नीज माझ्या नंदलाला...

Submitted by संगीता थूल. on 22 August, 2018 - 10:09

नीज माझ्या नंदलाला...

नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे....
नीज माझ्या नंदलाला.....
शांत हे आभाळ सारे शांत तारे शांत वारे
या झरयाचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे.
नीज माझ्या नंदलाला....
झोपल्या गोठ्यात गायी साद ना पडसाद नाही
पाखरांचा गलबलाही बंद झाला, बंद झाला रे...
नीज माझ्या नंदलाला....
नीज रे आनंदकंदा नीज रे माझ्या मुकुंदा
आवरी या घागर्यांचा छंदताला, छंदताला। रे....
नीज माझ्या नंदलाला....
सावल्यांची तीट गाली चांदण्यांना नीज आली
रातराणीच्या फुलांचा गंध आला गंध आला रे...
नीज माझ्या नंदलाला....
कविवर्य मंगेश पाडगावकराचे हे सुंदर अंगाई गीत
लतादीदींचा हलका हलका आवाज.. शांत शांत नादमधुर
संगीत. गेल्या तीन पिढ्या प्रत्येक महाराष्ट्रीयन माता आपल्या तान्हुल्यासाठी ही अंगाई गात आहेत. हातात पाळण्याची
दोरी, मंद मंद झोके, पाळण्यातील इवलसं नाजुकसं बाळ
आणि आईच्या हळुवार आवाजातील अंगाईचे सूर असे
घराला घरपण देणारे प्रसन्न वातावरण प्रत्येक घराने
अनुभवलेले आहे.
आईला सूर असो वा नसो, ती तिच्या बाळासाठीअंगाई गातेच. किंबहुना त्या अंगाईतच तिला तिचा सूर गवसतो. त्यामुळे ती बाळा ! गाऊ कशी अंगाई? असे कधीच म्हणत नाही, एकदा तिचा सूर लागला की तिचे बाळ झोपेपर्यंत ती थांबत नाही
आईच्या अंगाई गीतात सहसा चिमुकल्याच्याच गोष्टी असतात.तसेच झाडे,वेली,पाने,फुले,चंद्र तारे असा निसर्गही असतो. अगदी पाळण्यात असल्यापासून हे सर्व शब्द बाळाच्या परिचयाचे होत पुढे थोडासा मोठा झाल्यावर त्याच्याशी बाळाची मैत्री होते.
नीज माझ्या नंदलाला.... या अंगाईतून आई बाळाला
जाणिव करून देते की, बाळा ! आता निजायची वेळ झाली आहे.सारे आकाश, सारी सृष्टी, चंद्र तारे सर्व शांत
झाले आहे. गाईच्याही गोठयात निरव शांतात दिसत आहे.
पाखरांची कुजबुज थांबलेली आहे.झर्याची झुळझुळ
मंदावली आहे. तुझ्याही पायातील घागर्याचा आवाज
आता थांबव, फुललेल्या रात राणीच्या मंद मंद सुगंधाने
मोहरलेल्या चांदण्या सुध्दा झोपी जात आहे.बाळ सारी
निजानीज झाली तेव्हा माझ्या आनंदकंदा! तुही आता नीज.
आईच्या अंगाईतील हे समजावणीचे सूर आणि त्यातील गोडवा किती सुंदर! तिंचं बाळही इतकं शहाणं, कि ते लगेच झोपी जाते. सर्व मधुर आवाजाची किमया.याशिवाय त्यामुळे बाळाला त्याची आई जवळ असल्याची जाणिव होते. त्याला सुरक्षित वाटते. बाळाला झोपविण्यासाठी इतके पुरेसे असते.
वाचक हो! आपण थोडे मागच्या काळात जावू या
आणि पूर्वीच्या ग्रामीण, अशिक्षित आईच्या अंगाईतील
गोडवा चाखू या. खरा अर्थ, खरी माया त्या अंतर्गत
दडलेली दिसेल. त्या आईला नसते तालासुरांची माहिती,
तिच्याजवळ नसते साहित्यीक भाषा, पण तरी तिची
ममता, तिचे वात्सल्य तिच्या अंगाईतून भरभरून वाहत
असते. तिच्या अंतरातून आलेले ते नैसर्गिक शब्द असतात.
आपल्या तान्हुल्याला जोजविताना ती सूर लावते
गाई वो.... गाई.. गाईचे किती करू ... नाही निजतं
लेकरु...... सांज येळं झाली बाई निजे गोठयात वासरु...
असा शेवटचा सूर ती पहिजे तेवढा लांबविते, ती तिच्या
अंगाईत चिमणी पाखरं, गाई वासरं आणि निसर्गातील जे
जे सुचेल ते ते सर्व काही आणते. ऐकतांना मनस्वी आनंद
होतो आणि कौतुकही वाटते की, हे सर्व या आईला
कसे सुचते? शब्दांची अशी गुंफण ती कशी काय करते?
या काळात असा आगळा वेगळा गोडवा असलेली अंगाई
दुर्मिळ झालेली दिसते. मात्र माझ्या बाळांना झोपवितांना माझ्या आईच्या आणि सासूबाईच्या गोड आवाजातून अशी अंगाई मी ऐकलेली आहे.अजूनही ते सूर कानात, मनात गुंजारव करीत आहेत. आता ती अंगाई ऐकायला येत नाही. येणार नाही. कारण आम्ही आया आता सुशिक्षीत झालो आहोत. अंगाईचेही शुद्धीकरण झाले आहे... आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही? असं आम्ही म्हणायला लागलो. आणि कालपरत्वे हा बदलसापेक्ष आहे.
वाचक हो। आई सुशिक्षित नसते. आई अशिक्षितही
नसते. आई गरीब नसते, आई श्रीमंतही नसते. ती फक्त आई असते. आपल्या लेकरावर जीवापाड प्रेम करणारी जीव ओवाळून टाकणारी. या जगात देव आहे की नाही माहित नाही, पण आई मात्र नक्की आहे. प्रत्येक घरात आहे, घरातल्या प्रत्येकाला आहे. तिच्यातच देवत्व लपलेलं आहे. शोधलं की सापडत असे म्हणतात. देव प्रत्येकाकडे जावू शकत नाही, म्हणून त्याने प्रत्येक घरी आईला पाठविले. म्हणून त्या परमेश्वराने कोणतेही वैभव, धनसंपदा आपल्याला दिली नसेल, तरी त्याच्यावर आपण नाराज होवू नये, कारण त्याने आपल्यावर भरभरून प्रेम करणारी आई दिलेली आहे. म्हणून आज ज्याच्याजवळ आई असेल तो सर्वात श्रीमंत, •
O प्रा.संगीता भारत थूल
(से.नि.)संस्कृत विभागप्रमुख
महिला महाविद्यालय,
अमरावती,मो. ९४२२९५७१७१

Group content visibility: 
Use group defaults

आवडलं..
पण हे गीत खळेसाहेबांचं आधी आहे मग लतादीदींचं असं वाटतं.
नितांतसुंदर कॉम्पोझिशन!!