स्वर सम्राज्ञी आशा भोसले

Submitted by संगीता थूल. on 7 September, 2018 - 08:36

।। पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणीक
त्याचेच त्या कळले तो राजहंस एक।।
जवळपास सहा दशकापूर्वी मराठी रसिकांमध्ये लोकप्रिय झालेल्या या अर्थपूर्ण गीताच्या गायिका आदरणीय आशाताईंचा आज जन्मदिवस.
एका स्वच्छ तळ्यातील सुरेख सुंदर इवलेसे बदकाचे पिल्लू सुज्ञ रसिकांच्या मानस सरोवरात अत्यंत डौलदारपणे आणि ऐटीने मनसोक्त विहार करीत आहे. ‘आशा’ नावाच्या या राजहंस पक्षाला सर्वसाक्षी परमेश्वर निरामय दीर्घयुष्य देवो.या
पृथ्वीतलावर मानवी जन्म मिळणे हे भाग्यच.आणि या जन्माच सार्थक होणे,कलाकार होणे हे सौभाग्य आणि त्याहीपेक्षा राजहंसासारखे लोकप्रिय जीवन जर अनुभवता आले तर ते परमभाग्य म्हणावे लागेल. पण भाग्य किंवा नशिब असे स्वत: आपल्याकडे चालून येत नाही. ते मिळवावं लागतं. संघर्षोनि आणि जिद्दीने. अग्नितून तापून निघाल्यानंतरच सोन्याला झळाळी येते.आशाताईचं जीवनही असच. संपूर्ण संघर्षमय.
कुठेही अनुकुलता नाही. तरीही अतिशय धेर्याने आणि चिकाटीने प्रतिकूल परिस्थितीशी सामना करित त्यांनी आपल्या काटेरी जीवनाची सुंदर फुलबाग फुलविली. स्वत:चे नशिब स्वतः घडविले आणि म्हणूनच आज राजहंसासारखे सुंदर जीवन जगणार्या आशाताईंना भाग्यवान म्हणावेसे वाटते.
आशा भोसले पं. दीनानाथ मंगेशकर यांच्या सांगितीक घराण्यात जन्मजात संगीताचा वारसा लाभलेले, सुंदर आवाजाची देणगी आणि या वर्तमान काळात याच कर्णमधुर आवाजामुळे संपूर्ण देशभरात नावलौकीकास आलेले एक विशाल आणि भारदस्त लोकप्रिय व्यक्तिमत्व, संगीत क्षेत्रात सर्वोत्कृष्ट,सर्वश्रेष्ठ आणि स्वरसम्राज्ञी अशा विशेष उपाधीने आज त्यांच्या नावाचा अत्यंत आदराने उल्लेख केल्या जातो.
आशाताई। एक सदाबहार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व संगीतातील सर्व रागात व रंगात रंगून जाणारी, साधी परंतु नीटनेटकी रहाणारी, प्रसन्न आणि हसर्या चेहर्याची व त्याहीपेक्षा यशाच्या सर्वोच्च शिखरावर आरूढ झालेली असूनही सर्वसामान्य लोकांशी सुसंवाद साधणारी सर्व रसिकांची आशाताई आज एक गानसम्राज्ञी म्हणून संगीत प्रेमीजनांच्या हदय सिंहासनावर विराजमान झालेली आहे.सप्तसुरांवर जीवापलिकडे प्रेम करणारी ,निसर्गदत्त आवाजाची व
कलेची मनापासून जोपासना करणारी ही महान स्वरसाधिका आजही आपल्या कलेविषयी प्रामाणिक आणि विनम्रता दर्शविताना म्हणते की,...
।। सुर माझा मायबाप सुर माझा देव हो
गळ्यामध्ये जपली मी लाखाची ही ठेव हो।।
स्वरांवर आशाताईचं इतकं प्रेम, आणि म्हणूनच रसिकही त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात. रसिकांसोबत अगदी सहजपणे बोलताना त्या म्हणतात की, माझ्यातील सूर वजा केला तर मी तुमच्याच सारखी एक सामान्य आहे.माझा आवाज माझ्यासाठी सर्व काही आहे’ निसर्गानेि दिलेली ही लाखाची ठेव जतन करणार्या आशाताईंचा आवाज म्हणूनच की काय आजही दमदार आहे. किंबहूना तरूण आहे स्वर अजुनही असेही म्हणता येईल.
आशाताईंचा प्रत्येक सूर वेगळा, प्रत्येक प्रतिमा वेगळी. गाणे कोणतेही असो आशाताई त्या गीताच्या भूमिकेत समरस होतात. जेव्हा त्या उठी गोविंदा उठी गोपाला.. ही भूपाळी किंवा निज रे निज रे बाळा ही तान्हुल्यासाठी अंगाई गातात तेव्हा त्यांच्या वात्सल्यपूर्ण सूरातून मातृत्व पाझरतं.त्यांचे प्रियकराला साद देणारे ते जीवलगाऽs.... चे आर्त स्वर असो किंवा ऋतु हिरवा सारखा मनमुराद आनंद असो, आशाताई त्या सूरात हरवून जातात व मेघांच्या धारांमध्ये न्हाऊन निघण्याची इच्छा असलेल्या अल्लड नवतरूणीला ये रे घनाच्या ओल्या सुरातून चिंब भिजवून टाकतात. आणि चांदण्या रात्रीत प्रियकरासोबत फिरणाच्या प्रेयसीला चांदण्यात फिरताना... च्या किंचित आर्जवतेच्या सूरातून सावरतात. स्वनातल्या कळ्यांनो..... चांदणे शिंपीत जाशी। यासारखी हळूवार कोमल भावना, आपल्या भावपूर्ण सुरात रसिकांसमोर सादर करणार्या आशाताई केव्हा तरी पहाटे... तरूण आहे रात्र अजुनही या मनोवेधक गीताने गांभीर्य निर्माण करतात. तर लगेच आपल्या जोशपूर्ण आवाजाची धार।वाढवित उष:काळ होता होता... सारखे समरगीत गाऊन रसिकांमध्ये देशप्रेम जागृत करून वीररसाची निर्मिती करतात.
शृंगार रसातही आशाताई तितक्याच रमतात. कुठे कुठे जायाच हनीमूनला.... किंवा लाल काळ्या धाग्याने रेशमी, कशिदा काढलेल्या साडीला हात लावू नका असे लटक्या रागाने आणि ठसक्याने सांगणार्या आशाताईंचा सूर शृंगारिक लावण्या गाताना काही वेगळाच असतो. मलमली तारूण्य माझे.... हे परिपूर्ण प्रणयगत जणू त्यांच्या कोमल सुरातून उजळून निघण्यासाठीचे लिहिल्या गेले की काय असे जाणवते. तरूण प्रेमी जनांना श्रृंगाररसात अथांग बुडविणाच्या आशाताई जेव्हा भक्तीरसाकडे वळतात तेव्हा त्यांचे सूर त्यांच्या अंतरंगातील परमेश्वराविषयी असीम श्रध्दा आळवून जातात.ज्ञानदेव बाळ माझा... रघुपती राघव गजरी गजरी... मागे उभा मंगेश..... जय शारदे वागेश्वरी... या ईशस्तवनासाठी त्यांनी लावलेले सुश्राव्य सूर अप्रतिम आहेत.
हिंदी सिनेमासृष्टी तर त्यांच्या आगळ्यावेगळ्या गायन शैलीसाठी वेडावलेली आहे.या लेखात स्वरात तोरामन दर्पण कहलाए ... . यासारख हळूवार सुरात भजन गाणार्या पाश्चात्य आशाताई पिया तू अब तो आजा.... किंवा दम मारो दम. . यासारखे संगीतावर आधारीत तनमन डोलायला लावणारी गीते तेवढ्याच धूंद स्वरात गातात.रसिकांच्या अंतरंगात अगदी खोलपर्यंत जाऊन भिडणार्या गझल या गीतप्रकाराला जेव्हा आशाताईंचे समर्थ आणि सशक्त सूर कवटाळतात तेव्हा गझलसाठी आशाताई की आशाताईसाठी गजल हे समीकरण ठरविताना रसिक श्रोता व्दिधा मनस्थिती अनुभवतो. सलोनासा सजन है.. कभी जा किसीने... दिल चिज क्या है.... इ. कितीतरी सुंदर सुंदर गजल गीतांनी रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळविलेले आहे.
आयुष्यात सुखाचे क्षण तसे दुर्मिळच. परंतु आशाताईचे अनुभवी, भावपूर्ण असे जीवनाचे तत्वज्ञान सांगणारे सूर.. भोगले जे दुःख त्याला ...किंवा चैन से हमको कभी.... अशा अर्थपूर्ण गीतांना स्पर्श करतात.तेव्हा निरस जीवनाचाही आस्वाद घेणे सहज सोपे होते.
असे हे आशाताईचे सांगितीक विश्व. त्यांच्या विविध स्वरसाजाचा स्पर्श झालेली ती बुगडी असो की झुमका असो... चुडी असो की छल्ला असो...लहंगा चुनरी असो की महका महका गजरा असो. त्यांच्या मधुर सुरेल स्वरांच्या अनुभूतीने रसिकांच्या हृदयाच्या तारा अलगद छेडल्या जातात. हे मात्र निश्चित.
आशाताई! एक असामान्य, अफाट आणि प्रभावी व्यक्तीमत्व. आतापर्यंत मी त्यांना केवल मासिकातून, पुस्तकातून किवा जिथे कुठे मला ते मिळाले, ते मी आवडीने सवडीने वाचलेले आहे. आकाशवाणीवरून ऐकलेले आहे आणि आता दूरदर्शनच्या युगात किंचित जवळून पाहिलेले आहे. त्यांचे कर्णमधूर सूर सतत कानावर येत असल्यामुळे त्यांच्या सहवासाची अनुभूती जाणवते. त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध येत नसूनही त्यांच्याविषयी माझ्या मनात नितांत आदरभाव आहे आणि म्हणूनच आशाताईंचे हे असे शब्दानितांत आदरभाव आहे आणि म्हणूनच आशाताई हे शब्दा पलिकडचे व्यक्तिमत्व मी शब्दांकीत करण्याचे फार मोठे धाडस करीत आहे. अधिक उणे होण्याची मनात भीती आहे. पण तरीही त्यांच्याविषयीचे प्रेम माझ्या लेखणीला गती देत आहे आणि सुज्ञ वाचक समजून घेतिल अशी आशा ही आहे.
आशाताईंचा आज वाढदिवस. खूप खूप शुभेच्छा
आपल्या सर्वांच्या.... म्हणजेच लहान मुलांसाठी बडबडगीते गाणार्या,तान्ह्या बाळासाठी अंगाई गाणार्या, तरूणाईच्या मनात प्रीत खुलविणार्या त्यांच्यातील रूसवे-फुगवे दूर करणार्या, तर प्रौढासाठी तेवढ्याच तन्मयतेने अभंग, भक्तीगीते गाणार्या आपल्या आशाताईला शुभेच्छा देऊ या..
॥गात रहा तू गात रहा गं अशीच रसिकांसाठी
अधिक याहूनी काय शुभेच्छा देऊ मी तुझियासाठी।।
शुभम् अवतु।

O प्रा.संगीता भारत थूल
(से.नि.)संस्कृत विभागप्रमुख
महिला महाविद्यालय,
अमरावती,मो. ९४२२९५७१७१

Group content visibility: 
Use group defaults

।। सुर माझा मायबाप सुर माझा देव हो
गळ्यामध्ये जपली मी लाखाची ही ठेव हो।।>>>>

इथे "सूर" कराल का? हे खास सूरांबद्दल असल्याने राहवले नाही.

बाकी आशाताई आवडत्या आहेत. त्यांना शुभेच्छा!