आरत्यांमध्ये जादाचे शब्द घालून म्हणायची प्रथा कोणी व कधी सुरु केली?

Submitted by Parichit on 19 September, 2018 - 06:05

पुण्यात आल्यापासून गणेशोत्सवात एक गोष्ट अनुभवली आहे. इथे श्री गणेशाची आणि इतर आरत्या थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हटल्या जातात असे माझे मत आहे. मूळच्या आरती मध्ये काही जादाचे शब्द घातले गेले आहेत. जसे कि उदाहरणार्थ...

जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती
जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा
जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी

अजून अशी अनेक उदाहरणे आहेत. मूळ आरतीमध्ये "जय देव जय देव जय मंगल मूर्ती" इतकेच आहे. लहानपणापासून तितकेच वाचत व म्हणत आलो आहे. पुण्यात मात्र त्याला "हो श्री मंगल मूर्ती" असे जोडतात. प्रथम प्रथम हे सगळे ऐकून गम्मत वाटली. पण नंतर नंतर चीड येऊ लागली. त्याच अर्थाचा दुसरा शब्द पुन्हा का म्हणायचा? हा आचरटपणा कोणी व का केला असेल? मुख्य म्हणजे हे पुण्यातच जास्त आहे. कोल्हापूर सांगली सातारा भागात हे ज्यादाचे शब्द म्हणत नाहीत (असे माझे निरीक्षण आहे). तिकडे अजूनही मूळ आरत्याच जशाच्या तशा म्हंटल्या जातात (मुंबई व इतर महाराष्ट्राचे माहित नाही). काही प्रश्न मनात आले:

१. हे नसतेउद्योग कोणी, कधी व का केले असतील?
२. केवळ स्वत:चे अस्तित्व व वेगळेपण दाखवण्याकरिता एखाद्या आरती पुस्तकाच्या लेखकाने/प्रकाशकाने तर हे केले नसेल?
३. एखाद्या मूळ लिखाणामध्ये बदल करणे ह्याला कॉपीराईट भंगाचा गुन्हा म्हणतात. इथे तो लागू होत नाही का?
४. इथे तर अधिक शब्दांची भर घालणाऱ्या महाभागाने काहीही कारण नसताना सरळ सरळ द्विरुक्ती केली आहे. व ऐकताना तो थेट मूर्खपणा आहे हे जाणवते. जसे कि...

ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी पावसी लवलाही
आरती ओवाळू भावार्ती ओवाळू तुज कर्पूर गौरा

का रे बाबा? फक्त भक्ता लागी पुरेसे वाटत नाही का तुला? फक्त आरती ओवाळू म्हणून मन भरत नाही का तुझे?
महिषासुरमर्दिनी शब्द असताना पुन्हा त्याच अर्थाचा दैत्यासुरमर्दिनी म्हणावा असे तुला का वाटले असेल?

थेट मूर्खपणा वाटतो आणि विशेष म्हणजे लोकांनी कुणीही ह्या घुसडवणूकीला विरोध किंवा आक्षेप नोंदवलेला दिसत नाही. चालते का असे काहीही केले तर? चालत असेल तर मी तर म्हणतो करणाऱ्याने इतकेच बदल का केले असतील? अखंड आरतीच नवीन लिहायची ना. उदाहरणार्थ:

देवी दैत्यी सागर मंथन पै केले हो घुसळण पै केले |
त्यामाजी अवचित हळहळ जें उठिले हो जळजळ जे उठले |
तें त्वां असुरपणे प्राशन केलें हो गिळंकृत केले |
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले हो फेमस झाले |

का? काय हरकत आहे? आहे कुणाची हरकत?

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

खरं आहे.
कोणीतरी एकसाईटमेंट मध्ये प्रत्यय ऍड केले असतील स्वतःचा वेगळेपणा दाखवायला.नंतर ते शब्द जास्त जास्त वापरले गेले.सर्वात गंमत सोसायटीच्या आरत्या म्हणताना येते.2-3 लोक अशी प्रत्यय पुरवणी वाले असतात.बाकीचे गोंधळतात.मग बाकीचे ते शब्द शिकून टाकायला लागतात तोवर या 2-3 जणांना बदलायची इच्छा होऊन तर प्रत्यय ड्रॉप करतात.

पुण्यात आल्यापासून गणेशोत्सवात एक गोष्ट अनुभवली आहे.>>>
यात प्रादेशिक संबंध नसावा कारण फक्त पुणेच नाही, नगर आणि सातारा जिल्ह्यातील नातलगांकडे पण असंच म्हणतात. अजून बर्‍याच ओळखीच्या लोकांकडे पण असंच ऐकलं आहे.

हिंदी आरती मध्ये सुद्धा अशी एक - दोन उदाहरणे आहेत.
जसं ॐ जय जगदीश हरे... भक्त जनो के संकट (दासजनो के संकट) क्षण में दूर करे...
श्रद्धा भक्ती बढाओ (श्रद्धा प्रेम बढाओ )

संतांनी लिहिलेल्या रचना भ्रष्ट होऊन जातात हे मान्य आहे मला काही प्रमाणात पण समहाऊ मला लोकांनी (अगदी अनर्थकारक नसतील तर) जादाचे शब्द घालणे खटकत नाही. कोणाचा ते काव्य भ्रष्ट करण्याचा उद्देश नसतो तर आरत्या गाताना तो एक जोश असतो, ती आळवून आळवून म्हणण्याची धुंदी असते एक प्रकारची. लोकसंगीतच ते तसे पाहिले तर. त्यामुळे गैर नाही वाटत. आधुनिक संगीतात नाही का कसलेले गायक लोक पारंपारिक गाणी जशी च्या तशी न म्हणता जॅमिंग करत थोडे फार इम्प्रोवाइज करून म्हणतात, ऐकायला छान वाटतात वेगळी वर्जन्स सुद्धा.

अनुमोदन!
अहो भक्तीत तल्लीन झाल्यावर किती स्तुति करू देवाची नि किती नाही असे होते. त्यासाठी तेव्हढी भक्ति असायला पाहिजे.
तशी नसेल तर केवळ दाखवायला म्हणून आरती करायची म्हणून मग कमी पैशात, कमीत कमी वेळात करायची!!
असली "दिखाऊ भक्ति" म्हणजे देवाला फसवण्याचा प्रयत्न. अहो तुमची भक्ति नसेल तर देव तुमच्याकडे ढुंकून बघत नाही, फसतोय कसला?
हे न समजणे हाच खरा मूर्खपणा.

>>आरती लौकर संपतेय, लांबवावी म्हणून केलेला सोप्पा उपाय असावा कदाचित.>> सहमत आणि मैत्रेयीचा प्रतिसाद सुद्धा.

मला पण प्रामाणिकपणे जादाच्या शब्दांचा वैताग येतो. परवा एके ठिकाणे इतके जादा शब्द प्रत्येक आरतीत होते की वैतागून मी आरतीच म्हणणे बंद केले.

आरत्यांमधे घातलेले 'मनाचे श्लोक' रसभंग करतात हे मान्य आहे, पण ह्याचा प्रादेशिकतेशी संबंध नाही. दुसरं म्हणजे ह्यात 'मुर्खपणा', 'आचरटपणा' इतका टोकाचा वेडेपणा सुद्धा नाही वाटत. आरती जशी आहे, तशी म्हणावी हे मान्य आहे.

मलापण वैताग यायचा/येतो इतकी शेपटं, घुसडलेले शब्द ऐकून.
वरच्या maitreyee च्या पोस्टने जरा वेगळा दृष्टीकोन दिसतोय.

मला पण प्रामाणिकपणे जादाच्या शब्दांचा वैताग येतो. >> +१ त्याहून अधिक वैताग लोक शब्द बदलतात त्याचा येतो, संकटी पावावे ऐवजी संकष्टी पावावे, हलाहल च्या जागी हळहळ इत्यादी.

मलाही पूर्वी वैताग यायचा, हल्ली कुठे कुठे काय काय घालतात/ घालू शकतील हे बघायची मौज वाटते. मूर्खपणा वगैरे काही अजिबातच वाटत नाही. अर्थात असं म्हणायला स्वतःला आवडत नाही. पण कोणी म्हणत असतील तर म्हणो बापडे.
माझी संस्कृती, धर्म हे सर्वसमावेशक असल्याने टोकाचा अभिमान वगैरे नाही. मी प्युरिस्ट वगैरे अजिबातच नाही. भेसळ आणि भंपक बोटीचे मेंबर आम्ही.
हो. चुकीचे शब्द म्हटले की जास्त वैताग येतो +१
मै ची पोस्ट आणि गायक घेतात त्या अ‍ॅडिशन्स आणि याची तुलना इंटरेस्टिंग वाटली. की राजहंसाचे चालणे जगी झालिया शहाणे म्हणोन काय कवणे चालोच नये की काय!
ज.हिं ज.म.

आरत्या ओवाळायची प्रथा कुणी सुरू केली असावी?
Submitted by आ.रा.रा. on 19 September, 2018 - 19:45

असा प्रश्न विचारण्यामागील उद्देश कळेल का???

अमित + १
फळिवर वंदनाला बसवलं नाही म्हणजे झालं! Proud

तरी बरयं आता संध्याकाळी देवापाशी दिवा लावल्यावर शुभंकरोती म्हणणे बंद झालेय. त्यामुळे रोजचे "दिपक जोशी (दिपज्योती) नमोस्तुते " घडत नाही.

व्हॉट्सअ‍ॅप युनितुन 'दीपक जोशी नमोस्तुते' हे नवीनच समजलं. हे मुद्दाम विनोद निर्मितीला केलेलं आहे हे उघड आहे, त्यामुळे सगळ्यात जास्त आवडलं आणि हसायला आलं.

गावी आमच्या शेजारच्या एक काकू चक्क तुषार हार ढवळा म्हणलेल्या.

मला चुकीच्या शब्दांचा वैताग नाही येत, करमणूक मात्र होते.

जास्तीचे शब्द नकोत, तर आरत्या सुद्धा एव्हढ्या लांब लांब कशाला?
म्हणजे कंठी झळके माळ मुक्ताफळांची - जयदेव इ. असे म्हणून आरती संपवावी! उगाच पुढे रत्नखचित फरा (की फडा?, देवच तो फडे पण रत्नखचित!) वगैरे कशाला?
मुळात लग्न जसे रजिस्टर करतात, उगाच होम नि फेर्‍या, नि लांबलचक मंगलाष्टके वगैरे नकोत म्हणून, तसे गणपती उत्सव पण नुसते रजिस्टर करावे. अमुक मंडळाने २०१८ ला गणेशोत्सव केला असे सर्टीफिकीट द्यावे मुन्शिपाल्टीने, भक्कम रजिस्ट्रेशन फी पण उकळता येईल!!

>>तर आरत्या सुद्धा एव्हढ्या लांब लांब कशाला?<<

पॉइंट आहे. आमच्या सोसायटीतले काहि महाभाग तर "येई हो विठ्ठले...." हि आरती अर्धा-पाउण तास खेचायचे; अगदि साग्रसंगीत ताना, फिरकि वगैरे घेत. ढोलकि, टाळ वाजवणारे आणि आरती ओवाळणार्‍याचे प्रचंड हाल... Happy

जादाचे शब्द घालणारे लोक आरती म्हणताना बाकिच्यांची पंचाईत करतात. आपण पहिली ओळ संपवून दुसरी ओळ सुरू करतो तेव्ढ्यात हे (प्रक्षिप्त-पाठी) लोक जोरात 'हो स्वामी शंकरा' वगैरे म्हणून अर्धी ओळ मागे जातात आणि सगळ्या आरतीचा सिंक्रो घालवतात; वरती आपणच कशी संपूर्ण योग्य आरती म्हणतो असा भाव असतो, त्यामुळे चिडचिड होते. पण तुम्ही म्हणता तसा कॉपीराईट कायद्याचा भंग होण्याचा प्रश्न नाही. कारण ते हक्क मूळ लेखकाच्या मृत्यूनंतर साधारणपणे ५०-१०० वर्षेच लागू असतात. त्यानंतर ते आपोआप कॉपीराइट-मुक्त होतात.

आरतीची लांबी वाढवण्याचा याच्याशी काही संबंध असेल असं वाटत नाही. आरत्या म्हणताना फार वेळ जातो म्हणून पूर्वी १०-१० आरत्या म्हणणारे लोक आता २-३ आरत्या (प्रक्षिप्त अर्ध्या-अर्ध्या ओळींसकट) म्हणून लगेच लोटांगण घालतात. आपल्याकडे अगदी रामायण, महाभारत पासून तुकाराम-गाथा, दासबोध इत्यादी सर्वच ग्रंथांमध्ये वेगळ्याच गोष्टी घुसडण्याची लोकांना खोड आहे, त्यामुळे आरत्या देखिल त्यातून सुटल्या नाहीत. अशा लोकांना खरंच तुम्ही बनवलेली आरती ऐकवावीशी वाटते!

ढवळा हा धवल वरूनच आलेला असल्याने पांढऱ्या रंगाच्या वर्णनात फार फरक पडलाय असे वाटत नाही LOL

Pages