भेट

Submitted by फूल on 16 August, 2018 - 07:56

या वेळी भारतातून येताना माझी शालेय पाठ्यपुस्तकं आवर्जून बरोबर घेऊन आले. अगदी सगळ्या विषयांची नसली तरी भाषांची बरीच पुस्तकं सांभाळून ठेवलीयेत मी. शाळा सुटल्यास क्वचितच उघडून बघितली असतील. पण तरी ठेवली होती जपून. एक दिवस दुपारी लेक झोपल्यावर आठव्या इयत्तेचं मराठीचं पुस्तक हातात घेतलं. अभ्यास म्हणून समोर आलेल्या, क्लिष्ट वाटणाऱ्या कथा-कविता अचानक दर्जेदार साहित्यकृती म्हणून समोर आल्या आणि आवडायला लागल्या. कित्येक धडे ज्या मूळ पुस्तकांतून घेतले होते ती पुस्तकंही वाचून झाली होती आताशा. शालेय दिवसातली परीक्षा, मार्क, अभ्यास या सगळ्यांमुळे निर्माण झालेली त्या पुस्तकाबद्दलची अनास्था कुठल्याकुठे पळून गेली होती. कुठल्या वेगळ्याच चष्म्यातून बघत होते मी त्या पुस्तकाकडे...? प्रत्येक कविता, प्रत्येक धडा नवीन काही सांगून, शिकवून जात होता. मी हरवून गेले त्या पुस्तकात. लेक उठली.. तशी पुन्हा नव्याने सापडले... स्वत:च स्वत:ला. शरीर पुन्हा रोजच्या कामाला लागलं पण मन मात्र तरीही त्या पुस्तकाभोवतीच घुटमळत राहिलं.

एक सखी आठवली... शाळेतलीच.. काहीतरी कारणावरून एकमेकींचं परत तोंड बघू नये या टोकाला गेलो होतो दोघीहीजणी. शाळा सुटल्यावर कर्मधर्मसंयोगाने एकमेकिंचं तोंड बघायची गरजच पडली नाही इतक्या वेगवेगळ्या मार्गाने चालत्या झालो. आत्ता यावेळच्या भारतवारीत माझ्या लेकीबरोबर मी आणि तिच्या लेकीबरोबर ती अचानक समोरासमोर आलो आणि नव्यानेच भेटलो दोघी एकमेकींना. तो एकमेकींबद्दलचा राग, दुस्वास मधल्या काही वर्षांत कुठल्या कुठे विरून गेला होता. आमच्या लेकींचीही छान गट्टी जमली आणि आमचीही. फोन नंबर्सची देवाणघेवाण झाली इतकंच नाही तर सहकुटुंब भेटूया म्हणून एकमेकीना वचनंही देऊन झाली. तासभर गप्पांत हरवून गेलो होतो. असं कधी शाळेत असतानाही झालं नव्हतं. पण आत्ता नव्याने भेटल्यावर झालं खरं. काळ नावाचं औषध किती ठिकाणी लागू पडतं?

मी अकरावी-बारावीत असताना सुनीताबाईंचं ‘आहे मनोहर तरी’ वाचून काढलं होतं. सुनीताबाई स्वत: एक सिद्धहस्त लेखिका म्हणून मला माहीतच नव्हत्या तेव्हा. त्यांची एकूण साहित्यातील जाण किती थोर आहे हे तेव्हा माहित नव्हतं. पु. ल. देशपांडे दैवत! तेव्हाही आणि आत्ताही. त्यांची बायको... एवढीच काय ती सुनीताबाईंची माझ्यासाठी ओळख. वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षी आयुष्याचा अनुभव तरी असा कितीसा असेल मला..? ते पुस्तक वाचून त्या वयांत सुनीताबाईंना नावं ठेव ठेव ठेवली. आमच्या कॉलेजच्या ग्रूपमध्ये तशीही मी एक सुजाण वाचक म्हणून नावाजलेली होते. त्यामुळे त्या जोषात मी खूप काही बोलून जायचे. पुलंबद्दल अत्यादराने बोलून झालं की, “काहीही म्हणा त्यांना बायको काही चांगली मिळाली नाही.” हे वाक्य ठरलेलं. अगदी काही महिन्यांपूर्वी हेच पुस्तक पुन्हा एकदा हातात पडलं. माझं लग्नं झाल्यावर, मला एक मुलगी झाल्यावर मला सुनीताबाई फार वेगळ्या अंगाने भेटू आल्या. ते पुस्तक आणि त्या स्वत: मला त्यानंतर इतक्या भावल्या की काही वर्षांपूर्वीच्या माझ्या अज्ञ बडबडीबद्दल मी त्यांची मनोमन माफी मागितली आणि त्यांची इतरही पुस्तकं विकत घेऊन आले. त्यांचं कवितावाचन हा तर एक अपूर्व ठेवा आहे. त्या कविता मी माझ्या फोनवर सतत ऐकत असते. माझी लेक त्यांना फोनमधली आज्जी म्हणते. आता विचाराल तर सुनीताबाईंच्याप्रति मला अपार आदर आणि माया आहे... पुलंपेक्षा कणभर अधिकच...

हे असं अनेकदा घडलंय. काही वर्षांपूर्वीच्या नावडीचं आवडीत रूपांतर किंवा उलटंही. लहानपणी भावा-बहिणींशी भांडताना मिळालेले असुरी आनंद आता त्याच भावंडांपासून दूर गेल्यावर चटके लावून जातात. आईशी तरुण वयात झालेलं भांडण त्यावेळी कितीही योग्य वाटलेलं असलं तरी आता तो सगळा वेडेपणा वाटतो. इतकंच कशाला एखादी माझ्याच नावडीची भाजी अनेक वर्षांनी वेगळ्या स्वरूपात कुणा सखीच्या घरी खाऊ गेले तर आवडली मला. जुना कुण्या जवळच्या व्यक्तीने दिलेला पण तेव्हा न आवडलेला ड्रेस. तो टाकवतही नाही आणि घालावासाही वाटत नाही म्हणून नुसताच ठेवून दिलेला. पण अनेक वर्षांनी काढून बघितला तर आवडला. तोच ड्रेस नव्या हौसेने वापरला गेला. किंवा या उलट आपलेच जुने फोटो बघून वाटलंय की काय म्हणून आपण तेव्हा ते तसले कपडे घालत होतो? कॉलेजात असताना लिहिलेल्या माझ्याच कविता वाचून मला आता हसू येतं. तेव्हा किती अभिमान वाटायचा त्या कवितांचा. आता कुणाच्या हाती पडल्या तर मेल्याहून मेल्यासारखं वाटेल.

त्या अवचित भेटलेल्या शाळेच्या पुस्तकाने बरंच काही माझ्या समोर आणून ठेवलं... आणि वाटून गेलं की असंच एकदा मनंही आवरायला घ्यावं. नको तो विचार, नको त्या आठवणी असं म्हणून ठोकून, हजार कड्या-कुलूपं लावून गच्चं बंद केलेले दरवाजे उघडावे. पुन्हा नव्याने भेटू जावं त्या आठवणींना. आत साचलेली जळमटं झटकून स्वच्छ करावी. आठवणींच्या घड्या मोडाव्या, लखलखीत सोनमाखल्या प्रकाशात घेऊन यावं त्यांना. एखादी बोचरी आठवण पार बोथट, हळवी झाली असेल, न जाणो हसूही येईल आपल्याला तिच्याकडे बघून... फुटलेल्या स्वप्नांच्या काचा टोचणार नाहीत कदाचित... एक एक काच उचलून त्यातून नवं स्वप्नं जोडता येईल. एखादं अलवार, नाजूक दु:खं तितकं हळवं नसेलही आताशा. एखाद्या लटक्या दु:खाचं न जाणो सुखही झालं असेल कुणी सांगावं? या सगळ्या आठवणींवरून सावकाश हात फिरवत फिरवत त्यांच्या पुन्हा नव्याने घड्या घालाव्या आणि त्या आठवणी आपल्याला हव्या तश्या नीट व्यवस्थित लावून ठेवाव्या. पुन्हा केव्हातरी असंच सहज उघडून बघण्यासाठी.

मग जाणवलं की किती बदललेय मी....? पूर्वीची मी आणि आत्ताची मी अशी माझी मीच मला किती नव्याने भेटू आलेय या साऱ्या अनुभवांतून! कोणी एक ग्रीक तत्त्वज्ञ म्हणून गेलाय नं तसंच काहीसं No man ever steps in the same river twice, for it's not the same river and he's not the same man.

ते शालेय पुस्तक हातात घेण्याआधीची मी आणि नंतरची मी या दोघींत एका अनुभवाचा फरक होता. असे क्षणोक्षणी येणारे अनुभव माझं अवघं अस्तित्त्वच कणाकणाने बदलत राहिले. मग अनेक वर्षांनी जेव्हा मीच अशी माझ्यासमोर येऊन उभी ठाकले तेव्हा जाणवलं... बरंच पाणी वाहून गेलंय.. ती नदीही तीच नाही आणि मीही तीच पूर्वीची नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग जाणवलं की किती बदललेय मी....? पूर्वीची मी आणि आत्ताची मी अशी माझी मीच मला किती नव्याने भेटू आलेय या साऱ्या अनुभवांतून! कोणी एक ग्रीक तत्त्वज्ञ म्हणून गेलाय नं तसंच काहीसं No man ever steps in the same river twice, for it's not the same river and he's not the same man.>> खुप खुप छान, सहज आणि भावणार लिहिता तुम्ही Happy

लेख वाचताना अगदी अगदी झाल Happy

काय लिहिलंयस अग सही! प्रत्येक वाक्याला "अगदी अगदी" अस होत होतं. मी पण माझी सगळी पुस्तक शाळेतली अशीच जपून ठेवलेत. पाखऱ्या, दमडी, गोकुळ, व्याघ्रदर्शन हे अन असे अनेक धडे वाचून काढतो कधीकधी; वेगळंच विश्व तयार होतं ! शाळेतले आपण आणि आत्ताचे आपण केवढं फरक पडलाय हे सारखं जाणवतं, मी हे एकदा मम्मीला सांगताना मला मम्मी म्हटली की अजून एक वीस वर्षाने यावर बोलू, त्यावेळी अजून वेगळाच सापडशील म्हणे स्वतःला!
खूप भारी लिहिलंस! थांक्यु व्हेरी मच लिहिल्याबद्दल! Happy

सुंदर लिहिलेय.
बदल हा जीवनाचा स्थायीभाव असायला हवा. अगदी कितीही मोठा बदल असला तरी तो आपल्या जिवंत असण्याचे लक्षण मानावे.

कुलू... काय बरं वाटलंय ही धड्यांची नावं वाचून... स्मशानातील सोनं, लाल चिखल, उपवास आणि दया पवारांची कोंडवाडा, कणा... आठवणीत रुतून बसलेत हे धडे आणि कविता...

खूप सुंदर लिहिलंय!
No man ever steps in the same river twice, for it's not the same river and he's not the same man.>> मस्तच!!
आहे मनोहर तरी बद्दल मी हे खूप जणांकडून ऐकलंय, पण मला मात्र अकरावी की बारावीत असताना पहिल्यांदा वाचलं ते आजपर्यंत त्याची अनेक पारायणं करेपर्यंत ते पुस्तक खूप आवडतं.

या सगळ्या आठवणींवरून सावकाश हात फिरवत फिरवत त्यांच्या पुन्हा नव्याने घड्या घालाव्या आणि त्या आठवणी आपल्याला हव्या तश्या नीट व्यवस्थित लावून ठेवाव्या. पुन्हा केव्हातरी असंच सहज उघडून बघण्यासाठी. >>> फारच सुंदर!!!

छान व्यक्त केला आहेत आपल्या मनाच्या जडण-घडणीचा प्रवास...आपणच आपल्याला नव्याने सापडतो केव्हा केव्हा.

मी पु. लं. ची पुस्तके दर चार पाच वर्षांनी वाचतो.. दर वेळी काहीतरी नवीन सापडते कारण आपला द्रुष्टीकोन बदललेला असतो , नवीन कंगोरे दिसू लागतात.... मधल्या काळातल्या जीवनाभुवामुळे पूर्वी कधीच न जाणवलेल्या वाक्यांचे अर्थ अचानक मनाला भिडू लागतात , वाक्यांचे गर्भितार्थ स्वच्छ दिसू लागतात....
त्यासाठीच परत एकदा Atlas Shrugged , Illusions , Zen and the art of motorcycle Maintenance वाचायचे आहे.

No man ever steps in the same river twice, for it's not the same river and he's not the same man. >> किती खरं आहे.

छान लिहिले आहे.

अगदी अगदी अगदी
फरक एकच सुनीताबाई तेंव्हा ही फार उत्तुंग वाटल्या होत्या. साधारण १५-१६ वर्षाची असताना वाचल होत. जे कोणी त्यांच्या विरुध बोलायच ती लोक माझ्या वर्तुळातून आपोआप गायब झाली

सुंदर लेख!
आहे मनोहर तरी अकरावीत असताना पहिल्यांदा वाचलं आणि भारावून गेले होते. सुनीताबाईंची आणि आपली खूप पूर्वीची ओळख असणार नाहीतर इतक्या सारख्या विचारांचं कोणी कसं असेल असं वाटतं आजही. त्यांच्या लेखनातून भेटलेले पुलं देखील तितकेच आपलेसे वाटले!
काळानुसार १८०°चा बदल माझ्या गाण्यांच्या आवडीत झाला. नवीन बॉलिवूड ते जुनी हिंदी गाणी असा. अर्थात काही चांगली नवीन गाणी आवडतात पण आता पहिल्या दहात सगळी जुनीच गाणी येतील.

खूप सुंदर लिहिलंय!
आहे मनोहर तरी मधले सर्वात जास्त लक्षात राहिले ते डाळींबाचे दाणे.