'हल्लीच्या मुली'

Submitted by मंगला मराठे on 20 September, 2018 - 11:23

लग्नाचा क्लास – ३
‘हल्लीच्या मुली’ ले. मंगला मराठे

हल्लीच्या मुली हा सध्या अव्याहत चर्चेत असलेला विषय आहे. ‘हल्लीच्या मुलींना फक्त नवरा हवा असतो. सासरचे बाकी कुणी नकोच असते.’ ‘आदर ,सबूर, नम्रपणा, असले शब्दसुद्धा त्यांच्या गावी राहिलेले नाहीत.’ ‘ ह्यांना जरा काही हुं म्हणायची सोय नाही. हातात पैसा आहे, बाजारात सगळं विकत मिळतंय.’ ‘पूर्वी मुलीच्या लग्नाचा घोर लागायचा. आता मुलाच्या लग्नाचा घोर लागतो. मुली हल्ली भारी अटी घालायला लागल्यायत.’ ह्या रुळांवरून ही चर्चेची गाडी जात असते. शहरातल्या मुलींबद्दल तर अशी चर्चा होतेच होते.
या वर्णनाबाबत दोन प्रश्न मनात येतात. एक यात आपल्या मुली पण येतात की फक्त सुना आणि उपवर मुली आहेत? दुसरा प्रश्न अचानक एक पिढी च्या पिढी निर्मम, माजोरी निपजली आहे का? दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर निश्चित आहे की असे होणे शक्य नाही. पहिला प्रश्न जरा अडचणीत टाकणारा आहे. मुख्य मुद्दा आहे तो मुली या बद्दल काय म्हणतात? मुलींचे म्हणणे असते की ‘ आम्हाला माणस नको अस नाही पण - –’ आम्हाला जबाबदाऱ्या टाळायच्या नाहीत पण— -’ ‘ आम्हाला घरकाम करायचं नाही अस नाही पण - –’
हा जो पण आहे तो खुप काही सांगतो. ते आपल्याला समजून घेतले पाहिजे.
आताच्या तरुण मुलींना ज्या पद्धतीने वाढवलेले आहे ( nurturing ) ती आणि त्यांच्या पालकांचे नर्चरिंग यात खूप फरक आहे. शाळा, कॉलेज, क्लास, नोकरी यात गुरफटत आताच्या मुली मोठ्या झाल्या. लग्न होईपर्यंत आईवडिलांनी त्यांना सगळं हातात हजर करून दिलेले असते. त्यामुळे लग्नानंतर आपल्या आयुष्यात खूप मोठं स्थित्यंतर येणार असे त्यांना वाटते. हे स्थितंतर जास्तीत जास्त सुखकर ( स्मूथ गोइंग ) असावे असे त्यांना वाटते. त्यातून हे सगळे पण-- येतात.
आजच्या तरुण मुली पूर्वीच्या मुलींसारख्या गरीब गाय नाहीत. पण त्यांचे सगळेच चुकीचे आणि बेताल आहे असेही नाही. आज मुली आहे ते मुकाट्याने सहन करत राहणार नाहीत. कारण त्या सक्षम आहेत. सक्षम असणे आणि निमूटपणे काहीही चालवून घेणे हे दोन्ही एकत्र असू शकत नाही. त्यांना पूर्वीच्या बायकांसारखे दुय्यम स्थान नको आहे. पण समाजातली पुरुष प्रधानता सहजी जाणार नाही ती आपल्या समोरसुद्धा आहे हेही त्यांना माहित आहे. त्यामुळे त्या सगळ्या बाबी अधिक तपासून घ्यायचा प्रयत्न करतात. अनेक मुली आपण एकदा नमते घेतले तर आयुष्यभर आपल्याला झुकुनच राहायला लागेल या भीतीने आधीपासूनच ताठर भूमिका घेतात. हे योग्य नाही पण खरे आहे. मुली काय म्हणतात,----
‘ आईबाबा स्थळ शोधताना मुलाचे शिक्षण, त्याचा पगार, उंची, वय सगळं माझ्यापेक्षा जास्त असेल असेच मुलगे बघतात. पण सगळं त्याचच कां जास्त? पटणे न पटणे पगार पदव्यांवर ठरतं का? ते तर स्वभाव आवडींनिवडीवर ठरणार. एकीकडे म्हणतात मुलगा स्वभावाला, वागाबोलायला चांगला हवा. खरं सुख त्यातच आहे. पैसा काय पुढे मिळेल. पण स्थळ बघताना जात ,वय, पगार आधी बघतात. नेमके महत्वाचे काय?
आणि पगार त्याचा जास्त काय माझा जास्त काय . काय फरक पडतो? मी पण घरातच वापरणार ना ते पैसे? ------- पण नकोच उगाच इगो प्रॉब्लेम! नंतर मी काही बोलले, कसलेही मत दिले की लगेच गाडी त्या पदव्या पगारावर घसरायची. नकोच ते विकतच दुखणं. ह्या मुलांना कोणीतरी हे सांगायला हवं. -----’
“ मला नवरा कसा हवा.? चांगला अॅक्टिव आणि डॅशिंग हवा. ------ डॅशिंग असला तर तो घरीसुद्धा तसाच असेल का? मला बॉसिंग करत राहील का? --– बाहेर डॅशिंग असला तरी घरात नरमाईने वागणारा हवा. ---– पण मग घरातल्या सगळ्यांसमोरच नरमाईने राहील. सगळ्यांचं ऐकत राहील. बरोबर मलाही सगळ्यांना झेलत बसावे लागेल.--–
असा मुलगा भेटला पाहिजे जो बाहेर डॅशिंग असेल, घरातले सगळे त्याच्या शब्दात असतील, पण बायकोच्या बाबतीत मात्र प्रचंड हळवा असेल, तिचा प्रत्येक शब्द मानणारा असेल. ----------
आपल्या अपेक्षा थोड्या फिल्मी आहेत का? –---“

“ एकत्र कुटुंबात राहणे चांगले असेल का? माझं माझ्या आईबाबांवर प्रेम आहे तसं त्या मुलाचं त्याच्या आईबाबांवर असणार. त्यांना नाकारून कसं चालेल. मला तसं करायच नाहीय. मला जबाबदारी टाळायची नाही. पण एकत्र राहायचं म्हणजे जितकी माणसं तितक्या लढाया. आणि आपण अभिमन्यू ! एकत्र कुटुंब म्हणजे सासरच्या माणसांचा घोळ. कोण काय म्हणेल ही सततची धास्ती. ती नको बाबा! सासूच्या हाताखाली राहायचे म्हणजे तिच्याच पद्धतीने वागावे लागेल. आपल्या मनासारखे काही करता येईल की नाही कोण जाणे.
घरात चार माणसं असली मजा येते; एकत्र कुटुंबात सपोर्ट सिस्टीम मिळते; हे खरे. पण प्रेमाने गोडीगुलाबीने राहणारी माणसं असली तर सपोर्ट करतील. सारखी ‘आमच्या घरात असच लागत’ आणि ‘हेच हवं’ अस करणारी असली तर – माझ्या प्रत्येक गोष्टीत इंटरफियर करणारी असली तर – अशा माणसांचा काय आधार मिळणार आणि कसली कंपनी मिळणार? वेगळ राहिलं तर एकट्या नवऱ्याशीच जुळवून घ्यायचं. ते सोप आहे. आधीच सगळी घडी नव्याने बसवायची आहे. त्यात कमीत कमी पॅरॅमीटरस असलेले बरे.”
मुलींचे हे मुद्दे बिनबुडाचे नाहीत . त्याच बरोबर लग्नानंतर सगळे मखमली पायघड्यांवरून चालल्यासारखे आयुष्य असावे ही अपेक्षा चुकीची आहे. ते शक्यच नाही. तडजोड ही करावीच लागते. दोघांनाही आणि घरातल्या इतरांनाही. तडजोड करणे म्हणजे शरण जाणे नाही. ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मुलीला सासरघरात मिसळायचे आहे. विरघळून जायचे नाही.
१००% आपल्या घरासारखच सासर मिळू शकत नाही. आपल्याला आपले स्वत्व टिकवून नातेसंबंध सांभाळायचे आहेत. म्हणून निवड करताना डोळसपणे करायला हवी. त्यासाठी प्रथम स्वत:ला नीट ओळखायला हवे. आपले गुणदोष, विचारसरणी, आवडीनिवडी नेमकेपणाने माहित हव्या. तर आपल्याला अनुरूप जोडीदार निवडता येईल. आपल्या प्राथमिकता आपण ठरविल्या पाहिजेत. आपल्याला कोणत्या गोष्टी आग्रहाने हव्याच आहेत; कोणत्या नसल्या तर चालतील किंवा असल्या तर चालतील आणि कोणत्या गोष्टी अजिबात चालणार नाहीत याचे स्पष्ट गणित मांडायला हवे.. एखादे नाणे बघताना कसे एक बाजू आपण बघतो त्यावेळी दुसरी बाजू आपोआप आपल्या हाताला टेकलेली असते. तसेच एखादी गोष्ट आपण हवी म्हणतो तेव्हा त्याच्या अनुषंगाने येणारी दुसरी गोष्ट आपल्याकडे आपोआप येते. ती दुसरी गोष्ट आपल्याला झेपणार की नाही याचाही विचार करायला पाहिजे. आपल्याला हवी ती एकच बाजू आपण घेऊ शकत नाही. . सिनेमात आपण समोरच्या पात्रात स्वत:ला बघतो. तसेच इथे आपल्या भोवतालच्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये स्वत:ला ठेवून बघायचे. आपल्याला काय सुखकर वाटत ते आपल्यासाठी आपले निकष असतात. जग ही सर्वात मोठी शाळा आहे म्हणतात ते याचसाठी. पालकांशी, सामुपादेशाकांशी संवाद साधायला हवा. हाच आपल्यासाठी लग्नाचा क्लास असतो. मनातल्या सगळ्या शंका दूर करणारा.
मुळात आपण आणि आपल कुटुंब हे परिपूर्ण, आदर्श नाही. आयुष्यात नव्याने येणारी व्यक्तीही आणि त्याच्या घरातील माणसेही परिपूर्ण असणार नाहीत. आपले गुणदोष, जबाबदाऱ्या त्याचे गुणदोष, जबाबदाऱ्या सगळ जमेत धरून आपल्याला संसार करायचा आहे. त्यासाठी तडजोड प्रत्येकाला करावी लागते. मात्र ही तडजोड डोळसपणे करावी आणि आपल्याला झेपणारी असावी . त्यासाठी एकमेकांशी बोलून एकमेकांचा परिचय करून घेऊन मग निवड करावी. लग्न हे जिगसॉ पझल सारखे असते. आपल्याला आपल्या शेजारी सहज बसणारा तुकडा शोधायचा असतो. मग चित्र निकोप नितळ बनते.
============================================================================

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं लिहिलंय. आधीचा लेखही चांगला होता तुमचा. तुम्ही विवाहपूर्व समुपदेशन केंद्र वगैरे चालवता का ? ( मी आता त्यापलीकडे गेले आहे Lol ) कुतूहल म्हणून विचारतेय.

छान लिहीता तुम्ही. पूर्वी चतुरंगमध्ये कोणीतरी या विषयावर लिहीत होत्या, साथ साथ नावाची त्यांची संस्थाही होती पुण्यात .

किती ते गोग्गोड लिहावे.
लग्न म्हणजे कायदेशीरपणे सेक्स करता येण्याचा व्यवहार आहे, हे लक्षात घेतले की असे प्रश्न पडणार नाहीत.

<<< पालकांशी, सामुपादेशाकांशी संवाद साधायला हवा. >>>
पालकांनाच समुपदेशनाची गरज आहे. त्यांनी सर्वप्रथम मुलामुलीच्या संसारात नाक खुपसणे बंद करावे आणि त्यांना पाहिजे तसा संसार करू द्यावा. मुलामुलींनी पण लग्न झाल्यावर स्वतंत्र रहावे, हे उत्तम.

लग्न म्हणजे कायदेशीरपणे सेक्स करता येण्याचा व्यवहार आहे, हे लक्षात घेतले की असे प्रश्न पडणार नाहीत.>> हे मुद्दल असलं तरी त्यावर पिढ्यानपिढ्या चढत गेलेलं व्याज जास्त गुंतागुंतीचं होऊन बसलेलं आहे.

लग्न म्हणजे कायदेशीरपणे सेक्स करता येण्याचा व्यवहार आहे >> चटपटीत आणि सवंग. लग्न हा सामाजिक विधी का झाला हे पण पाहिले पाहीजे. बलदंडांनी आवडलेली स्त्री पळवून न्यायची, उपभोगायची अशा अवस्थेतून सामाजिक तोडगा म्हणून लग्नसंस्था अस्तित्वात आली. जुन्या काळाप्रमाणे आई वडीलांच्या आणि समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी वंश पुढे चालवावा लागे. त्यासाठी समा़जाने या जोडप्यांना दिलेली मान्यता आणि संरक्षण. याव्यतिरिक्तच्या व्यवहारांना सामाजिक प्रतिष्ठा नाही. हे समर्थन नाही किंवा टीकाही नाही. फक्त त्यामागचे उद्देश काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न आहे. केवळ सेक्स हा आपला नजरिया आहे...

उपाशी बोका :D:D

Marriage = Public declaration of private business for the purpose of social and legal sanction/approval.

एवढा आटापिटा करून, अटी घालून, तडजोडी करून लग्न करायची/टिकवायची 'गरज' आहे का?
कोणाला?

सामाजिक स्थिती आता पूर्ण बदललेली असल्याने विवाह आणि कुटुंब या दोनही गोष्टींची पुनः मांडणी करायला हवी !
आता स्त्री आर्थिक आणि मानसिक बाबतीत स्वयंपूर्ण आहे. त्यामुळे "लग्न करून" हे दोन आधार मिळवणे हा मुद्दाच अस्तित्वात नाही. मग "लग्न करायचेच कशाला!" याचा नीट विचार करायला हवा. स्त्री आणि पुरूष दोघांनाही स्वतःची जीवनशैली आबादित ठेवायची असते , त्यात कोणतीही आणि कुणाशीही तडजोड त्याला अजिबात परवडत नाही. त्यामुळे एकमेकांची privacy आणि space आबादित ठेवू शकणारी relationship ची मांडणी देणारी संस्था अस्तित्वात येणार हे उघड आहे . परंतू एक पत्नीत्व / एक पतीत्व मानणारे जीव पारंपारिक विवाह पद्धतीने बांधले जातील. त्यावर विश्वास नसणारे / ते एक लोढणे मानणारे / त्याची गरजच नसलेले लोक विवाह न करता एकत्र रहाणे पसंत करतील.
कुटूंब व्यवस्था म्हणाल तर ती इतरही कारणांमुळे विभक्त पद्धतीकडे सरकलेलीच आहे. महत्वाची कारणे पहाल तर नोकरी - व्यवसायासाठी किंवा शिक्षणासाठी शालेय शिक्षणा नंतर मुले व मुली, आता घराबाहेर पडताना दिसतातच !

उपाशी बोका व अ‍ॅमी +१

लग्न करायलाच लागते असे काही नाही. करीअर, स्वतःला हवे तसे जगणे, आर्थिक स्वावलंबन स्वतःचे सूख महत्वाचे आहे. बाकी झमेला नसला तरी काही फरक पडत नाही.

छान लेख.
उबो, अ‍ॅमी, अमा यांची मतेही बरोबर आहेत परंतु भारतात तशी सामाजीक स्थिती रुळण्यास दशके लागतील.

पालकांना समुपदेशनाची प्रचंड गरज आहे हे निश्चित.

लग्न करणे , आवश्यकता की अनिष्ट रूढी, या वर चर्चा जाण्या अगोदर,....
जे लग्न करतात, आणि ज्यांचा लग्नसंस्थेवर विश्वास आहे, म्हणून त्यांना ते टिकावेसे वाटते, मात्र सिस्टम मधल्या त्रुटींमुळे थोडी-फार कुरबुर होतेय अशा लोकांसाठी हा लेख आहे.

ज्याना लग्न आवश्यक वाटत नाही, अश्या सुखी लोकांसाठी नाही

मी चारचौघी मासिकात विवाहपूर्व मार्गदर्शनावर मालिका लिहित होते. आणि विवाहेच्छुक तरुण तरुणी आणि त्यांच्या पालकांसाठी कार्यशाळा घेते. म्हणजे वधूवर मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात वक्ता म्हणून जाते. मी एकटी आयोजित करीत नाही.

आज आपली जीवनशैली खूप बदलली आहे . लग्नाकडे बघण्याचा दृष्टीकोनही थोडासा बदलला आहे. पण त्या प्रमाणात आपल्या संसाराच्या आणि कुटुंबातल्या नातेसंबंधाच्या कल्पना बदलेल्या नाहीत. त्याचे पारंपारिक रूप अजूनही आपली मनात रुजलेले आहे . त्यामुळे प्रत्येकाच्या मनात सतत संघर्ष चालू असतो . त्यासाठी या गोष्टींवर सतत संवाद व्हायला हवा. म्हणून हा एक प्रयत्न.

दोन्ही बाजूच्या पालकांचं समुपदेशन जास्त गरजेचं आहे.
बाकी आताच्या पिढीतले नवरा बायको तसे सॉर्टेड असतीलच.

लग्न हे जिगसॉ पझल सारखे असते. आपल्याला आपल्या शेजारी सहज बसणारा तुकडा शोधायचा असतो. मग चित्र निकोप नितळ बनते.>> हे खूप विनो दी आहे. गौरी देशपाम्डेंच्या एका कथेत त्यांची एक नणंद अनुभवांची एक एक वीट नीट बसवून संसाराचे आल्हाददायक शिल्प बनवते जे कोणत्याही कोनातून सुरेख दिसेल. तसे वाटले हे. किं वा व्यक्ति वल्ली तले चौकोनी कुटुंब.

आताच्या मुलाम्चे अनुभव विश्व इतके वेगळे आहे कि ते पालकांना समजत नाही. उगीच वीस तीस वर्शांपूर्वीच्या कन्सेप्ट्स मुलाम्च्या माथी मारायला बघतात.

आय वुड रादर स्पेम्ड अ‍ॅन इविनिन्ग विथ अ फुल पर्सन अँड वॉक आउ ट रादर दॅन स्पेंड माय लाइफ विथ अ तुकडा. जिग सॉ पझल वगैरे काही नाही. मेक युअर ओन लाइफ गर्ल्स.

सिम्बा +१
मंगलाताई,
<<आज आपली जीवनशैली खूप बदलली आहे . लग्नाकडे बघण्याचा दृष्टीकोनही थोडासा बदलला आहे. पण त्या प्रमाणात आपल्या संसाराच्या आणि कुटुंबातल्या नातेसंबंधाच्या कल्पना बदलेल्या नाहीत. त्याचे पारंपारिक रूप अजूनही आपली मनात रुजलेले आहे >>. +१

अमा Like! Lol

> लग्न हे जिगसॉ पझल सारखे असते. आपल्याला आपल्या शेजारी सहज बसणारा तुकडा शोधायचा असतो. मग चित्र निकोप नितळ बनते. > अश्लील अर्थ निघतोय का काहीतरी Wink FE चे वर्कशॉप आठवले.

हे असले लेख वाचले की मला 'ठोकळ्यांचा कारखाना' https://www.maayboli.com/node/65688 आठवतो.

आर्थिक द्रुस्त्या स्कश्म मुली (स्वत भर्पुर उत्पन्न असलेल्या किंवा वदीलोपपार्जित उत्प्न्न अस्लेल्या ) व आर्थिक परालंबित्व असलेल्या ase 2 गट आहेत.

गट १: IT,CA,MEdical,MBA, ततसम चांगले पगार /स्वकामाइ देणारे शिक्शण(_(skills),
गट २: Pure graduates with zero income,or low income (not enough to survive independently in given city or town),आइअ वदीलांकदुन वारसा हाक्काने zero financial contribution
दुसर्‍या गतातल्या मुलींना adjust व्हावे लागते
गट १ मधे देखील मी एकतीने जगु शकते हे मानसिक बळ नसेल तर adjust व्हावे लागते.पुरुशही ह्या गटात मोडतात
on my terms and conditions ची एक किम्मत असते. ती चुकवावी लागते.

ह्या वर्शी गनपतीत लहान मुलाम्ची गानी नाहीत कय?

ह्या वर्शी गनपतीत लहान मुलाम्ची गानी नाहीत कय?

नवीन Submitted by arc on 21 September, 2018 - 16:01
^^^^^^
हे इकडे अळूवड्यांचे उंडे, खडू आणि परकर मिळतील सारखे वाटले Happy

छान लिहीले आहे. पहिले एक दोन परिच्छेद सध्या नेहमी ऐकू येणारी (आणि व्हॉअ‍ॅ मधून येणारी) मते बरोब्बर दाखवतात.

लग्नाळू मुले, मुली व त्यांचे पालक यांनी आवर्जून वाचावा असा लेख.

इथली अनेक, बहुधा सर्वच मुले मुली, हायस्कूल झाल्यावर स्वतंत्र रहायला लागतात, पुष्कळांना कॉलेजसाठी कर्ज काढावे लागते. आणि नोकरी स्वतः शोधावी लागते, नवरा/बायको स्वतः शोधायचा/ची. मग स्वतंत्रतेच्या गप्पा मारायच्या. मग एकत्र कुटुंबियात वेळ घाळवायला भीति वाटत नाही, टेन्शन येत नाही.
याचा अर्थ आई बाबांशी, सासू सासर्‍याशी अजिबात नाते तोडायचे असा मुळीच नाही. अडी अडचणीला एकमेकांना मदत करणे हे चांगल्या माणसाचे कर्तव्यच असते. भले कितीहि स्वतंत्र असा. पण मुख्य म्हणजे भीति किंवा टेन्शन नाही!

बोंबलायला कॉलेज संपेपर्यंत बापाच्या जीवावर घरी राहून उनाडक्या करायच्या, एक पैसा मिळवायचा नाही, नोकरी सुद्धा बापाच्या मदतीने. रहायची, लग्न आईबाबांनी लावून द्यायचे, जागा घ्यायला सुद्धा आई बापाची मदत नि मग मात्र स्वतंत्रपणाच्या गप्पा करायच्या! ढोंगी लोक कुठले.

बोंबलायला कॉलेज संपेपर्यंत बापाच्या जीवावर घरी राहून उनाडक्या करायच्या, एक पैसा मिळवायचा नाही, नोकरी सुद्धा बापाच्या मदतीने. रहायची, लग्न आईबाबांनी लावून द्यायचे, जागा घ्यायला सुद्धा आई बापाची मदत नि मग मात्र स्वतंत्रपणाच्या गप्पा करायच्या! ढोंगी लोक कुठले.>>
नंद्या , अगदी. स्वतःच्या जीवावर बाहेर पडुन जॉब मिळविने, अपार्टमेंट रेंट करणे, कार घेणे , ग्रोसरी करणे, इंशुरंस घेणे, स्वतःचे कर्ज काढून शिक्षण पुर्ण करने, घर विकत घेणे इत्यादी सर्व करायला लावले तर बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.

बोंबलायला कॉलेज संपेपर्यंत बापाच्या जीवावर घरी राहून उनाडक्या करायच्या, एक पैसा मिळवायचा नाही, नोकरी सुद्धा बापाच्या मदतीने. रहायची, लग्न आईबाबांनी लावून द्यायचे, जागा घ्यायला सुद्धा आई बापाची मदत नि मग मात्र स्वतंत्रपणाच्या गप्पा करायच्या! ढोंगी लोक कुठले.>>. Rofl

लेख ब-यापैकी संतुलित ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. मुलीची घालमेल चांगली मांडली आहे. तसेच अपेक्षा आणि वास्तव यातली तडजोड कशी स्विकारायाची हे पण.... पिढीतलं अंतर , नर्चरिंग हे पण.
एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे तोटे पाहता एकत्र कुटुंबात मुलींचा कोंडमारा होतो हे खरे आहे. ते अंगवळणी पडले तर बायकाच मग आम्ही नाही का आयुष्य काढले, काय झाले असे विचारताना दिसतात.
आजची मुलगी सक्षम आहे हे विधान सरसकट करायचे होते कि सक्षम असलेल्या मुलींच्या संदर्भातच आहे ते ?
सक्षम म्हणजे प्रसंगी एकटीने आयुष्य रेटता येईल किंवा प्रसंगानुरूप निर्णय घेता येतील अशा प्रकारे आर्थिक बाजू भक्कम असा घ्यायचा का ?

झटकन मनात विचार आला, महिना आठ दहा हजार कमवणा-या मुली पुढे धाडस करून नकार देऊ शकतील. प्रसंगी एकटीने मुलांना वाढवू शकतील का आजच्या जमान्यात ?