मरेस्तोवर अभ्यास केला - घास रे रामा

Submitted by नाचणी सत्व on 21 August, 2018 - 00:22

ऑर्कुट हे पहिले समाजमाध्यम म्हटले जाते ज्यामुळे जगभरातील विविध ठिकाणचे लोक एकाच वेळी गंभीर चर्चा करू लागले. विविध स्तर आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीमुळे खटके उडू लागले. आपल्या आपल्या जगातून दुस-याकडे पाहताना बनलेल्या मतांना पलिकडच्या जगातून सुरूंग लागू लागला. अर्थात प्रत्येकालाच आपले मत मुद्देसूद पद्धतीने मांडता येत नाही. वादविवादांचा सराव प्रत्येकाला असतो असेही नाही ( आणि काही जणांना वादविवादांचे व्यसन लागले हे अलाहिदा) .

माध्यमात ज्यांना स्थान नाही असे लोक चाचरत का होईना आपल्या समस्या बोलू लागले. शेतकरी वर्ग येऊ लागला. त्या निमित्ताने शेतकरी संघटनांची आंदोलने, त्यांचे प्रश्न सूज्ञांना समजू लागले. हे लोक येईपर्यंत ठराविक मंडळांचे शेतक-यांबद्दलचे ज्ञान पाजळले जात असे. त्यात शेतक-याला आयकर नाही, तो फुकट्या आहे वगैरे ओका-या असत. अशा मंडळींना शक्यतो इग्नोर केले जाई. पण त्या वेळीही दूध आंदोलनाबाबत टोकाची असंवेदनशील मतं व्यक्त केली जात. कांदाफेक आंदोलनादरम्यान शेतक-यांना माज आला आहे वगैरे वक्तव्ये केली जात.

त्याला उत्तर म्हणून तुम्हाला काय होतंय एसीत बसून आणि लाखभर महिना पगार घेऊन बोलायला असं एखादे वक्तव्य झालेले आठवते. त्या वक्तव्याचा मग व्यवस्थित समाचार घेतला गेला. तुम्ही म्हशीवर बसून गावभर उंडारत होता त्या वेळी आम्ही अभ्यास करत होतो अशी पोस्ट आली कि मग त्या खाली कुजकट टोमण्यांचा रतीब घातलेला आढळायचा. एकंदर पाण उतारा केलेला असायचा. या उपहासाची सवय नसणा-यांना त्यास उत्तर कसे द्यावे हे ठाऊक नसायचे. काही मंडळी मग संतप्त होत. म्हणजे ही मंडळी आंदोलनावर कुजकट टीका करणार, अशुद्ध (ग्रामीण) भाषेची टिंगल करणार (आमचीच भाषा बोला हा आग्रह) आणि यांना एकही वाक्य खपत नाही याचा राग अनावर झाला कि मग शिवीगाळ सुरू होत असे. परिणाम म्हणून त्या त्या कम्युनिटीतून असे लोक हाकलले जात.

हे झाले नमनाला घडाभर तेल अर्थात पार्श्वभूमी. ऑर्कूटच्या काळात मोठ्या पगाराच्या नोक-या आयटीत मिळत असत. त्या आधी कित्येक वर्षे इंजिनिअयरींग आणि मेडीकलचे प्रभुत्व होते. जोडीला काही काळ कॉमर्स क्षेत्राला बरे दिवस आले होते. मग एमबीए ची टूम आली. वाढत्या खासगी कॉलेजेस मुळे अध्यापक महाविद्यालयांची मागणी वाढली.

थोडक्यात करीयर साठी अभ्यास अनिवार्य झाला. अधिक आकर्षक संधींमुळे अनेक जण त्याकडे ओढले गेले. स्पर्धा वाढली. मग टक्केवारी वाढत गेली. त्यामुळे खाजगी क्लासेसचे पेव फुटले. स्पर्धा अधिकच तीव्र झाली. लातूर पॅटर्न सारखे फक्त गुणांना महत्व देणारे पॅटर्न आले. नववीचा अभ्यासक्रम गुंडाळून दहावीचा अभ्यास सुरू करायचा आणि नववी दहावी पूर्ण करून वर्षभर फक्त प्रश्नपत्रिका सोडवून घेण्याला महत्व आले. परीक्षा हा कौशल्याचा भाग झाला. पण महाराष्ट्रातून स्पर्धापरीक्षांना दहावीत पहिल्या आलेल्या मुलांचा कस लागत नव्हता. त्यामुळे आयसीएसई आणि सीबीएसईच्याआ शाळा चालू झाल्या.

या सर्व गदारोळात अभ्यास केला म्हणजे करीयर होते आणि जे अभ्यास करत नाहीत ते आळशी असा समज घट्ट झाला. अभ्यास करीयरसाठी केला जातो असे संस्कार पालकांवर आणि त्यांच्या मुलांवर झाले. आमच्या शाळेत एक दिवस शिक्षकांनी सुवाच्य अक्षरात सुविचार लिहीला होता "लहानपणी अभ्यासरूपी कष्ट केले तर मोठेपणी आराम मिळेल, लहानपणी आराम केला तर फलाटावर हमालरूपी कष्ट करावे लागतील". श्रम आणि बुद्धी यांची विभागणी ही अशी होत होती. श्रमाला प्रतिष्ठा नाही असे अप्रत्यक्ष सुचवणारे अनेक संस्कार कळत नकळत त्या वयात होत असत.

दुसरीकडे शाळा न शिकलेले किंवा जुजबी शिकलेले बनिये मात्र व्यवसायाचे प्रात्यक्षिक घेऊन पैसा कमावत गेले. अभ्यास करणारे सर्व नोकरीकडे वळत होते. पण नोकरी करणा-यांसाठी धंदे मात्र अभ्यास न केलेले बनिये टाकत होते. या अभ्यास केलेल्यांना खाऊ घालायला अभ्यास न करणारे शेतकरी शेतात (उनाडक्या करीत) फिरत होते.

व्यवसायात घालवलेला वेळ हा ते ते कौशल्य / ज्ञान मिळवण्यासाठी घालवलेला असतो हे अनेक जणांना पचनी पडत नव्हतं. शेतीसाठीही काही ज्ञान आवश्यक असून त्यासाठी काळ्या मातीत राबावे लागते याची गंधवार्ता अनेकांना अजूनही नाही. हे ज्ञान चार भिंतीत बसून येत नाही. केवळ पुस्तके वाचून शेतीच काय स्वयंपाक सुद्धा येत नाही. करूनच बघावं लागतं. आपल्या पुस्तकी अभ्यासाच्या या पद्धतीत प्रात्यक्षिकाद्वारे ज्ञान मिळण्याला वाव नाही. त्यामुळे आपल्याकडे महत्वाचे तंत्रज्ञान विकसित होत नाही. आपल्याकडे फक्त सॉफ्टवेअर क्षेत्रामधे स्वावलंबन आहे. बाकीच्या सर्व क्षेत्रामधे परदेशी तंत्रज्ञान आहे. ते वापरण्याचे कौशल्य आपल्याला मिळते. अभियांत्रिकीमधे तर ते ही नाही. अभियंत्यांना सहा महीने ट्रेनिंग द्यावे लागते. कित्येक मशीन्स त्याने कॉलेजमधे पाहिलेल्या नसतात.

काळाचा महीमा असा की आता साडेचार लाख अभियंत्यांचा जागा असूनही त्यातल्या ६०% रिक्त राहू लागलेल्या आहेत. कारण अभियंत्यांना नोक-या नाहीत. या अभ्यासक्रमाचा उपयोग धंदा सुरू करायला होत नाही. किमान डॉक्टर आपला धंदा सुरू करतो. पण गरजेपेक्षा जास्त डॉक्टर्सची संख्या शहरातून उपलब्ध होतेय. परिणामी अनेक जण माशा मारताहेत. उपनगरातून होमिओपॅथी झालेले डॉक्टर्स सर्रास अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करतात. पण गावाकडे जायची यांचीही तयारी नसते. कारण लाख रूपये घालवल्यानंतर शहरातच एक दिवस नावारूपाला येऊ ही अपेक्षा. तसेच आम्ही एव्हढा अभ्यास केला तर व्हाईट कॉलर्ड जॉब हवा. इंजिनियर / डॉक्टर झालो म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा हवी हा अपेक्षा असते. माझ्या एका मित्र डॉक्टर आहे. त्याची बायको डॉक्टर आहे. वडील आणि आजोबा डॉक्टर होते. काका बिका सगळे धरून डॉकटरांचे खानदान. त्याला डॉक्टर म्हणवून घेण्यात स्वारस्य नाही. याउलट एकजण गावाकडून आलेला. संघर्ष करून डॉक्टर झालेला. त्याला फक्त नावाने हाक मारली की त्रास होतो. त्याचा उल्लेख डॉक्टर म्हणून केला की गडी खूष !

थोडक्यात प्रतिष्ठा आणि विनामेहनतीचे काम यामुळे या क्षेत्रांना पसंती होती. आता मात्र गोंधळाचे वातावरण आहे. मोठ्या संख्येने पालकांमधे अशा बदलाच्या वेळी काय करायचे याची माहिती नसते. आता तर शेतीही उद्ध्वस्त होत चालल्याने जी मंडळी शिकून प्रतिष्ठीत व्यवसाय करू पाहत होती त्यांच्यातही नैराश्य आलेले आहे. थोड्या मुलांचे करीयर होते.

आज जसे शेतक-याला मुलगी मिळत नाही किंवा पुरोहिताला मुलगी मिळत नाही तसेच अभियंत्याच्या बाबतीत होत आहे. पुढे डॉक्टरच्या बाबतीत होईल. काही वर्षांपूर्वी वकील असणे मानाचे समजले जाई. त्यामुळे सगळे वकील होऊ लागले. त्याचा परिणाम असा झाला की कलेक्टर ऑफीस किंवा कुठल्याही सरकारी कार्यालयापुढे वकील लोक छत्री टाकून बसू लागले. त्या क्षेत्राची पत राहिली नाही.

याउलट आम्ही रात्रंदिवस अभ्यास करत असताना तुम्ही उंडारत होता असे ज्याच्याबद्दल वाटायचे आणि हा मुलगा वाया जाणार याची खात्री होती तो काहीही करता येत नसल्याने जमिनीचे व्यवहार करता करता आला मोठा बिल्डर झाला हे पाहिले आहे. आता तो आमचा बालपणीचा मित्र आहे हे अभिमानाने सांगावे लागते. एजंट साठी एक वेगळे कौशल्य लागते. ज्ञान लागते हे आता मान्य करावे लागते.

शाळा चुकवून तालमीत जाणारा एक जण शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकून आता स्वतःच्या ब्रॅण्डच्या जिम चालवू लागला आहे. त्याच्याकडे शिकायला लोक येतात. ते ही ज्ञानच आहे. आपल्या पूर्वीच्या घोकंपट्टीच्या चाकोरीत तसे समजले जात नव्हते एव्हढेच. अशी असंख्य उदाहरणे आहेत. घोकंपट्टी केली म्हणजेच ज्ञान मिळवले किंवा आपण इतरांपेक्षा जरा लायक झालो या समजाला आता नाही म्हटले तरी धक्का बसत चाललेला आहे. आम्ही त्या वेळी कष्ट केले म्हणून आता आरामाचे आयुष्य जगतो हा सिद्धांत आता परिस्थिती खरी होऊ देईना.

तर लांबलचक लेखाच्या शेवटी तात्पर्य किंवा कुठलाही संदेश नाही हे जरा विचित्र नाही का वाटत ? अहो, परिस्थिती मोठी विचित्र असते म्हणतात. सगळी समीकरणे उलटी पालटी करून टाकते. तर मग लेखाचे काय ? सहज निरीक्षण आहे हे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डा.अ, छान लेख. कन्क्लूजन असे एकच एक काढता येणार नाही.या विषयाला बरेच कंगोरे आहे. लेखासाठी धन्यवाद.

लोकांचे प्रॉब्लेम सोडवायला सुरवात करा.... पैसे आपोआप मिळत जातील..... मग त्यासाठी अभ्यास मरेस्तोवर करा, करु नका काही फरक पडत नाही. प्रमोशन होताना हल्ली विचारतात का? किती अभ्यास केला होता ते? बरेच ओव्हर क्लॉलिफाइड लोकं , अंडरक्लॉलिफाइड ( Uhoh ) लोकांच्या हाताखाली काम करताना दिसतात ना?
प्रत्येक काम करायला स्किलसेट लागतो , अगदी कमीशन मिळवायला पण ! ..... काही लोक शाळा शिकुन स्किल सेट मिळवतात / मिळवू शकत नाहीत.... काही लोक न शाळेत जाता स्किल सेट मिळवतात / मिळवू शकत नाहीत... यात सगळ्या कॉब्मिनेशन्स मिळतील.

१९६८-१९७० साली आमची अशीच समजुत करुन देण्यात आली होती की आर्ट्स वा कॉमर्स घेणारे जास्तीत जास्त क्लार्क होतील्,पण डिप्लोमा केल्यास इंजिनीअर होशील आणि पगार सुद्धा भरपुर मिळेल. त्याकाळी पॉलिटेक्निककडे जाणारा रस्ता आर्ट्स वा कॉमर्स कॉलेजवरुन जात असे आणि "त्या " कॉलेजमधील ते रंगी-बेरंगी कपडे घातलेल्या मुला-मुलींचे घोळके,त्यांचे गॅदरिंग्,कॉलेजच्या कमी तासिका विरुद्ध आमचा पांढरा हाफ शर्ट ,खाकी विजार्,दिवसभर कॉलेजच्या तासिका,प्रक्टिकलसाठी निळा डगला असलेला गणवेश ! ! अर्थात आम्ही डिप्लोमा पुर्ण केला आणि वीज मंडळात नौकरी सुरु केली.

डागदर, खूप विविध विषयांची गल्लत झाली आहे का?

१. शिक्षण => पैसा, हे थेट प्रमाण नसते. पीएचडी झालेले अनेक जण फक्त ग्रॅज्युएट झालेल्यांपेक्षा कमी पगारावर काम करत असतात. मात्र त्यांना त्यातून मिळणारा आनंद अधिक पगाराच्या नोकरीत मिळेलच असे नाही.
२. धंदा आणि शिक्षणः धंदा करणारा उच्चशिक्षीत असेलच असे नाही. आणि उच्चशिक्षीत धंदा करणारच नाही वा अयशस्वी होईल असे नाही.
३. मुठभर लोकांच्या हातातला धंदा: हे भांडवलशाहीत होणार. लेवल प्लेयिंग फिल्ड करण्याचा आदर्श राज्य/समाज रचनेत सरकार प्रयत्न करेल पण तरी ही विषमता दूर होणार नाही.
४. विद्यार्थीदशेत अभ्यासः सर्व विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासाच्या दृष्टीने पोषक वातावरण आहे असे समजा. तर जे विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत ते
त्यांच्याकडून अपेक्षित काम करत नाहियेत व म्हणून आळशी आहेत असे म्हणावे लागेल. इथे अभ्यस म्हणजे शाळेतलाच असे मला म्हणायचे नाही. एखादा मुलगा दुकानात/धंद्यात काम करेल, एखादा कलाकार त्याच्या कलेत उमेदवारी करेल. पण उनाडक्या न करता 'स्किल' कमावण्याचे काम अपेक्षित आहे
५. आता 'घासणे व म्हशीवरून उंडारणे' या प्रतिक्रियेबद्दलः इथे घरी अभ्यासाचे वातावरण नसणे (गरिबी, परंपरागत शिक्षणाची संधी नसणे वगैरे वगैरे) यामुळे पुढल्या जीवनात विषमता निर्माण होत आहे. दुर्दैवाने त्या पिढीत ती विषमता दूर होणे अवघड आहे. मात्र त्यांच्या पुढल्या पिढीला ती विषमता दूर करण्याची संधी अ‍ॅफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन (आरक्षण, शिष्यवृत्ती, उत्तम प्राथमिक शाळा वगैरे) द्वारा सरकारने करून देणे आदर्श समाजरचनेत अपेक्षित आहे.

आता श्रमप्रतिष्ठेबद्दलः समाजात विषमता राहणारच. हुशार/बुद्धिवान/कामसू/कर्तबगार माणसे अधिक यश/पैसा कमावणार व त्यांना समाजात मानाचे स्थान मिळणार. हे आर्थिक प्रगत समाजात देखील होते. फक्त कामसू आहे पण हुशार नाही असा मनुष्य आर्थिक प्रगत समाजात उत्तम असेंब्ली लाइन वर्कर असेल, त्याला जे वेतन मिळते त्यात तो मानाने जगू शकत असेल तर श्रीमंत माणसाच्या तुलनेत त्याला कमीपण वाटत नाही. याउलट आर्थिक मागास (जिथे अश्या प्रकारच्या माणसांचा पुरवठा अधिक आहे) तिथे अश्या मनुष्याच्या व श्रीमंताच्या कमाईत तफावत जास्त असेल व हे 'मानाने' जगणे अवघड होईल. तिथे प्रतिष्ठा कमी असणार.

ज्या माणसात कुवत असेल (फंक्शन ऑफ बुद्धिमत्ता + कामाची तयारी) तो जिथे त्याच्या आवडीला व त्याला जी कमाई अपेक्षित आहे ती मिळणार्‍या क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करेल.
जसे एखादा पीएचडी मनुष्य पगार कमी पण आवडत्या विषयात अभ्यास करायला मिळेल अशी नोकरी शोधेल.
धंद्यातली हुशारी असणारा मनुष्य जिथे धंदा वाढण्याची संधी आहे तिथे घुसेल.
ज्या कामात कमी कुवत चालते व जिथे कमाई कमी आहे तिथे अधिक कुवतीचा माणुस का आनंदाने जाईल? उदा. ज्याला डॉक्टर होणे शक्य आहे तो वॉर्ड्बॉय म्हणून करीअर गोल ठेवणार नाही. शेतीत हेच होते. फारशी जमीन नसेल व थोडीफार जरी कुवत असेल तर ज्याला शक्य आहे तो शेतीतून बाहेरच पडतो आणी म्हणून जे उरतात त्यातले अनेक 'कुवत' नसलेले असतात. मोठी जमीन असलेल्यांमध्ये कितीतरी मुद्दाम शेती करणारे असतातच की (आणि बरोबरीने इतर अनेक धंदे).
जिथे कुवत आहे पण तरी कमी कुवतीचा रोजगार करावा लागतो व त्याचे कारण आळस नसून सामाजिक पार्श्वभुमी आहे तिथे वरचा अ‍ॅफर्मेटिव्ह अ‍ॅक्शनचा मुद्दा येतो.

एकंदरीत समाजाचाच प्रॉब्लेम असा आहे की पैसा म्हणजे यश असे समजले जाते.
लेखही त्याच अंगाने लिहीला आहे.
पण खरे यश आवडीच्या क्षेत्रात काम करत आपल्याला आपल्या कुवतीनुसार अपेक्षित मजल गाठणे हे असते.

मुलांबाबत बोलायचे झाल्यास त्यांना लहानपणापासूनच त्यांच्या आवडीचे एकूण एक छंद जोपासू द्या.
जेणेकरून वर उल्लेखलेली नैराश्याची परीस्थिती त्यांच्या वाटेला कधी येणार नाही, ते आपल्या आवडीनुसार आपले निभावतीलच.

बाकी लेखातील सर्व मुद्दे पटले नाही तरी मांडणी छान ..
सविस्तर लिहायला वेळ नाही त्याबद्दल क्षमस्व

अभ्यास आणि स्किल अशी विभागणी का केली आहे ? शेतीतले पारंपारीक ज्ञान नसते का ? आज कोष्टी, विणकरांचे पारंपारिक ज्ञान नष्ट झाले आहे. त्याऐवजी ही सर्व मुलं परीक्षेचे "स्कील" मिळवत आहेत. सर्वांनी फक्त अभ्यासाच्या "स्कील" च्या मागे लागले तर काय होईल ती आजची परिस्थिती मांडली आहे. निरीक्षण आहे. कुठलेही तत्त्वज्ञान मांडलेले नाही.

जे आहे ते आहे. तुम्ही सगळे जण इतके हळवे का होताय पण?
वॉरन बफेटचा सल्ला ऐका. Managing your career is like investing - the degree of difficulty does not count. So you can save yourself money and pain by getting on the right train.
-------
It is not the strongest of the species that survives, nor the most intelligent that survives. It is the one that is most adaptable to change.

शेवटी सुसन्स्कृत पणा असावा , तो शिक्षणाने येतो , > > मी अजिबात सहमत नाही. शिक्षणाने सुसंकृत पणा येतो ही अंधश्रद्धा आहे. माझी बाई सुशिक्षित नाही (वाचताही येत नाही तिला) पण ती सुसंस्कृत आहे. हिच माझी शेजारीण ग्रॅज्युएट नक्कीच असेल, पण सुसंस्कृत नावाला पण नाहिये.

आजकाल शिक्षणाचा उपयोग फक्त डिग्री चार घौघात मिरवण्यासाठी आणि पैसा कमवण्यासाठी होतो. हुशार असणं हे फक्त अभ्यासापुरतं मर्यादित नसून, सर्वांग सुंदर हुशारी अपेक्षित आहे पण आपल्याकडून सोयिस्कररित्या सर्व गोष्टींची गल्लत होते. मोठेपणा पुर्वी आचरणाने मिळत असे, आजकाल जितका जास्त पैसा तितका मोठेपणा मिळतो. आचरणाला शून्य किंमत राहिली आहे.

शेवटी सुसन्स्कृत पणा असावा , तो शिक्षणाने येतो ,>>>> ज्ञानाने म्हणा हवं तर.
पण पुन्हा तेच, नियम नाहीच हा, असं व्हायला हवं असं म्हणते मी. Happy
अर्थात स्वभाव, वृत्ती, संस्कार, आजूबाजूचं वातावरण , मूड , समोर कोण आहे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यामुळे ही गोष्ट जनरलाईझ नाही करता येणार.
शेवटी मानवी स्वभाव हे न सुटलेले आणि कुठल्याही नियमात न बसणारे कोडे आहे! कोण कधी, कसा आणि का विशिष्ट पद्धतीने वागेल हे सांगता येत नाही .

<<< आजकाल शिक्षणाचा उपयोग फक्त डिग्री चार घौघात मिरवण्यासाठी आणि पैसा कमवण्यासाठी होतो. >>>
हे फक्त आजकालचे नाही, पूर्वीपासूनच आहे. कॉलेज हे नोकर तयार करण्याचे कारखाने आहेत. तिथे नोकरीसाठीचा कागदाचा कपटा मिळतो. खरे शिक्षण अनुभवातूनच मिळते.

थोडक्यातः चांगले शिक्षण घ्या, ज्याच्यामुळे भरपूर पैसे मिळतील. मग ज्ञान मिळवत बसा किंवा पैसे देऊन सरळ विकत घ्या.

अभ्यास आणि स्किल अशी विभागणी का केली आहे ? शेतीतले पारंपारीक ज्ञान नसते का ? आज कोष्टी, विणकरांचे पारंपारिक ज्ञान नष्ट झाले आहे. त्याऐवजी ही सर्व मुलं परीक्षेचे "स्कील" मिळवत आहेत.
>>>

हो पण ते पारंपारीक पद्धतीने घेऊन फार उपयोग होणार नाहिये. त्याला आधुनिक शिक्षणाची जोड दिली पाहिजे. आधुनिक शिक्षणाचा पाया पक्का पाहिजे. मग अश्या पारंपारिक ज्ञानाचा उपयोग होईल नाहीतर नुसतीच पिळवणूक होईल.

बाकी ते तुकडे करण्याचा तुमचा प्रतिसाद समजला नाही. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला समजले नाही बहुतेक.

टवणे सर, आधुनिक शिक्षण जोडीला हवे, पण त्याचा सीलॅबस काय असावा? असलेली शिक्षण पद्धती तो पाया देते का?

शिक्षण हवेय पण हवे ते अस्तित्वात असलेल्या शिक्षण पद्धतीतून मिळतेय का?

>>आता श्रमप्रतिष्ठेबद्दलः समाजात विषमता राहणारच.... <<

श्रमप्रतिष्ठा (डिग्निटी ऑफ लेबर) आणि सामाजीक प्रतिष्ठा (सोशल स्टेटस) याचा संबंध जोडला गेलेला दिसतोय, जो अजिबात नाहि/नसतो. श्रमप्रतिष्ठा म्हणजे ठरविक काम (किंवा ते काम करणारे श्रमीक) नसुन ते काम करण्यास कोणालाहि (रिगार्ड्लेस ऑफ दि सोशल स्टेटस) लाज्/कमीपणा वाटु नये हि वृत्ती/जाणीव...

त्याला आधुनिक शिक्षणाची जोड दिली पाहिजे. >>> आत्ता मुद्द्यावर आला आहात. अभियांत्रिकी महाविद्यालयांचं वाटोळं का झालं ?

Pages