तीन देवियां - भाग २

Submitted by प्रकाशपुत्र on 25 August, 2018 - 23:45

पहिला भाग इथे वाचा : https://www.maayboli.com/node/67180

मग मी तिला एके ठिकाणी घेऊन गेलो. काय बोलायचे वगैरे तयारी पक्की झाली होती. वातावरण खेळकर करावे म्हणून तिला एक जोक सांगितला, तुम्हाला पण सांगतो

( एकदा दोन मित्र, राम आणि श्याम रेल्वेने प्रवास करत असतात. डब्यात एक पूर्ण टक्कल पडलेला माणूस असतो. राम श्यामला म्हणतो, तू जर त्या माणसाच्या टकलावर मारलेस तर तुला १०० रु देईन. श्याम जातो, त्या माणसाच्या टकलावर जोरात मारतो आणि त्या माणसाला म्हणतो, "अरे काळे तू इकडे कुणीकडे ? ". तो माणूस खूप चिडतो आणि म्हणतो, " अहो मी काळे नाही, मी कुलकर्णी आणि असे डोक्यावर मारतात का ? " श्याम सॉरी म्हणतो आणि परत येतो.
राम त्याला म्हणतो, "तू एकदा त्याला फसवलेस, परत फसवून दाखव आणि ५०० रु घे". श्याम परत जातो, त्या माणसाच्या टकलावर जोरात मारतो आणि म्हणतो, " अरे काळे, मी तुझे पैसे बुडवले म्हणून असा रागाऊ नकोस प्लीज़, निदान ओळख तरी दाखव". तो माणूस खूप चीडतो आणि जोरात म्हणतो की अहो मी खरच काळे नाही. श्याम "Very Very Sorry" म्हणतो आणि परत येतो.
तेवढ्यात स्टेशन येते आणि सगळे उतरतात. राम श्यामला म्हणतो की आता तू मारुन दाखवलस तर तू खरा. श्याम परत त्या माणसाकडे जातो, परत त्याच्या टकलावर मारतो आणि म्हणतो, "अरे काळे, अगदी तुझ्यासारखाच एक माणूस आमच्याबरोबर ट्रेन मध्ये होता. )

काय, जोक आवडला ना ? पण एक छोटिशी चुक झाली माझ्याकडून. तिच्या बाबांना पण पूर्ण टक्कल आहे हे मी साफ विसरलो, त्यामुळे माझ्या जोकला फारसा प्रतिसाद नाही मिळाला. Anyway, मी तिला माझ्या मनातल्या भावना पूर्ण सांगितल्या. पिक्चर मधले dialogues बोललो. ती किती सुंदर दिसते ते सांगितले. तुझ्याशिवाय जगणे अशक्य आहे हे सांगितले.

अहो आश्चर्यम, ती मला म्हणाली कि तिला माहितीय मी तिच्या मागे फिरतोय आणि माझ्या एवढ्या वर्षांच्या मेहनतीचे फळ म्हणजे तिला पण मी आवडायला लागलोय, एक हुशार आणि चांगला मुलगा म्हणून. मंडळी, हा केवढा मोठा विजय होता याची तुम्हाला कल्पना नाही. हुशारी सोडली तर, दिसायला मी तेव्हा खूप दिव्य होतो. खूप उंच आणि किड्किडीत, गाल आत गेलेले (माझे मला पण मी पसंत केले नसते. एकदा तर जोकच झाला होता. माझी आजी माझ्या आईला म्हणाली की निखिलचे नाक फार मोठे दिसतेय का ग ? तर माझी आई तिला म्हणती, "अग नाक फार मोठे नाही, गालफड बसली आहेत म्हणून नाक मोठे दिसतेय.” आणि हे त्या दोघी माझ्या समोरच बोलत होत्या. तरुण मुलांना काही भावना असतात, त्यांचा अपमान होऊ शकतो याची या माय - लेकींना काही कल्पनाच नाही ) तर असे आम्ही दिसायला त्यावेळी. आता छान दिसतोय ते सोडा.

Coming back to the story, तिचे ते म्हणणे ऐकल्यावर मी एकदम 'सातवे आसमान पे' असं काय म्हणतात त्यावर पोचलो. मग आम्ही खुप गप्पा मारल्या आणि परत भेटायचं ठरवलं. मग आम्ही परत २-३ वेळा भेटलो. एकदा घरी काय आणि कधी सांगायचे याची चर्चा केली. ती म्हणाली कि तिचे बाबा खूप कडक आहेत आणि ती त्यांना हे सांगू शकणार नाही. मी इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षाला होतो. लवकरच कॅम्पस Interview मधून नोकरी लागायची शक्यता होती. आम्ही असं ठरवलं कि एकदा नोकरी लागली कि मी तिच्या घरी जाऊन तिच्या बाबांना भेटायचं.

नंतर काही दिवसानी मी मित्रांबरोबर रंगीला पिक्चर बघायला गेलो होतो, तर तेथे ती घरच्यांच्या बरोबर आली होती. तिच्या बाबांनी मला बघितले आणि ते तिला काहीतरी म्हणाले. ती माझ्याकडे आली आणि ती मला म्हणाली की तिला काहीतरी बोलायचे आहे. आम्ही जरा बाजूला गेलो. तिने सांगितले की तिच्या बाबांना आपल्याबद्दल कळले आहे. मी अजून शिकतोय आणि मला नोकरी नाही, म्हणून मी त्यांना पसंद नाही. त्यांनी तिचे लग्न ठरवले आहे. मुलगा पुण्याला इंजिनियर आहे. ती पुढे म्हणाली कि ती तिच्या बाबाना विरोध नाही करू शकत. आख्खा रंगीला बघताना माझा मुन्ना झाला होता. खूप वाईट वाटले, पण विचार केला की तिचे तरी काय चुकले, मी अजुन शिकतोय, नोकरी कधी लागेल आणि मी माझ्या पायावर कधी उभा राहीन याचा पत्ता नाही.

तर ते पहिले प्रेम. काही दिवस खूप वाईट वाटले, जगण्यात अर्थ नाही असे वाटले. तोपर्यंत Campus Interview चालू झाले आणि मला लगेचच एका खुप मोठ्या कंपनीत मध्ये खुप चांगला Job मिळाला. एक महिना उशीर, पण तो महिना आयुष्य बदलून गेला. अजूनही ते दिवस आठवले की काळजात एक कळ उठती. असे वाटते की 'तु होती तो कैसा होता, तु होती तो वैसा होता '. अजूनही गावी गेलो की पावले तिच्या घराकडे वळतात. 'ती सध्या काय करते' हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न कधी नाही केला, पण ती जिथे असेल तिथे खूप सुखी असावी ही इच्छा.

पुढचा भाग लवकरच ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Namokar , मेघा , प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद