बहिणाई

Submitted by Asu on 24 August, 2018 - 09:34

अजरामर कविता लिहून कवितांबरोबरच लेवा गणबोलीला सुद्धा खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या *निसर्ग कन्या "बहिणाबाई चौधरी" यांची आज १३८ वी जयंती* त्या निमित्त बहिणाबाईंना माझी लेवा गणबोलीत काव्यांजली -

बहिणाई

माय बहिणाई बहिणाई
समद्या खानदेशाची आई
डोयामंधी समद्यायच्या
दिशे वं गह्यरी नवलाई

सादा सबूद तुह्या हाती
व्हतो अनमोल मोती
सब्दायचेबी ह्ये पाखरं
जिनगानीचं गानं गाती

वावरात डोले पिक
तुह्यासंग गानं गाती
पानाफुलायशी तुही
जमली व नाती गोती

कोन म्हने तू अडानीे
तू तं दुनियाची शहानी
पाटीवर निसरगाच्या
तुन्हं लिव्हली कहानी

आसोद्याची तू लेक
सासरी जयगाई आली
शाईमधी नहीं जाता
सिधी ईद्यापिठा गेली

जलमा खानदेशी आलू
साता जलमाची पुन्याई
किती कवतिक बोलू
धन्य तू वं बहिणाबाई

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
(24.08.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वा! फारच सुरेख. वाचतानाही अगदी गोड वाटली कविता.

' लेवा गणबोली ' व 'अहिराणी ' या फार वेगळया बोलीभाषा आहेत का ?>>मी 'लेवा गणबोली' हे पहिल्यांदाच ऐकतोय. बहिणाबाईंची अहिराणी एवढंच माहित आहे.

खानदेशात लेवाबहुल तालुक्यात अहिराणी भाषा थोडी वेगळ्या पद्धतीने बोलली जाते,हेल काढल्या सारखी.
बहिणाईंची एक आठवण --- एकदा त्यांच्या मुलाने स्वामी विवेकानंदांचे चित्र काढले व ते बहिणाईला दाखवून कसे आहे विचारलं तर ती म्हणाली जणू देवानंच फेटा बांधलाय.
अशी थोर होती ही माय.

सर्वश्री, भाऊ नमसकर, शाली, पंडित, मानव पृथ्वीकर, प्रीत००९ -
सर्व प्रथम, मायबोली या वेबसाइट वरील माझ्या 'बहिणाई' या कवितेवरील आपणा सर्वांच्या गोड अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
सगळ्या बोलीभाषा गोड असतात. तशीच लेवा गणबोली. बोलीभाषा मनात उमलून ओठांवर फुलतात. त्यांना मातीचा सुगंध असतो. शहरी कृत्रिम संस्कार त्यांच्यावर झालेले नसतात. म्हणूनच त्यांची मूळ गोडी कायम असते. माझी 'बहिणाई' ही कविताही 'लेवा गणबोली' या बोली भाषेतील आहे.
लेवा गणबोली आणि अहिराणी या दोन्ही बोली भाषा गोडच आहेत. दोन्ही मराठी बहिणीच आहेत. पण, बहिणी असल्या तरी त्या एकच नसतात. त्याचप्रमाणे लेवा गणबोली व अहिराणी या दोन्ही अगदी वेगळ्या भाषा आहेत. अशा अनेक बोली भाषांनी मराठी संपन्न झालेली आहे.
प्रामुख्याने जळगांव जिल्हयात चार बोलीभाषा बोलल्या जातात. जळगावच्या पश्चिमेस अहिराणी, उत्तरेकडील सातपुड्याच्या डोंगराळ भागात पावरी तर दक्षिणेस अजिंठ्याच्या डोंगराळ भागात तावडी व उर्वरित आणि पूर्वेस लेवा गणबोली बोलली जाते.
बहिणाबाईंच्या कवितांबद्दल जो गैरसमज आहे की, त्या कविता 'अहिराणी' या बोलीभाषेतील आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. बहिणाबाईंच्या संपूर्ण साहित्य 'लेवा गणबोली'तच आहे. ही प्रामुख्याने लेवा पाटीदारांची भाषा आहे.
आपला स्नेहांकित,
प्रा.अरुण सु.पाटील (असु)
(२७.०८.२०१८)