उकडीची मोदक फुले

Submitted by सोनू. on 16 September, 2018 - 10:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

उकड -
3 कप पाणी
2 कप तांदळाची पिठी
अर्धा चमचा मीठ
एक चमचा तूप
खाण्याचा लाल व हिरवा रंग

सारण :
१ वाटी ओलं खोबरं
पाऊण वाटी चिरलेला गूळ
एक चमचा तूप
३ वेलच्यांचे दाणे कुटून किंवा पूड करून

क्रमवार पाककृती: 

ही पाककृती माझी नाहीय. फेसबुकवर कोणीतरी फोटो दिले होते ते पाहून प्रयत्न केला. तिनेही असेच कुठेतरी पाहिले होते. मूळ पाककृती वाल्या व्यक्तीचे आभार.
तुम्हाला ही आवडले तर तुम्हीही प्रयत्न करा व इतरांना शिकवा.
मोदकाचेच सारे काही करायचेय फक्त आकार फुलांचा द्यायचा. खूप वेळखाऊ काम आहे पण झाल्यावर बघायला छान वाटतं त्यामुळे वेळ असेल तर नक्की करा.

उकड - मी सध्या OPOS - One Pot One Shot च्या प्रेमात आहे त्यामुळे त्यांची आटालिसीस पद्धत वापरली. त्याने उकड शेवटचे फुल होई पर्यंत छान मऊ होती. फुले व मोदक पण सात आठ तासांनंतरही मऊ होते. माझे नेहमी एवढ्या वेळाने वातड व्हायचे.

3 कप पाणी, अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तूप कुकरात घालून 1 शिट्टी करायची. गॅस बंद करून कुकरची वाफ काढून टाकायची नी त्यात 2 कप तांदळाची पिठी घालून फोर्क ने ढवळून घ्यायचं, गुठळ्या फोडायच्या. मग कुकरला झाकण लावून 10 मिनिटे तसाच ठेवायचा. मग उघडून पीठ काढून घेऊन मळायचं.

पिठाचे 2 भाग करा
एक भाग तसाच पांढरा राहूदे
दुसऱ्या भागातून थोडा भाग काढून त्यात खाण्याचा हिरवा रंग चमचाभर पाण्यात कालवून मिसळा तर उरलेल्या भागात तसाच लाल रंग मिसळा. हो दोन्ही पीठे नीट मळून रंग एकजीव करा

सारण :
१ वाटी ओलं खोबरं
पाऊण वाटी चिरलेला गूळ
एक चमचा तूप
3 वेलच्यांचे दाणे कुटून

खोबरं, गूळ नी तूप एकत्र करून शिजवून घ्या. हे पण कुकरात घालून एक शिट्टी करून करता येईल. मग त्यात वेलची पूड / कूट टाका.

फुलं बनवायची कृती :

एका वेळी दोन फुले होतात. त्यासाठी 3 पांढरे, 2 लाल व दोन लहान हिरवे गोळे लागतात. अगदी लहान लहान गोळ्या करून घ्या.

आता बोटांनीच गोल गोल दाबून लाल व पांढऱ्या गोळ्यांचे गोल पुऱ्यांसारखे आकार करा. सगळीकडून सारखा दाब देऊन समान जाडीची पुरी असूदे. छोटीच असल्याने लगेच जमते. हिरव्या गोळ्या मधे दाबून वाटीसारख्या बनवा.
मला लिहिताना हे कठीण वाटतय पण फोटो बघून समजेल की हे फार सोपं आहे.

Phule_purya.jpg

आता पांढऱ्या नी लाल पुऱ्या पाणी लावून एक आड एक ठेवा. मध्यभागी बोटाने दाब देऊन थोडं चिकटवा.

Phule_maandani.jpg

सुरीने त्यांचे समान दोन भाग करा.

Phule_kaapani.jpg

आता या दोन्ही भागांची दोन फुले होतील. चमच्याने या भागांच्या कापलेल्या भागाकडे सारण ठेवा. एका बाजूला थोडीशीच तर दुसऱ्या बाजूला जास्त जागा रिकामी ठेवली की फुल गुंडाळायला सोपं जातं.

Phule_Saaran.jpg

जिकडे कमी जागा ठेवलीय तिथून गुंडाळायला सुरुवात करा. हा फुलाचा खालचा भाग दाबत दाबत जा. शेवटाच्या मोकळ्या भागाला पाणी लावून फुल चिकटवा.
असेच दुसरे फुल.

Phule_gundaali.jpg

आता त्या हिरव्या वाटीला आतून थोडे पाणी लावून त्यात हे फुल ठेवा आणि वाटी चिकटवा.

ही झाली दोन्ही फुले तयार.

Phule_kacchi.jpg

मोदकांसारखे उकडून घ्या.

Phule_Vaafavane.jpg

हे फुल

Phule_Poorna.jpg

मोदक नी फुले

Phule_Taat.jpg

वाढणी/प्रमाण: 
फुलांच्या आकारानुसार. २० फुले होऊ शकतील.
अधिक टिपा: 

सारण भरण्याच्या आधीच गुंडाळून फुलाचा आकार किती होतो ते पाहून घ्या म्हणजे गोळ्या केवाढया करायच्या ते ठरवता येईल.

माहितीचा स्रोत: 
फेसबुकवर कोणीतरी फोटो दिले होते ते पाहून प्रयत्न केला.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोनू, एकेका फुलाचा वेळ वाचवण्यासाठी जर खालीलप्रमाणे केले तर!

उकड तेल लावून तुकतुकीत होईपर्यंत मळून घ्यायची म्हणजे पीठ न लावता पोळपाटावर पोळी लाटून घेता येईल. मग त्याच्या सुरीने लांब पट्ट्या कापायच्या. पट्टीची एका बाजूची कडा चेपून चपटी करून घ्यायची आणि ती कडा पाकळीच्या साईडला घेवून तुम्ही वळलंय तसे फूल वळायचे. नंतर पाकळ्यांच्या गॅपमध्ये चमच्याच्या दांड्याने सारण किंचीत दाबून बसवायचे. एकाच पोळीत बरीच फुले होतील आणि सारणासकट फूल वळताना अती नाजूकपणे वळायची गरज नाही. नक्की पटापट होतील.

अश्विनी, तसंही करता येईल बहुदा एकाच रंगात. पण त्या सुरळीच्या उभ्या वड्या वाटतील कदाचित. आपल्याला हवा तो आकार करायला हरकत नाही.

भरत., हो, मोदकाला पण काळ्या पाडायला वेळ लागतोच. जितक्या कळ्या जास्त तितका जास्त वेळ.
या फुलांना वेगवेगळ्या रंगांमुळे अजून जास्त वेळ लागतो.

गव्हले वाचून ही फुले करायला हरकत नाही असं वाटलं Wink ते तर भयानक वेळखाऊ काम पण हौसेला वेळ नसतो Happy पण उकड साथ देत नव्हती, ती आटालिसीस नी मनासारखी उकड झाली.

सारण करुन फ्रीज मधे ठेवलं होतं त्यामुळे करायला घेतले तो पर्यंत त्यात थोडे पाणी झाले होते/आहे. त्यातले पाणी काढुन टाकावे की थोडं तांदुळाचे पिठ टाकुन कोरडे करावे ? एनी सजेक्शन्स?

मस्तच.

उघडे सारण वाफवताना त्याला पाणी सुटत नसेल तर छानच.

आज तुमच्या पद्धतीने उकड करायला घेतली.पण आयत्यावेळी बेत बदलला.पाणी गरम झाल्यावर,त्यात तूप,मीठ,पीठ,घालून ५ मिनिटे गॅसवर ठेवले.शिटी वाजली नाही. प्रे.पॅनमधे सगळा गोळा झाला होता.उकड खूप दगडी झाली होती.पाणी लावून मळली तरी वातड होती.फुले करायची सोडाच, मोदकाऐवजी पॅटीस/कचोरी झाले.

पाणी गरम झाल्यावर,त्यात तूप,मीठ,पीठ,घालून ५ मिनिटे गॅसवर ठेवले.शिटी वाजली नाही.
>> पीठ घातल्यावर गॅस सुरू ठेवायचा नाहीय.
--
3 कप पाणी, अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तूप कुकरात घालून 1 शिट्टी करायची. गॅस बंद करून कुकरची वाफ काढून टाकायची नी त्यात 2 कप तांदळाची पिठी घालून फोर्क ने ढवळून घ्यायचं, गुठळ्या फोडायच्या. मग कुकरला झाकण लावून 10 मिनिटे तसाच ठेवायचा. मग उघडून पीठ काढून घेऊन मळायचं.

सोनू, आयत्यावेळी बेत बदलला.आता कळले की अजिबात फेरफार करणे नाही म्हणून.पुढल्यावेळी नक्की दिले तसेच करेन.

https://youtu.be/ppObIbz8mJI

हे आटालिसीस वाले सर म्हणतात की पीठात पाणी मुरलं की पीठ स्वतःच स्वतःला मळून घेतं. सध्या मी यांना फॉलो करून बरच कायकाय बनवतेय.

हायला ... भारी दिसतायत. मोदक करायचा मुहुर्त सापडला की हे पण करु. १५ ऑगस्ट पेशल दिसतायत एकदम.
मधले फोटो आमच्या सुशिला बाईं सारखे दिसतायत. (यु नो हु.. गणपतीच्या दिवसात मोदकाच्या धाग्यावर नाव घ्यायला लावू नका Wink )

सोनू,
वन पॉट वन शॉट मेथडबद्दल लिहा. वाचायला आवडेल.

आटालिसीस पद्धतीने पीठ मळून पाहिले. पण नीट जमले नाही. मला तर कणिक गुठळ्या असल्यासारखी वाटली मग पुन्हा नीट मळून यायला अजून मळावी (पाणी न घालता) लागली. त्यापेक्षा १०--१२ मिनीटात पीठ मळून झाकून ठेवले तर भाजी करायला टाकेपर्यंत मस्त मऊ होते.

अदिती, परत आटवा ते. << अर्रर सारण शिजवुन घ्यायच हे मी बघितलच नाही. ह्या रेरीपी मधे फक्त फुल बनवण्याची कृती बघते आहे... मी आत्ता पर्यंत ४/५ वेळा केलेत मोदक, पण न शिजवताच. Sad

ओह, सोनाली, नाही झाले का नीट चपाती चे पीठ. हं. मुरत ठेवणे हीच युक्ती आहे खरं तर, लग्गेच करण्यापेक्षा.

मानव,
ही आयडिया कोणाची आहे हेच माहीत नाही, मी आपली माबोवर अजून कोणी दिली नाही म्हणून लिहिली.

इतर प्रतिसादकर्त्यांचे आभार.

आटालिसीस पद्धतीने पीठ मळून पाहिले >>> मी ही गेले दोन दिवस हेच करतेय .
माझ्याकडच्या पीठाला १:३ पाणी आणि पीठ प्रमाण लागलं .पीठात थोड्या गुठळ्या झाल्या पण नंतर परत थोड तेल लावून पीठ मळून घेतलं पण तो त्रास कमी वाटला , नेहमीपेक्षा.
सकाळच्या पोळ्या संध्याकाळीही नीट राहील्या , एरवी जरा चिवट -कडक होतात . बघूया पुढे काय होतय ते .

सकाळच्या पोळ्या संध्याकाळीही नीट राहील्या , एरवी जरा चिवट -कडक होतात . >>
अरे वा! छान. त्यांचे बाकीचे व्हिडीओ ही बघा, मस्त आहेत.

Pages