फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

या दिलेल्या लिंक्स संबंधितांच्या रिसर्चच्या आहेत. त्याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडे मागावे. काही लोक इग्नोर करतीलच. त्यांचे आगाऊ धन्यवाद. Happy

भागवत सर,
वर दिलेल्या लिंक मधे एक लिंक डॉ. दीक्षित यांच्या रिसर्च पेपरची दिलेली आहे. तो संयुक्त संशोधनाचा पेपर आहे. त्यामधे त्यांनी प्रिडायबेटिक ( ६.५ किंवा कमी ) असे प्रमाण असलेल्यांवर प्रयोग केलेले आहेत. ६.५ पेक्षा जास्त लेव्हल असेल तर काय ? त्यांच्या इतर पेपर्सच्या लिंक्स मिळतील का ?
इतर ठिकाणी टाईप टू डायबेटीस रिव्हर्स होतो असे संशोधन झाल्याचे पेपर्स वरच्या लिंक्स मधे दिसत आहेत.
( मी यातला तज्ञ नाही. सामान्य आहे).

दीक्षिताख्यानाचे काही काही भाग त्या दुसर्‍या धाग्यावर लिहिले गेलेले दिसले. काही लोकांकडे या कार्यासाठी भरपूर वेळ आहे, असे दिसते. तर असे अधले मधले भाग त्या दुसर्‍या धाग्यावर लिहिण्यापेक्षा इथेच लिहुन काढले तर पुण्याची गणना वाढेल. सगळं एकदम लिहिलं पाहिजे असं नाही. हरिनामसप्ताह असतात, तसे मास ठेवले तरी चालतील. जमलेल्या भाविकांना मायबोलीच्या पावन मंदिरातच या आख्यानाचा लाभ घेता येईल. मायबोलीचेही पुण्यांक वाढतील.

इथे काही मंडळींनी ट्रोलिंगला दिल्या गेलेल्या सुसंस्कृत स्मायलीचं खूप कौतुक केलंय. आता त्यावरून आणखी एका अशाच आयडीची आठवण झाली. ही इज ऑल्सो सो कूऽऽऽऽल., यु क्नो!

तर त्या मंडळींचं सईंच्या धाग्यावर जे काही चालू झालं, त्याबद्दल काय मत आहे?

भागवतांनी हा लेख भारावून जाऊन लिहिलंय जाहिरात वाटत नाही असे वाटते असं मी आधी लिहिलं. नंतर असंही वाटलं की असेल हा धागा डॉ. दीक्षितांची जाहिरात हरकत नाही. ते या धाग्यापुरते मर्यादीत राहील.

पण सईंच्या धाग्यावरही त्यांचे तेच पालुपद सुरू आहे.
अमुक नंबरवर संपर्क करा, कुणी दीक्षितांच्या पद्धतीवर प्रश्न विचारला की त्याला विपु बघा, कुणी काही शंका विचारली की दीक्षित असं म्हणतात म्हणून व्हिडिओचा संदर्भ आणि त्याचे प्रतिलेखन. त्यामुळे तो धागाही विविध आहारप्रणालींची चर्चा ऐवजी दीक्षितांच्या पद्धतींची कमाल याकडेच वळलेला आहे.

@फारएंड
>>>ही अशी वाक्ये व्हॉअ‍ॅ वरून येतात आणि अनेक जण शहानिशा करता ती इण्टर्नलाइज करतात. हे वाचून असे वाटेल की डॉक्टरांना एम्बीबीएस झाल्यावर एक बाड दिले जाते आणि एखाद्या धर्मग्रंथाप्रमाणे "त्यात जे आहे तेच खरे" असे मानायची सक्ती केली जाते. कल्पना करा. दरवर्षी हजारो डॉक्टर्स तयार होता. त्या त्या वर्षातील विद्यार्थ्यांपैकी "क्रीम" मधले, या विषयाची आवड, विचार करण्याची आणि विषय ग्रास्प करण्याची क्षमता असलेले आणि समकालीन इतर अनेक क्षेत्रातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त काळ मेहनत घेण्याची तयारी असलेले जे तरूण असतात त्यातीलच सहसा यात येतात (इतर अनेक क्षेत्रातही जातात पण वैद्यक क्षेत्रात साधारण असेच लोक येतात हे इथे महत्त्वाचे).

यांना जर असे काहीतरी ब्रह्मवाक्य सांगितले, तर शिक्षणाच्या ४-६ वर्षांत, रेसिडेन्सीच्या काळात, स्वतःच्या प्रॅक्टिस मधे, इतर मेडिकल रिसर्च मधे असणारे हे लोक "असे का?" विचारून त्याचा शोध घ्यायचा काहीच प्रयत्न करत नसतील? मला खात्री आहे की एखादा रोग असाध्य आहे असे जर कॉमन नॉलेज असेल, तर वैद्यकीय क्षेत्रातील किमान अर्ध्या लोकांचा पहिला इन्स्टिन्क्ट हा असेल की यावर इलाज कसा शोधता येइल. आणि असा इलाज जर सापडला, तर तो डबल ब्लाइण्ड टेस्ट्स पासून इतर अनेक मार्गांनी असंख्य लोकांवर वापरून त्याचे साइड इफेक्ट्स, इतर आजार असलेल्या लोकांवरचे परिणाम या सगळ्याची "पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याची, आणि कोणीही ते सिद्ध करण्याची" खात्री झाल्याशिवाय मेडिकल कंपन्या व या क्षेत्रातील लोक तसे जाहीर करत नाहीत.

या दोन पॅराग्राफना अनुमोदन.
मुख्य म्हणजे दीक्षितांच्या आधी कितीतरी वर्षं फास्टिंग म्हणा किंवा लो कार्बोहायड्रेट डाएट म्हणा सगळ्यावर झालेले रिसर्च हे मेडिकल डॉक्टरांनी केले आहे.
फास्टिंग आणि त्याचा एजिंगवर आणि वजनावर काय परिणाम होतो हे पाहणारे मार्क मॅटसन (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंग) असोत किंवा सचिदानंद पांडा (सरकेडीएन रिदम) https://www.the-scientist.com/features/running-on-empty-31436.
सचिदानंद पांडा यांचा एक प्रबंध तर २००९ साली म्हणजे १० वर्षांपूर्वी पी एन ए एस या अतिशय हाय फॅक्टरच्या जर्नलमध्ये पब्लिश झाला आहे.

हा डॉ. मॅटसन यांचा २००५ चा पेपर https://www.sciencedirect.com/science/article/pii/S095528630400261X

हा डॉ. लस्टिग यांचा २०१२ सालचा पेपर https://www.nature.com/articles/nrgastro.2010.41

पण त्या सायंटिस्टमधल्या आर्टिकलमध्ये हे पण लिहिले आहे
Panda’s research formed the basis of one such product, branded as The 8-Hour Diet. The book, cowritten by an editor at Men’s Health, which covered Panda’s research when it came out in 2012, claimed (right on the cover) that dieters who restricted their food consumption to an eight-hour window every day could “watch the pounds disappear without watching what you eat!”

त्यामुळे, जे डॉक्टर यात वर्षानुवर्षे काम करतात ते मागे राहतात. आणि जे लोकांना कळेल अश्या (पण नेहमी ऍक्युरेट असेल असे काही नाही) भाषेत ते प्रसिद्ध करतात त्यांना प्रसिद्धी मिळते. प्रसिद्धी मिळते हा भाग दुय्यम आहे. अशा रिसर्चचे जे माऊथ टु माऊथ "डंबिंग डाऊन" होते ते धोकादायक असते.
५:२ डाएटचा जनक मायकल मोझली हे जरी डॉक्टर असले, तरी ते मेडिकल जर्नालिसम करतात. त्यांनी आयएफ वर होरायझन या बीबीसीच्या कार्यक्रमात एक एपिसोड केला होता. त्यानंतर त्यांनी स्वत: ५:२ डाएट, मेडिटरेनिअन डाएट आणि ब्लड शुगर डाएट अशी पुस्तके लिहिली. पण या सगळ्याचा बेस एकच आहे. आणि यातले कुठलेही रिसर्चचे काम मोजली यांनी स्वतः केलेले नाही. पण तेदेखील प्रत्येक मुलाखतीत सांगतात की टाईप २ किंवा लठ्ठपणा असेल तर काहीही खाऊन फास्टिंग करून वजन कमी करणे बरोबर नाही. जास्त प्रमाणात, पण हेल्दीच खायला हवे.
***********************
खड्डा,
टाईप २ रिव्हर्स होतो हे खूप आधीपासून लोकांना माहिती आहे. महाराष्ट्रात दीक्षित पद्धत लागू व्हायच्या आधी.
पण पण पण पण

"The treatment plan involved creating a personalised exercise regime for each trial participant and reducing their calories by between 500 and 750 a day. "

हे तुम्ही दिलेल्या न्यूज मधलं दुसरंच वाक्य आहे. पर्सनलाइझ्ड रेजिम. आणि कॅलरी रिडक्शन.
अर्थात, प्रत्येकाच्या प्रकुतीप्रमाणे तयार केलेला व्यायामाचा प्लॅन आणि खाणे कमी करणे. इथे त्याला कॅलरी म्हंटले तरी तुम्ही कार्बोहायड्रेट्स कमी करूनसुद्धा तेच साध्य करत असता.

म्हणून, पुन्हा एकदा, टाईप २ असेल तर फक्त ५५ मिनिटांच्या २ विंडो आहेत म्हणून काहीही खाता येत नाही. आपण त्या २ वेळांमध्ये काय खातो हेदेखील महत्वाचे आहे.

सई
डायबेटीस बराच होत नाही इथपासून तो बरा होतो इथपर्यंत आपली प्रगती झाली आहे. दीक्षितांच्या प्रणालीचा वापर करायचा माझा विचार आहे. त्याआधी ज्या काही बाबी तपासून घ्याव्याश्या वाटल्या त्या घेत असताना या गोष्टी मिळाल्या.

दीक्षितांच्या वेट लॉस बाबत आता त्यांच्याशी संपर्क साधेनच. मधूमेहाच्या बाबतीत त्यांनी प्रयोग करताना जे सँपल निवडलेले आहेत त्यांचा काउंट प्रिडायबेटिक आहे ( ६.५ ). इतर दोन पेपर्स मला मिळालेले नाहीत. त्याच्या पुढे काय ? तसेच ज्यांची प्रगती इन्शुलीनची इंजेक्शन्स घेण्यापर्यंत झालेली आहे त्यांचे काय असे आणखी दोन उपप्रश्न आहेत.

मला या पद्धतीचे फायदे झाले नाहीत तर मी ते सांगेनच. केप्टो डाएट सुरू करण्यासाठी मला नॉन व्हेजला पर्याय शोधून काढावे लागतील.

टाईप २ असेल तर फक्त ५५ मिनिटांच्या २ विंडो आहेत म्हणून काहीही खाता येत नाही. आपण त्या २ वेळांमध्ये काय खातो हेदेखील महत्वाचे आहे >> होय. दीक्षितांची तीन व्याख्याने मी ऐकली आहेत. साखर खाऊ नका असे एकदा त्यांनी म्हटले आहे. ते मधूमेहींना काय सूचना देतात हे ही कळेलच. एका मित्राला यात रस आहे. तो संपर्क करणार आहे , केलाही असेल.

drd.PNG

ही इमेज डॉ. दिक्षित यांच्या दूरदर्शन कार्यक्रमातून घेतली आहे. ह्यात केलेले दावे कितपत वैज्ञानिक आहेत हे कसे कळणार?

ह्यात केलेले दावे कितपत वैज्ञानिक आहेत हे कसे कळणार?>> हेला. मलाही हाच प्रश्न आहे.

पण सध्यातरी माझे वजन विनासायस* कमी होत आहे म्हणून मी ही प्रणाली चालू ठेवली (गेले सहा महिने) आहे.
*विनासायस मध्ये ज्याला वजन कमी करायचे आहे त्याने योग्य आहार व थोडातरी व्यायाम असे पथ्य पाळणे अपेक्षित आहे असे मी समजतो व मी पाळतो.
माझ्या दॄष्टीने या प्रणालीचे यश "आहारातील उष्मांक कमी करण्यासाठी होणारा सोपेपणा" यात आहे.
माझे आजी व आजोबा फक्त एखाद्या, दुसर्‍या वेळेस खाउनही कुठलीही व्याधी न जडता ९० वर्षे जगलेले मी पाहिले आहेत. त्यामुळे मला १६ तासाच्या उपासाने काय दीर्घ दुष्परिणाम नसावेत असे मला वाटते.

विक्रमसिंह जी,
दिक्षित प्रणाली ही दुसरी तिसरी काही नसून साधी इंटरमिटंट फास्टींग च्या अनेक प्रचलित पद्धतींपैकी एक पद्धत आहे. आइएफच्या कोणत्याही पद्धतीने वजन कमी होतंच. (सामान्यीकरण नाही, पण बहुतांशी परिणाम तेच आहेत.) ह्याबद्दल आधीच्या एका प्रतिसादांत मी सविस्तर लिहिले आहेच. प्रश्न हा नाहीच की "त्यांच्या दाव्यांत विज्ञान नसेल तर वजन कसं काय कमी होतंय बुवा... ?"

यांना जर असे काहीतरी ब्रह्मवाक्य सांगितले, तर शिक्षणाच्या ४-६ वर्षांत, रेसिडेन्सीच्या काळात, स्वतःच्या प्रॅक्टिस मधे, इतर मेडिकल रिसर्च मधे असणारे हे लोक "असे का?" विचारून त्याचा शोध घ्यायचा काहीच प्रयत्न करत नसतील? मला खात्री आहे की एखादा रोग असाध्य आहे असे जर कॉमन नॉलेज असेल, तर वैद्यकीय क्षेत्रातील किमान अर्ध्या लोकांचा पहिला इन्स्टिन्क्ट हा असेल की यावर इलाज कसा शोधता येइल. आणि असा इलाज जर सापडला, तर तो डबल ब्लाइण्ड टेस्ट्स पासून इतर अनेक मार्गांनी असंख्य लोकांवर वापरून त्याचे साइड इफेक्ट्स, इतर आजार असलेल्या लोकांवरचे परिणाम या सगळ्याची "पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याची, आणि कोणीही ते सिद्ध करण्याची" खात्री झाल्याशिवाय मेडिकल कंपन्या व या क्षेत्रातील लोक तसे जाहीर करत नाहीत.

@ फा
इलाज शोधण्याचे प्रयत्न होत आहेतच. आज अब्जावधी रूपये खर्च करून औषधे शोधली जात आहेत. त्यासाठी हजारो जण संशोधन करत आहेत. औषधनिर्माण शास्त्राप्रमाणे उत्पादन वितरण सर्व चालू आहे. नवीन गुंतवणूक येत आहे. एक धेय्य म्हणूनही नवीन वैद्यकीय विद्यार्थी सामील होत आहेत. पण रोग झाल्यावर बरा करण्यासाठी हे सगळे चालू आहे. मला वाटते ही नाण्याची एक बाजू आहे.

नाण्याची दुसरी बाजू आहे ती म्हणजे रोग होऊच नये यासाठी काय करता येईल. या बाजूने जो कोणी काम करील त्याला त्यातून काहीही उत्पन्न मिळत नाही. मात्र त्यासाठी येणारा खर्च स्वबळावर सोसता येतो!!!! हे लक्षात घेऊन इथे गुंतवणूक केली जात असते. डॉ. दिक्षीत या दुसऱ्या बाजूबद्दल बोलत आहेत. पण काही झाले तरी भाषण ऐकणार नाही, मात्र टिका करत राहणार, असे म्हणणाऱ्यांबद्दल काय बोलणार?

त्यामुळे नाण्याच्या दोन्ही बाजू एकमेकांविरूद्ध भासत असल्या तरी दोन्ही बाजू लोककल्याणाचेच काम करत आहेत हे कोणीच लक्षात घेत नाहीये.

पण यात थोडासा बदल व्हायला लागलाय. स्क्रीनशॉटस टाकण्यासाठी तरी हल्ली भाषण उघडले जायला लागले आहे. Happy

नाण्याची ही जी दुसरी बाजू डॉक्टर मांडत आहेत. त्यासाठी लेखातील लिंक मध्ये दिलेल्या व्याख्यानातील ३८:०९ ते ४३ः०८ या ५ मिनिटांचे भाषण पहा.
त्या भागाचे प्रतीलेखन सोयीसाठी इथे देत आहे. कदाचित ते वाचून कोणाला तरी संपूर्ण भाषण ऐकायची इच्छा होईल यासाठी ही धडपड करतोय.

यात डॉ. दिक्षीत "मी कोण नाही" हे स्पष्ट करतात.

पहिली गोष्ट मी कुठेही प्रॅक्टीस करत नाही. माझा कुठेही दवाखाना नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर व त्या आधी औरंगाबाद येथे पूर्णवेळ अध्यापक म्हणून काम करत आलेलो आहे.

त्यामुळे सर तुम्हाला कुठे भेटायला यायचे? असा प्रश्न विचारू नका. तुम्ही आत्तापर्यंत अनेक डॉक्टरांचे कार्यक्रम ऐकले असतील. त्या प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवट, "तुम्हाला जर काही शंका असतील तर मला अमुक ठिकाणी येऊन भेटा." अस असण्याची शक्यता आहे. Happy
पण हा कार्यक्रम असा आहे की,
हया कार्यक्रमाच्या शेवटी मी तुम्हाला अस सांगणार आहे की, यापुढे तुम्ही मला भेटू नका. जेवढे मी तुम्हाला सांगितले तेवढे तुमच्यासाठी पुरेसे आहे. पुन्हा मला भेटण्याची आवश्यकता नाही.

मी आहारतज्ञ नाही. सध्या या लोकांची खूप चलती आहे बाजारात. कुंणीतरी मला सांगितले की ८०००० घेतात!!!! मी मधुमेहाचा तज्ञ देखील नाही. मी फिटनेस एक्सपर्टपण नाही. माझी कुठेही जिमन्याशियम, व्यायामशाळा वगैरे नाही.

जे लोक दारातून आत्ता आत यायचा प्रयत्न करत होते, त्यांनी हे सगळ ऐकल्यावर विचार केला असेल की, परत जावे की काय. Happy

कारण विषय आहे वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध आणि बोलणारा माणूस कशातच एक्सपर्ट नाही. आपल्याला एक्सस्पर्ट पाहिजे असतो कायम.
प्रत्येकाला रॉकेट सायन्स पाहिजे असते प्रत्येक गोष्टीत. त्यामुळे कुणी साध सोप वगैरे सांगितले की ते पटकन पटतच नाही.

पण आता मी कोण आहे हेही सांगतो.
मी अभ्यासू डॉक्टर आहे. मी ज्या काही डिग्र्या मिळवल्या त्या सर्व अभ्यास करून मिळवलेल्या आहेत.
मी एक चिकित्सक वृत्तीचा माणूस आहे. एखादी गोष्ट सरांनी सांगितली किंवा पुस्तकात वाचली म्हणून मी मान्य नाही केली; तर मला पटली तरच मान्य केली.
माझा जो विषय आहे त्याला प्रिव्हेंटिव्ह ऍंड सोशल मेडिसीन अस म्हणायचे. आजार झाल्यावर बरा करण्यापेक्षा, तो होऊच नये यासाठी काय करता येईल त्याच शास्त्र.

आजकाल डॉक्टरांचा संबंध आरोग्याशी राहिलाच नाहीये. त्यांचा संबंध थेट रोगाशीच जोडला गेलाय. आपण पण रोग झाल्याशिवाय डॉक्टरांकडे जातच नाही हे पण एक दुर्दैव आहे.

म्हणजे उद्या जर कोणी अस म्हटल की, "रोगाला कस बळी पडायच नाही, हे शिकवण्याचा माझा व्यवसाय आहे. ते मी तुम्हाला शिकवतो. त्याचे मला पैसे द्या. " तर मला नाही वाटत अशी प्रॅक्टीस करणाऱ्याला कोणी पैसे देईल. पण आजारी पडल्यावर मात्र काही हजार खर्च करायला लोक तयार असतील.

मी एक प्रामाणिक संशोधक आहे. त्यामुळे जे असेल तेच सांगेन. कारण संशोधन जर प्रामाणिक नसेल तर ते समाजाला अहितकारकच असते.
+
गेली २७ वर्षे समाजामध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, त्यांच अज्ञान दूर व्हाव यासाठी प्रयत्न करतो आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये समाजाविषयी जाणीव निर्माण व्हावी असा प्रयत्न करत असतो. हे माझे क्रेडेंटिअल आहे.

त्यामुळे मी आज जे तुम्हाला सांगणार आहे त्यात माझा कोणताही व्हेस्टेड इंटरेस्ट नाही. मला तुमच्याकडून आजही एक पैसा नकोय, उद्याही नकोय. त्यामुळे मी जे सांगतो आहे ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. नंतर जर तुम्ही स्वतःवर प्रयोग केला तर तुम्हाला ते पटणार आहे याची मला खात्री आहे. मग मात्र तुम्ही तुमचे आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकाल हे नक्की.

हे व्याख्यान वेगळे आहे. ही पुस्तकातली माहिती नाहीये. कुठे ऐकलेली माहिती नाहीये. मग काय आहे?
२०१२ पासून मी जे स्वतःवर प्रयोग केले, मित्रांवर केले, ओळखींच्यांवर केले; त्यातून जे ज्ञान आम्हाला मिळाले ते मी येथे देणार आहे.

<दिक्षित प्रणाली ही दुसरी तिसरी काही नसून साधी इंटरमिटंट फास्टींग च्या अनेक प्रचलित पद्धतींपैकी एक पद्धत आहे. आइएफच्या कोणत्याही पद्धतीने वजन कमी होतंच. (सामान्यीकरण नाही, पण बहुतांशी परिणाम तेच आहेत.) ह्याबद्दल आधीच्या एका प्रतिसादांत मी सविस्तर लिहिले आहेच. प्रश्न हा नाहीच की "त्यांच्या दाव्यांत विज्ञान नसेल तर वजन कसं काय कमी होतंय बुवा... ?">
मी वाचत होते तर दिसते की इंटरमिटंट फास्टींग हे नाव आणि डाएट साधारण २०१२ नंतर प्रसिध्द झाले आहे. डॉ. जिचकर ज्यांना दिक्षित प्रेरणास्थान म्हणतात ते २००४ साली वारले आणि त्यांनी १९९७-२००४ मध्ये हे २ दा जेवणे आणि ५५ मिनिटे इन्सुलिन सायकल सांगितली होती लठ्ठपणा दूर करण्यासाठी. मी रिसर्च पेपर्स पूर्ण बघितले नाहीयेत पण जर असे असेल तर दिक्षित यांनी इंटरमिटंट फास्टींग चे नाव घेण्याचे काही कारण नाही. आणि जरी असे नसले तरी ते सांगत असलेले डाएट इंटरमिटंट फास्टींग पेक्षा वेगळे आहे.

माय्बोलीच्या ह्या आणि इतर अनेक धाग्यात, पुल म्हणतात तस " फणस सोलावा तशी कविता (धा गा) सोलाय ची, गरे फे कून द्यायचे आणि साल चावत बसायची" असा प्रकार दि सतो.

धागाविषय दीक्षितांनी सांगितलेली आहारप्रणाली नसून स्वतः डॉ दीक्षित आहेत, हे आता उमजले.

एखादी आहारपद्धती/उपचारपद्धती का चांगली? तर ती सुचवणारा/शोधून काढल्याचा दावा करणारा त्यासाठी एकही पैसा आकारत नाही. ती फुक्क्ट आहे.
हा मी शोधलेला अर्थ नाही. याच शब्दांत हे धागाकर्त्याने लिहिले आहे.
धागाकर्त्याकडून त्या पद्धतीबद्दल किती चर्चा झाली आहे? त्या पद्धतीवरच्या आक्षेपांना काय उत्तर दिले गेले आहे? (मी या विषयातला तज्ज्ञ नाही, हे उत्तर होत नाही. जर मी एखाद्या विषयातला तज्ज्ञ नसेन तर मी त्या विषयावर कोणतेही भाष्य करणे उचित ठरत नाही. तज्ज्ञ नसताना एखाद्या पद्धतीच्या बाजूनेही.)

शिवाय आपण आजार झाल्यावरच डॉक्टरकडे जातो,तो होऊ नये म्हणून काळजी घेतली जावी, असे सांगितले जात नाही, हे विधान सरसकट खरे नाही. मधुमेह, हृदयविकार इत्यादींबाबत तो होण्याची अधिक शक्यता असलेले वर्ग कोणते? त्यानुसार तुम्ही कोणत्या तपासण्या कोणत्या वेळी केल्या पाहिजेत, कोणती काळजी घेतली पाहिजे, ही माहिती जनसामान्यांनापर्यंत पोचवण्याचे प्रयत्न गेली अनेक वर्षं होत आहेत.

ही पद्धत/ हे ज्ञान कुठे ऐकलेले नाही, पुस्तकात वाचलेले नाही, मी स्वतः संशोधन करून शोधून काढले आहे, हे मान्य करायला हरकत नाही(*). पण ती यापूर्वी कोणालाच माहीत नव्हती, असा त्याचा अर्थ होत नाही.
*कोणत्याही क्षेत्रात काम करणार्‍यांने आपल्या संशोधनविषयासंदर्भात पूर्वी झालेल्या संशोधनाची माहिती करून घेणे अपेक्षितच नव्हे, तर अनिवार्य आहे.

धागा रुळावर आणल्याबद्दल शाम भागवत, पारु यांचे आभार.
मला वाटते की विपर्यास झाला, पूर्वग्रहाने त्याला जोड दिली आणि नंतर भाषणे न ऐकता स्ट्रॉ मेन ऑर्ग्युमेण्ट सुरू झाली आहेत. भाषणे करतान व्यक्ती एखादा मुद्दा सांगताना एखादे वाक्य भरीचे टाकतो , ते जर सुटे घेतले आणि संदर्भ काढून टाकले तर अनर्थ होतात.

काही लोकांचे नेमके आक्षेप काय आहेत ?

१. दीक्षितांची पद्धत अवैज्ञानिक आहे
२. या पद्धतीमुळे धोका उत्पन्न होऊ शकतो.
३. सांगणारी व्यक्ती तज्ञ नाही ( जे ते सांगतात )
४. मधूमेह बरा होत नाही. असे दावे खोटे आहेत.
५. वैद्यकीय महाविद्यालया शिकवले जाते ते चुकीचे आहे (दावे करणारी व्यक्ती स्वतः वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापक आहे. ती बीए बीएड नसणार असा अंदाज)

की
६. त्यांनी केलेले संशोधन आधी पासूनच आहे (संशोधन आहे )
७. त्यांनी नवे काही केलेले नाही
८. ते पैसे घेत नाहीत

नेमके आक्षेप समजले म्हणजे थोडक्यात आटपेल हे प्रकरण. त्याने इतर अज्ञानी / भक्त टईप लोकही या दुष्ट जाळ्यात ओढले जाण्यापासून वाचतील.

या लोकांनी
अ) दीक्षितांचे व्हिडीओ पाहीलेले आहेत का ?
ब) त्यांचे रिसर्च पेपर्स वाचलेले आहेत का ?
क) मधूमेह बरा होतो किंवा नाही याबद्दलचे लेटेस्ट संशोधन काय आहे याची माहिती (निव्वळ माहिती) घेतलेली आहे का ?

जर अ / ब / क ची उत्तरे होय असतील तर संवाद साधला जाईल अथवा नुसताच वाद राहील

माझे आक्षेप मी मांडले आहेत. भागवतांना विचारले आहे. दीक्षितांना व्हॉट्सअ‍ॅप करीत आहे.

त्यातल्या एका आक्षेपाचे उत्तर त्यांचा रिसर्च पेपर वाचल्यानंतर मिळाले. ते म्हणजे वर्गीकरण. ते त्यांनी केलेले आहे.
दुसरा आक्षेप म्हणजे HbA1c ६.५ असलेल्या व्य्कतींचाच विचार एका रिसर्च पेपर मधे आहे. मला अजून दोन पेपर्स मिळालेले नाहीत. ६.५ म्हणजे सेफ म्हणायला हवे. ८ पेक्षा जास्त असेल तर काय याबद्दल या रिपोर्ट मधे काही नाही.
तसेच ज्या व्यक्तींचे सँपल घेतले त्यांनी पथ्यं पाळून जो आहार घेतला त्या आहाराबाबत त्यांनी जे कळवले तेच प्रमाण मानून (विश्वास ठेवून) निष्कर्ष काढला आहे. थोडक्यात या व्यक्ती खोटे बोलणार नाहीत असे गृहीतक त्यामागे आहे.
अशी चाचणी घेताना तीन चार महीने व्यक्ती निरगाणीखाली असणे हे थोडे अवघडच आहे .. तरीही स्पष्टीकरण मागवत आहे.

जर तर स्वरूपाचे आक्षेप, टिंगल टवाळी किंवा भागवत (जे स्वतः फक्त वाहक आहेत) यांच्या चुका यांना टार्गेट करण्यापेक्षा ज्याबद्दल सांगितले जातेय त्यावर आक्षेप असतील तर बरे होईल. धाग्याचा खूपसा भाग यातच गेलेला आहे. निव्वळ लॉजिक पेक्षा त्याला तथ्यांची जोड असेल तर बरे. हे शेवटचे.

आणखी एक (जे धाग्याशी संबंधित नाही)
काल एका ड्युआयडीकडून मी इथलीच कुणी महिला सदस्या आहे असे समजून गैरसमजातून (अथवा सहेतूक) प्रतिसाद दिले गेले आहेत. माझे वाद इब्लीस यांच्याशी आहेत. त्यांनाही मी पुरूष आहे हे चांगलेच ठाऊक आहे. त्या ड्युआयडीमुळे मला काहीच त्रास होणार नाही (फक्त लोक संपर्क साधताना अवघडतील ) पण ज्या महिला सदस्याबद्दल सूचक असे भाष्य केले गेले आहे ( जा सिनेमा बनवा) त्यामुळे तिची बदनामी होईल. मला हा ड्युआयडी कुणाचा याचा अंदाज आहे. कुणाबद्दल लिहीले याचाही अंदाज आहे. त्याबाबत काहीही बोलायचे नाही. त्या महिला सदस्याला त्रास होऊ नये एव्हढीच नम्र इच्छा आणि अशा प्रकारे जे आरोप करायचेत ते अशा चांगल्या धाग्यांवर केले जाऊ नयेत हे आवाहन. तुम्हाला मला काय बोलायचे ते वाहत्या पानांवर, माझ्या विपूत किंवा अन्य भरकटलेल्या धाग्यांवर बोलू शकता. आयडी पाहून मी ठरवेन उत्तर द्यायचे कि नाही.

आमचा खड्डा यांच्याशी सहमत.
या धाग्याचा ८०% भाग सध्या अ‍ॅटॅक आणि काऊंटर अ‍ॅटॅक झालाय. शंका समाधान फेज साठी बरीच पानं मागे जावं लागतंय. (शंका जेन्युईन नाहीत असं म्हणत नाहीये.)

सोप्या मराठीत -
१. एखादी पद्धत फुकट आहे, त्यात कमी कष्ट/व्याप आहेत म्हणून ती सर्वोत्तम आहे, हे तुम्हांला पटतं का?
२. नि:स्वार्थ बुद्धीने केलेले संशोधन/उपचार तेच चांगले आणि पैसे मोजावे लागलेले उपचार चांगले नाहीत, हे तुम्हांला पटते का?
३ तुम्हांला स्वतःला तुमच्यासाठी किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी निवड करायची वेळ आली, तर काय निवडाल? फुकट की विकत?
अ) विकतच्या जोडीने फुकट
ब) रिस्क नसेल तोवर फुकट
क) अर्थातच फुकट.

हे प्रश्न या धाग्याच्या विषयप्रवाहाला अनुसरून आहेत.

आहारपद्धतीतील शास्त्रीय भागांबद्दल सईंनी त्यांच्या धाग्यावर आणि या धाग्यावरही लिहिलेलं आहे. त्याचा प्रतिवाद केला जाईल याची शक्यता कमी आहे. उलट त्यांनी अमकी गोष्ट चूक आहे, असं स्पष्टपणे न लिहिल्याचा गैरफायदा घेतला गेला. (यात त्यांना दोष देत नाहीए. त्यांनी तसं केलंच पाहिजे, असा आग्रह नाही. पुढच्या प्रतिसादांत त्यांनी स्पष्टपणे तसं लिहिल्यावरही त्यावर भावनिक उतारा दिला गेलाय.)

आजच्यापुरता तरी थांबतोय.

>>>मधुमेह, हृदयविकार इत्यादींबाबत तो होण्याची अधिक शक्यता असलेले वर्ग कोणते? त्यानुसार तुम्ही कोणत्या तपासण्या कोणत्या वेळी केल्या पाहिजेत, कोणती काळजी घेतली पाहिजे, >>> अगदी खरं आहे. माझी डॉक्टर वार्षिक भेटीत बेसिक वेलनेस साठी टेस्ट करते. काय व्यायाम करतो, काय खाल्लं पाहिजे हे ही सांगते. आणि मी चुकीचे चॉईस केले तर मी खापर डॉ वर फोडत नाही. माझ्या शरीराची काळजी मलाच घेतली पाहिजे. त्यासाठी लागेल ती माहिती सर्वस्वी मलाच शोधली पाहिजे.
बाकी फुकट म्हणून चांगलं, फुकट म्हणून तुम्ही विचार करा, फुकट म्हणून पाळा हे काही झेपेलं नाही. हे वर्क होतं, हे परिणामकारक आहे याचं कारण हे हे आहे म्हणून तुम्ही पाळा सांगितलं असतं तर आवडलं असतं. वेस्टड इंटरेस्ट आहेत का नाहीत हे कळणे महाकठीण आहे. आणि म्हणूनच वर अनेक लोकं पीअर रिव्ह्यूड पेपर्स मागत आहेत. अर्थात त्यातही गफले झाले आहेत, पण तुलनेने कमी.

भरत यांची पोस्ट आत्ता वाचली. सहमत. 'फुकट आहे' हा मुद्दा पटवण्याचा पॉईंट कसा होईल?
पण होमिओपदी आहे झालातर फायदाच, आयुर्वेदिक आहे काही वाईट तर होणार नाही ना! अशा विचारसरणीचे अनेक लोक बघितले आहेत. ज्याचा त्याचा प्रश्न.

ज्याच्या त्याच्या priorities आणि मानसिकतेचा प्रश्न आहे. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या मुद्दे अपील होऊ शकतात. कोणाला फुकट महत्त्वाचे वाटेल, कोणाला जास्त पथ्य-पाणी नाही वाटेल, कोणाला उपास-तापास नाही वाटेल, कोणाला अलोपॅथिक डॉक नवीन काही औषधे लिहून देत नाहीये ते महत्त्वाचे वाटेल.

बाकी, इतके वाद झाले तरी भागवत धाग्याचा डोक्यावर डॉक्टर चा फोन, पत्ता का टाकत नाहीत? स्वतः कशाला explanation देत बसलेत? कोणाला शंका असतील तर डायरेक्ट डॉक्टर ला विचारतील लोकं. तुम्ही फक्त तुमच्या अनुभवाबद्दल आणि तो किती ग्रेट वाटला ते लिहायला पाहिजे. Indirect speech mode मधे का जायचं?

नवीन Submitted by पारु on 30 August, 2018 - 00:56

-- अभ्यास वाढवा इतकंच सुचवेन. Happy

"मी जेवढं वाचलं त्यात तर मला इतकंच दिसलं" हे काही भक्कम विधान असू शकत नाही.

Pages