तू का राम?

Submitted by झुलेलाल on 10 October, 2018 - 13:55

डॅशिंग आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या कारवायांच्या कहाण्या म्हणजे आजकाल अविश्वसनीयच वाटाव्यात असेच प्रकार असतात.
नाशिक मनपाचे आयुक्त असलेल्या मुंढे यांनी आजही अशीच धडक कारवाई केली.
नवरात्रीनिमित्त कालिका मंदिरात तुकाराम मुंढे आरतीकरिता पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी मंदिरात आणि प्रसाद स्टॉल्सवर त्यांना प्लास्टिक दिसले. राज्यात प्लास्टिकबंदी असूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पाहून, आयुक्त तुकाराम मुंढे चांगलेच भडकले. आरती होताच, मुंढे यांनी सर्व प्रसाद स्टॉल्सची अचानक पाहणी केली, आणि प्लास्टिक न हटविल्यास, दुकाने हटवू असा इशारा दिला.
***
ही बातमी वाचली आणि अशाच एका कारवाईचा कुणाकडून तरी ऐकलेला एक किस्सा आठवला. ती कारवाई करणारा अधिकारी कोण होता माहीत नाही. पण तो किस्सा ऐकल्यावर मात्र, डॅशिंग मुंढेच डोळ्यासमोर आले.
तो किस्सा सांगायलाच हवा...
तर, अशाच एका डॅशिंग अधिकाऱ्याची एका शहरात बदली झाली. (डॅशिंग अधिकारी एकाच ठिकाणी फार काळ राहात नसतात.) योगायोगाने, त्याच शहरात त्या अधिकाऱ्याची बहीण राहात होती. ज्या कार्यालयात या अधिकाऱ्याची नेमणूक झाली, त्याच कार्यालयात त्याच्या या बहीणीचा नवरा नोकरी करत होता.
आपला भाऊ आपल्या गावात आला आहे म्हणताना, बहिणीने एकदा प्रेमाने त्याला घरी जेवायला बोलावले. मेव्हणा जेवायला येणार म्हणून तिचा नवरा अंमळ उशिरापर्यंत कामावर गेलाच नाही. दुपारी हा अधिकारी बहिणीकडे आला, सगळे मिळून छान गप्पाबिप्पा मारत जेवले, थोडा वेळ थांबून हा अधिकारी आपल्या आॅफिसात परतला.
केबिनमधे जाताच त्याने स्टेनोला बोलावले. आणि भराभरा डिक्टेशन दिले.
ते वाचून स्टेनोची गाळण उडाली.
ज्या मेव्हण्याच्या घरी साहेब जेवायला गेले होते, त्यालाच कारवाईची नोटीस देणारे ते पत्र होते!
ड्यूटीवर असताना घरी थांबल्याबद्दल कारवाई का करू नये याची विचारणा करणारी नोटीस!
... बिचारा मेहुणा, पाहुणचार आटोपल्याच्या समाधानाने थोडा उशिरा आॅफिसात आला, अन् ही नोटीस त्याच्या हातात पडली!

असा तो कडवा शिस्तप्रिय अधिकारी!
मुंढेच्या प्लास्टिक कारवाईच्या बातमीवर गप्पा मारताना हा किस्सा आजच मला कुणीतरी सांगितला आणि मुंढेच आठवले!

पण लगेच एक प्रश्न मनात आला.
ड्यूटीवर असताना घरी थांबल्याबद्दल मेहुण्याला नोटीस देणारा तो अधिकारीदेखील, ड्यूटीवर असतानाच तर बहिणीकडे जेवायला गेला होता.

... मुंढे असते तर त्यांनी काय केले असते??

Group content visibility: 
Use group defaults

तो अधिकारी फक्त दीड ते दोनच्या दरम्यानच म्हणजे लंच च्या वेळेतच जाऊन ,वेळेवर ऑफिसात परत आला असेल. काय सांगावे, बहिणीला त्याचा स्वभाव माहीत असल्याने, जेवणाचे पदार्थ सुद्धा भरभर खाण्यासारखे असावेत.

हीच घटना जर का प्रायव्हेट कंपनी मधे घडली असती तर हा माणूस असा उशीरा गेला असता का? गेला असता तर त्याच्या साहेबानी त्याला समज / नोटीस दिली नसती का? घरी काही काम असल्यास परवानगी घेऊन उशीरा जाणे आणि न सांगता उशीरा उगवणे ह्यात काही फरक नाही का? प्रायव्हेट कंपन्यांमधे कामाबद्दल, उपस्थिती बद्दल जे नियम / अपेक्षा असतात तेच सरकारी ऑफीसेस ना का लागू होत नाहीत? वेतन आयोगा नुसार पगारवाढ तर न चुकता मिळते, मग कामाचे किंबहुना कर्तव्याचे काय ?

सरकारी अधिकारी बाबु उगाच माजलेले नाहीत दहावा आयोग पण द्या यांना, आपण भरु टँक्स आणि मरेपर्यंत देऊ यांना कडक पेंशन

आमची सरकारी नोकरी मस्त सुरु आहे. नावापुरतं काम करायचं नाही केलं तरी कोणी काय बोलत नाही. प्रायवेट कंपनीचे एम्प्लॉयी दिवस रात्र मेहनत करून आमच्या कामाची भर काढतात. बिचार्यांना कमी पगारात राबवून घेतात मिळणारा मोबदला त्यांच्या साहेबांच्या आणि आमच्या खिशात. पाचही बोटं मस्त लोण्यात बुडालेली आहेत आमची. Happy