एयर फ्रायर दाल बाटी : स्वातंत्र्यदिन स्पेशल

Submitted by आ.रा.रा. on 15 August, 2018 - 06:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बट्ट्यांसाठी

कणिक : सुमारे ५-६ पोळ्यांसाठी घेतो तितकी.
रवा : ३-४ चहाचे चमचे शीग लावून
हळद, मीठ, ओवा, तेलाचे मोहन.

(संपादन २ : कणकेत रवा मिक्स करायचा कारण बट्टीसाठी नॉर्मली जरा जाडसर दळलेली कणिक वापरतात.)

दाल :
घट्ट तुरीचे वरण, मिरची लसूण हिंग घालून.

क्रमवार पाककृती: 

कृती फक्त बट्टी/बाटीची देतोय.

१५ ऑगस्टच्या निमित्ताने थोडा सुट्टी मूड होता, अन काकूचं सुरु होतं आज्जी कशी नागपंचमीला कानवले करायची, कशी तवा ठेवायची नाही वगैरे. म्हटलं चल आज दाल बाटी खाऊ.

निखार्‍यातली करायला फार उस्तवार पुरेल म्हणून शॉर्टकट एयरफ्रायरमधे करायची ठरवली, अन अक्षरशः ३० मिनिटांत तयार झाली पण.

तर कृती :

वरचे सगळे जिन्नस हे असे घट्ट भिजवून घेणे. घट्टपणाचा अंदाज फोटोत येतोय का पहा. मोहन थोडं जास्त घालावे. ओलसर केल्यास मजा जाईल.


बट्टी साठी सुमारे दीड पोळी ची लाटी होईल इतका गोळा घेऊन हाताने मोदकाची पारी करतो तसा वळवायचा. आत तेल लावायचं, अन मोदक स्वतःवर बंद करायचा. परत त्याला दाबून तेल लावून पोकळ मोदक करायचा, पुन्हा बंद करायचा, हे असं ३-४ वेळा केलं, की बट्टीला आतून पुड बनतात, अन भाजल्यावर खुसखुशित होते.

एयरफ्रायर २०० डिग्री से. ला प्रीहीट अन त्यानंतर १५ मिनिटे. (संपादन १ : डिग्री कोणती (फॅरनहाईट की सेल्सिअस तो जरा झोल आहे. योग्य शोध घेऊन जमल्यास पुन्हा एडिटेन. सध्या अमितव म्हणताहेत ते योग्य असेल असे वाटते आहे म्हणून बदलले.)


या १५ मिनिटांत वरण करून होते. बट्टीवर आपल्या बेताने हवं तितकं कमी/जास्त तूप टाकून - माझ्या बेताने १ चमचाभरच घातलंय. नॉर्मली बट्टी निखार्‍यातून काढली की तुपात बुडवून काढतात.
तेव्हा तब्येतीत बट्टी चुरून, त्यावर घट्ट वरण घालून..

एंजॉय!

हॅपी इंडिपेंडन्स डे!

वाढणी/प्रमाण: 
५ बट्ट्या केल्या, दोघांत २-२ खाऊन ५वी कुस्करून साखरतुपासोबत संपली.
अधिक टिपा: 

इतक्या पट्कन अन मस्त बट्ट्या होतील असं वाटलं नव्हतं.

कणीक मळण्यापासून बट्ट्या शेकण्यापर्यंत संपूर्ण काम मी केले आहे. वरण व भाजी सौ. सौ.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक पदार्थ, ए.फ्रा.साठी माझे प्रयोग.
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

आरारा, सेल्सिअस आणि फॅ. चा गोंधळ झाला असावा. भारतातल्या आहे सो से. मध्ये रीडिंग असावं. नंतर प्राप्त झालेल्या ज्ञानानुसार केक वगैरे करायला ३५०- ४०० फॅ. टेंप ठेवतात, त्यामुळे २०० म्हणजे जेमतेम १०० सें. होईल, ते पुरेसं नसावं. तसं असेल तर तुमच्या कृतीत से. करा.
एकदम सोपे आहेत करायला मात्र.

दाल बाफले मधील बाफले हे मक्याच्या पिठाचे असतात. पाण्यात घालून उकडलेले. मला काही ते इतके आवडले नाही. हे बाफले सर्व दाल शोषून घेतात आणि कोरडे कोरडे होत राहतात. शिवाय उकडलेले असल्याने जरा सॉगी लागतात.

बाट्या मस्त लागतात. कुरकुरीत आणि त्यात झणझणीत दाल , कांदा , घरगुती राजस्थानी पद्धतीचं लोणचं आणि भरपूर तूप अहाहा !

Pages