सुरुवात नव्या बदलाची

Submitted by संयोजक on 21 August, 2018 - 09:52

62E91F17-2009-464F-85B8-1594CB506D66.jpeg

श्रावणाचा अलवार महिना येतो. निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेली असते. लहान मोठी रोपटी सुध्दा अद्भुत दिसणारी फुले लेवून श्रीमंत झालेली असतात. अजुबाजूला पाचूंची नुसती पखरण झालेली असते. रंगांच्या विस्मयकारी छटा लेवून डोंगर सजलेले असतात. अवखळ झऱ्याप्रमाणे बागडणारा श्रावण अनेक व्रत, वैकल्य, उपास, ग्रंथवाचणामुळे प्रौढही भासतो. पंचमीला अंगणा अंगणात माहेरवाशीनींचे पैंजणे रुणझुणतात. झोके बांधले जातात. वारूळे पुजली जातात. सोमवारी शिवामुठी वाहील्या जातात. स्वयंपाकघरातुन खमंग वास येतात. चटण्या, कोशींबिरी, वेगवेगळ्या वड्या, भाताच्या मुदीवरचे पिवळे धम्मक वरण आणि विविध भाज्यांनी केळीची पाने सजतात. रांगोळीच्या महिरपींवर चिमटीने हळदी कुंकू पडते. तृप्त पंगती उठतात. अनेक व्रतांची उद्यापने करीत करीत श्रावण आला तसाच गडबडीने जातो. पण जाताना बाप्पांचे वेध लावायला विसरत नाही.

बाप्पा येणार म्हणलं की सजावटीच्या चर्चा सुरू होतात. सगुण रूपात शोभणारा बाप्पा कुठल्या रूपात घरी आणायचा ह्यासाठी मूर्ती निवडणे हे काम सर्वप्रथम करण्यात येतं. एव्हाना काहींनी बाप्पा बुक केलाही असेल. अनेकजण मूर्ती घरीच बनवतात. कोणी मातीचा तर कोणी तांदळाचा, शाडूच्या मातीचा, पेपरचा, इ. बरेचजण मूर्ती विकत आणतानाही अगदी आठवणीने मातीची मूर्ती आणतात. पण बहुतकरून व मोठ्या प्रमाणावर pop म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती दरवर्षी खपतात. Pop चे तोटे माहीत असूनही लोक त्या विकत घेतात.pop च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत, रंगासाठी वापरलेली रसायने घातक असतात. शिवाय, त्यांची काय हालत होते हे पाहायचे असेल तर विसर्जनानंतर नदीकिनारी किंवा समुद्रावर जाऊन पहा. निर्माल्यही नदीत किंवा जलाशयात विसर्जित करण्यात येते. त्याचे पुढे काय होते हे आपण जाणतोच. सजावट करताना थर्माकोल सारखे पर्यावरण विघातक साहित्य मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ते टाळून, सहज कुजणारे किंवा पुनर्वापर करता येण्याजोगे साहित्य वापरायला हवे. ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन आपला गणेशोत्सव जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कसा करता येईल ह्या अनुषंगाने विचार आणि अंमलबजावणी व्हायला हवी. म्हणूनच जे मायबोलीकर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतात, त्यांना त्यांचे अनुभव मांडण्यासाठी हा धागा, त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि पर्यावरणाची हानी रोखण्यास मायबोलीचाही हातभर लागतो आहे हे सुखद सत्य जगासमोर येईल.

बदल ही एकदम होणारी गोष्ट नसली तरी त्याची सुरवात कुठून तरी होणं गरजेचे आहे. शंभर मैलांच्या प्रवासाची सुरवात ही पहिल्या उचललेल्या एका पावलानेच होते. म्हणूनच या दुरवर चालणाऱ्या पर्यावरणपुरक प्रवासाचे पहिले पाऊल आपली मायबोली या 'गणेशोत्सवाच्या' निमित्ताने उचलत आहे. ह्या गणपतीला मायबोली तर्फे "सुरुवात नव्या बदलाची" हा उपक्रम राबवतो आहे. ह्यात तुम्ही साजरा केलेला पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा अनुभव लिहणं अपेक्षित आहे, सोबत प्रकाशचित्र असेल तर सोन्याहून पिवळं. या वर्षी जमले नसेल तर तुमच्या मनात असलेल्या कल्पना मांडल्या तरी त्यांचे स्वागत आहे. त्यांचा उपयोग इतरांना पुढच्या गणेशोत्सवात करता येईलच की.
गणपतीबाप्पा मोरया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्यावर्षी आम्ही मातीची मूर्ती आणलेली. विसर्जनादिवशी एक कुंडी आणली आणि त्यात विसर्जन केलं. गणपतीचं आवडतं फुल जास्वंदी, म्हणून त्यात जास्वंदीचं झाड लावलं. रोज सकाळी झाड पाहून प्रसन्न वाटतं Happy
CYMERA_20180822_211445.jpg

छान Happy

मी ह्या वर्षी घरीच गणपती बनवणार आहे. तो पण शाडुचा! मागील वर्षी कागदाच्या लगद्याचा केला होता, पण मिळून येण्यासाठी थोडे पीओपी वापरावे लागले, त्याचे वाईट वाटले Sad

आमच्या घरी गणपती नसतो, आमच्या एका सरांच्या घरी बसवायला देणार आहे, मागील वर्षी पण त्यांनाच दिला होता. Happy

फोटो उद्या टाकते.

छान उपक्रम आहे
आम्ही सजावटीसाठी रोजच्या रोज खरी, ताजी फुले वापरतो
विविध पाने , फुले वापरुन माळा , पाकळ्यांची रांगोळी अशी सजावट असते
निर्माल्य कलश मध्ये हे निर्माल्य टाकतो

आम्ही शाडूची मुर्ती विकत आणतो. विसर्जन घरच्या बागेत माडाच्या झाडाखाली करतो

माझी आई गोकुळाष्टमीचे गोकुळ, पोळ्याचे बैल हे सगळ मातीपासून घरीच बनवते.
गेल्या काही वर्षांपासून गणेश मुर्ती (मातीच्या)पण घरच्या घरीच बनवु लागलो आहोत आम्ही!
सुरुवातीला वेळ लागत असे, पण आता व्यवस्थित जमतात मुर्ती.
माती साधी/काळी/लाल वापरतो. भिजवताना त्यात कागदाचा/वर्तमान पत्रान्चा लगदा व फेविकोल मिसळतो (त्याने तडे जात नाहीत)
समोर गणेशाच सोप्प चित्र ठेवतो, त्या रुपाचा आधार घेत मुर्ती बनवतो, सगळे मिळून.

फोटो मिळाले तसे शोधुन (सगळ एकत्रच) टाकेन.

हे पोस्टर फार मस्त झालं आहे. मी २ वेळा मसुदा वाचायला घेतला आणि पुन्हा स्क्रोल करून पोस्टर बघत बसले.

- साधारण 18 वर्षांपूर्वीच मातीची मूर्ती आणणे बंद केले आहे
फायबर ची मूर्ती वापरतो.
- गेल्या वर्षी पासून मोजकीच फुले आणि दुर्वा वापरतो
- सजावटी मध्ये थर्माकोल कधीच वापरला नाही, पण गेली 3 4 वर्षे पूर्ण सजावट फेकून न देता त्यातल्या काही गोष्टी वापरून नवीन वर्षाची सजावट करायचा प्रयत्न करतो.
- दर्शना साठी येणाऱ्या लोकांना आधी पेपर कप मधून कॉफी द्यायचो, गेल्या वर्षी पासून रोजचे कप देतो, विसळायला लागतात पण कप चा कचरा कमी होतो.

छान छान कल्पना येत आहेत. खरंच मस्त उपक्रम आहे हा.
पोस्टर बद्दल स्वाती आणि सिंडीला +१११ . सुंदर आणि कलात्मक पोस्टर्स!

सिम्बा यांची पध्दत आवडली. मी दरवेळेस मातीची मुर्ती घ्यायला जातो पण सुबकपणा पाहून बाप्पावर भाळतो आणि POPची मुर्ती घरी आणतो. यावेळी शाडूचीच आणणार. Happy

मस्त पोस्टर आणि उपक्रम.
अरे मंडळी इथेच लिहायला बसली की! हिट होणार उपक्रम!
पण असं नका करु. नीट लेख लिहून काढा.

छान उपक्रम

उपक्रमाच्या हेडर मधे मायबोली गणेशोत्सव २०१८ असं टाका म्हणजे धागे कळायला सोप्पं पडेल

अक्षय दुधाळ, छान कल्पना.
छापाची मूर्ती बनवणे सोपं असतं. मातीच्या लगद्यात मळताना थोडाथोडा कापूस मिसळयाचा. मूर्ती घट्ट राहते. लाल पिवळा गेरू रंग म्हणून वापरता येतो.

शाडुची माती - रंगाच्या दुकानात दोन/पाच किलोचे वाइटिंग/फिलर म्हणून मिळते.

किंवा - बागेतली माती पाण्यात कालवून वरचे लाल पाणी वेगळे ट्रेमध्ये काढून ठेवल्यावर त्यातून बारीक मातीचा लगदा मिळतो.

@अक्षय दुधाळ : छानच !
@सिम्बा : मातीची मूर्ती का बंद केलीत ? ती पर्यावरणपूरकच असते ना ?

मातीच्या लगद्यात मळताना थोडाथोडा कापूस मिसळयाचा. मूर्ती घट्ट राहते. >>>> कागदाचा लगदा + व्हाईटिंग पावडर (शाडू) + गोंद घातला तरी चालतो घट्ट राहण्यासाठी. हे तीनही योग्य प्रमाणात घालून भरपूर मळून मोठ्या गोळ्याची जाड लाटण्याने अर्धा सेंटिमीटर जाडीची मोठी पोळी लाटायची. साच्याच्या आतून गोडं तेल लावून त्यात ती पोळी बसवून हाताने साच्याच्या कंगोर्‍यांमध्येही नीट बसेल अशी चेपायची. आतून वर्तमानपत्राचा कागद गोंदाच्या सहाय्याने कपटे करून दुहेरी / तिहेरी थरात लावायचा. हे झाल्यावर साच्याच्या भागांना जिथे भाग जोडायचे आहेत तिथे पोळीच्या बाजूला मिश्रणाच्या गोळ्याच्या लोळ्या रोल करून फेव्हिकॉलने चिकटवायच्या. त्यावरूनही फेव्हिकॉल लावून साच्याचे भाग फिक्स करायचे. हा साचा पोकळ बाजू वर करून उन्हात सुकवायला ठेवायचा. पाऊस असेल तर घरीच हॅलोजन लावून किंवा ड्रायरने सुकवायचा. खडखडीत सुकल्यावर साच्याचे भाग वेगळे करायचे. आणि हळुवारपणे गणपती त्यातून बाहेर काढायचा. मग पॉलिश पेपरने घासायचा. कुठे टच-अप करायला हवे असेल तर करायचे. कोरीव काम, बोटं वगैरे टोकेरी वस्तूने फिनिशिंग करायचे. घासल्यावर त्याचा रंग राखाडी ते पांढरा होतो. मग पुढे व्हेज डाय वापरून रंगरंगोटी सुरू. असा गणपती वजनाला हलका परंतु विसर्जनाच्या वेळी तिसर्‍यांदा डुबकी लावल्यावर हमखास खाली जाणारा, कंठी/मुकुट/फुलं/हार्/मोदक व्यवस्थित पेलणारा, विसर्जनानंतर काही तासांतच पुर्ण विरघळून जाणारा असतो.

कापूस घालायचा असेल तर चिमूट चिमूट घेवून हातानेच पिंजून मिसळावा लागतो.

कितीही पर्यावरण पूरक म्हंटले तरी समुद्रात विसर्जन करताना , समुद्राच्या इकोसिस्टीम चा भाग नसलेली गोष्ट आपण त्यात सोडतो, (जेव्हा आम्ही बंद करायचा निर्णय घेतला तेव्हा हे विसर्जन हौद वगैरे प्रकार मोठ्या प्रमाणावर नव्हते)

हे करायला लागणारी माती कुठूनतरी मिळवायलाच लागते, म्हणजे कुठेतरी पर्यावरणावर अत्याचार करूनच ती मूर्ती आकार घेते.

लॉजीस्टिक चे कारण, घरात इन मिन 3 माणसे असताना( पैकी 2 ज्ये ना) , मूर्ती आणणे, गर्दीतून विसर्जनाला समुद्रावर जाणे वगैरे प्रकार त्रासाचा होऊ लागला.

Pages