कथा सुवर्णाची

Submitted by बेफ़िकीर on 31 August, 2018 - 23:08

आशा कार्यकर्त्यांची सभा आटोपून सुवर्णा गावी परतत होती. मुलीची आणि मुलाची शाळा सुटली असेल आणि दोघे चालत चालत घरी येत असतील ह्याचा तिला अंदाज होता. एस टी मध्ये बसून ती खिडकीतून दिसणारे उजाड बोडके डोंगर बघत स्वतःच्या आयुष्याशी त्यांची तुलना करत होती. हे उजाड बोडके डोंगर आणि टेकड्या तिला खूप काही शिकवायचे. सुवर्णाच्या समाजातील स्थानिक पुढारी, जाणती माणसं, चार शब्द बोलता येणारी माणसं आणि हे डोंगर अगदी सारखे वाटत होते तिला! ह्या डोंगरांवर फक्त तेव्हाच हिरवा रंग चढतो जेव्हा वरून चार थेंब पडतात. तशीच ही जाणती माणसं आणि पुढारी! कुठलासा शासकीय निधी आला तर महोत्सव असल्यासारखे घरोघरी जाऊन, सगळ्यांशी गोड बोलून, सगळ्यांची आधार कार्डे आणि अर्ज घेणार. अक्कल शिकवणार! निधीतील किरकोळ भाग गावकर्‍यांना एखाद्या स्वरुपात पोचवणार. बाकी गिळंकृत करणार! एरवी आठ नऊ महिने नुसते पांढरे नेहरू शर्ट आणि पायजमे घालून गावात फिरणार किंवा बसून राहणार. चकाट्या पिटणार!

'समाज'! हा शब्द तिच्या काळजात इतका खोलवर रुतला होता की तिला फक्त इतकेच जाणवत होते की कधीकाळी आपल्याला ह्या शब्दाची किळस वाटत होती. घृणा वाटत होती. पण ती किळस, घृणा, केव्हा गाडून टाकावी लागली आणि केव्हा आपण ह्याच 'समाज'नावाच्या यंत्रणेचा एक नगण्य भाग होऊन बसलो हे मात्र तिला आठवत नव्हते. ह्या समाज शब्दाचा विशिष्ट अर्थ होता त्यांच्या गावात! विशिष्ट समाजाची लोकं असा तो अर्थ! एकंदर समाज असा त्या शब्दाचा अर्थ नव्हता.

आशा कार्यकर्त्यांच्या सभेत सांगितल्यानुसार सुवर्णा आता गावी जाऊन गरोदर बायका शोधणार होती. गाव म्हणजे काय? आठशे लोकवस्तीची एक वाडी! सगळे रोजच एकमेकांना भेटणारे! त्यात गरोदर बायका हुडकायला कशाला लागणार आहेत? सुवर्णाला तर तीन बायका माहीतही होत्या. त्या बायकांच्या डिलीव्हरीनंतर दिड वर्षापर्यंतचे लसीकरण होईपर्यंत सुवर्णाला त्यांची काळजी घ्यावी लागणार होती. त्याचा अल्पसा मोबदला मिळणार होता सरकारकडून! त्या मोबदल्यात काहीच विशेष करता येत नसले तरी निदान तेवढेच, असे म्हणून ती दारोदारी फिरायला तयार झाली होती. टीबीचे पेशंटही शोधायचे होते. पहिली सहा महिन्याची औषधे त्या पेशंट्सना स्वतःहून घरी नेऊन द्यायची होती. तसे काम मजेशीर होते. ह्याचे कारण जाईल त्या घरात मान मिळणार होता. फुकटच प्रबोधन करणारी आणि काळजी घेणारी एक आशा घरी येत असेल तर कोण नाही म्हणेल? तिला घरोघरची माणसे चहापाणी विचारू लागली होती. किंचित आदर मिळू लागला होता. तिच्या गावात ती एकटीच आशा होती. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रत्येक गावात आशा नेमल्या जायच्या. ती एकटीच आशा बनू शकत असल्यामुळे काही बायका खट्टू झाल्या होत्या. त्या तिच्या पाठीवर तिची बदनामी करत होत्या. आशाच्या नावाखाली ही गावाला जाते आणि काहीतरी करून येते म्हणत होत्या. जाताना आणि येताना कशी चमकदार दिसते बघा, असेही म्हणत होत्या. मुले इतकी लहान असून रस्त्यावरून चालत शाळेत जातात आणि येतात पण हिला काळजी नाही असे म्हणत होत्या. सुवर्णाला मात्र मुलांची काळजी वाटत असे. मुलगी आता वयात आली होती. दुर्मीळ कांती मिलालेली मुलगी चांगली उंचही होती. नजरेत भरण्यासारखी होती. थोडा स्वयंपाक करायला शिकली होती. लहान भावाला सांभाळून घरी आणत होती. लहान भावाकडे बघायचे असल्यामुळे स्वतःकडे कोण बघतंय की काय हे बघत बसायला तिला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे आईच्या म्हणण्याप्रमाणे दोघे सुसाट चालत शाळेत जात आणि सुसाट चालत घरी येत. मुलगी वर्गात पहिल्या पाचात येत असल्यामुळे तिचे शैक्षणिक पालकत्व एका संस्थेने घेतले होते. निदान तो खर्च वाचला म्हणून सुवर्णा खुशीत होती. नाहीतर नवरा कधीपासूनच म्हणत होता की जास्तीतजास्त दहावीपर्यंत पोरीला शाळेत पाठवायचे. ह्या संस्थेमुळे मुलगी निदान कॉलेजला जाईल असे सुवर्णाला वाटत होते.

सुवर्णा शेतात मजूरी करायची! ते तिचे मुख्य काम होते. दिवसाला एकशे ऐंशी पासून दोनशे साठपर्यंत मजूरी मिळायची. पण हे काम दररोज असायचे असे नाही. आठवड्यातून तीनेक दिवस असायचे. उरलेले दिवस ती शिवणकाम करायची. मोठ्या गावी जाऊन ब्लाऊज शिवायचे काम शिकून आल्याचा तिला फायदा झाला होता. साडे तीन हजारात एक सेकंड हँड मशीनही मिळाले होते. ते मशीन घरात आलेले पाहून नवर्‍याने सुवर्णाच्या कंबरेत लाथ घातली होती. टीचभर खोलीत हे मशीन ठेवले तर बसायचे कुठे, जेवायचे कुठे आणि झोपायचे कुठे म्हणाला होता. डोळ्यातले पाणी पुसत सुवर्णाने कडाडून विरोध केला होता रात्रभर! दुसर्‍या दिवशी रात्री सुवर्णाने गावातील एका बाईकडून आलेली चाळीस रुपये शिलाई नवर्‍याला दाखवली तेव्हा कळी खुलली. म्हणाला हेच करत जा, शेतात जायचे कशाला! ती म्हणाली शिवण शिवून पाय दुखतात, सारखे नाही शिवण शिवता येणार. नवर्‍यालाही शेतात काम असायचे. पण ते अर्धा दिवस करून तो अर्ध्या दिवसाचे पैसे घेऊन दारू प्यायला निघून जायचा. थेट रात्री येऊन घरात आडवा व्हायचा. अनेकदा त्याचे वाढलेले ताट दुसर्‍या दिवशी गुरांना घालावे लागायचे. तो सुवर्णाला देत असलेल्या शिव्या मुलगा केव्हाच शिकून बसला होता. मुलाला ह्या वयात त्या शिव्या येतात हे सुवर्णाला माहीतच नव्हते.

एका दुसर्‍याच संस्थेने पर्यावरणास हानिकारक नसलेले असे सॅनिटरी नॅपकीन्स सुवर्णाला विकायला म्हणून दिले होते. टीव्हीवर दिसणार्‍या जाहिरातीतील कंपन्यांचेच नॅपकीन्स वापरणार्‍या कॉलेजमधील मुली सुवर्णाकडचे नॅपकीन्स घ्यायला तयार होत नव्हत्या. हळूहळू त्यांचे प्रबोधन करत सुवर्णा त्यांचे मन तयार करत होती. हे नॅपकीन्स किंचित स्वस्तही होते. काहीवेळा कमी असलेली किंमतच उत्पादनाला ग्राहकाच्यामते कमी दर्जाची ठरवते हा विचित्र अनुभव सुवर्णा घेत होती. त्यातच सुवर्णाच्या एकंदर धडाडीमुळे भडकलेल्या काही बायका इतर बायकांना नॅपकीन्सऐवजी पारंपारीक प्रकारे कापडच वापरलेले बरे हे उलटे शिकवत होत्या. तो एक विरोध मोडून काढताना सुवर्णा तिच्या विरोधात असलेले घटक मोजायचाही कंटाळा करू लागली होती. न विकले गेलेले नॅपकीन्स ती आणि तिची मुलगी वापरू शकत असल्यामुळे तो एक खर्च वाचला होता.

उजाड बोडक्या टेकड्यांच्या रांगांमधून एस टी बस चालली होती. दिवसभर घामाने चकाकणार्‍या सुवर्णाच्या कपाळावर आता काही केस वार्‍याने उडत होते. डोळे शून्यात लावून सुवर्णा नव्यानेच उपटलेल्या संकटावर विचार करत होती.

घराला लागूनच असलेल्या जागेत कानिफनाथाचे हे भले मोठे मंदिर समाजाने बांधून ठेवले होते. त्या मंदिरात येणार्‍या भक्तगणांना विसाव्यासाठी म्हणून जी जागा करायची होती त्यासाठी समाज सुवर्णाचे घर मागत होता. एकेकाळी निर्व्यसनी असलेल्या नवर्‍यासोबत अपार कष्ट करून सुवर्णाने ती टिचभर खोली बांधली होती. ती आता जाणार होती. आता नवरा समाजाच्या बाजूने होता. त्याला अजून वाटत होते की समाज पर्यायी जागा देणार आहे. पण समाज म्हणत होता की तुम्हाला घरकुल योजनेत काहीतरी मिळेल. म्हणजे सगळेच बेभरवश्याचे होते. नवर्‍याने एकदा समाजाशी वाद काढून पाहिला तर त्याच्यावर इतका दबाव आणण्यात आला की तो गळपटलाच! त्या रात्री त्याने भरपूर प्यायली, घरात आला आणि समाजाला देता येत नाहीत म्हणून सुवर्णाला शिव्या दिल्या. लाथाही घातल्या. तूच फुटक्या नशिबाची म्हणून हे संकट कोसळलंय म्हणाला! सुवर्णा त्या रात्री रडली नाही.

कानिफनाथाला कळस बसवायचा दिवस जवळ जवळ येऊ लागला होता. सुवर्णाचे टेन्शन वाढत चालले होते. एखाद्या ओळखीच्या माणसाने लिफ्ट दिली आणि थकलेल्या सुवर्णाने कधीकाळी ती घेतली तर वाडीतील बायका एकमेकीत चर्चा करायच्या. ते नवर्‍यापर्यंत पोचले तर नवरा सतरा प्रश्न विचारायचा. सासू, सासरे दुसर्‍याच गावी राहायचे आणि नवर्‍याला काहीही सांगायचे नाहीत. हाताच्या पंजात मावेल इतक्याश्या आरश्यात बघण्याचे मुलीचे प्रमाण वाढल्याचे सुवर्णाच्या केव्हाच लक्षात आले होते. स्वयंपाक करता करता तिला आडवळणे घेऊन सुवर्णा चार चांगल्या गोष्टी सांगून ठेवायची. निदान मुलगी आणि मुलगा हे एकमेकांशी भांडत नव्हते. पण कानिफनाथ मात्र घरावर उठलेला होता.

पुढच्या आठवड्यात खोली पाडणार असे समाजाने सांगितले आणि सुवर्णाचे पाय जमीनीला खिळले. तिने हाताने पलंगाचा आधार घेतला. घरात दुसरे कोणीच नव्हते ते बरे झाले. नाहीतर ती खरोखर रडली असती. अक्षरशः ओक्साबोशी रडली असती. पण त्याक्षणी ती एकटी होती. समाज घरातून निघून गेला तरी बराच वेळ ती तशीच उभी होती. मग दारात येऊन तिने कानिफनाथाकडे बघितले. नवरा देत असलेल्या यच्चयावत शिव्या तिला त्याक्षणी सुचल्या. पण ओठ घट्ट मिटत आणि आसवांना गालांवरून ओघळू देत तिने भक्तीभावाने हात जोडले व पुटपुटली, कानिफनाथा, लक्ष ठेव रे बाबा भक्तांवर!

रात्री नवर्‍याला सांगितले. नशेत असलेल्या नवर्‍याने पहिल्यांदाच घराबाहेर पडून समाजाला शिव्या घातल्या. तसे मग घाबरून तिनेच त्याला आत आणले. पण बातमी कर्णोपकर्णी झालीच. अर्ध्या रात्री समाज दारात आला. काय चालले आहे म्हणून दरडावून विचारू लागला. पदर पसरून सुवर्णाने समाजाची माफी मागीतली आणि समाजाला परत पाठवले. पोरे घाबरून एकमेकांना बिलगली होती. नवरा सुवर्णाच्या मागे उभा होता.

सुवर्णा एस टी तून उतरली. लगबगीने वाडीकडे आली. बोंगळे नावाचे एक कुटुंब मुंबईला कायमचे गेले होते. त्यांनी त्यांची खोली सुवर्णाला भाड्याने द्यायला तयारी दर्शवली होती. त्या घराची किल्ली सुवर्णाने शेजार्‍यांकडून घेतली आणि ते घर उघडले. घराच्या आत बांधलेली मोरी होती. आंघोळीनंतर आता सगळ्या गावासमोर नुसत्या परकरावर धावत धावत घरात जायची गरज उरणार नव्हती. पण भाडे बरेच होते. दोन ओळखीची पोरे हाताशी घेऊन सुवर्णाने सामान शिफ्ट केले. रात्री नवरा घरी येईल तेव्हा हबकेलच ह्या विचाराने त्याही परिस्थितीत ती हसली. आजपासून नवीन घर हाही एक आनंद तिच्यातील स्त्रीला बिचारीला झालेलाच होता. मुलांना ही खोली आवडली. रात्री नवरा आला. रिकामे घर बघून बोंब मारू लागला. त्याची थोडा वेळ मजा पाहून सुवर्णाने हसत हसत त्याला ह्या खोलीत बोलावले. खोली पाहून नवरा भांबावलाच. पण चांगली खोली आहे म्हणाला.

दुसर्‍या दिवशी समाज आला. घरावर पहिला वार झाला. सुवर्णा आणि नवरा ते पाहून रडू लागले. चार म्हातार्‍या बायका त्यांना सावरू लागल्या. हक्काचे घर जमीनदोस्त होत होते. भाड्याच्या खोलीत राहावे लागणार होते. पुन्हा आयुष्यात हक्काचे घर कधी होणार हे माहीत नव्हते. सुवर्णाला तर ती शक्यताच वाटत नव्हती कारण आता नवर्‍याची साथच नव्हती. मुलेही मोठी होऊ लागली होती. कधीकाळी गुलाबी स्वप्ने पाहून अपार कष्टांनी बांधलेली ती टिचभर खोली ढिगार्‍यात रुपांतरीत होत होती. समाज हसत होता. कानिफनाथाच्या भाविकांना जागा झाली म्हणत होता. कोंबडंही आणुन ठेवलेलं होतं. तेवढं मात्र नवर्‍याला खायचं होतं

पूर्ण खोली कोसळल्यावर स्वतःच्या मनाचा ढिगारा करून सुवर्णा पुन्हा आशा बनली आणि एका गरोदर बाईला भेटायला गेली. जणू काही झालेच नव्हते

त्या गरोदर बाईने हिचीच आस्थेने चौकशी केली तर सुवर्णाने हसत हसत सांगितले.

"कानिफनाथ आलाय वाडीत म्हन्ल्यावं तेवढं करायलाच लागंन की आपल्याला, न्है का?"

मुलीचे शैक्षणिक पालकत्व घेणार्‍या संस्थेची माणसे दोन दिवसांनी वेगळ्या कामासाठी वाडीत आली. सुवर्णा त्यांनाही भेटली. म्हणाली आठवीची गाईड मिळायची राहिली आहेत. ते लोक बरं म्हणाले. ते निघत असताना सुवर्णा म्हणाली..........

"पुढच्या आठवड्यात या बरं का! कानिफनाथाचा कळस चढवायचाय. लई मोठा उत्सव आहे"

त्या लोकांपैकी एक बाई म्हणाली, तोच कानिफनाथ ना, ज्याच्यामुळे तुमची खोली गेली?

वरकरणी हसून पाय काढता घेताना, पहिल्यांदाच सुवर्णाने मान फिरवली आणि अश्रू वाहू दिले

फक्त, दिसू नाही दिले..........

=========

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टची !
बेफी आता लिहीत रहा प्लिज..

भयाण वास्तव!

दुर्मीळ कांती मिलालेली >>>>. मिळालेली अस हवय का इथे?

तुमच्याकडून टायपो होत नाहीत म्हणून एक शंका फक्त.

सॉरी... नेटवर्क प्रॉब्लेम मुळे तीनदा पोस्ट झालेले

खास बेफि टच नाही उतरलाय कथेत. आपण नेहमीच उपरोधिक लिहीता,सॉक्रेटिस लिहीतोय असंच मला तरी वाटतं.
कानिफनाथाच्या भक्तांऐवजी परशुरामाचे भक्त असते तर असा उपरोध पर लेख आला असता काय?

न जाणे का, तुमच्या आधीच्या कथांमध्ये नावीन्य असायचं, आता ते कुठेही जाणवत नाही.
धक्कातंत्र, रसाळ वर्णन ह्या तुमच्या पूर्वीच्या लिखाणाच्या ज्या जमेच्या बाजू होत्या, त्या अजूनही आहेत, पण किंबहुना त्याचा जास्तच अतिरेक झालाय.
प्रत्येक गोष्ट मेलोड्रामा न करताही सांगता येऊ शकते, पण तिचा प्रभाव काळजापर्यंत जाऊ शकतो. (संदर्भ- कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट)
तुमच्या कथेची सरळधोपट मांडणीही मी सांगू शकतो, इतकं प्रेडिक्टेबल झालंय.
१. एखाद्या व्यक्तीच गरजेपेक्षा जास्त व्यक्तिचित्रण.
२. मग त्याच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम टाकणे.
३. त्यात दोन चार सुखाचे क्षण.
४. मग सगळं हळूहळू नीट होईल असं दाखवणे.
४. आणि त्यांनंतर काहीतरी विचित्र दाखवून सगळं वाईट करून टाकायचं.
५. मग नावापुरता आशेचा किरण.

यामध्ये सढळ हातानी ..... किंवा ! या चिन्हांचा वापर. आणि तुमचे नेहमीचे स्टिरियोटाईप असतातच.

सॉरी, पण आता फक्त काहीतरी नवीन वाचायला मिळेल अशी अंधुक आशा सुल्यानंतर जागृत झाली होती. पण....
असो. पुलेंशु