भयकथा: त्या वळणावर..

Submitted by निमिष_सोनार on 8 October, 2018 - 11:23

"भेटलास का तू धर्मेंद्र साहेबांना? झालं ना तुझं काम?", जितेंद्र मला फोनवर म्हणाला.

"अरे, काम झालं. अगदी मनासारखं. हा क्लायंट मला मिळाला. धर्मेंद्र साहेबांकडे माझ्याखातर शब्द टाकल्याबद्दल धन्यवाद. मी त्यांच्यासोबत चांगला बिझिनेस करून त्यांचे मन जिंकेल, चांगल्या दर्जाचे प्रॉडक्ट त्यांना देऊन तू त्यांना माझ्यासाठी दिलेला शब्द सार्थ करून दाखवेन!", मी म्हणालो.

आता रात्रीचे आठ वाजून गेले होते. हे काम सहा वाजता आटोपणार होते पण होता होता या ना त्या कारणाने उशीर झाला.

मी जितेंद्रच्या शहरात म्हणजे अलकापूरला आलेलो होतो. मागे दोन्ही वेळेस येथे आलो होतो तेव्हा जितेंद्रकडेच मुक्काम केला होता आणि सकाळी माझ्या गावी गेलो होतो पण आज तो दुसऱ्या गावी गेलेला होता म्हणून आता कोणत्यातरी हॉटेलमध्ये जेवण करून माझ्या सेकंड हँड कारमध्ये बसून मी रात्रीच माझ्या गावी परतणार होतो. माझ्या व्यवसायाची ही सुरुवातच होती आणि अलकपूरचा हा क्लायंट मिळवायला जितेंद्रची मदत मोलाची ठरली होती.

या क्लायंटने जर प्रॉडक्टची प्रशंसा केली तर आणखी त्याच्या ओळखीचे लोक मला क्लायंट म्हणून लाभणार होते...

जितेंद्रने मला जेवणासाठी स्टेशनजवळच्या एका हॉटेलचे नाव सुचवले आणि एक सावधगिरीची सूचना सुद्धा केली, "किशोर, एक तुला सांगायचंय! रात्री गाडी चालवतांना सेतूगांव फाटा पार केल्यानंतर थोड्याच वेळात घाटाचा चढाव लागतो आणि त्यावर जे पहिलं धोकादायक वळण लागतं ना, तेथे सावध राहा फक्त, बाकी काही नाही! तेथे थोडं जास्त घनदाट जंगल आहे आणि..."

"सावध म्हणजे? अँक्सिडेंट होईल म्हणून म्हणतोयस ना? नाही रे, मी गाडी रात्रीची हळूच चालवेन. काळजी करू नकोस!" मी त्याला म्हणालो.

"अरे तसे नाही, तू तर गाडी काळजीपूर्वक चालवशीलच, मला माहिती आहे, पण मी वेगळ्याच बाबतीत सावध राहा असे सांगतोय, तू विश्वास ठेव अगर नको ठेऊस पण, माझं तुला सांगणं आणि सावध करणं भाग आहे!"

"अरे जितेंद्र सांग ना, काय नेमकी भानगड आहे ती?"

"ते वळण लागलं की बाजूच्या जंगलातून हिरव्या साडीतली एक स्त्री रस्त्यावर येते आणि आपल्या गाडीसमोर येऊन उभी रहाते...सगळ्यांनाच नाही पण काही जणांना असा अनुभव आला आहे. तू फक्त एकच करायचं, गाडी थांबवायची नाही. थांबलास तर संपशील!"

मी हसायला लागलो कारण असल्या गोष्टींवर खरंतर माझा विश्वास नव्हता कारण अशा गाडीसमोर स्त्री येऊन उभ्या राहण्याच्या असंख्य गोष्टी मी कथा, कादंबऱ्या, चित्रपट आणि मालिकांमधून पहिल्या होत्या. मनोरंजन म्हणून ठीक आहे पण खऱ्या आयुष्यात असल्या गोष्टींची भीती बाळगायची म्हणजे जरा अतिशयोक्ती होते.

पण तरीही त्याच्या समाधानासाठी मी म्हणालो, "हो नक्की जितेंद्र, मी योग्य ती काळजी घेईन!"

"ठीक आहे, चल बाय! हॅप्पी जर्नी आणि बेस्ट लक!"

जितेंद्रने फोन ठेवला आणि मी हॉटेलच्या रस्त्याला गाडी वळवली. हॉटेल चांगले होते. मी मलई कोफ्ता आणि तंदुरी रोटी मागवली. दोन्ही पदार्थांची चव खरोखरच सुंदर होती.

मी बिल दिले आणि गाडी स्टार्ट केली, सीट बेल्ट बांधला. साडेनऊ वाजले होते.

या शहरात उगाच महागड्या लॉज किंवा हॉटेलमध्ये मुक्काम करून काही साध्य होणार नव्हते आणि तसेही उद्या मला सकाळी दहा वाजता आणखी एका सरकारी क्लायंटला भेटायचं होतं, तशी त्यांना वेळ दिलेली होती. तो क्लायंट राजकारणी लोकांशी संबंध ठेऊन होता. त्याला दिलेली उद्याची वेळ पाळणं आवश्यक होतं. मी सकाळी पाच पर्यंत गावी पोहोचणार होतो. आणि आईही गावी एकटी होती....

शहराबाहेर पडेपर्यंत साडेदहा वाजले होते, आता शहरातील नेहमीची रहदारी मागे पडून हायवेची रहदारी सुरू झाली. रस्त्यांवर वेगाने वाहणारे अवजड ट्रक जास्त संख्येने दिसायला लागले, तुरळक कार आणि टेम्पो होतेच!

जितेंद्रने सांगितलेले तो फाटा रात्री सव्वा अकरा वाजता आला. किंबहुना तो फाटा आल्यावर मला अचानक जितेंद्रने सांगितलेली त्या बाईची गोष्ट आठवायला लागली. मला मनातल्या मनात हसायला आले पण कुठेतरी मनातल्या एका कोपऱ्यात थोडीशी भीतीची लहर घर करून बसलेली दिसली...

त्या फाट्यावर मी थांबलो. थोडा चहा घेतला. मी बहुदा त्याचं शेवटचं गिऱ्हाईक होतो. माझं पिऊन झालं की तो दुकान बंद करण्याच्या तयारीत होता. दूरवर एखाद दुसरी झोपडी आणि दोन चार मिणमिणत्या पणत्या एवढेच दिसत होते, मग संपूर्ण रास्ता सुनसान होता, निर्मनुष्य होता. टपरी वाल्याला पैसे दिले आणि तो टपरी बंद करून निघून गेला. तिथला बाकड्यावर थोडा वेळ मी तसाच बसून राहिलो.

बराच वेळ तसाच बसून मी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे बघत बसलो. गाडी सतत चालवण्याने थोडासा थकवा आला होता, तो चहाने जरा दूर झाला होताच. पाचेक मिनिटांत पुन्हा गाडी सुरू करून पुढच्या प्रवासाला निघू म्हणून मी थोडं तसाच बसलो. आईला रात्रीच जेवण झाल्यानंतर मी निघतोय काळजी न करता झोप असे बजावले होते.

हायवेवर समोर दूरवरून एक लायटिंग लावलेला ट्रक मला येतांना दिसला आणि का कोण जाणे त्याच्या केबिनमध्ये असलेल्या निळ्या पिवळ्या लाल अशा म्युझिकप्रमाणे बदलणाऱ्या लाईट्सच्या प्रकाशात बसलेला ड्रायव्हर मला अतिशय बर्फासारखा आणि झोपलेल्या माणसासारखा थंड आणि काहीही हालचाल करत नसलेला असा दिसला....

त्याचे डोळे उघडे होते आणो त्याने नुसतंच स्टीयरिंग व्हील हातात धरलेलं होतं पण तो निश्चल बसून होता तरीही निर्विकारपणे ट्रक आपला पुढे जातच होता. त्याचे हात थोडेसेही हलत नव्हते. थोडं विचित्र वाटत होतं.

"चला निघू, या ट्रकच्या मागोमाग जाऊ" असा विचार करून मी गाडीत बसलो आणि गाडी सुरू केली. वेगाने त्या ट्रकचा पाठलाग करून जवळ जाऊन बघूया नेमका काय प्रकार आहे ते!थोडा टाईमपाससुद्धा होईल आणि जितेंद्रने सांगितलेल्या त्या बाईची भीतीसुद्धा कमी होईल....

त्याने सांगितलेले ते वळण आता घाटातल्या चढणीवर येणारच आहे. त्या बाईने यदाकदाचित पकडलंच समजा तर आधी ती त्या ट्रक ड्रायव्हरला पकडेल. तिला पाहून घाबरल्याने कदाचित त्या ट्रक ड्रायव्हरमध्ये थोडीशी जान तरी येईल, असा विचार करत मी स्वतःशीच हसलो आणि गाडी चालवत राहिलो. मी माझ्या आवडीची गाणी लावली...

नाहीतरी व्यवसायनिमित्ताने मला कारमधून रात्री बेरात्री प्रवास करण्याचे प्रसंग येणारच होते, अशा ऐकीव भूत कथांना मी घाबरून घरीच बसून राहिलो तर काय होईल?

माझ्या कारचा वेग वाढवून मी आता त्या ट्रकचा पाठलाग करू लागलो. घाट सुरू झाला. चढ सुरू झाला. मी त्या ट्रकच्या "सुरक्षित अंतर ठेवा" पेक्षाही जवळ गेलो आणि अचानक बघतो तो काय?

तो ट्रक ड्रायव्हर अचानक त्याच्या केबिनच्या उजव्या बाजूची खिडकी उघडून तसाच पूर्वीच्याच निर्विकारपणे माझ्याकडे मागे वळून बघायला लागला. बघतच राहिला. त्याचे डोळे वाजवीपेक्षा जास्त मोठे होते! पापण्या न लवता एकसारखा माझेकडे तो बघत होता!!

"अरे बापरे, हा एकसारखा मागे पाहतोय, किती भयानक वाटतंय ते! आणि मागे बघता बघता याचा ट्रक कसा काय आपोआप पुढे चाललाय? कसे शक्य आहे? हा काय प्रकार घडतोय?"

मी असा विचार करत असतानाच त्याची मान चेहऱ्यासकट अचानक केबिन मधून खाली लटकून लोंबायला लागली. त्या लटकलेल्या मानेची नजर मात्र माझेकडे रोखून पहात होती. तो निश्चल चेहरा ट्रकच्या हेलकाव्यांबरोबरच हलत होता. डोके दाण दाण ट्रकच्या बाहेरील भागास आपटले जात होते आणि त्या चेहऱ्याच्या डोक्यातून रक्त यायला लागले होते...

ते मुंडके माझ्याकडे टक लावून बघतच होते... आपटले जात असतांनासुद्धा!!

हा भयंकर प्रकार आता मी आणखी जास्त वेळेकरता बघू शकत नव्हतो. मला हे असे बघून मळमळायला लागले आणि मी तिकडून नजर हटवली आणि उजवीकडे रस्त्याच्या बाजूला असलेल्या पर्वतावर लक्ष केंद्रित केले. पण तो त्रिकोणी पर्वत मला का कोण जाणे एखाद्या धिप्पाड राक्षसाच्या कापून जमिनीवर ठेवलेल्या मुंडक्यासारखा दिसायला लागला...

जितेंद्रने मला सांगितलेले ते वळण आता आलेले होते. वळणाप्रमाणे मी गाडी वळवली. माझ्या आधीचा तो ट्रक मात्र आता वळू न शकल्याने दरीत कोसळला.

"यापेक्षा ती हिरव्या साडीवाली बाई दिसली असती तर बरं झालं असतं, हा असला विचित्र अभद्र प्रकार तरी बघायला नसता मिळाला!"

असा मी विचार करतो न करतो तोच मला माझ्या गाडीतून मागच्या सीटवरून आवाज आला,
"अहो मिस्टर! ही काय मी आहे ना! केव्हापासून बसलेय तुमच्या गाडीत मागच्या सीटवर! एवढी सुंदर मुलगी मागे बसलेली असतांना तुम्ही मात्र बघत बसलाय त्या ट्रक ड्रायव्हरकडे! काय आहे एवढं त्या ट्रक ड्रायव्हरमध्ये? "

हे ऐकल्यानंतर माझ्या अंगातून जोरदार एक भीतीची लहर पसरली! चेहरा घामेघूम झाला!!!

मी आरश्यात पहिले...
ती खरंच होती... बसलेली!
मागे! सीटवर!
हिरव्या साडीत!!

मागे वळून बघण्याची हिम्मत होत नव्हती!
पण आरश्यात ती खूपच सुंदर दिसत होती!

आरशात मी बघतच राहिलो! एकदम अलौकिक सौंदर्य!
गोलसर चेहरा!
काजळ घातलेले मोठे बोलके डोळे आणि फुलपाखराच्या पंखांसारख्या भासणाऱ्या पापण्या !
धारदार सुंदर नाक!
गुलाबाच्या फुलांसारखे नाजूक सुंदर थोडेसे विलग झालेले हसणारे ओठ!!

"क..क.. कोण आहेस तू? माझ्या गाडीत कशी आलीस?"

माझी बोबडी वळलेली बघून तिचे आरशात दिसणारे ओठ हसायला लागले.

मी गाडी चालवतच होतो. मात्र अजूनही मागे वळून बघायची माझी हिम्मत होत नव्हती.

आरशातून ती म्हणाली, "या वळणावर मला अनेक जण भेटतात किंवा असे म्हणा ना, की मी येथून जाणाऱ्या अनेकांना भेटते...

या वळणावर असलेल्या त्या बाजूच्या पर्वतावरच्या घनदाट जंगलात मी राहते...एकटी!

झाडाच्या फांद्यांचा पसरट झोका करून मी त्यात झोपून जाते. दिवसा भरपूर झोप घेतली की मग रात्री साधारण 9 वाजता मी उठते...

या घाटात या वळणावर काही वर्षांपूर्वी माझा मित्र अभय आणि मी गाडी चालवतांना अंदाज चुकल्याने गाडी दरीत कोसळून ठार झालो... मित्राच्या आत्म्याला त्याच्या शरीरातून मुक्ती मिळाली, पण मला नाही... माझे मन आमच्या आयुष्याला वेगळे वळण देणाऱ्या या वळणाला सोडायला तयार होत नव्हते...

कारण माझा मित्र आणि मी शेवटचे इथे एकत्र होतो ना, म्हणून! आणि बरं का, तू गाडी चालवत राहा..."

मी भलत्याच प्रसंगात सापडलो होतो. तिला काय म्हणावे हेही समजत नव्हतं आणि आता काय करावं हेही उमजत नव्हतं! मागे वळून बघण्याची हिम्मत होत नव्हती! मी समोर आणि आरशात आळीपाळीने बघत गाडी चालवत राहिलो.

"या वळणावर येणाऱ्या गाड्यांमध्ये जे तरुण मुलं असतात माझ्या मेलेल्या मित्रासारखे, त्यांच्या गाडीसमोर जाऊन मी उभी राहते! उद्देश्य हा की, त्यांना थांबवून माझ्या सौंदर्याने घायाळ करून त्यांना माझ्या मागे मागे नेऊन जंगलातल्या माझ्या राहत्या झाडावर घेऊन जायचं... मग माझा मित्र समजून मी त्यांचेशी रात्रभर मनसोक्त प्रेम करते आणि..." असे म्हणून ती हसायला लागली.

मी गाडी चालवत होतो पण माझ्या लक्षात आता एक गोष्ट यायला लागली. तेच तेच वळण पुन्हा पुन्हा यायला लागलं. म्हणजे मी इतका वेळ गाडी चालवत होतो तरी राहून राहून तिथेच पुन्हा पुन्हा येत होतो. चकवा बसला होता मला!

ती मात्र बोलतच होती.

"आज अमावस्या. कधीतरी अशाच एका अमावस्येला आमचा अपघात झाला होता...आमच्या सारख्यांना अमावस्येला जास्ती ताकद मिळते आणि मला एक बळी तरी लागतोच...मी दर अमावस्येला त्या जंगलातून बाहेर पडून बळी शोधत आसपास जाते. आजही आले होते.."

मी फक्त ऐकत होतो. गाडी चालवत होतो. गाडी पुन्हा पुन्हा त्याच त्याच मार्गावरून पुढे जात होती. तिचे ऐकत राहण्यावाचून पर्याय नव्हता.

"फिरता फिरता तू चहा पितांना दिसलास त्या टपरीवर!"

माझ्या अंगावर शहारे आले. म्हणजे मी चहा पीत होतो तिथे हीसुद्धा होती??

"तू मला आवडलास! आजपर्यंत माझ्या जाळ्यात अडकलेल्या सगळ्यांपेक्षा तू मला जास्त आवडलास. पण तू त्या कोणत्यातरी ट्रक ड्रायव्हरकडे बघत होतास! मी तुला मिळवण्यासाठी बेभान झाले...

मग मी त्या ट्रक ड्रायव्हर मध्ये शिरले आणि त्याच्या मेंदूतल्या नसेवर आतमधून दणका दिला तसा तो बसल्या बसल्या मेला.

मग मी त्याच्या आतमधून त्याचा ट्रक चालवत राहिले जेणेकरून ते बघून तू भारावल्यासारखा ट्रकच्या मागे येशील! आणि ट्रक ड्रायव्हरच्या रूपाने मला एक बळी सुद्धा मिळेल!

तू आलास आणि काही वेळाने मी त्या ड्रायव्हरमधून बाहेर निघाले म्हणून त्याची मान खाली लटकली...! मग तुझ्या गाडीत येऊन बसले!...

मला आवडलेल्या सगळ्या तरुणांना मी माझ्या झाडावरच ठेऊन घेते...त्यांचेशी प्रेम करून त्यांचे तारुण्य शोषून घेते आणि जर्जर, वृद्ध झालेल्या अवस्थेत त्यांना माझ्याजवळ कायमस्वरूपी ठेवते..."

ही बडबड मला असह्य होत होती...

मी आता ठरवलं की मागे वळून बघायचंच! कदाचित मागे कुणी बसलेलं नसेल, फक्त हा आभास असेल, मला फसवायला?

मला आता कुठेतरी याचा अंत करायचा होता....ती खरोखरच असली तरी तिला सांगायचं होतं की, आता गाडीतून उतर खाली! मी गाडी थांबवतो...

काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकू एकदाच!!

बस!

हिंमत करून मी मागे वळून बघितले आणि तिची हिरवी दृष्टी माझ्यावर पडली...

तिच्या चेहऱ्यावर मला आश्चर्यकारक भाव दिसले...
आणि त्याच दरम्यान मला माझ्या शरीरात बदल जाणवू लागले...

पायापासून हळूहळू मांड्यांपर्यंत अचानक कसल्यातरी वेदना होऊ लागल्या, माझ्या पूर्ण शरीरात अचानक बदल व्हायला लागला...

मी होतो त्यापेक्षा कुणीतरी वेगळाच व्हायला लागलो...
माझ्या हाताच्या नखांपासून मनगट आणि खांद्यांपर्यंत काहीतरी सरकत गेलं... माझे केस बदलले...

टेबलावर काचेच्या ग्लास मध्ये अक्रोड ठेऊन तो टेबल हलवला तर अक्रोड जसा हलेल तसा माझा मेंदू डोक्यामध्ये हलू लागला, डोळ्याला प्रचंड मुंग्या येऊन मेंदूमध्ये बदल जाणवायला लागला...

माझे नाक, कान, ओठ बदलत गेले...

शरीराच्या बाहेरच्या आणि शरीराच्या आतमधल्या अवयवात प्रचंड उलथापालथ झाली...

हृदय, आतडे, यकृत, धमन्या, फुफ्फुस हे सगळे अवयव हलू लागले, त्यांच्या जागा बदलल्या, ते शरीरात इकडेतिकडे फिरू लागले, रक्तात अचानक वेगळेपणा जाणवायला लागला... आणि जणू काही ते सर्व अवयव बदल होऊन आपापल्या जागी परत येऊन बसले...

"माझा अभय, माझा अभय!", ती माझेकडे बघून ओरडली...

मला चांगलंच आठवायला लागलं: "होय, मी अभय आहे आणि ही आहे प्रणिता...!!!"

आम्ही अलकापूरहुन येतांना या घाटात अंदाज चुकल्याने अपघात होऊन आम्ही दोघे दरीत कोसळलो होतो...

हो, मी अभय आहे...
मीच तिचा अभय...
माझा पुनर्जन्म झाला होता..
किशोरच्या रूपाने...
मला सगळं आठवायला लागलं...

मला गाडीच्या मागच्या काचेतून दिसायला लागलं की प्रणिताने झाडावर सांभाळून ठेवलेले जर्जर देह कसेतरी धडपडत पळत आमच्या गाडीमागे धावत येत होते... त्यांचे टोळके आमचा गाडीच्या दिशेने वेगाने येत होते...

मी पुढच्या सीटवरून प्राणिताच्या बाजूला सीटवर उडी घेतली...गाडी आता वेडीवाकडी चालत होती!!

तिच्या डोळ्यात डोळे रोखून पाहिले आणि तिला मिठी मारली...

तिच्याही मुक्तीची वेळ आली होती...

ते टोळके सुद्धा आमच्या गाडीवर मिळेल तिथे बाहेरून लटकलेल्या अवस्थेत गाडीसोबत घसरत येत होते...

आणि गाडीसहित आम्ही सगळे दरीत कोसळलो...

(समाप्त)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे, आवडली.
त्या बाईपेक्षा ट्रक ड्रायव्हर भारी आहे!

त्या बाईपेक्षा ट्रक ड्रायव्हर भारी आहे!>>:D
छाने..

टेबलावर काचेच्या ग्लास मध्ये अक्रोड ठेऊन तो टेबल हलवला तर अक्रोड जसा हलेल तसा माझा मेंदू डोक्यामध्ये हलू लागला, >> इथे खुप हसली.. :ङ

छान

मिस्टर बन्या सेठ, तुम्ही माझ्या कथेवर खालीलप्रमाणे प्रतिक्रीया दिली आहे:
"कसला झ दर्जा असतो हो तुमच्या लेखनाचा, नैसर्गिकच असे लिहिता की कोर्स केलाय कुठला =))"
Submitted by बन्या on 10 October, 2018 - 01:11

माझे उत्तर:
माझ्या लेखनाचा दर्जा कोणताही असो पण तुमच्या प्रतिक्रियेचा दर्जा कोणता?
Z पर्यंत ABCD संपते नाहीतर त्यापुढचे अक्षर शोधले असते तुम्ही!
बाय द वे, फक्त या कथेवरची प्रतिक्रिया दिली असती तर बरे झाले असते, माझ्या आतापर्यंतच्या संपूर्ण लेखनाचा दर्जा तुम्ही ठरवून टाकला?
आणि दर्जा आवडत नाही तर मग दर वेळेस माझी कथा प्रसिद्ध झाली की वाचता कशाला?
ज्यांना माझे लेखन आवडते अशा वाचकांचा पण तुम्ही याद्वारे विनाकारण अपमान केलात!
तुमचे लेख आतापर्यंत मी वाचले नव्हते पण आता वाचायला घेतो हळूहळू ! बघतो दर्जा कोणता आहे ते!

छान आहे गोष्ट Happy
पण भय रसापेक्षा विनोदी अधिक वाटली.

मला हॉरर कॉमेडी लिहायची नव्हती पण अनवधानाने तो प्रयोग माझ्याकडून झाला आहे हे बहुतेक वाचकांच्या प्रतिक्रियेवरून दिसून येते. आता हॉरर कॉमेडी या प्रकारात थोडे आणखी प्रयोग करायला हरकत नाही... आपणा सर्वांच्या प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद!

मस्त