दुसरा चंद्र

Submitted by फूल on 26 July, 2018 - 02:31

नुकतंच आम्ही सिडनीत नवं घर घेतलं. त्या नव्या घरातलं मला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर लिव्हिंगरूम... बघताक्षणी प्रेमात पडले मी तिच्या. भव्य लिव्हिंगरूम... तिच्या दोन बाजू व्यापून टाकण्याऱ्या बाल्कन्या... आणि त्या बाल्कनीमध्ये उघडणारी काचेची तीन मोठ्ठीच्या मोठी दारं....या दारांमुळे ती लिव्हिंग रूम अजूनच प्रसन्न, मुक्त, असीम भासत होती. तिच्या भव्यतेला साजेसं सामान कुठलं असायला आमच्यापाशी? पाठीवर बिर्हाड घेऊन धावणारी कासवं आम्ही... उद्याचा काय नेम? इथेच राहू की भारतात परत जाऊ? या विवंचनेत सामान जास्त वाढवलंच नव्हतं. आमचा एकुलता एक सोफा कुठेतरी कोपऱ्यात पाय पोटाशी घेऊन बसल्यासारखा दिसत होता. एका कोपऱ्यात टीव्ही आणि एका कोपऱ्यात चार खुर्च्यांचं इवलंसं डायनिंग टेबल. झालं संपलं. पण नवीन काही घ्यायचं नाही असं आम्ही ठरवूनच टाकलं. माझं जेमतेम वर्षाचं इवलंसं लेकरू घरभर रांगेल, धावेल आणि तिचं खेळणं, खिदळणं, गोंगाट सगळं घर भरून उरेल ही खात्री होती आम्हाला आणि तेच घडायला लागलं.

नवीन जागा, नवीन घराशी आमच्याहीपेक्षा पटकन पिल्लूची नाळ जुळली आणि तिचं बोट धरून आम्ही नवं घर अनुभवायला लागलो. आमच्या आयुष्यातले सगळ्यात सोपे, सहज, सुंदर दिवस जगायला लागलो. आमचं पाल्य कोवळं होतंच पण आमचं पालकत्त्व त्याहूनही कोवळं. तिच्या डोळ्यातून जग बघणं हा आमच्यासाठी अत्यंत विस्मयकारी अनुभव होता... अजूनही आहे.

तिचं चंद्रवेडही याच घरात जन्माला आलं. आधी बोलता येत नव्हतं तेव्हा नुसतंच आ आ आ म्हणून चंद्राकडे बोट करून दाखवायची. कारमधून जातानाही इमारती आणि झाडांच्या आडून चंद्र तिच्याशी लपाछपी खेळायचा. प्रत्येकवेळा तो डोकावला की “अं अं अं....आ....” असं ऐकू यायचं. आमच्या घरातले चंद्रासारखे गोलमटोल पांढरेशुभ्र दिवे बघून ती चंद्राला (ताईत) लाईट म्हणायला लागली. रोज संध्याकाळी आकाशात लाईट लागतो... किती समर्पक नातं जोडलं नै तिच्या इवल्याश्या मेंदूने चंद्राशी? मग आम्ही ओळख करून दिली. चांदोमामा, मून... आता ती त्याला बून नाहीतर चांदो म्हणते.

हल्ली आम्ही चंद्र बघायला घराबाहेर डोकावण्याआधीच आमच्या लिव्हिंग रूमच्या दरवाज्यांतून तो आत डोकावतो. मग आमच्या घरातलं हे खुळं... “बूssssन... चांदो चांदो...” असं म्हणत टाचा उंचावून इवलंस बोट त्याच्यावर रोखतं. माझा उसना आनंद ओसंडून वाहतो... “अले वा... चांदोमामा... चल जाऊया बाहेल” असं म्हणून तिला उचलून बाल्कनीत घेऊन जाते मी. मग ती तिच्यामते तिच्या बावीस महिन्यांच्या आयुष्याचा लेखाजोखा त्याच्यासमोर मांडत असावी. मी आपली तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे निवांत... “उगी राहावे जे जे होईल ते ते पहावे...” हा खरंतर रोजचाच दिनक्रम... पण परवा एक गंमत झाली.

राखीपौर्णिमा होती... आकाश समुद्रासारखं दिसत होतं... ढग नी ढग फेसाळलेल्या लाटेसारखा दिसत होता. क्षितिजाच्या कडेने संध्येच्या अनेकरंगी छटा उमटल्या होत्या. आज निसर्गराजा भलत्याच खुशीत असावा... अशी बहुरंगी छटांची उधळण फार क्वचित बघायला मिळते. हा सगळा रंगोत्सव उणा की काय म्हणून टप्पोऱ्या मोत्यासारखा तेजस्वी दिसणारा गोल गरगरीत चंद्र दिसायला लागला. मी हे बघितलं आणि पिल्लाला हाक मारली. आमच्या लिव्हिंग रूमच्या एका दरवाज्यात मी बसले होते आणि एका दरवाज्याशी नवरा. त्यालाही समोरचा देखावा भावला असणार त्यानेही पिल्लूला हाक मारली. पिल्लू बाबावेडं आहे म्हणून त्याच्यापाशी धावलं. त्याने तिला उचलून घेऊन चंद्र दाखवला. पण त्या दरवाज्यातून सगळाच्या सगळा गोळा दिसेना.... एक उर्मट झाड मध्ये डोकावत होतं. पिल्लूचं समाधान झालं नाही. मग मी तिला माझ्याकडे बोलावलं... तिला तो मोत्याचा टप्पोरा दाणा दाखवला. ती भयंकर खूष झाली माझ्या हातात उड्या मारायला लागली आणि म्हणाली... “दोनदोन...”

मला क्षणभर कळेना ही काय म्हणतेय. मग लक्षात आलं. बाबाच्या कडेवरून बघितला तो एक चांदो आणि माझ्या कडेवरून बघितला तो दुसरा चांदो अशी समजूत झाली बाईंची. त्यादिवशी आकाशात दोन चंद्र बघितल्याचं सुख ओसंडत होतं तिच्या दोन्ही डोळ्यातून. ती पुन्हा बाबाकडे धावली... तिथून परत एकदा तिने पहिला चंद्र बघून घेतला आणि पुन्हा दुसरा चंद्र बघायला माझ्याकडे झेपावली. भल्या मोठ्या लिव्हिंग रूमच्या दोन दरवाज्यांची ही कमाल होती. बाबाजवळच्या दरवाज्यात एक चंद्र होता आणि माझ्याजवळच्या दरवाज्यात दुसरा. माझं पिल्लू ती संपूर्ण संध्याकाळ दोन दरवाज्यात धावत राहीलं... तिच्या कल्पनेतले दोन चंद्र आम्ही विस्कटले नाहीत. आणि तसेही ते कसे विस्कटणार होतो आम्ही? कसं पटवून देणार होतो तिला की चंद्र एकच आहे?

आमच्या लिव्हिंग रूमच्या दोन दरवाज्यातून दिसणाऱ्या दोन चंद्रांचा खेळ आजही सुरू असतो. आम्हीही सगळं भान हरवून तो खेळ बघत बसतो. कुठेतरी आत जाणवत असतं की हे काही चिरंतन नाही. कधीच संपू नयेत अश्या वाटणाऱ्या वेळाच लवकर संपतात. असेच दिवस भराभर उलटतात. कुठेतरी खोलवर आत ही रुखरुख होतीच. दोन-तीन दिवसांपूर्वी हा खेळ बघत असताना ती हूर हूर आलीच वर... वाटलं... कधीतरी ती मोठी होईल. “मनू, इथून दुसरा चंद्र दिसतोय बघ...” असं मी तिला हाक मारून सांगेन आणि ती मोठ्ठ्या माणसासारखं मलाच समजावून सांगेल “मम्मा, don’t you know this? The earth has got only one moon?” पण माझ्यातलं आईपण...? ते कसं मोठं व्हायचं...? तेव्हाही लहानच असेल माझ्यातली आई... ती मात्र त्यानंतर आजन्म दुसरा चंद्र शोधत धावत राहील...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर लेखन. आधी वाचलं होतं पण प्रतिसाद द्यायचा राहून गेला. नावासारखंच नाजूक आणि हळवे लेखन।

कित्ती गोड लिहीलंय..... Happy छोटुकली अगदी डोळ्यासमोर आली पळापळी करताना! Happy पिल्लूला माझ्याकडून एक चाॅकलेट द्या. Happy

@ फूल ,

मून इज इन्डीड अ बून Happy

वात्सल्याचं चांदणं पडलंय तुमच्या लिखाणात. आवडलं !

अनिंद्य

आई ग्ग!!! काय अलवार लेखन आहे. फार सुंदर.
>>>>>>>>>>>>>>पण माझ्यातलं आईपण...? ते कसं मोठं व्हायचं...? तेव्हाही लहानच असेल माझ्यातली आई... ती मात्र त्यानंतर आजन्म दुसरा चंद्र शोधत धावत राहील...>>>>>>>> माझे डोळे इथे ओले झाले.

Pages