अशी ही बनवाबनवी

Submitted by प्रकाशपुत्र on 24 September, 2018 - 00:34

आज व्हाट्सअँप वरती एक मेसेज आला कि 'अशी ही बनवाबनवी' ला ३० वर्षे पूर्ण झाली. ते वाचून मला बनवाबनवीबद्दल काहीतरी लिहावे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. २३ सप्टेंबर १९८८ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. या पिक्चरला लोकांनी अफाट प्रेम दिले. हा पिक्चर अफाट गाजला आणि अजूनही गाजतोच आहे. 'Cult Following' असं जे म्हणतात ते या पिक्चरला मिळाले. मी दादा कोंडक्यांच्या जमान्यातला नाही, त्यामुळे त्यांचे चित्रपट किती गाजायचे याचा मला प्रत्यक्ष अनुभव नाही, पण त्याबद्दल ऐकून आहे. तेवढेच किंवा जास्तच प्रेम बनवाबनवीला मिळाले. दादांचे चित्रपट आता एवढे बघितले जात नाहीत, पण बनवाबनवी अजूनही कायम बघितला जातो, बाप आपल्या मुलांना त्याची ओळख करून देतो आणि पुढची पिढीपण बनवाबनवीच्या प्रेमात पडती. मी अमेरिकेत शिकायला आलो तेंव्हा Torrent वरून जे काही चित्रपट डाउनलोड करून बघितले त्यात पहिल्यांदा होते ते म्हणजे बनवाबनवी, एकापेक्षा एक, गोलमाल आणि अंगूर. (आतातर सगळंच युट्युबवर उपलब्ध असते, तरीपण कधीकाळी प्रलय आला आणि इंटरनेट नसेल, तर हाताशी असावेत म्हणून या सगळ्या पिक्चरच्या CD /DVD मी साठवून ठेवल्यात.) माझी मुलगी मोठी झाल्यावर, पालकांवर जी नैतिक जबाबदारी असती, ती जबाबदारी मी हे सगळे पिक्चर तिला दाखवून पार पाडलीय.

आत्तासुद्धा जेंव्हा हा लेख मी लिहायला बसलो तेव्हा बनवाबनवीतले प्रसंग आठवून हसू यायला लागले आणि मग बनवाबनवी परत बघायला लागला आणि म्हणूनच लेख पूर्ण करायला वेळ लागला. मी बनवाबनवी पहिल्यांदा केंव्हा बघितला हे मला लख्ख आठवतंय. माझ्या वडिलांची सगळी भावंडे आणि त्यांची सगळी मुले दिवाळीला आजी आजोबांकडे सांगलीला जमली होती. स्वतःहून पिक्चरला जाण्याची परवानगी मागण्याचे वय झाले नव्हते, चोरून जाण्याची अजून सवय लागली नव्हती (ती पुढे लागली आणि त्यावर एक कादंबरीचं होईल), त्यामुळे आम्हाला मोठ्या भावंडांवर किंवा काकांवर अवलंबून राहावे लागायचे. मुंबईचा कॉलेजला असणारा एक चुलतभाऊ सांगलीला आला होता, मग आम्ही त्यालाच खुप गळ घातली आणि तो मग आम्हाला घेऊन गेला. सांगलीला त्यावेळी एकंदर नऊ चित्रपटगृहे होती आणि त्याची सगळी नावे मला त्यावेळी (आणि अजूनही ) पाठ होती. माझी एक गंमतच होती, कुठलं गाव किती मोठे आहे याचा अंदाज मी तिथे किती चित्रपटगृहे आहेत यावरून लावायचो. त्यामुळे एखादा चुलतभाऊ किंवा मामेभाऊ आमचं गाव एवढं मोठं आहे वगैरे सांगू लागला तर मी त्याला तिथे थिएटर्स किती आहेत ते विचारायचो आणि त्या गावाची सांगलीशी तुलना करायचो.

सांगलीला त्यावेळी गावभागातच 'जयश्री' म्हणून थिएटर होते (आता ते पाडून तिथे मोठी इमारत झालीय) आणि बनवाबनवी जयश्रीला लागला होता. आम्ही सगळे दिवाळीचे नवे कपडे घालून बनवाबनवीला गेलो. तुफान गर्दी, तिकिटे ब्लॅकनेच घ्यावी लागली. त्यावेळी बाल्कनीचे तिकीट फक्त ४-५ रुपये होते. बनवाबनवीने त्यावेळी तीन कोटींचा व्यवसाय केला, आजची तुलना केली तर ते जवळपास ७०-८० कोटी होतील. त्यावेळी मला अजून एका गोष्टीचे आकर्षण वाटायचे ते म्हणजे मध्यंतरात मिळणारा वडा-पाव. सांगलीतला वडा मुंबई-पुण्यापेक्षा वेगळा. सांगलीत गोल आणि खुप मोठा वडा मिळायचा. वड्याचा पापुद्रा खुप जाड असायचा. त्या वड्याबरोबर त्रिकोणी पाव मिळायचा. वडा -पावची किंमत फक्त सव्वा रुपया.

तर ती बनवाबनवीशी पहिली ओळख, मग असंख्य वेळेला तो पिक्चर बघितला, मित्रांबरोबर बघितला, नातेवाईक आले कि व्हिडिओ आणून बघितला. गणपतीला आमच्याकडची मंडळे व्हिडिओ आणून किंवा पडद्यावर पिक्चर दाखवायची, तिथे परत बघितला. अमेरिकत आल्यावर जेंव्हा जेंव्हा आपल्या मातीची आणि आपल्या माणसांची ओढ लागायची तेंव्हा तेंव्हा अशा पिक्चरनी आणि गाण्यांनी जीवन सुसह्य बनवले. अमेरिकेत शिक्षण घेत असताना तर दाक्षिण्यात रूममेट्सनासुद्धा बनवाबनवी आवडला होता. आता तर बनवाबनवी युट्युबवर सारखा बघितला जातो.

बनवाबनवी हा निखळ व्यावसायिक पिक्चर आहे, निखळ मनोरंजन, कसला संदेश द्यायची फुशारकी नाही, एक साधीसुधी कलाकृती, पण मनाला भिडणारी. एक गोष्ट खुप जणांना माहित नाही, ती म्हणजे, बनवाबनवी घेतलाय ह्रिषीकेश मुखर्जीच्या 'बीवी और मकान ' या १९६६ च्या चित्रपटावरून. त्यात होते विश्वजीत आणि मेहमूद. पण सचिनने एक सच्ची मराठी कलाकृती बनवलीय. मला डायरेक्टर सचिन हा ऍक्टर सचिनपेक्षा जास्त आवडतो. सचिनचा अभिनय मला थोडा कृत्रीम वाटतो. सचिन अभिनय करताना खूप जास्त प्रयत्न करतोय असं वाटतं. पण बनवाबनवीत सचिनने सुधाचा अभिनय खुप छान केलाय. सुधीरपेक्षा सुधाच्याच भूमिकेत सचिन जास्त रमलाय असं वाटतं. सराफमामांबद्दल काय बोलायचं ? लक्ष्याबरोबरचे किंवा सुधीर जोशींबरोबरचे सराफमामांचे सगळे सीन्स हिट. एक साधारण रूपाचा कलाकार, यथा तथा नाच करणारा, निव्वळ अभिनयाच्या जोरावर किती पुढे जाऊ शकतो हे सराफमामांकडे बघून पटते. सुधीर जोशींनी पुणेरी घरमालक काय रंगवलाय ? त्यांना बघताना आपण पिक्चर बघतोय असं वाटतच नाही, हे प्रत्यक्षात घडतंय असंच वाटतं. राहून राहून असं वाटतं की त्यांचे अजून २-३ सीन्स टाकायला पाहिजे होते.

बनवाबनवीचे संवाद तर तीस वर्षे झाली तरी अजून हिट आहेत. "धनंजय माने इथेच राहतात का ? " , "तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे", "हा माझा बायको, पार्वती ", "हि सुधा, त्याचा बायको", आठवून आठवून हसायला येतं . संवादाबरोबरच काही दृश्येतर कायमची डोळ्यांवर कोरली गेलीत. जेव्हा साडी नेसून लक्ष्या लीलाबाई काळभोरांकडे रिक्षातून जातो आणि जेव्हा तो रिक्षातून उतरतो, ते म्हणजे युद्धाच्या पावित्र्यातच, अशोकला त्याला सांगायला लागतं कि जरा बाईसारखे वाग म्हणून. जेव्हा पार्वतीला बाळ होणार म्हणून सगळे तिला भेटायला जातात तेव्हा पार्वती बिडी ओढत बसलेली असते तो प्रसंग. सचिन लक्ष्याला म्हणतो, "जाऊबाई", तर लक्ष्या म्हणतो, "नका बाई इतक्यात जाऊ". सगळे प्रसंग एकापेक्षा एक. अजूनही हे प्रसंग काही विनोदी गोष्टींसाठी आणि इंटरनेटवर मिम्ससाठी वापरले जातात. जेव्हा पंतप्रधान मोदी इस्त्रायलला चालले, तेंव्हा त्यांना "मधुमेहाचे औषध" आणायला सांगणे. कोर्टाने जेंव्हा समलिंगी संबंधांना मान्यता दिली तेंव्हा धनंजय मानेंचे "हा माझा बायको" हे वाक्य सांगून धनंजय मानेंना किती दूरदृष्टी होती हे सांगणे. या सगळ्या गोष्टीतून हा चित्रपट सतत जिवंत राहतो. मला सचिन, अशोक, लक्ष्याचा "एकापेक्षा एक " पण खुप आवडतो, पण त्याला बनवाबनवीएवढे Cult Following नाही लाभले.

बनवाबनवीला तीस वर्षे झाली, पार्वतीला बाळ झालं असतं तर ते तीस वर्षाचं झालं असतं आणि कदाचित त्यालाही घर शोधण्यासाठी अशीच धडपड करायला लागली असती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मिते खरंच?> हो ग Happy
मी आजही खळख्ळून हसते हा सिनेमा बघताना, एकुण एक डायलॉग मला आवडतो.>>>>>> तु अजुन १० वर्षांनी हेच सांग बघु मला Happy

तू काय माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठी आहेस काय Proud
मी आता आज घरी जाउन बघेन.

काही गोष्टी अवीट असतात गं त्यातला हा सिनेमा, बहुदा १० वर्षांनी पण मी सेमच म्हणत असेन

तू काय माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठी आहेस काय>>>> ऑ Uhoh असा अर्थ निघतोय काय? थांब एडिटते Lol असेन गं
काही गोष्टी अवीट असतात गं > >>>> हो. माझ्यासाठीही अवीट आहेत काही सिनेमे

सचिनचा शोलेच्या वेळचा किस्सा ऐकल्यापासून तो डोक्यात गेला. त्यामुळे त्याच्या पुढच्या सिनेमांविषयीची माझी मतं "नावडतीचं मीठ अळणी" या सदराखाली टाकता येतील.>>>>>. काय किस्सा आहे तो? लिहु शकाल अथवा त्याची लिंक देऊ शकाल का?

शोले सिनेमात सचिनने एके हंगलच्या मुलाचे पात्र रंगविले आहे. फारच छोटी भूमिका आहे. एका दृश्यात हेमा मालिनी, एके हंगल आणि सचिन आहेत. त्यात विडीच्या कारखान्यात काम करण्याविषयी हंगल आणि हेमा सचिनची मनधरणी करतात आणि सचिन नकार देत असतो असा प्रसंग आहे. या प्रसंगाच्या शुटिंगच्या वेळी अमिताभने सचिनला ते दृश्य नेमके कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले.

त्यावर सचिनने अमिताभला तुम्ही सिनेमात कधीपासून काम करता आणि आजवर किती सिनेमांत काम केले आहे? असा प्रश्न विचारला. अमिताभने आपण १९६९ पासून काम करत असून तोवर ३० सिनेमांत काम केल्याचे सांगितले. खरेतर ६ वर्षांत ३० सिनेमे आणि तेही एखाद दोन अपवाद वगळता बहुतेक सर्व नायक म्हणून हा आकडाही काही कमी नाही.

पण तरीही सचिनने त्याच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठ्या असणार्‍या अमिताभला आपण १९६२ पासून काम करीत असून तोवर ३०० सिनेमांत (हिंदी + मराठी - सारेच बालकलाकार म्हणून - तरीही ३०० हा आकडा फारच फुगवलेला वाटतो. असो. ) काम केल्याचे मोठ्या गर्वाने सांगितले.

अमिताभने मोठ्या नम्रपणे सचिनला तो अतिशय अनुभवी आणि महान अभिनेता असल्याचे मान्य करत त्याला अभिनय कसा करावा याविषयी पुन्हा कधीही सूचना न करण्याचे कबूल केले.

बाप रे! आपण वयाने किंवा अनुभवाने कितीही मोठे असलो तरिही कुणालाच असे बोलू नये, कारण कोण कधी काय शिकवण देऊन जाईल सान्गता येत नाही.
भलताच आहे की महागुरू Sad

सचिन च्या आत्मचरित्राच्या कार्यक्रमात अमिताभ खूप तारीफ करत होते. माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे यांना इ..

सचिन च्या आत्मचरित्राच्या कार्यक्रमात अमिताभ खूप तारीफ करत होते. माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे यांना इ.. >> तो अमिताभ चा मोठेपणा झाला. खरंतर कोणताच कलाकार कुणापेक्षा कमी किंवा जास्त नसतो. अनुभव प्रत्येकाला शहाणं करतो. पण दुर्दैवाने सचिन ला मी कधीच कुणाचे तोंड भरून कौतुक करताना पाहिले नाहिये.
चित्रपटसृष्टी खरंतर इतकी मोठी इंडस्ट्री आहे जिथे प्रचंड एक्स्पोजर मिळू शकेल/ शकते. पण त्याने त्याचे झाकून घेतलेले डोळे कधी उघडलेच नाहित बहुधा. Sad

दुर्दैवाने सचिन ला मी कधीच कुणाचे तोंड भरून कौतुक करताना पाहिले नाहिये.>>>>>> काय दक्षिणा? सचिन करतो की तोंडभरुन कौतुक. स्वतःचं.

अमिताभबद्दलचा हा किस्सा मी ही ऐकला आहे आणि नंतर आता आता मधे पण एका मुलाखतीमधे सचिन ने स्वतः सांगितलं आहे की मी अमिताभला सिनिअर आहे वगैरे

हा धागा बनवा बनवीच आहे. बनवा बनवी म्हणजे पुर्णपणे अशोक सराफ आणि लक्ष्या , मग वाटलं तर सचिन

काल घनचक्कर पाहिला.साधी भोळी स्टोरी वाला पिक्चर अशोक सराफ च्या अभिनयामुळे मजेदार झालाय.
तो एक शंभर नंबरी शुद्ध सज्जन कुणी कधी का पाहिलाय गाणं असलेला 2 जोडप्याचा पिक्चर आहे तो पण छाने.अन्यायी सावकार/सरपंच इरा मध्ये अशोक सराफ चे असे पिक्चर मस्त वेलकम चेंज होते.

Pages