चांदण वणवा (लावणी)

Submitted by Asu on 8 October, 2018 - 23:55

चांदण वणवा (लावणी)

चांदण वणवा पेटून उठला अवघ्या कायेतुनी
दिलवरा या ना हो परतुनी राजसा विनंती कळवळुनी
राजसा विनंती कळवळुनी

दिवसामागून दिवस चालले वर्षामागून वर्ष
विरहाग्नीने काया तापली मावळला हर्ष
किती पहावी वाट सजणा अश्रूधारा नयनी
पदरव ऐकता उगीच वाटे आले माझे धनी

चांदण वणवा पेटून उठला अवघ्या कायेतुनी
दिलवरा या ना हो परतुनी राजसा विनंती कळवळुनी
राजसा विनंती कळवळुनी

दिवस कसाही नकळत सरतो रात्र छळते उरी
वाटे चंद्र वेडावितो मज चांदण्यांसह अंबरी
दारे खिडक्या उघड्या ठेवून वाट पहाते दिनी
वाराही ना अंगी छळतो झाले मी विरहिणी

चांदण वणवा पेटून उठला अवघ्या कायेतुनी
दिलवरा या ना हो परतुनी राजसा विनंती कळवळुनी
राजसा विनंती कळवळुनी

बाग केळीची पहा बहरली हिरवी पानोपानी
केळफूल उमलून आले कुजबूज कानोकानी
पाण्यावाचून सुकेल केळी या हो सत्वर रानी
विहीर भरली काठोकाठ उपसा करावा कुणी

चांदण वणवा पेटून उठला अवघ्या कायेतुनी
दिलवरा या ना हो परतुनी राजसा विनंती कळवळुनी
राजसा विनंती कळवळुनी

हंड्या झुंबर पेटून उठले दीप लागले घरी
श्रृंगार करून माळून गजरा झाले मी बावरी
अवचित येता गार वारा चाहूल लागली मनी
प्रेमाचा वर्षाव होता मिटेल डोळ्याची पापणी

चांदण वणवा पेटून उठला अवघ्या कायेतुनी
दिलवरा या ना हो परतुनी राजसा विनंती कळवळुनी
राजसा विनंती कळवळुनी

- प्रा. अरुण सु. पाटील (असु)
(दि.08.10.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults

लावणी झकास जमली आहे. तुम्हावर केली च्या जातीची आहे.

धृपद पुन्हा पुन्हा लिहायची आवश्यकता आहे का ?
||धृ|| असे लिहीण्याची रीत आहे बहुधा.