप्नाळू कमी आणि कधी कधी वेडसर पणाची झाक दिसायची काकांना तिच्यामध्ये आणि मग काकाचा ठोका चुकायचा.

सदू तीन वर्षांचा झाला आणि माईला लग्नानंतर पाहिल्यान्दा त्रास झाला. कुणाला काही समजेना. डॉक्टरांनी जुजबी गोळ्या औषधे करून पाठवलं पण कवठेकर काका मात्र बेचैन झाले. आणखी एक दोन डॉक्टरांना दाखवलं पण मिरगी चा झटका आला ह्या पलीकडे कुणीच काही सांगेना. काका माईच्या भावाकडे तिच्या माहेरी गेले डॉक्टरांनी हिस्टरी विचारली म्हणून. पण माईच्या थोरल्या भावाने अगदी उडवा उडवी नाही पण तसा विषय टाळण्याचाच प्रयत्न केला, आधी कधी तिला त्रास झाला नाही असं म्हणत. काकांचा स्वभाव ही तसा मऊ होता. त्यांनी फार लावून न धरता परतीची वाट पकडली. पण त्यांची अस्वस्तता मात्र चांगलीच मनात घर करून बसली.

मध्ये सात आठ वर्ष काहीच त्रास झाला नाही. बरी गेली. पण अलीकडे अलीकडे मात्र माईला चांगलाच त्रास जाणवू लागला. माई पंचेचाळीस सत्तेचाळीस ची झाली आणि ह्या आजाराने माईंचं शरीर आणि कवठेकर काकांचा मन दोन्ही ग्रासून गेलं. त्रास सुरु झाला की माईला काका आणि सदू वेड्यांच्या इस्पितळात नेत. तिथे डॉक्टर मग तिला भुलीचं किंवा गाढ झोपेचं इंजेकशन देत. मग काही तास वाट पाहत. वाटलं बरं तर ठीक नाहीतर तिला शॉक ट्रीटमेंट द्यावी लागे. शॉक द्यायचा असं डॉक्टर म्हणाले की काका आणि सदूच्या काळजाचं पाणी होतं असे. दोघंही काळीज घट्ट करत सगळं सहन करत. सदू आणि काका दोघे ही मग डोळे मिटून आण्णाबुवांचं स्मरण करत जप करायचे, बाहेर बाकावर बसून दवाखान्यातच. मग माई दोन तीन दिवसांनी घरी यायची. अशक्त पणा कमी झाला की हळू हळू पूर्ववत होत सदू आणि काकांच्यासाठी स्वयंपाक करायची. तोपर्यँत सकाळी काका स्वयंपाक करत आणि संध्याकाळी सदू कुठूनसा दोघांचा जेवणाचा डबा आणी. माई जेवायचीच नाही. त्यामुळे अगदी अशक्त होत गेली पुढे पुढे.

हे असं बरेच दिवस चाललं. पुढे मग बरेचवर्षांनी मी मोठा झालो आणि नोकरी धंद्या निमित्त घराबाहेर पडलो. इकडे पुण्यात फ्लॅट घ्यायचा म्हणून गावाकडचं ते खिडकीत बसून अभ्यास करायचो ते छोटं दोन खोल्यांचं घर विकलं आम्ही. जस ते घर विकलं तसं तिकडंच जाणं येणं कमी होत गेलं आणि हळूहळू मग गल्लीतल्या घरांचा संपर्कच तुटल्या सारखा झाला. बरेच दिवस मग नंतर सदूचा, कवठेकर काकांचा आणि माईचा विषय डोक्यातून विसरल्या सारखा झाला होता. आता ह्या गोष्टीला कित्येक वर्षं उलटून गेली. पण परवा अचानक सदुचा आणि माझा असा दोघांचा गल्लीतला मित्र भेटला. शिवाजी नगर स्टेशनवर. अजय पूर्णपात्रे. मी त्याला चटकन ओळखलंच नाही. पण पाठमोरा गेला तेंव्हा त्याची ती चालण्याची लकब पाहिली आणि मग खात्री पटली. त्याला मग घरी चल असं सहज म्हणालो. तो ही चटकन हो म्हणाला. बोलता बोलता सदुचा, कवठेकर काकांचा आणि माईचा विषय निघाला. अजय पूर्णपात्रे आणि मी दोघेही गहिवरल्यासारखे झालो. “ सदू काय करतो रे हल्ली? ” अजय पूर्णपात्रे भेटला म्हणून समजलं. नाही तर कदाचित समजलंच नसतं. त्याच्या कडून तिघांबद्दल समजलं ते असं...

सात आठ वर्षांपूर्वीच माई गेली. पुढच्या वर्षभरातच, माईंचं वर्षश्राद्ध अगदी तोंडावर असताना कवठेकर काका पण गेले. सदू ह्या सगळ्या कूतरओढीमध्ये बऱ्यापैकी हुशार असून सुद्धा धड काहीच शिकू नाही शकला. अर्धवट कॉलेज केलं आणि चरितार्थासाठी मग एकेठिकाणी जुजबी नोकरी करू लागला गावातचं. पण तिथे ही त्याचं फारसं काही मन आणि चित्त टिकलं नाही. लहानपणापासून आण्णाबुवाचं त्याला वेड होतच. मग माई आणि काका गेले तसा एकटा घरी राहून काय करणार म्हणून मठातच राहू लागला. तिथलीच मग निगराणी करतो मठाची. आणि तिथेच राहतो. असेल उत्सव किंवा गुरुवार चा मठातला कुणाचा प्रसाद वगैरे असेल तर जेवतो, अन्यथा “आज उपास आहे” असं म्हणत भुकेल्या पोटीच झोपतो जप करत. घर आता तसंच आहे. मुंग्याच वारूळ होऊन आणि कोळिष्टकं जमून आता तेही राहण्याच्या अवस्थेत नाही. जवळ जवळ सन्यासच घेतल्याने सदू चा लग्नाचा विचार नाही. कुणी म्हणतं माई चा वेडसर पणा त्याच्यातही उतरलाय. कोण देणार त्याला मुलगी?

माई गेल्यानंतर कवठेकर काकांनी थोडी माईच्या माहेरच्या गावातल्या लोकांकडून आणि इतर शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून माहिती गोळा केली. स्वतः ची ओळख लपवून खरं काय ते समजावं म्हणून. ते ही फक्त आयुष्यातलं कधी न समजलेलं एक गूढ प्रकाशात यावं म्हणून. फायदा तर काहीच नव्हता आता माई गेल्यानंतर तिच्या ‘लग्ना आधीच्या त्या हिस्टरी’ चा हे त्यांनाही माहिती होतं. पण त्यानंतर अर्धवट असं काहीतरी समजलं तिच्या पूर्वायुष्या संदर्भात. जितकं अर्धवट तितकंच विचित्र! माईचा लग्नाआधी गर्भपात केला गेला होता. तिच्या मनाविरुद्ध. तिला दोन घर सोडून पलीकडे राहणाऱ्या आळीतल्याच घारपुऱ्यांच्या नारायण पासून दिवस गेले होते. त्या गर्भपात नंतर धक्क्यानं माईला असा त्रास लग्नाआधी प्रथम एकदा झालेला होता. पण माईचे भाऊ माईच्या चौदाव्याला नरसोबाच्या वाडीला आले तेंव्हा कवठेकर काकांना त्राग्यानं, "आमच्या घराण्याची अब्रू धुळीस मिळवण्यासाठी काहीही उठवलंय हराम्यांनी...जागा दिली नाही ना मी, वाटणीची त्यांच्या....धुतल्या तांदळासारखी स्वच्छ होती आमची माई मी तुमच्या घरी दिली तेव्हा... मेल्या वर तरी तिला सोडा रे sss " असं माईचे भाऊ पोट तिडिकीनं बोलले कवठेकरकाकांना! आणि क्षणार्धात दोघे ही एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेऊन अंगरखा भिजेपर्यंत रडले माईच्या आठवणीनं कासावीस होत, बोडक्या डोक्यानं तळपत्या उन्हात. सदूही त्या दिवसापासून मठातून परत कधीच घरी गेलेला नाही.

चारुदत्त रामतीर्थकर
२६ ऑक्टोबर १८, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमची ही कथा नावाशिवाय व्हाटस अँप वर फिरते आहे. आजच एका ग्रुप मध्ये आली. पाठवणार्याला पण नाव माहिती नाही लेखकाचं!

प्रतिसादा बद्दल धन्यवाद चैतन्य जी !

किल्ली जी, :- अरे वा , इतक्यात व्हाट्सअप वर सुद्धा आली काय ? सकाळीच तर लिहिली होती बसून आज.

व्हाट्स अँप वर फिरताना लेखकाचं नाव नाही ह्यात विशेष काही नाही...पात्रांची नावं नाही ना काढून टाकली?...ती तरी तशीच ठेवली असली म्हणजे मिळवलं.

मागे एकदा लेखात एवढे फेरफार करून फिरला होता एक लेख, की माझाच विश्वास बसेना, लेख आपलाच आहे ना नक्की ह्याचा. असो. जितक्या लोकांना वाचायला मिळेल तितके समाधान. " नावात काय ? शेक्सपियर वगैरे वगैरे... " आहेच शेवटी.

मी त्यांना लेखकाचं नाव सांगितले आणि एडिट करायला लावली, तेवढाच हातभार .. छान आहे कथा हे सांगायचं राहील