मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संपुर्ण धागा वाचला . मजा आली.

अरे लक्ष्याची ती गावरान जिनत अमान म्हणजे प्रेमा किरण
कोणीतरी वर प्रेमा साखरदंडे म्हणालाय. प्रेमा साखरदंडे सुलभा देशपांडेची बहीण.

पुर्वी एक अलिखित नियम होता. व्ही शांतारामांचा चित्रपट रीलिज होत असेल तर इतर आपले चित्रपट पुढे ढकलत. पण हा रीवाज दादा कोंडकेनी मोडला म्हणून शांतारामांचा राग . त्यांच्या दुष्मनी वगैरे नव्हती. दादा त्यांच्या खोड्या काढायचे. चंदनाच्या पाटावर ... गाण्यासाठी त्यानी दादांच जाहीर कौतुक केलं होत.
शांतारामांनी बनवाबनवी काढल्यावर यांनी पळवापळवी नाव ठेवलं. त्यानी अशी ही बनवाबनवी केल्यावर लगेच अशी ही पळवापळवी . याच चित्रपटाच इतर कोणतही नाव नव्हतं. नाही म्हणायला त्यांनी बस कंडक्टरच्या जीवनावर चित्रपट जाहीर केला होता बाई वर चढा. बाकी हल्ली मिम येतात तस त्यांच्यानावावर जोक्स यायचे.
सलग रौप्यमहोत्सवी चित्रपट दिल्याबद्दल दादा गिनीज बुकात आहेत ही अजुन एक गैरसमजुत जी त्यांनी कधी दूर केली नाही... इति त्यांच आत्मचरीत्र.
सलग रौप्यमहोत्सवी चित्रपट+ लेखन+ दिग्दर्शन+अभिनय वगैरे साठी सुषमा शिरोमणी मात्र गिनीज बुकात आहे.

परवा एकापेक्षाएक पहात होतो. तेव्हा इतरांमुळे पाहीला जायचा पण आता सचिनला पहाण अगदी असह्य होतं .

नो एण्ट्री नावाच्या तद्दन टुकार, भिकार सिनेमाचा मराठीत रिमेक झाला होता. कुणी पाहीलाय का ?
सई ताम्हणकरला बिकीनीत दाखवणे हा युएसपी होता बहुधा सिनेमाचा. ट्रेलरमधेच ती दृश्यं इतकी ओंगळवाणी वाटत होती कि कुणी त्यावर फिदा होऊन गेले असेल तर निर्माते दिग्दर्शक स्वतः दारावर सत्कार करायला थांबत असावेत असं वाटलं.
हिंदीत तो हिट झाला. कारण काहीही असेल...
( स्त्री किंवा पुरूष एक्स्पोज करायचे असेल तर आपले शरीर सुंदर आहे कि नाही हे हिंदीवाले किमान पाहतात )

<<<<<<<<<<<पण त्यातली गाणी नंतर ऐकली तर ती गाणी आधी कुठे कधी ऐकली होती हे सांगताच येत नाही. मुळात शब्दच बहुतेकवेळा कळलेले नसतात, मग गाणे ओळखणार कसे?
Submitted by साधना on 11 August, 2018 - 19:30>>>>>>>>>
आजही अतिशय मेलोडियस गाणी येत आहेत की !
उदाहरणादाखल
झूम बराबर झूम (झूम बराबर झूम )
मितवा ( कभी अलविदा ना केहेना)
तालीबजाके नाचे गाएं .... तशन से ( तशन)
फलक तक साथ चल (तशन)
जाने क्युं दिल जानता है ( दोस्ताना)
भिगी भिगी सी है राते भिगी भिगी ( गँगस्टर)
मर जावां , कुछ खास है (फॅशन)
कजरारे ( बंटी - बबली)

शेकडो गाणी आहेत !!!

पशुपत, सस्मित >>>>> +++++ १११११

तालीबजाके नाचे गाएं .... तशन से >>>>>> अस आहे हे गाण? Uhoh मला ते तालीबजाके नाचे गाएं काही ऐकू यायच नाही आणि ते शेवटच तशन से, तशन दे ऐकू येत. Lol

<<< पशुपात तुम्ही आजची गाणी म्हणून सगळी जुनी गाणी टाकली आहेत ☺️ >>> मी सलील चौधरी , मदन मोहन , S.D. बर्मन , R.D. बर्मन , खय्याम, या काळातला आहे.. त्या संदर्भात ही गाणी नवीनच की !

<<तालीबजाके नाचे गाएं .... तशन से >>>>>> अस आहे हे गाण? >>
<>
या गाण्यातला त्या दोघांचा आवज इतका खडबडीत आहे तरीही फार सुरेल गायले आहेत .. त्या गाण्यात खूप सहज "राग" बदललेत , "Scale Change" सारखे काहितरी होते आहे असे वाटत असते तर ती त्याच scale मधेच वेगळीच स्वरावट असते.. गिटार चा , ड्रम्स्चा आणि स्वरावटीचा अप्रतीम वापर केलाय... त्यामुळे अतीशय आवडलेले - खूप वेळा ऐकलेले गाणे आहे.. त्यामुळे Lyrics कळत गेली
ताली बजावे नाचे गांवे
रब होवे शरीक जीने के जशन में
अपनी तो बात मगर कुछ निराली है
अपने तो खून में ईश्क की लाली है
होय अपना तो जीना तो जीना
तशन में.....

कालच 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' यातील प्रतापगडाचा पोवाडा बघितला. गाण्याच्या सुरवातीला जिजाबाई आणि मावळे यांच्यात संवाद आहे त्यात जिजाबाई पांढर्‍या वस्त्रात, विना आभूषणांच्या दाखवल्या आहेत. पण त्यावेळी शहाजीराजे हयात होते तेव्हा जिजाबाईंना अशा वेषभूषेत दाखवायचे प्रयोजन कळलं नाही Sad
हे कोणाच्याच लक्षात आलं नाही ह्याचंही आश्चर्य वाटतं.

फेसबुकवर मराठी गाण्यांचा ग्रुप आहे तिथे हे गाणे अनेकदा पोस्ट झालेले पाहिले.

हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली

हे गाणे ८०-९० च्या दशकातले आहे. फार प्रसिद्ध गाणे आहे, पण मला व्यक्तीश: "आपली आवड" मध्ये किंवा अन्य कुठे फार ऐकल्याचे आठवत नाही. इतर गाणी जी त्या काळात ऐकायला मिळायची किंवा आपली आवड मध्ये हमखास लागायचीच त्यांत कधी हे निदान माझ्या तरी ऐकण्यात नव्हते. असो. पण जेंव्हा आता सतत पाहायला मिळते आहे तेंव्हा मला फार गंमत वाटते हे पाहताना. मुलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि गाण्याचे शब्द वगैरे... जरा अतीच गोड-गुळचट केले आहे सगळे Lol का कुणास ठावूक पण मला हे पाहताना ते हिंदीतले "मुहोब्बत बडे काम कि चीज है" हे गाणे आठवते. थेट संबंध नाही पण तरीही.

Happy

चांदणे, रात्र, धरती, ओल्या दवात वगैरे - हे गाणे इण्डोअर असेल आणि ते ही पियानोवर असे ऐकताना अजिबात वाटले नव्हते. साधारण १:३८ ला महेश कोठारे का लाजतोय?

फारेन्ड +१
पहिल्यांदा बघितलं हे गाणं. रेडीओवर कायम लागायचे. ती पियानोवरची मुलगी कोण आहे? सुप्रिया पिळगावकर आहे का?

ती पियानो वाजवणारी मुलगी सुप्रिया वाटत नाही. केतकी थत्ते आहे का? पण तेव्हा ती तर फार लहान असणार. मग ही कोण आहे?

तृप्ती नाडकर नाव आहे चांदणे शिंपीत मधल्या अभिनेत्रि चे कदाचित. पण ती नेपाळी मुव्ही मध्ये काम करते. तिला सर्च केले तर तिचा अणि हिचा चेहरा सारखा च वाटला

'येडा की खुळा' हा मराठी चित्रपट खूप खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनवर लागला होता तेव्हा पाहिल्याचं आठवत होतं. त्यातलं टायटल साँग आठवत होतं ते परवा परत youtube वर पाहिलं.

कहर आहे कहर! लक्ष्मीकांत बेर्डे आणि मॉडर्न ड्रेस आणि विगमधली अलका कुबल Lol
गाण्याचे बोल 'दीवाणा तू येडा की खुळा..दीवाणा SSSSSSSSS' आणि भयानक डान्स!! अलका कुबलचं सिनेमातलं नाव मोहिनी. त्या गाण्यात तिच्या मागे काही गुंड लागले असतात आणि दर कडव्याच्या मधे 'ढाकचिक ढाकचिक मस्तानी, ढाकचिक ढाकचिक मोहिनी!!' म्हणत ते तिच्याभोवती फेर्‍या मारत असतात Lol

मॉडर्न ड्रेस आणि विगमधली अलका कुबल प्रेक्षकांना झेपणार नाही हे जाणवल्यामुळे की काय हे सुरवातीचे गाणे सोडल्यास अलका कुबल नंतर जवळजवळ पूर्ण चित्रपटात साडी आणि एकूण तिच्या टिपिकल आदर्श नारीच्या रूपात आहे Happy

बाकी चित्रपटात वर्षा उसगावकर, प्रिया अरुण, अविनाश खर्शीकर, कुलदीप पवार, जयश्री गडकर अशी अनेक मातब्बर मंडळी आहेत. कथा एकूण वाईट नाही. वर्षा आणि प्रिया मस्त दिसतात आणि नाचतात पण छान! पण हा सुरवातीचा प्रकार म्हणजे डोळ्यांवर आणि कानांवर अत्याचार आहे Sad

हो जबरी आहे हा चित्रपट. त्यात एक डायलॉग आहे. कुलदीप पवार अलका कुबलला लग्नाची मागणी घालतो तेव्हा ती आपलं लक्ष्मीकांतवर प्रेम आहे आणि त्याच्याशिवाय ती कुणा दुसर्‍याशी लग्नाचा विचारही करू शकत नाही असे म्हणून त्याला धुडकावून लावते. तेव्हा कुलदीप म्हणतो 'मी तुमच्या प्रेमाच्या आड येणार नाही. माझ्याकडून तुम्हा दोघांना शुभेच्छा. मी तुमच्या प्रेमाच्या आड आलो तर पुढच्या जन्मी घुबड होईन' Lol

Happy बघायला हवा वेळ काढून.... असाही संवाद चालला असता --
तरीही करूया आपण लग्न. मी सज्जन, सहृदयी माणूस आहे. मी तुमच्या प्रेमाच्या आड येणार नाही. माझ्याकडून तुम्हा दोघांना शुभेच्छा.

तरीही करूया आपण लग्न. मी सज्जन, सहृदयी माणूस आहे. मी तुमच्या प्रेमाच्या आड येणार नाही. माझ्याकडून तुम्हा दोघांना शुभेच्छा.>>> Lol

साधारण याच टाईपचा डायलॉग आहे पुढे कुलदीप पवारच्याच तोंडी Happy अलकाबाईंनी नकार दिल्यावरही कुलदीपकडून मिळणार्‍या पैशांच्या लोभाने तिचा भाऊ लक्ष्मीकांतवर गुंड पाठवून त्याला मारहाण करतो आणि अलकाचे लग्न जबरदस्तीने कुलदीपशी लावून देतो. लग्नाच्या पहिल्या रात्री रडणार्‍या अलकाची समजूत काढताना कुलदीप म्हणतो 'मी तुझ्याशी लग्न केलं कारण मी केलं नसतं तर तुझ्या भावाने तुला दुसरीकडे कुठेतरी जबरदस्तीने लग्न लावून दिलं असतंच कारण तो तुझ्या आणि लक्ष्मीकांतच्या प्रेमाच्या विरोधातच होता. पण मी तुझ्या प्रेमाच्या आड येणार नाही. तुला लक्ष्मीकांतशी प्रेमसंबंध ठेवायला माझी पूर्ण परवानगी आहे!" या अफलातून जस्टिफिकेशनमुळे आपला पती किती उदार, सज्जन आहे , त्याने आपल्याशी लग्न करून आपल्यावर केवढे उपकार केले आहेत हे अलकाला लगेच पटतं आणि एका क्षणात लक्ष्मीकांतचा विसर पडून तिचे आदर्श पतिव्रता भारतीय नारीत रुपांतर होते Happy तिकडे बिचारा लक्ष्मीकांत जबरी जखमी होऊन तिची आठवण काढत असतो, ती आपल्याला भेटायला का येत नाही असा विचार करत असतो आणि ही इकडे कुलदीपसाठी वडाची पूजा करायला जाते Happy

Pages