प्रेम तरंग

Submitted by Asu on 21 October, 2018 - 21:44

प्रेम तरंग

हृदयीचे तरंग माझ्या
तुझ्या हृदयी उठतील का ?
मुक्या भावना अंतरीच्या
बोल तयांना देशील का ?

उजाड रानी निष्पर्ण वृक्षी
पक्षी होऊन बसशील का ?
भर दुपारी ग्रीष्मकाळी
गीत माझे गाशील का ?

तृषार्त चातका वर्षासमयी
घन बरसून जाशील का ?
उघड्या चोची अलगद पडण्या
थेंब होऊन येशील का ?

स्वप्न वेडी स्वप्न माझी
उघड्या नयनी दिसतील का ?
गूढ मनाच्या स्तब्ध डोही
प्रेम तरंग उठतील का ?

आग लावुनि स्वतः जळणे
असे कुठे असेल का ?
तुझे नि माझे प्रेम दिवाणे
जगात कुठे दिसेल का ?

- प्रा.अरुण सु. पाटील (असु)
(दि.21.10.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults