रेसिपी बुक

Submitted by फूल on 10 August, 2018 - 22:56

जेनी... माझ्या ऑस्ट्रेलियातल्या जुन्या घरची शेजारीण... ऐंशी वर्षांची एक अनुभवसंपन्न आज्जी. खरंतर ही मूळची ब्रिटीश पण अनेक वर्षांपूर्वी येऊन ऑस्ट्रेलियात स्थाईक झाली. अनेक देश फिरून न जाणो किती लोकांना भेटली असेल ती. आजवर उपजीविकेसाठी अनेक व्यवसाय केले होते तिने. काही चढले काही बुडले. शॉपिंगची भयंकर हौस, तसंच खाण्याची आणि खिलवण्याचीही. स्वयंपाककला हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. ही बयाही पाकशास्त्रात पारंगत. तिचं घर म्हणजे रेसिपी बुक्सचा खजिनाच. मी शाकाहारी आहे असं कळल्यावर मला बोलावून बोलावून इतर खाद्य संस्कृतीतल्या शाकाहारी पाककृती दाखावायची. मीही उसनं अवसान आणून त्या रेसिपीजचं कौतुक करायचे. फोनवर त्या पुस्तकातल्या पानाचा फोटो काढून घ्यायचे. पण घरी येऊन पुन्हा तेवढ्याच उत्साहाने आमटी-भाताचा कुकर चढवायचे.

तिच्या दुर्दैवाने लग्नं होऊनही तिला मूलबाळ नव्हतं. ही साठवलेली पुंजी कुणाच्या तरी हाती सुपूर्त करावी ही ओढ असणं सहाजिक आहे. माझ्याकरवी तिची ही हौस ती पुरी करून घेत असे. बटाटे, त्यांचे विविध प्रकार, मग चिप्ससाठी कुठले चांगले?, कटलेट, बटाटे वडे असल्या प्रकारात ते सारण घट्ट होण्यासाठी कुठले चांगले?, करीमध्ये कुठले घालावे? तसेच टोमेटोचे विविध प्रकार, इतर भाज्या कश्या निवडायच्या?, तळण्यासंबंधीची काही तंत्र असं बरंच काही तिने मला शिकवलं... ज्याचा मला रोजच्या स्वयंपाकातही उपयोग व्हायला लागला. काही पदार्थ स्वत: रांधून खायला घातले तर काही चांगल्या हॉटेलात नेऊन खिलवले. मग मीही माझ्या परीने कांदा भजी, बटाटे वडे, पाव भाजी, पुलाव, बिर्याणी असले पदार्थ कधी घरी करून तर कधी विकत आणून तिला खायला घातले.

आमची ही खाद्यसंस्कृतीतली देवाण-घेवाण सुरू असतानाच एकदा मी तिला केक्सबद्दल विचारलं. माझ्या नवऱ्याच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ चॉकलेट केक घडवायचा होता. माझा तोवरचा बेकिंगमधला इतिहास अद्भुतरम्य होता. आमच्या घरातला ओव्हन अगदी हाताबाहेर गेलेला... त्याला सोबतीला घेऊन काही घडवायला गेलं की हमखास करायला घेतलेल्या गणपतीचा मारुती व्हायचा. म्हणून म्हटलं हिच्या हाताखाली घडवून बघावा एकदा केक. माझी ही इच्छा मी बोलून दाखवत असतानाच जेनीचे डोळे चमकले आणि लगोलग पाणावलेही. समोरच्या टेबलावरचं एक जुनाट पिवळं पुस्तक तिनं अलगद उचललं आणि माझ्या हातात ठेवलं. पुस्तक कसलं ती एक पुस्तिका होती. बी-रू नावाच्या सेल्फ रेझिंग फ्लोअर बनवणाऱ्या एका लंडनमधल्या कंपनीने छापलेली पुस्तिका. सेल्फ रेझिंग फ्लोअर वापरून केक, पेस्ट्रीज, स्कोन, ब्रेड, मफीन असले तऱ्हे-तऱ्हेचे पदार्थ कसे घडवायचे याची समग्र माहिती त्या पुस्तिकेत होती.

मी ते पुस्तक चाळत असतानाच जेनीने सांगितलं... “माझ्या आईचं पुस्तक आहे हे. जपून वापर आणि मला परत आणून दे.” तेव्हा मला तिच्या ओलावलेल्या डोळ्यांचा अर्थ कळला. जेनी सांगत होती.. तिची आई तेच पुस्तक वाचून बेकिंग करायला शिकली आणि तिने जेनीलाही याच पुस्तकातून शिकवलं. ज्यादिवशी जेनीने पहीला केक जन्माला घातला त्यादिवशी तिच्या आईने तिचं कसं आणि किती कौतुक केलं होतं हे सांगताना जेनी फार फार हळवी झाली. तिच्या इतर बहिणींना कुकिंगची अज्जिबात आवड नव्हती त्यामुळे जेनी आणि तिची आईच स्वयंपाकघरात असायच्या. तिची आई उत्तम बेकिंग करायची. दर शुक्रवारी दुपारी शाळेतून जेनी आणि तिच्या बहिणी घरी आल्या की संपूर्ण वीकेंड घरातल्या आणि आजूबाजूच्या पोरांना खायला होतील म्हणून तिच्या आईने पन्नास-साठ कप केक्स करून ठेवलेले असायचे. अजूनही शुक्रवारी दुपारी तिला केक्सचा वास येतो असं म्हणाली. मलाही भरून आलं. घरातल्या पोरांसाठी शेकड्याने लाडू वळणाऱ्या आपल्या माय-मावश्या आठवल्या. भाजलेल्या बेसनाचा कसा घरभर वास दरवळायचा ते आठवलं. “जपून वापर... तुझ्या मुलीच्या हाती लागू देऊ नको... माझ्या आईची आठवण आहे ही... माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे... एरवी मी कुणालाही दिलं नसतं पण तुला म्हणून देतेय..” असल्या शंभरेक सूचना शंभर वेळा ऐकून मी ते पुस्तक घेऊन घरी आले.

दुसऱ्या दिवशी दुपारी लेक झोपल्यावर सावकाशीने, हळूवार हाताळत त्याचं एक-एक पान उलगडून बघितलं. पानं अगदीच नाजूक झाली होती. १९२३ साली छापलेल्या पहिल्या आवृत्तीतलं पुस्तक होतं ते.... कृष्ण-धवल.. पण तरीही सचित्र. मला खजिनाच हाती लागल्यासारखं वाटलं. पहिल्या पानावर सुंदर अक्षरात तिच्या आईचं नाव होतं आणि त्याच्या वर आणि खाली गोळ्या-गोळ्यांची नक्षी. ती नक्षी पुढे प्रत्येक पानाच्या कोपऱ्यात रेखाटलेली होती. तिच्या आईची नक्षीकामाची आवड जेनीतही उतरली होती. जेनीच्या घरातही सगळीकडे कला-कुसर दिसून यायची. तिच्या आईने ज्या दिवशी त्या रेसिपीज आमलात आणल्या होत्या त्या तारखा बऱ्याच रेसिपीजच्या बाजूला लिहिल्या होत्या. बऱ्याच रेसिपीजच्या खाली तिच्या आईने करून बघितलेला यशस्वी बदल नोंदवला होता. उदाहरणार्थ... एका केकच्या रेसिपीनंतर लिहिलं होतं... की अंडी, बटर, साखर एवढंच खूपवेळ फेटून एकजीव करून घ्यावं आणि मग त्यात हळू हळू फेटत फेटतच फ्लोअर मिक्स करावं किंवा मफीनच्या रेसिपी नंतर लिहिलं होतं की सुकामेवा किंवा चॉकलेटचे छोटे तुकडे केकमध्ये घालायचे असल्यास मिश्रण बेक करायच्या कप्समध्ये ओतल्यावर वरतून हे तुकडे घालावे. हे सगळं अगदी प्रिंटेड वाटावं इतक्या सुवाच्च अक्षरात लिहिलेलं होतं. पण पेन्सिलीने. काही रेसिपीजच्या पुढे त्या घडवण्यासाठी लागलेल्या वेळाची नोंद होती.

मला ते पुस्तक वाचताना गंमत वाटत होती. बी-रू या कंपनीने जगात सर्व प्रथम सेल्फ रेझिंग फ्लोअर जन्माला घातलं. मग ते वापरायचं कसं हेही सांगणं भाग होतं. त्या पुस्तकात जागोजागी यात बेकिंग पावडर घालू नका अश्या ठळक अक्षरात सूचना होत्या. त्याकाळी बहुतेक घरात कोळश्याची भट्टी होती. अगदी वरचा दर्जा म्हणजे gas oven. पण तरी त्या ओवनला तापमान नियंत्रणाची कुठलीही सोय नव्हती. मग कोळशाची भट्टी मुळात कशी पेटवा पासून ते ओवनमध्ये हात घालून तापमान बघा अश्या प्रकारच्या सूचना पहिल्या काही पानावर होत्या. gas oven ला त्यातल्या त्यात moderate आणि hot असे दोन प्रकार होते. आजच्या काळात स्पष्ट अक्षरात ओवनवर तापमापक असूनही माझा केक घडत नव्हता. काय नव्हेच ते.

मग पुढल्या पानावर आपल्या लेकींना या पुस्तकामधून बेकिंग करायला उद्युक्त करा. उत्तम बेकिंग करणारी गृहिणी हे घरातल्यांच्या उत्तम आरोग्याचं प्रतीक आहे, बाहेरून आणून असे पदार्थ खाण्यापेक्षा घरीच करून खाल्लेले कसे योग्य... तसंच आमचं सेल्फ रेझिंग फ्लोअर वापरून कुणीही बेकिंग करू शकतं... अश्या आशयाचा मजकूर होता. त्यानंतर रेसिपीज आणि सगळ्यात शेवटी आयसिंग कसं करायचं याबद्दल माहिती. प्रत्येक रेसिपीमध्ये बटर घालून हाताने पीठं मळण्याचे सल्ले, सुरीने अंडी फेटण्याबद्दल सूचना आणि कधी "हॉट" ओवनमध्ये नाहीतर कधी "मॉडरेट" ओवनमध्ये बेक करा अशी सूचना. फेटण्यासाठी लाकडी चमचाच वापरा. फेटण्याआधी लाकडी चमचा दुधात बुडवून घ्या म्हणजे चमच्याला मिश्रण चिकटणार नाही. अंडी दुसऱ्या भांड्यात फोडा... एखादं अंडं खराब निघालं तर सगळं मिश्रण खराब व्हायला नको असे काही त्या काळाचं चित्र डोळ्यासमोर उभं करणारे सल्ले होते. किती ओवन तापला की केक चांगला होईल?, अंडी आणि इतर जिन्नस किती वेळ फेटायचे?, कोळश्याची धग कमी-जास्त कशी करायची हे आणि असं बरंच काही सांगायला कुणी अनुभवी गृहिणी बाजूला उभी असणं हीसुद्धा एक अलिखित गरज हे पुस्तक वाचताना जाणवत होती. म्हणूनच आईने मुलीला बेकिंग शिकवणं म्हणजे आदल्या पिढीतली खाद्यसंस्कृती पुढल्या पिढीला बहाल करणं.... या दोन पिढ्यांमधला दुवा हे पुस्तक होतं.

हा वारसा जेनीच्या आईकडून जेनीकडे आला आणि तिच्याकरवी आता माझ्याकडे...? जेनीच्या आईला किती प्रसंगी त्या पुस्तकाने आधार दिला असेल? जेनीच्या घरातले किती सोहळे त्या पुस्तकाने बघितले असतील? त्या पुस्तकामुळे घडलेल्या पदार्थांनी किती जणांना तृप्त केलं असेल? किती सख्यांना तिच्या आईने या पुस्तकाबद्दल सांगितलं असेल? जवळ जवळ एका शतकापूर्वी जगत असलेलं एक आयुष्य त्या पुस्तकरूपाने माझ्या भेटीला आलं होतं. यॉर्कशायरमधली १९२३ सालातली गृहिणी आणि आज २०१८ सालातली मी एक भारतीय गृहिणी आम्हा दोघीना ऑस्ट्रेलियात या पुस्तकाने भेटवलं. या विचारासरशी काटा आला अंगावर.

खरंच काय म्हणून बघावं त्या पुस्तकाकडे? तिच्या आईच्या व्यक्तिमत्त्वाचं बरंचसं दर्शन घडवणारं पुस्तक? की बेकिंगच्या इतिहासातला एक महत्त्वाचा मैलाचा दगड? विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमधल्या सामाजिक परिस्थितीचा मागोवा घेणारं एक पुस्तक? त्याकाळातलं स्त्रीजीवन दाखवणारं एक पुस्तक? नाहीतर निव्वळ एक रेसिपी बुक? मी हरवून गेले त्या पुस्तकात आणि त्या काळातही. जेनीने फार मोलाची गोष्ट माझ्या हाती दिली होती यात काही शंकाच नाही. मीही ते पुस्तक फार काळजीपूर्वक वापरून तिला परत केलं.

मला त्या पुस्तकाचा केक करायला उपयोग झाला नाही असं नाही. मी प्रमाण त्या पुस्तकानुसार उतरवून घेतलं आणि दुसऱ्या काही रेसिपीजचा आधार घेऊन आजच्या काळातला oven किती गरम करायचा ते बघितलं. माझा केकही छान झाला होता. जेनीला चवीसाठी म्हणून केक घेऊन गेले. केवळ त्या पुस्तकातली रेसिपी या भावनेनेच जेनीचे डोळे पुन्हा भरून आले. पहिल्यांदा तिने केकचा नुसताच वास घेतला, क्षणभर डोळे मिटून घेतले. मग इवलासा तुकडा तोडून तोंडात घातला आणि त्यानंतर भरभरून कौतुक करत राहिली. तिच्या आईने तिच्या पहिल्या केकचं जसं कौतुक केलं होतं नं... अगदी तसंच...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंयस. जुनी कूक बूक्स, जुने काळजीपूर्वक हाताळलेले टूल्स ( वेल लव्हड ) अशी कोणाची वापरायला मिळणं किंवा विरासत मधे मिळणं याला नशिब लागतं.

माझा तोवरचा बेकिंगमधला इतिहास अद्भुतरम्य होता. >> माझा चॉकलेट चिप कूकी बनवायचा इतिहास तर एकदम करूण / दारूण आहे . किती पुस्तके , किती ऑनलाइन रेसिप्या, व्हिडिओ पाहिले. पण दरवेळेस न चुकता बुलेट प्रूफ हॉकी पक्स ! आता तर मुलांनी हट्ट करणे पण सोडले आहे. बिस्कोटी आणि कपकेक्स वर समाधान मानतात दोघंही.

आता हे पुस्तक मिळवून त्यातली रेसिपी ट्राय करावी काय ?

छोटीशी पण खोलवर आठवण. कुणा कुणाचे असे हळवे कोपरे आणि तितक्याच संवेदनशीलतेने त्याला दिलेला हृद्य प्रतिसाद हे सारेच भावले.

(या धाग्यातून जो दुसरा धागा निघेल त्याचे बाळंतपण ... .... यांनी करावे असा ठराव मांडत आहे.)

वावेचा प्रश्न प्रामाणिक वाटला म्हणून उत्तरं देते आहे.

> का बरं असा विचार करायचा? >
लेखिकेचा आधीचा धागा वाचला आहे का?
https://www.maayboli.com/node/66938
त्यात काही झोल जाणवतोय का? मी तिकडेच तेव्हाच प्रतिसाद देणार होते पण थोडं थांबूयात म्हणलं. तर परत तसलाच, तेचते प्रोमोट करणारा धागा आला. म्हणून लिहलं "१०० वर्ष झाली तरी त्याचत्या चुलमूल मेंटलिटित अडकलेल्या बायका बघून...."

===
> रेसिपी बुक ऐवजी समजा एखाद्या पुरुषाला १०० वर्षांपूर्वीच्या दुसऱ्या पुरुषाचे बागकामाचे पुस्तक मिळाले असते तर काय वाटलं असतं? > गृहिणी+स्वैपाक आणि पुरुष+बागकाम या दोन्ही गोष्टी सारख्या नाहीत हे आधीचा धागा वाचल्यास कळेल.
• १०० वर्षापूर्वीच्या पुरुषाचा बागकाम हा छंद होता कि पोटापाण्याचा धंदा होता कि केवळ तो पुरुष आहे म्हणून त्याला हे काम असाईन केले गेले होते आणि त्याने ते आवडून घ्यावे असे तेव्हाच्या सगळयांचेच गृहितक होते?
• सेम प्रश्न आताच्या पुरुषासाठी

अॅमी, मी आज पुरणपोळी करणार आहे रात्री घरी गेल्यावर. आणि कोणी ती गरम-गरम खाल्ली नाही, (माझ्यामते) पोटभरेपर्यंत खाल्ली नाही तर त्या लेखात जशी चिडचिड होते तशीच करणारे मी ही.
लेखात स्त्रीलिंगी प्रतिमा आल्या म्हणून लगेच भावना बदलत नाहीत. आणि चूलमूल मेंटलिटित (म्हणजे काहीतरी वाईट आहे असं धरुन चालतो) कोणी अडकत नाही.
न जाणो मोठा झाल्यावर मुलाला बाबा असं करायचा वाटून कदचित छान वाटेल ही. पण शेवटी आपण जे करतो ते कुणाला छान वाटेल म्हणून नाही करत, तर आपल्याला छान वाटतं म्हणून करतो. माझ्या पानात गरम गरम पोळी कोणी वाढली तर जो आनंद मला होतो तो आपण ही इतरांना द्यावा इतका साधा विचार आहे. यात जेंडर आणि समानता याचा काडीचा संबंध नाही.
आपण काही केलं आणि कोणाला आनंद झाला (आणि कोणी आपली स्तुती केली) तर मला तर जाम आवडतं. Happy

> माझ्या पानात गरम गरम पोळी कोणी वाढली तर जो आनंद मला होतो तो आपण ही इतरांना द्यावा इतका साधा विचार आहे. यात जेंडर आणि समानता याचा काडीचा संबंध नाही. >
• तुम्ही कोणाच्या पानात गरमगरम पोळी वाढू शकला नाही तर तुम्हाला गिल्ट येतो का?
• तो गिल्ट येऊ नये, कोणाच्यातरी पानात गरमगरम पोळी वाढणे हेच आपले पहिले/ सगळ्यात महत्वाचे कर्तव्य आहे असे समजून तुम्ही पोटपाण्यासाठी काही कामधाम न करता गृहस्थ बनला आहात का?
• बनला असाल तर तुम्ही कोणत्या वर्गाची लाइफस्टाइल जगत आहात? आणि त्यासाठी कोण, का पे करतंय?

१. माझं जे काम आहे ते जर मी नीट केलं नाही तर मला गिल्ट येतो. हापिसात वेळेवर कोड कमिट केला नाही, रिव्हू वर वेळेत कमेंट दिली नाही, पोराला वेळेवर शाळेत सोडलं नाही, खराब जेवण केलं, मुलाचा अभ्यास घेतला नाही, त्याच्या बरोबर हवा तितका वेळ घालवला नाही. अनेक कारणांनी गिल्ट येतो.
२. पोटापाण्यासाठी काम करतो आणि गृहस्थाश्रमीची कामं ही करतो. आणि (बरेचदा) आनंदाने करतो.
३. कामकरी वर्गाची लाईफ स्टाईल जगतो. दिवसभर काम करतो, रात्री घरी गेल्यावर घरचं काम करतो, नेटफ्लिक्स बघतो आणि झोपतो. बोरिंग वाटत्येय का तुम्हाला? पण मनासारखी टोकं जुळण्यासाठी आणखी काही वर्षे तरी हे करणं गरजेचं आहे. पुरेसे पैसे जमले की काम सोडणारे.

लेखिकेचा आधीचा धागा वाचला आहे का?>
वाचला होता. लेखन म्हणून आवडलं असलं तरी मला स्वतःला गरमगरम पोळ्या खायची/ करून वाढण्याची क्रेझ नाही, त्यामुळे खूप रिलेट झाला नव्हता तो लेख, म्हणून प्रतिसाद दिला नव्हता.
पण, या लेखातली भावना वेगळी आहे.
खरंच काय म्हणून बघावं त्या पुस्तकाकडे? तिच्या आईच्या व्यक्तिमत्त्वाचं बरंचसं दर्शन घडवणारं पुस्तक? की बेकिंगच्या इतिहासातला एक महत्त्वाचा मैलाचा दगड? विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमधल्या सामाजिक परिस्थितीचा मागोवा घेणारं एक पुस्तक? त्याकाळातलं स्त्रीजीवन दाखवणारं एक पुस्तक? नाहीतर निव्वळ एक रेसिपी बुक?
हा परिच्छेद पहा. शंभर वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये राहणार्या स्त्रीशी एका पुस्तकामुळे आपला संवाद म्हणा, नातं म्हणा, दुवा म्हणा, जोडला गेला असं वाटलं लेखिकेला ( असं मला वाटलं Happy )
शांता शेळक्यांची पैठणी नावाची एक कविता आहे. आजीची जुनी पैठणी पाहून नातीला काय वाटतं, तर आजीशी दुवा जोडल्यासारखा वाटतो.
कधीतरी ही पैठणी
मी धरते उरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझे कुशल सांगा

मग इथे आजीच्या पैठणीऐवजी आजोबांचा रूमालही असेल, पणजोबांची ज्ञानेश्वरी असेल, अशी कुठलीही वस्तू असेल, जी त्यांना प्रिय होती.
रेसिपी बुक आणि पैठणी या वस्तू तथाकथित बायकी आहेत म्हणून या सुंदर भावनेला पुरुषप्रधान संस्कृती, स्त्रियांचं कंडिशनिंग अशा चश्म्यातून बघायला हवंच का?
(पुरुषप्रधान संस्कृती, स्त्रियांचं कंडिशनिंग याही गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण त्या मला इथे अस्थानी वाटल्या)

पुरुषप्रधान संस्कृती, स्त्रियांचं कंडिशनिंग याही गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण त्या मला इथे अस्थानी वाटल्या>>> सहमत.

वावे +११

आता तर मुलांनी हट्ट करणे पण सोडले आहे.>> मेधा Lol

वेधाकावेझा
( वेगळा धागा काढायची वेळ झाली . त्या ह्यांना निरोप पाठवावा ही णम्र विनंती )

अरे देवा... आज वाचतेय हे सगळं... माझ्यामते कुठलीही साहित्यकृती किंवा कलाकृती ही एकदा वाचकांच्या किंवा रसिकांच्या हाती पडली की वाचकांचे पूर्वानुभव, त्यांची जडणघडण, त्यातून घडलेलं प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व या आणि यासरख्याच इतर अनेक अंगांनी ती साहित्यकृती त्यांना येऊन भिडते किंवा याच गोष्टींमुळे ती भिडत नाही... उदा. मला दिसलेलं गवताच्या पात्यावरलं पिवळं धम्मक सोनेरी फूल मी जसंच्या तसं माझ्या शब्दांत मांडायचा प्रयत्न केला ज्यांना ते दिसलं त्यांना दिसलं, नाही दिसलं त्यांना नाही दिसलं... माझ्यासाठी हे दोन्ही खरं आहे, प्रामाणिक आहे... दिसणंसुद्धा आणि न दिसणंसुद्धा... ज्यांना दिसलं त्यांचे आभार ज्यांना नाही दिसलं त्यांचेही आभार! Happy

अमितव, वावे... तुम्हाला जे दिसलं ते अॅमी यांनाही दिसावं यासाठीची तुमची कळकळ स्तुत्य आहे... पण त्याच बरोबर अॅमी यांना ते तसं दिसत नाहीये ही त्यांचीही कळकळ मला तितकीच स्तुत्य आणि प्रामाणिक वाटतेय... Happy

> पण त्याच बरोबर अॅमी यांना ते तसं दिसत नाहीये ही त्यांचीही कळकळ मला तितकीच स्तुत्य आणि प्रामाणिक वाटतेय... Happy > Cool Lol आवडली प्रतिक्रिया!

===
> लेखन म्हणून आवडलं असलं तरी मला स्वतःला गरमगरम पोळ्या खायची/ करून वाढण्याची क्रेझ नाही, त्यामुळे खूप रिलेट झाला नव्हता तो लेख, म्हणून प्रतिसाद दिला नव्हता. > मला त्या लेखात ८०-९० च्या दशकात नोकरी करणार्या बाईला इतरांनी दिलेली गिल्ट ट्रिप, त्याला बळी पडलेली ती आणि पुढची पिढी असं बरंचकाही दिसलेलं. ज्याचत्याचा चष्मा; तसाच हा माझा चष्मा Wink
मला गृहिणी हा प्रकार मुळातूनच आवडत/झेपत नाही. त्यांनी स्वैपाक रिलेटेड काही लिहिलं कि अजूनच डोकं दुखतं. साध्याश्या गोष्टीला काहीतरी ग्लॉसी, ग्लॅमर वगैरे दिलय असं वाटतं.
Anyway, The hours बघितला नसेल तर पहा.

===
आणि फूल, तुझ्या आईला शिक्षणात, नोकरी करताना, बढतीत काय अडचणी आल्या, त्यातून ती कशी तगुन राहिली ते लिहल तर वाचायला 'मला' जास्त आवडेल. फक्त आणि फक्त प्रोफेशनल लाईफ. नोकरी करताना मूल आजारी पडलं, अचानक भरमसाठ पाहुणे टपकले वगैरे नको. फक्त प्रोफेशनल लाईफ.

आणि फूल, तुझ्या आईला शिक्षणात, नोकरी करताना, बढतीत काय अडचणी आल्या, त्यातून ती कशी तगुन राहिली ते लिहल तर वाचायला 'मला' जास्त आवडेल. फक्त आणि फक्त प्रोफेशनल लाईफ. नोकरी करताना मूल आजारी पडलं, अचानक भरमसाठ पाहुणे टपकले वगैरे नको. फक्त प्रोफेशनल लाईफ.>>> हे वाचून खूप हसले... कपड्यांच्या दुकानात "याच फॅशन मधली ब्रॉड काठाची साडी दाखवा नं" असं सांगणाऱ्या बायका दिसल्या डोळ्यासमोर... Lol कुणाला काय आवडेल किंवा आवडणार नाही हा विचार करून नाही लिहिता येत हो मला...

अॅमी... हा तुमचा चष्मा हेच खरं... मला जे दाखवायचं आहे ते तुम्हाला दिसत नाही... मग राहूया की दोघी आपापल्या पानांवर सुखात...

छान लेख.
अगदी ह्याच कल्पनेवर Joanne Harris ची five quarters of the orange ही कादंबरी बेतलेली आहे.
एक middle-aged बाई आपल्या मृत आईचे रेसिपी बुक घेऊन ज्या गावातून आईला व कुटुंबाला युद्ध काळात गावकर्‍यांनी हाकलून लावलेले असते त्या गावात येऊन आईच्या रेसिपी वापरत एक restaurant उघडते. जिवंत असताना तिचे आईशी संबंध ताणलेले असतात. पण नंतर त्या रेसीपी बुक मधून तिला आपली आई आणि तिचा तिला माहीत नसलेल्या traumatic भूतकाळ उलगडत जातो. तो उलगडताना अनेक मानवी भावना केवळ recepie बरहुकूम जेवण बनवताना च्या कृतीतून आपल्या समोर येतात.
जमल्यास तुम्ही वाचा आणि आवडल्यास जेनि आजींना सुद्धा recommend करा.

ऊनऊन हा लेख एवढा नाही आवडला. त्या बाबतीत माझा आणि अ‍ॅमीचा चष्मा एकच असावा बहुतेक.
माझी आईपण नोकरी करत असल्याने आणि घरात पोळ्यांना बाई असल्याने आम्हालाही गरम पोळ्या क्वचितच मिळायच्या. पण आईला त्याबद्दल गिल्टी वगैरे कधी वाटल नसावं. गरम पोळ्या आम्हाला मिळाल्या नाहीत, पण आईच्या नोकरीमुळे आम्हाला इतर अनेक फायदे/ संधी मिळाल्या. माझ्या आत्ताच्या व्यावसायिक आयुष्यातले ताणतणाव आई अगदी नीट समजून घेऊ शकते. ह्याचं मुख्य कारण, तिने तिच्या प्रोफेशनल आयुष्यात घेतलेले अनुभव, असं मला वाटतं.
पण रेसिपी बुक हा लेख आवडला. २०१८ मध्ये जगताना अचानक १९२३ मधल्या आयुष्याची झलक आणि ती ही एखाद्या रेसिपी बुक मधून दिसणं हे नक्कीच exciting आहे.
आमच्या घरी माझ्या आजीने १९६० च्या दशकात लिहिलेल्या घरगुती हिशेबाच्या वह्या (डायर्‍या) आहेत. त्या वाचून मी पण तेव्हाचा काळ, तिची दिनचर्या, तिच्या priorities असं सगळं imagine करते आणि माझा वेळ अगदी मजेत जातो. त्या डायर्‍या वाचल्यावर, बायका अजून चुलमुल मेंटालिटीत अडकल्या आहेत असं मला अजीबात वाटत नाही. उलट आजी पेक्षा माझं आयुष्य कितीतरी स्वतंत्र आणि आत्मनिर्भर आहे असच फिलींग येत दरवेळेस.

फूल, खूप छान लिहिलंयस. आवडलं.

five quarters of the orange >>> हाब, तुम्ही केलेलं पुस्तकाचं वर्णन वाचताना ‘लव शव ते चिकन खुराना’ सिनेमा आठवला. मला खूप आवडला होता तो सिनेमा.

खूप छान लेख आणि त्यावरची चर्चाही. दोनेक पिढ्या ओलांडून काही भेटतं तेव्हा झालेला आनंद व्यक्त< झालाय आणि तो ही अत्यंत सुरेख शब्दांत. ही जेनी मलाही भेटलीच.

फुला, मला सगळ्यात काय आवडलं असेल तर... तू अलगद झेललेले वार (आता ह्या शब्दावर धुळवड उठण्याची शक्यता आहे. पण आत्ता अजून वेगळा शब्द आठवत नाहीये. तेव्हा हाच ठेवते). लवलेलं पातं आतून किती कणखर असावं लागतं...
लिहीशील त्यावर बाईपणाचे, पुरुषपणाचे... आणखिनही कसले कसले छाप बसतिल. लिहिल्यावर अगदी सहजी लेखावेगळी होतेयस. हेच घडणं, घडवून घेणं... बाकी-बि-घडणं चालूच असतय की.
खूप खूप लिहीत रहा.... घडत रहा.

<<<पुस्तकाबद्दल लिहीलेलं वाचतांना हाफ ब्लड प्रिन्सची आठवण झाली.>>>
@ चैत्रगंधा.... वाचता वाचता अगदी हेच आठवलं..

फूल , अप्रतिम लेख...

आपण ज्या विचारांशी येऊन ठेपलोय, ते परिपूर्ण आहेत, इथे सुधारणेला वाव नाही; आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांना चूक ठरवण्याआधी ते समजून घ्यायचीही गरज नाही, असं होतंय का?

लेख आवडला आणि चर्चा देखील चांगली आहे.
दादची दाद अगदी मनापासून!
भरत, उलट इथे मतभेदांना खुबसुरत मोड देऊन छोड देना अच्छा हा दोन्ही बाजूंनी घेतलेला पवित्रा मला चांगला वाटला.

जिज्ञासा, म्हणजेच आपले विचार तपासायची आणि न पटलेले विचार समजून घ्यायची गरज नाही, असंच नाही का?

{एक ललितलेख म्हणून मला हे लेखन आवडलं. मी माझ्या पहिल्या प्रतिसादात तसं लिहिलंयही.}

ही चर्चा इथे अस्थानी असण्याची वा वाटण्याची शक्यता आहे, त्यामुळे थांबतो.

Pages