मोगरा

Submitted by VB on 29 August, 2018 - 15:01

हॉस्पिटलच्या त्या एकाकी खोलीत अगदी कंटाळून गेली होती प्रिया. त्यातच कधीतरी डोळा लागला तिचा, अन जाग आली ती मंद दरवळणाऱ्या मोगऱ्याच्या सुवासाने. वॉर्डबॉय अगरबत्ती लावून गेला म्हणजे संध्याकाळ झाली होती. तसेही दिवस काय अन रात्र काय, तिला त्याने असा कायसा फरक पडणार होता म्हणा. अनिच्छेने का असेना पण तिने हे सत्य स्वीकारले होते की आता काही ती जिवंत इथुन बाहेर पडणार नाही. जीवन कितीही त्रासिक असले तरी मरणाची भीती प्रत्येकाला वाटते. पण प्रिया या सगळ्याला इतकी विटली होती की तिला आता कशाचेच काही वाटत नव्हते.
पण आता तिला काहितरी वेगळी जाणीव झाली. अगरबत्ती तर रोज सकाळ - संध्याकाळ लावली जायची, पण त्यामुळे तिला इतके प्रसन्न वाटायचे नाही, कारण हे असे हॉस्पिटलचे वातावरण. पण आज काहीतरी नक्कीच वेगळे होते. अन नेमके तेव्हाच तिची नजर बाजूच्या टेबलावर ठेवलेल्या मोगऱ्याच्या फुलांवर पडली. अन तिचे तिलाच गवसले की अचानक इतके छान का वाटत होते तिला.
लहानपणापासून प्रियाला पांढरी फुले खूप आवडायची. केशरी दांडा असलेला पारिजात, आपल्या सुगंधाने मोहून टाकणारा मोगरा, डोळ्याला एक प्रकारची शीतलता देणारा पांढरा गुलाब, एवढेच काय अगदी तगरही तिची आवडती.
आपल्या कृश झालेल्या थरथरत्या हाताच्या ओंजळीत काही फुले घेतली तिने, अन स्वतःच्याही नकळत भूतकाळात रमली.

तिचे हे पांढऱ्या फुलांसाठीचे प्रेम कसे कोण जाणे तिने न सांगताही अमितला कळले होते. अमित अन प्रिया एकाच कंपनीत कामाला होते. अन दोघेही प्रेमात होते एकमेकांच्या, फक्त त्याची कबुली मात्र नव्हती दिली. कदाचित त्या प्रेमामुळेच असेल पण अमितला कळले होते की प्रियाला पांढरी फुले खूप आवडतात. त्यानंतर रोज तो मोगऱ्याचा गजरा तिच्या डेस्कवर ठेवून जायचा. प्रियाला ते खूप आवडायचे. काहीच न बोलता खूप काही बोलून जायचे ते दोघेही त्या फुलांमुळे.

आज जेव्हा हॉस्पिटलमध्ये ती फुले पाहीली तेव्हा सगळ्यात आधी तिला अमितचीच आठवण आली, पण सोबत हेही आठवले की तिचा अमित आता या जगात नाही. त्याच्या जाण्यानंतर इतका काळ होऊनही तिने कधीच त्यानंतर मोगरा घेतला नव्हता. मोगऱ्याची फुले तिला अमितच्या आठवणीत घेऊन जायची अन त्याचा शेवट नेहमी ओघळणाऱ्या अश्रुत अन न संपणाऱ्या वेदनेत व्हायचा. म्हणून तो गेल्यावर तिने कधीच मोगरा घेतला नव्हता.

आता जवळपास महिनाभर प्रिया हॉस्पिटलमध्ये होती, मग इतक्या दिवसात जे नाही झाले ते आज कसे काय? हल्ली तर तिला कोणी भेटायला देखील येत नव्हते, मग ही फुले कोणी आणली, हा प्रश्न पडला होता तिला.

अन अचानक जणू तिचे तिलाच उत्तर मिळाले, या मोगऱ्याच्या फुलांना फक्त त्यांचा सुवास नव्हता तर त्यांना गंध होता अमितच्या स्पर्शाचा. तो नुसता विचारच इतका सुखावह होता की त्या आनंदातच डोळे मिटले तिने. तिला कायम वाटायचे की आयुष्याच्या सांजवेळी तिचा अमित येईल तिला घ्यायला, अन आज तो खरेच आला होता मोगरा बनून.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

Pages