मधुरा (लघुकथा)

Submitted by किल्ली on 1 October, 2018 - 10:55

थंड हवेची डोंगराळ भागात असलेली ठिकाणं निसर्गसौंदर्याने समृद्ध असतात. आपल्या ह्या गोष्टीतील गावही लोभस रुपडं लाभलेलं होत. डोंगराच्या कुशीत वसलेल्या ह्या गावात नजर जाईल तिकडे हिरवळ दिसत असे. येथील फळबागा हे मुख्य पीक आणि फळे विकणे हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे आर्थिक उलाढाल फळ व्यापाराच्या मार्फत होत असे. इतर कुठलीही शेती इथे होत नसे. दुर्गम भाग, दळवळणाची अपुरी साधने, यामुळे हे टुमदार गाव सो कॉल्ड आधुनिकीकरणापासून दूर होतं. इंटरनेट वगैरे इकडे फार बोकाळलं नव्हतं. मग सोशल मेडिया वगैरे फार दूरची गोष्ट! ह्या गावातले एकुलते एक सुपर मार्केट गावकऱ्यांच्या गरजा भागवत असे.
ह्याच गावात मधुरा राहत असे. ती नावाप्रमाणेच गोड बोलणारी, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी अशी होती. गावातले सुपर मार्केट तिचे बाबा चालवत असत. प्रत्येक आठवड्यात ठराविक दिवशी मधुरा आणि तिचे बाबा शहरात जाऊन दुकानासाठी लागणार माल घेऊन येत असत. ह्या दुकानात जवळजवळ सगळ्या गरजेच्या चीजवस्तू गावकऱ्यांना उपलब्ध व्हाव्यात म्हणून मधुरा धडपडत असे. हे दुकान म्हणजे एक छोटासा मॉलच होता म्हणा ना! येणारे ग्राहक म्हणजे गावातील लोक असत, बऱ्याचदा पर्यटकसुद्धा येत असत. पर्यटकांसाठी कलाकुसरीच्या वस्तू, शोभेच्या वस्तू, नक्षीकाम केलेले पडदे, ओढण्या, साड्या अशाही वस्तू हल्ली आकर्षण ठरू पाहत होत्या. त्यामुळे 'मधुरा स्टोअर्स ' जवळपासच्या भागात चांगलेच लोकप्रिय झाले होते.
मधुरा एक कलाकार वल्ली होती. तिने शिक्षण सुद्धा कला शाखेत घेतले होते. creativity का काय म्हणतात ती तिच्यात ओतप्रोत भरली होती. साधारणपणे सगळ्याच कला तिला अवगत होत्या. पण तिचे वैशिष्ट्य म्हणजे कापडावर केली जाणारी कलाकुसर, जरदोसी काम, भरतकाम ह्या श्रेणीत बसणारे हे सर्व कलाप्रकार होते. साधी प्लेन साडीआणून ती तिला इतक्या सुंदर रीतीने सजवत असे की पाहणाऱ्याने पाहतच राहावे. गावातील बहुतकरून सगळ्या मुलींच्या लग्नात ती त्यांना स्वहस्ते डिझाईन केलेली साडी प्रेमाचे भेट आणि गावाची आठवण म्हणून देत असे. कलेत रममाण होणारी ही मुलगी स्वभावाने मात्र स्वच्छंदी होती. कधी कोणाचं काही ऐकणार नाही. मन मानेल तेच करणार!
माणूस कितीही सद्गुणांचा पुतळा असला तरी वडीलधाऱ्या माणसांचं ऐकायला हवं. त्यांचे सल्ले त्यांच्या अनुभवरुपी विशाल सागरातून निवडलेले मोती असतात. ते आपल्या भल्यासाठीच सल्ले देत असतात. काही गोष्टी पटत नाहीत, पण निदान ऐकून घेतल्या पाहिजेत. संवाद साधला पाहिजे. ही गोष्ट मधुराला सांगूनही पटायची नाही. एकटीच असल्यामुळे लाडाकोडात वाढली होती ना ती! स्वतःच्या सौंदर्याचा , कलेचा थोडाफार गर्वही होताच!
एक मात्र होतं की, मधुरा कधी कोणाला त्रास देत नसे, तिच्या विश्वात ती मश्गुल असे. तिचे सगळे कलाकुसरीचे काम ती हाताने करत असे, कुठलंही यंत्र न वापरता! त्यामुळे किचकट काम तिला तासनतास करावे लागे. पण तिला त्याची फिकीर नसे. दिवस रात्र खपून एखादे कलाकृती आकारास आल्यावर तिला अतीव आनंद होत असे. ह्या मुलीच्या हातात जादू आहे असे सर्वजण म्हणत असत. तू स्वतः बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेव असेही सल्ले तिला मिळाले होते. शिवाय अनेक स्त्रियांनी आणि मुलींनी तिच्याकडून ही कला आम्हालादेखील शिकव अशी विनंतीही केली होती. पण मधुरा म्हणत असे, “माझी कला विकाऊ नाही, मी ती विकणार नाही. कला शिकवता येत नाही, शिकता शिकवता येत ते फक्त तंत्र! कला जन्माला येताना वरून सोबत आणावी लागते, कलेचे ज्ञान उपजत असावे लागते. पण ह्या कलेस पात्र कोणी भेटलं तरच त्याला/तिला शिकवीन." पण ही पात्रता ती कशी परखणार होती हे तिचं तिलाच माहिती नव्हतं. त्यामुळे हा विषय निघाला की तिला काहीतरी अस्वस्थ करत असे, अपूर्ण वाटत असे.
आज मधुरा एक सुंदर अबोली रंगाची साडी घेऊन बसली होती. पण काही केल्या मनासारखं काम होत नव्हतं. कधी नक्षी नीट येत नसे तर कधी रंगसंगती तिला आवडत नसे. ती आज स्वतःच्याच कामावर नाखूष होती. त्यामुळे तिची अत्यंत चिडचिड झाली होती. मधुरा धड जेवलीही नव्हती. शेवटी कंटाळून काम तसंच ठेवून घरातून बाहेर पडली. सायकल काढली आणि गावात फेरफटका मारण्यास निघाली. तिला असं न ठरवता स्वच्छंदीपणे कोठेही भटकण्याची सवय होती. असे केल्यामुळे तिला उत्साह वाटत असे. गावही फार मोठं नव्हतं त्यामुळे सगळ्या वाटा परिचयाच्या होत्या. गार आल्हाददायक वाऱ्यामुळे आणि फिरण्यामुळे तिचे मन उल्हसित झाले. एवढा वेळ व्यापून राहिलेली मरगळ दूर जाऊ पाहत होती. फिरत फिरत ती गावाच्या वेशीवर असलेल्या टेकडीवर आली. डोंगराळ भागामुळे गावात छोट्या मोठ्या खूप टेकड्या होत्या. पण ही टेकडी तिची विशेष आवडती होती. इथुन बरेच दूरवरचे दृश्य दिसत असे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाजूचे शहर काही प्रमाणात दिसत असे. ते शहर निरखण्यास तिला खूप आवडे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना ही जागा माहित नसल्यामुळे तिचे सौंदर्य अबाधित होते. कसलाही गोंगाट नाही, फक्त सुंदर व निरव शांतता!
सायकल स्टॅन्डला लावून मधुरा तिथेच एका झाडाखाली बसली. दूरवर नजर फिरवत परिसर न्याहाळताना तिला तिच्या दृष्टीने आश्चर्यजनक गोष्ट दिसली. तिथे एक लहान मुलगा त्याच्या दोस्तांना काहीतरी शिकवत होता. ही मुलं टेकडीच्या विरुद्ध बाजूला पायथ्याशी होती त्यामुळे त्यांना वरच्या भागावर असलेली मधुरा आपल्याला पाहत आहे हे माहित नव्हतं.मधुराचे लक्ष त्यांचे निरीक्षण करण्यात गुंतले. त्या मुलाने जवळच्या पिशवीतून काही वस्तू काढल्या आणि प्रत्येकाला दिल्या. ती वस्तू काय हे मधुराने जरा निरखून पहिले तर ती एक बासरी होती, छोटीशी! त्या मुलाने प्रत्येक दोस्ताला एक सुंदर बासरी भेट दिली होती. फक्त बासरीची भेटच नाही तर आपल्यासोबत संगीत शिकणाऱ्या त्याच्या मित्रांना एक खास सुरावट तो शिकवणार होता. त्यासाठी त्याने कोणती सरगम, कुठले स्वर कसे घ्यायचे इ.सर्व शास्त्रीय माहिती सांगितली आणि बासरीवर ती धून प्रत्यक्ष वाजवूनही दाखवली. तो प्रत्येक बारीक गोष्ट समजावून सांगत होता.त्याच्या सूचनांप्रमाणे बालक सगळं ऐकत होते. तो काय बोलतोय हे जरी ऐकू येत नसले तरी त्याचे आणि शिकणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव तिला सहज टिपता येत होते. त्यात हावभावांत काय नव्हतं! लहान सहान बारकाव्यासह ती विशिष्ट धून लयबद्ध रीतीने आणि सर्वांसोबत ताळमेळ ठेवत कशी वाजवावी हे समजुन घेण्याची प्रचंड उत्सुकता, सूचना ऐकताना तल्लीन झालेलया नजरा, प्रत्यक्ष जो मुलगा शिकवत होता त्याच्या चेहऱ्यावरचं वात्सल्य , त्याने सांगितलेल्या गोष्टींचे पालन आणि त्याची हुबेहूब नक्कल केल्यानंतर बासरीवादन करत आले तेव्हा उमटलेले सूर ऐकून झालेला अपरिमित आनंद हे सगळं सगळं ती पाहू शकत होती.
धून शिकवून झाली, तुकड्या - तुकड्यांमध्ये सगळ्यांची तालीमही झाली आणि सगळे मिळून एकत्र बासरी वाजवू लागले. ते मधुर सुर वातावरणात मिसळले आणि त्या नादावर गुंग झालेली मधुरा कितीतरी वेळ ते अद्भुत बासरीवादन हर्षित मनाने अनुभवत होती. बासरी वाजवत वाजवतच ती मुले कुठेतरी निघून गेली तसा आवाज मंद झाला आणि मधुरा भानावर आली.
बराच वेळ झाला इथे येऊन, घरी जायला हवं, बाबा वाट पाहत असतील ह्या विचाराने ती चटकन उठली आणि घरच्या दिशेने सायकलवर रस्ता कापू लागली.
सायकलच्या पेडल बरोबर तीचं विचारचक्रही सुरु झालं होतं. ज्ञान देण्यातला आणि ते कितीतरी पटीने गुणण्याचा आनंद तिने प्रत्यक्ष पहिला होता. टीमवर्कची जादू अनुभवली होती. कुठेतरी वाचलेला
"अपूर्व: कोपि कोशोयं विद्यते तव भारति ।
व्ययतो वॄद्धिमायाति क्षयमायाति संचयात् ॥"
हा श्लोक आठवला आणि तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याच क्षणी तिने काहीतरी ठरवले होते आणि हा निर्णय एकदम पक्का झाला होता.

घरी पोचल्यावर लगेच ती बाबांकडे गेली आणि म्हणाली, "बाबा, एकटीनेच सगळे काम करण्यापेक्षा मी माझ्या मित्रमैत्रीणींची मदत घेईन म्हणते. त्यासाठी आपल्या गावातल्या मुलामुलींना ट्रेनिंग देण्याबाबत काय विचार आहे तुमचा? मी क्लास उघडू का ?

बाबा प्रसन्न हसले आणि आधीच कधीतरी बनवलेली "मधुरा आर्ट्स" ची पाटी स्टोअर्सच्या मुख्य दरवाज्यावर लावून टाकली.
--------------------------------------------------------------------------------------------------------
श्लोकाचे मराठीत भाषांतर आणि अर्थ:
"(हे) देवी सरस्वती, तुझे भांडार अपूर्व आहे. (ते) खर्च केल्याने वृद्धिंगत होते आणि साठवल्याने क्षय पावते."
म्हणजेच
ज्ञान दिल्याने वाढते आणि साठवल्याने कमी होते.
----------------------------------------------------------------------------------------------------------
काय लिहावं हे न ठरवता विचारांच्या ओघात जसं सुचेल तशी ही कथा लिहीत गेले. त्रुटी असू शकतात. विषय भावला तर कृपया आपलेही विचार जरूर मांडावेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
-----------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

थोडी आधी लिहिली असती अन् विस्तारता (आताची थोड़ी तुटक/अर्धवट वाटली) आली तर गणेशोत्सव मधील व्यक्तिचित्रण स्पर्धेत सुद्धा पाठवता आली असतीकी Happy

छान लिहीलंय.
पण एक गोष्ट खटलकी ती अशी.
वर्णनावरून असं जाणवतं की मुलं त्या दिवशी पहिल्यांदाच बासरी शिकताहेत. बासरी अशी काही तासात शिकण्याची गोष्ट नव्हे, त्याला दिवस लागतात. पहिल्या काही तालमीत ऐकणाऱ्यांचे डोके उठेल. तेव्हा तो पहिला क्लास न दाखवता, तो मुलांना नवी धून शिकवतोय, ते शिकून मग ते सगळे मिळून वाजवतात आणि मधुर सूर वातावरणात पसरतात, मधुरा तल्लीन होते. मग उत्सुकतेने जाऊन मुलांना विचारते तेव्हा कळतं की गेले कित्येक दिवस इथे रोज क्लास भरतो व
तो मुलगा त्यांना बासरी शिकवतोय.. असे काही असल्यास वास्तवतेकडे झुकेल.

तुम्ही आपले विचार मांडा म्हणालात म्हणून वाटले ते लिहिले, चूभुदेघे.

बासरीचं मलाही मानवकाकांसारखंच वाटलं. आणि अशा दुर्गम भागात एकमेव दुकान म्हणजे सुपर मार्केट असणं हेही जरा वेगळं वाटलं.
कथेची कल्पना चांगली आहे मात्र.
च्रप्स, संस्कृत श्लोकाचा अर्थ असा आहे की विद्येचा खजिना हा खर्च केला तर वाढतो आणि उलट साठवून ठेवला की कमी होतो.

आताशा मला एकटीला सगळे काम करवत नाही आणि होत ही नाही. >> आमच्या घरच्यांना अशी वाक्ये ऐकवली असती तर.... म्हातारी झाली कायं! ...असे ऐकायला लागले असते. Lol

ह्यापेक्षा ' आम्ही सर्व जणींनी मिळून काम केले तर ...' असे काहीतरी वाक्य हवे Happy

मानव, विनीता आणि वावे तुमचे खुप खुप आभार! तुमच्या सुचनांनुसार कथेत बदल केला आहे, काही चुका होत्या त्याही दुरुस्त केल्या. तुम्हाला विनंती आहे की पुन्हा एकदा कथा वाचुन पाहा व काही त्रुटी असल्यास सांगा Happy धन्यवाद Happy

@कल्पेशकुमार:
व्यक्तिचित्रण लिहावे असे काही डोक्यात नव्हते, एक साधी कथा लिहायची होती बास!
और एक बात, संयोजक मंडळ वाले भाग नही लिया करते स्पर्धा मे Proud
@ च्र्प्सः
अर्थ वरती दिला आहे Happy वावे ह्यांनी सान्गितलेला अर्थ अगदी बरोबर Happy
@ पद्मः
धन्यवाद Happy
@ शाली:
Happy

mast