अभूतपूर्व भयाविष्कार -तुंबाड' - (Movie Review - Tumbbad)

Submitted by रसप on 13 October, 2018 - 02:16

पाऊस, अंधार आणि एकटेपण, ह्या तिन्हींत एक समान धागा आहे. अजूनही असतील, पण एक नक्कीच आहे. तो म्हणजे 'भय'. अंधार आणि एकटेपणातल्या भयाचा अंश चित्रपटांतून व कथांतून अनेकदा समोर येतो, आला आहे. 'पाऊस' मात्र फार क्वचित अश्या रुपात समोर आला आहे.
'सत्या' मध्ये पावसाची एक मुख्य भूमिकाच होती. तो पाऊस 'सत्या'मध्ये मुंबईची ओळख देत होता. कथानकातल्या जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या प्रसंगात त्याची उपस्थिती, त्याची साक्ष होतीच. चित्रपटात पावसाचा इतका प्रभावी वापर 'सत्या'नंतर आत्ता वीस वर्षांनंतर 'तुंबाड' मध्ये दिसतो. अर्थात पावसाच्या ह्या दोन्ही भूमिका पूर्णपणे भिन्न आहेत. 'तुंबाड'चा पाऊस अनिश्चिततेचं गूढ भयप्रद सावट आणणारा आहे. त्याच्या सततच्या कोसळण्यातून एक उद्गार ऐकू येत राहतो. तो उद्गार हृदयाचा स्पंदनं वाढवतो, मन अस्थिर करतो. त्याचं कोसळणं नेहमीच अशुभ वाटतं आणि तरीही त्यात एक प्रकारची विचित्र अपरिहार्यताही अटळपणे जाणवत राहते. 'तुंबाड'च्या कथेचा अनन्यसाधारण महत्वाचा भाग - भय - हा ह्या पावसाने 'अंधार' आणि 'एकटेपणा'च्या जोडीने समर्थपणे पेलला आहे.
हे भय, ही भीती वेगळ्या प्रकारची आहे. तिचा जन्म लोभ, लालसेतून झाला आहे. इथली अमानवी शक्ती भुताची नसून देवाची आहे. इथला मनुष्य फक्त स्वत:च घाबरत नाही, तो त्या अमानव्यालाही घाबरवतो. किंबहुना, भय विरुद्ध भय असा हा सामना आहे, ज्यात अर्थातच भयाचाच विजय होणार असतो आणि होतोही.

ही कहाणी तीन कालखंडांत घडते. सुरुवात १९१८ मध्ये होते.
'तुंबाड' हे साताऱ्यापासून थोडं दूर असलेलं एक गाव. तिथला एक भयाण, गूढ वाडा. त्याचा मालक एक म्हातारा 'सरकार'. ह्या वाड्यात अमर्याद किंमतीचा खजिना लपलेला असल्याची निश्चित माहिती 'सरकार' कडे असते. पण अख्खं आयुष्य खर्ची पडूनही त्याला काही तिचा शोध घेता येत नाही.
मात्र त्याचा अनौरस पुत्र 'विनायक' ह्या संपत्तीच्या शोधाचा ध्यास घेतो. त्याच्या बालपणापासून ह्या कथानकाची सुरुवात होते. म्हाताऱ्या 'सरकार'च्या मृत्युनंतर आईच्या हट्टामुळे त्याला 'तुंबाड' सोडावं लागतं. मात्र पंधरा वर्षांनंतर त्याचा ध्यास त्याला पुन्हा तिथे यायला भाग पाडतो.
कहाणीचा तिसऱ्या भागात लोभ आणि स्वैराचारात गुरफटलेला विनायक त्याच्या मुलाला ह्या शोधाचा लोभी वारसा सोपवतो. आत्तापर्यंत भारत स्वतंत्र होऊन संस्थानं आणि राजांच्या मालमत्तांचं विलिनीकरण सुरु झालं असतं. 'मग त्या खजिन्याचं, वाड्याचं काय होतं?' हा प्रश्न चित्रपट पाहूनच सुटेल.

नारायण धारप ह्यांच्या एका कथेवर बेतलेला हा चित्रपट लेखक-दिग्दर्शक राही अनिल बर्वे ह्यांचं एक 'ड्रीम प्रोजेक्ट' आहे. हे स्वप्न सत्यात उतरायला अनेक पावसाळे जावे लागले आहेत. बऱ्याच संघर्षानंतर त्यांच्या ह्या स्वप्नाचं जे सत्यस्वरुप समोर आलं आहे, ते पाहता 'the wait was worth it' असंच म्हणावं लागेल ! पटकथेवर अनेक वर्षांचे संस्कार झाल्याने खूप विचारपूर्वक तिची अगदी घट्ट अशी बांधणी झाली आहे. अनावश्यक रेंगाळणं वगैरेला इथे बिलकुल स्थान नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षक अनिश्चित भयाच्या सावटाखाली राहतो, त्याला अजिबात उसंत मिळत नाही. हे कथानक काही action packed किंवा सतत हेलकावे आणि वळणं घेणारं थरारनाट्य नाहीय. ह्यात धक्कातंत्र नाहीय. मात्र तरीही गूढ आणि भयाचा ताण मनावरून कुठेच हलका होता होत नाही.

प्रेक्षकाच्या मनावरची ही पकड ढिली न होऊ देण्याचं श्रेय कमालीच्या साउंड डिझाईनिंगचंही वाटलं. आधीच म्हटल्याप्रमाणे पावसाचा आवाज हा ह्या साउंड डिझाईनिंगमधला एक महत्वाचा भाग आहेच. मात्र त्याशिवायही अनेक ठिकाणी बारकाईने काम केलं आहे.
जोडीला प्रभावी पार्श्वसंगीत सगळी तीव्रता अजून वाढवतं. एरव्ही भयपटांमध्ये पार्श्वसंगीताचं एक महत्वाचं काम 'भो:' करून घाबरवण्याचं असतं. इथे असला कुठलाच ढणढणाट नाही. घाबरवण्यासाठी, अस्सल भयनिर्मिती करण्यासाठी असल्या उसनेपणाची गरज 'तुंबाड'ला भासतच नाही.

संपूर्ण कथानक महाराष्ट्रात आणि मराठी पात्रांचंच असल्याने साहजिकच पडद्यावरील कलाकारांचे हिंदी उच्चार मराठाळलेले असणं आवश्यक होतं. इथे अनिता दाते, दीपक दामले सारखे मराठी सहकलाकार आहेतच मात्र प्रमुख भूमिकेत असलेला सोहम शाह आणि इतर काही सहकलाकार अमराठी आहेत. तरीही त्यांचे हिंदी उच्चार सफाईदार वाटणार नाहीत ह्याची खबरदारी घेतली गेली आहे, हे खूप वाखाणण्याजोगं वाटलं. बालकलाकार मोहम्मद समादकडूनही ह्यासाठी मेहनत करवून घेतली असल्याचं अगदी स्पष्टपणे जाणवतं.

'तुंबाड' हे शंभर वर्षांपूर्वीच्या काळात घडणारं कथानक आहे. तेव्हाचा भूभाग, राहणी, घरं हे सगळं खूप अस्सल वाटेल अश्या प्रकारे चित्रित करण्यात आलं आहे. वारंवार हा उल्लेख होतो आहे, पण 'पाऊस' वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या रूपांत अप्रतिम सादर केला आहे. वाडा, त्याच्या आतला भाग आणि गुहा व इतर गूढगम्य जागा ह्यांचं चित्रण अंगावर येतं. ह्या अंगावर येण्यामागे 'किळस' किंवा 'बीभत्सपणा' नसून त्यातून सतत डोकावणारं 'भय' आहे.

सर्वच्या सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय, घट्ट बांधलेली व वेगळेपण असलेली कथा-पटकथा, पकड घेणारं ध्वनीदिग्दर्शन व पार्श्वसंगीत, भेदक नजर असलेलं कॅमेरावर्क, लोभ व लालसेने बरबटलेला मानवी चेहरा, दैवी शक्तीचं दानवी रूप अश्या सगळ्यांतून 'तुंबाड' नावाचा एक अभूतपूर्व भयाविष्कार दृश्य स्वरूप घेतो. मोठ्या पडद्यावर आणि दमदार आवाजासह हा अनुभव घेणं केवळ चित्तथरारक आहे. चित्रपटाची लांबी फक्त पावणे दोन तासांची आहे, हेही विशेष उल्लेखनीय आहे.
सहज विकल्या जाऊ शकणाऱ्या इतर काही चित्रपटांसमोर हे वेगळं प्रोडक्ट बाजारात फार काळ टिकेलच, ह्याची दुर्दैवाने खात्री देता येत नाही. मात्र चित्रपट पाहताना पाहणाऱ्याच्या पाहण्याची धैर्यपरीक्षा 'तुंबाड'च्या भयाकडून घेतली जाईल, ह्याची खात्री नक्कीच देता येईल.

रेटिंग - * * * * *

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2018/10/movie-review-tumbbad.html

"तुंबाड"
दिग्दर्शन : राही अनिल बर्वे, आनंद गांधी
निर्मिती : सोहम शाह, आनंद एल. राय, मुकेश शाह, अमिता शाह
पटकथा : मितेश शाह, आदेश प्रसाद, राही अनिल बर्वे, आनंद गांधी
कलाकार : सोहम शाह, अनिता दाते, मोहम्मद समाद, दीपक दामले
संगीत : अजय-अतुल, जेस्पर किड
छायाचित्रण : पंकज कुमार
संकलन : संयुक्ता कज़ा
ध्वनी : ध्रुव पारेख, कुणाल शर्मा
Picture1_3.jpg

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद !
उत्तम परीक्षण !!
नक्की पाहणार !!!

पाहिला आत्ताच. मस्ट वॉच.

भय व त्यावर मात करणारी लालसा...अप्रतिम चित्रण.
पार्श्वसंगीत अतिशय सुरेख.... एकही प्रसंग अथवा संवाद जास्तीचा नाही. पण संवाद अगदी कान देऊन ऐकावे लागतात, विशेषतः सुरवातीचे.