भांड्यावर नावं लिहितात त्या यंत्राला काय म्हणतात

Submitted by सत्यजित on 2 October, 2016 - 15:56

भारतात भांड्यांच्या दुकानात स्टिल आणि इतर धातूच्या भांड्यावर नाव घालायला जे मशीन वा यंत्र वापरतात त्याला काय म्हणतात?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वी खूप घासाघीस करून ठरवून बायका भांडी डबे घेत. व त्यावर स्वतःचे नाव घालून घेत. आता ते फारसे दिसत नाही. ठोक्याच्या पातेल्यावर ते छिन्नी हातोड्याने घातलेले विशिष्ट शैलीतले नाव असे. स्टीलचे डबे भांडी जे स्मूथ सरफेसचे असत त्यावर त्या मशीन ने. त्याचा तो पिक्युलीअर आवाज. आता हे भांडे आपले झाले म्हणून आई आजी ह्यांना वाटणारा आनंद. किती तरी चित्रे समोर आली. आता हे फारसे दिसत नाही.
पूर्वी लग्नात आहेर म्हणूनही स्टीलची भांडी देत. अगदी एकच ग्लास, एकच बारके तसराळे हे देखिल असे.
माझ्याकडे आहेत अशी. ती माणसे त्या घटना कधीच विस्मृतीत गेल्या पण ते नाव अजून आहे.

आई माझ्याकडे राहायला आल्यावर माझ्याकडे पातेल्यावर झाकण घालायला फ्लॅट झाकण्या नाहीत असे तिच्या लक्षात आले. म्हणून तिने तीन झाकण्या कोणाला तरी सांगून आणवून घेतल्या त्यावर माझे नाव घातलेले होते. ते आठवले.

आता काचेची नैतर टप्परवेअर मावे प्रूफ भांडी.

आता देणे घेणे फार नसते आजूबाजूला. भांडी विसरायची हरवायची जवळपास बंद झालीत. कश्याला कोण नाव टाकेल. गिफ्ट द्यायचं असेल तर टाकतात काहीकाही. काहीकाही चांगलं पॅक करून बॉक्सवरच लिहितात नावगाव.
कोरण्या म्हणायचे हे ठाऊक होते. एन्ग्रेवर माहित नव्हते. अर्थात इंग्रीविंग मशिन्स असतात इंडस्ट्रीमध्ये हेही तसेच. धन्यवाद माहितीबद्दल.

मध्यंतरी ठराविक प्रकारची भांडीच आहेर म्हणून द्यायची फॅशन होती. म्हणजे उदाहरणार्थ, १९८० च्या सुमारास सगळेच एकमेकांना मिल्क कुकर देत. मग एकाच्या लग्नात त्याला एकवीस मिल्क कुकर मिळालेत असंही घडू लागलं. तेव्हा आपल्याला मिळालेली एक्स्ट्रा भांडी दुसर्‍याला भेट देण्याची शक्कल लोक लढवू लागले. यात अडचण येऊ लागली ती भांड्यावर असलेल्या "अमूक तमूक कडून स्नेहपूर्वक भेट" या शब्दांची. तर भांड्याच्या दुकानदारांनी या अडचणीवरही मात करण्याकरिता ही अक्षरे मिटवणारेही दुसरे एक यंत्र दुकानात ठेवायला सुरुवात केली होती. ते कुणाला आठवतेय का?

असं नाव मिटावायचं यंत्र तर आठवत नाहीये.. पण ज्यानी इन्ग्रेव्ह करायचे त्यानीच गिरगीटवून नाव मिटवता यायचे..

मी जिथे मॅनुफॅक्चरींग मध्ये काम करायचो तिथे पार्ट्सवर नंबर घालायला हे यंत्र वापरायचो.. इन्ग्रेव्हर हे एकदम परफेक्ट नाव आहे... हे यंत्र वापरायचा चांगला सराव लागतो पण, हाताला झिणझिण्या येतात यंत्र हातात घेतले की. नुसता थरथराट होतो हाताचा...

सोनार वापरतात अजूनही हे यंत्र सर्रासपणे मुख्यत्वे चांदीच्या भांड्यांवर नाव घालायला...

अजूनही काही भांड्यांच्या दुकानात छिन्नी हातोडीने पण नाव घातले जाते.. ती सगळे भांडी बहुतेक रुखवतात ठेवण्यासाठी घेतली जाणारी असतात..

तर भांड्याच्या दुकानदारांनी या अडचणीवरही मात करण्याकरिता ही अक्षरे मिटवणारेही दुसरे एक यंत्र दुकानात ठेवायला सुरुवात केली होती. ते कुणाला आठवतेय का? >>> पुण्यात जोगेश्वरी मंदिराजवळ अशी दुकाने होती.

पण ज्यानी इन्ग्रेव्ह करायचे त्यानीच गिरगीटवून नाव मिटवता यायचे.. >>> हिम्सकूल, त्या यंत्राने नाव निघत होते, गिरगीटायला लागत नव्ह्ते.

सिम्बा Happy ,यू वेअर टू अर्ली, असं म्हणावं लागेल की काय? Proud

हिमस्कूल, हो, त्या झिणझीण्या थरथाराट, मजेशीर अनुभव असतो. आम्ही पण टूल्सवर नाव घालायला वापरायचो. सुरवातीला अक्षरे अगदीच भन्नाट येतात.

Actually Happy
सर्वात लहान धागा हे बिरुद तर गेले,
वादविवाद रहित धागा हे विशेषण खरे व्हावे ही श्री चरणी प्रार्थना Happy

<अजूनही काही भांड्यांच्या दुकानात छिन्नी हातोडीने पण नाव घातले जाते.>
----- मी पण वापरले आहे... (लॅब मधली वस्तु दुसर्‍या ग्रुपच्या लोकान्नी घेतली तर त्यान्नी कुणाला परत करायची यासाठी) नाव कोरायला. नन्तर कलर कोड वापरायला लागलो.

आमच्या घरी आजोबान्च्या काळातले काही भान्डी (जेवणाचे ताट-वाट्या) आहेत. अत्यन्त सुरेख नावे कोरलीली आहे. असे सुवाच्च आक्षर तर कागदावर पण बघायला मिळणे दुर्मिळ. १९५०-६० च्या काळातली आहेत म्हणुन नक्कीच छन्नी-हातोडी वापरलेली असेल (एक अन्दाज).

मग ८०-९० च्या दशकातली एन्ग्रेवरने कोरलेली काही भान्डी - अक्षर खराब आहे, जेमतेम अन्दाजाने वाचता येते.

,

ही भांड्यावरची अक्षरे आणि कपड्याच्या लाँड्रीतील बिलावरची अक्षरे लै भारी वेगळीच असतात. तो थरथराट
व आवाज अगदी लक्षात आहे.

आहेरात द्यायची चांदीची भांडी वगैरे. गुलबक्षी कागदात गुंडाळलेली.
पितळेतांब्याच्या भांड्यांच्या बाजार पेठेत असतील अजून ती कोरणी वापरात. समईच्या बेसच्या आतल्या बाजूला नाव. पितळी लोट्याच्या साइडला. अब वो बर्तनां बी कमइच दिकते. सांगलीला गणपती देवळाच्या मागे आहे ती बाजार पेठ.

ही भांड्यावरची अक्षरे आणि कपड्याच्या लाँड्रीतील बिलावरची अक्षरे लै भारी वेगळीच असतात. तो थरथराट
व आवाज अगदी लक्षात आहे.

आहेरात द्यायची चांदीची भांडी वगैरे. गुलबक्षी कागदात गुंडाळलेली.
पितळेतांब्याच्या भांड्यांच्या बाजार पेठेत असतील अजून ती कोरणी वापरात. समईच्या बेसच्या आतल्या बाजूला नाव. पितळी लोट्याच्या साइडला. अब वो बर्तनां बी कमइच दिकते. सांगलीला गणपती देवळाच्या मागे आहे ती बाजार पेठ.

माझे वडील देखील हातोडा आणि खिळा वापरून भांड्यांवर नावे लिहित असत. त्यांचे अक्षर मूळातच खुप सुंदर होते ( ते पुर्वी पोस्टात होते, तिथे आलेल्या एका स्विस माणसाने केवळ त्यांचे अक्षर बघून त्यांना व्होल्टास मधे नोकरी देऊ केली आणि तिथे ते ३८ वर्षे राहिले ) तर त्यांची पद्धत म्हणजे ते कागदावर नाव लिहून तो कागद भांड्यावर चिकटवत आणि मग त्यावर खिळ्याने नेमके प्रहार करून नाव कोरत. हे प्रहार खुपच नेमके असत. अर्थात त्याकाळची भांडी पण तशीच मजबून असत म्हणा. अशी भांडी आमच्याकडे अजून आहेत.

या भांड्यांवर नावे लिहिण्याच्या यंत्राचा एक खास आवाज असायचा, मला नाही वाटत बर्फी चित्रपटात तो नेमका आवाज ऐकवला होता.

अनील फॉर्मात एकदम हं. दिनेश फोटो टाका ना. भांडे पहावे अशी इच्छा आहे. Happy माझ्याकडे पण आहेत. सासुबाईंचे नाव, आईचे नाव कोरलेली भांडी. . सो क्यूट

छिन्नी-हातोड्याचे पाहिले नाही, पण इलेक्ट्रिसिटीवर चालणारी यंत्र लहानपणापासून पाहिलीत. अजूनही भांड्यांच्या दुकानात असतात. एक-दोनदा (भांडीवाल्याल्या अमुक नाव नेमके कसे लिहितात हे सुधरत नव्हते म्हणून) स्वतः त्या यंत्राने नाव घालायचा प्रयत्नही केला. अगदीच मजेशीर अनुभव. एकतर ते यंत्र हातात घेतल्यावरचा आवाज, थरथर, गुदगुल्या वेगळ्या आणि त्या यंत्राचे टोक भांड्यावर टेकवल्यावरचा अनुभव वेगळा (हा दुसरा अनुभव अगदी कानातही गुदगुल्या करतो. :फिदी:)

या थरथरीसह मोत्यासारख्या अक्षरात नावे उमटविणार्‍या भांडीवाल्यांप्रति नेहमी आदर वाटत र्‍हाईला आहे.

ट्रार्रर्रर्रर्रर्र ट्रार्रट्रा ट्रार्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र ट्रार्रर्र ट्रार्रर्रर्रर्रर्र ट्रार्रर्रर्रर्र ट्रार्रर्रर्र ट्रार्रर्रर्रर्रर्रर्रर्र ट्रार्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र

(शेवटचे लांब ट्रार्र आहे ते डोक्यावर रेष मारली आहे.)

वा.. छोटुसा पण आठवणी जाग्या करणारा धागा!
आमच्या गावात छन्नी हातोडा घेवुन माणसे दारावर यायची...'भांड्यावर नाव घालुन देणार...' असे ओरडत फ़िरायची.
मस्त कार्यक्रमच असे तो. त्यांना घरी बोलवले जाई. कागदावर सुवाच्च अक्षरात नाव, दिनांक, जागा (प्लेस) लिहुन द्यायचे. र्‍ह्स्व, दिर्घ नीट सांगायचे, मग त्यान्च्या 'लेखणीने' मोती अवतरत.
देणे-घेणे असेल तर कोणाला कोणाकडुन नीट सांगावे लागे. भांड्यावर नाव नेमके कुठे घालायचे ते पण त्यांचे ठरलेले असे. तीथेच का हे उत्तर त्यांचेच असे.
'आपल्या' भांड्यावर घरतील 'मुलाचेच' नाव असे.
आई ने एकदा चहाचे चे २ कान वाले नवे भांडे आणले. त्यावर नाव घालताना, मी जोरदार आक्षेप घेतला, या भांड्यावर तरी माझे नाव हवेच..तो हट्ट पुरवला गेला Happy
आता ही वेळ येत नाही, पण चांदीच्या भांड्यावर मात्र आठवणीने, लेकिचे नाव घालते.

@सत्यजित, आपण फक्त एका ओळीत प्रश्न विचारलात आणि माझ्यासहित कित्येकांच्या विस्मृतीत गेलेल्या गोड आठवणी पुन्हा जाग्या केल्यात. आम्हाला आमचे बालपण परत अनुभवण्याची संधी दिलीत. आपले आभार!!!

मस्त धागा. मस्त आठवणी.

त्या भांडीवाल्यांचा काय कॉन्फिडन्स असेल ना? असं तयार वस्तूंवर नाव नंतर फक्त केकवर (आणि अर्थात पुस्तकांवर वगैरे. पण ते वेगळं) घातलेलं पाहिलंय. पण ते सोप्प असतं. काही चूक झालीच तर ते काढता येतं. भांड्यांवरचं तसं नाही.

ते मजकूरही टिपिकल असत. पण त्यामुळे आठवणी राहतात - अगदी तारखेसकट.

मस्त प्रश्न ! कधी विचारच नव्हता केला Lol

अगदी इकडे येण्याच्या वेळेस पण आईने जी जी स्टील ची भांडी दिली होती त्या सगळ्यांवर नाव घालून घेतले होते. जेव्हा रूममेट्स बरोबर राहत होतो आणि सगळे वेगवेगळ्या अपार्टमेंट्स मध्ये गेले तेव्हा मग कुठले भांडे कोणाचे असे वाद न होता नाव घातलेले आहेत ते माझे असे आरामात वेगळे करता आले.

काल शुक्रवार पेठेत तांब्यापितळेच्या दुकानातून दोन तांब्याची फुलपात्रं घेतली, आणि तिथेच नावं घालून घेतली टर्रर्र करून Happy
माझ्याकडे एक नैवेद्याची वाटी आहे चांदीची. माझ्या पणजोबांचं नाव असलेली. लेकीला ते दाखवतांना इतकं ग्रेट वगैरे वाटलं ... आता माझी स्टीलची भांडी काही कुणी माझ्या खापरपणतवंडांना दाखवणार नाहीये कौतुकाने, पण तरीही मी अजूनही नावं घालून घेते स्टीलच्या भांड्यांवर - नाव आणि तारीख.:)

भांडी पुर्वी एकदा घेतली कि ५०/६० वर्षे बघायला नको अशी परिस्थिती होती. तांब्या पितळेच्या भांड्याना कल्हई करणे सहज शक्य होते कारण कल्हईवाला नियमित यायचा आणि प्रत्येक भांड्याशी घरच्या स्त्रीच्या आठवणी निगडीत असायच्या. प्रत्येक भांड्याला नावं असायची पेढेघाटाचा डबा, करंडा, शकुंतला वगैरे.

दुर्दैवाने घराच्या वाटण्या झाल्या तर भांड्यांची वाटणी होताना डोळ्यातून पाणी निघत असे. मला वाटतं श्यामची आई चित्रपटात असा प्रसंग आहे. गुंतता हृदय हे नाटकातही आहे.... ( दोन्हींचा संदर्भ मात्र खुप वेगळा )

अमा, भांडी माळ्यावर आहेत आता.

आजीचं नाव घातलेली फुलपात्रं, गडू, तांब्ये, काही निवडक भांडी आहेत अजून वापरात. ती भांडी हाताळतानाही कौतुकाने हाताळली जातात. दोन छोट्या पेल्यांवर माझे व बहिणीचे नाव कोरले आहे. अगदी पंधरा-वीस वर्षे अगोदरपर्यंत या भांड्यांचं विशेष अप्रूप नव्हतं. टपर वेअर, प्लास्टिक, काच यांचा वापर वाढत गेला तसं हे नाव कोरणं कमी होत गेलं आहे. नावं घातलेली भांडी हाताळताना आता मजा वाटते.

खरच किती आठवणी जाग्या झाल्या... खरंय सत्यजीत.. ! माझा शाळेत जाण्याचा रस्ता भांडीबाजारातून होता. त्यातील मोठ्या भांडी दुकानाच्या बाहेर फडताळाला लागुनच पोत्यावर बसलेला हा कारागीर चांगलाच आठवतो.
चवड्यावर बसलेला, दोन्ही पायात भांडे पकडुन, एका हातात पंच अन दुसर्‍या हातात छोटी हातोडी. या प्रकारे नावे टाकतांना खरंच खुप स्किल असावे लागते. वाटते तेवढे सोपे काम नाही ते. पंच हातात पकडतांना तो पेना सारखा न धरता उलट्या हाताने धरावा लागे जेणे करून अक्षरावर नजर राहील. या लोकांना इतकी सवय झालेली असे की शिलाई मशिन ची सुई चालावी तसा पंच पुढे सरकवीत असे आणि पंच ने (साधारण अर्धा मि.मि.) पुढे सरकल्या क्षणी वरून हातोडीचा फटका पडत असे. पिट-पिट हातोडीचे ठोके टाकुन बघता बघता सुंदर नाव उमटत असे.
मॅन्यूअली टाकलेल्या असे नाव पुसणे अवघड असे. कारण पंच चा खड्डा त्यामानाने खोल असे (खड्ड्याच्या सभोवती होणारा उंचवटा हाताला जाणवणारा असे)
' ५० रुपयांच्या खरेदीवर १ नाव मोफत' या प्रकारच्या जहिरात दुकानांच्या बाहेर असे.
काळ बदलला, भांड्यांची जाडी (बेस मेटल थिकनेस) कमी झाली आणि ईलेक्ट्रीक मशिनही आले. मग असे हे कारागीर आता गायब झाले.
या ईलेक्ट्रीक मशिन मधे स्ट्रोक अ‍ॅडजेस्ट करता येतो. आणि बफिंग द्वारे टाकलेले नाव पुसता देखिल येते. (अर्थात बर्‍याचदा ते लक्षात येते)

उदा. म्हणुन काही टिपिकल भांड्यांवरची नावे ..
" चि. सौ.कां. सरला हिला लग्नानिमित्त सप्रेम भेट दि. १०/१०/१९८५"
"स्वर्गवासी हरीभाऊ तात्या यांच्या स्मॄती पित्यर्थ"

मी शाळेत असतांना पेनावर नाव टाकणारा यायचा .. तिक्ष्ण सुईने खड्डे पाडुन त्यावर मेणाचा रंगीत खडू फिरवीत असे.. त्यावर लवकरच धागा काढतोय (आता रूमाल टाकून ठेवतोय) Wink

घरचं भांड्याचे दुकान असल्याने भांड्यावर नावे टाकण्याचा चांगलाच अनुभव आहे. गावाकडे अजुनही मुलीकडचे लग्नात सगळे भांडे देतात. त्याला झाल म्हणतात. दिवसभरात अशा ४-५ झालींवर तरी नावे टाकायला लागायची. ती मशीनपण चांगलीच गरम होते, त्यात उन्हाळा. हाताला चांगलेच चटके बसायचे.
अजुनही गावाकडे लग्नात भांडी दिली जातात.
नाव खोडुन नवीन नाव टाकायचे आम्ही दोन रुपये घ्यायचो. ते पैसे म्हणजे आमची कमाई. सगळी सुट्टी यातच जायची.

नॉस्टेल्जिक धागा.

मस्त पोस्टी आल्यात.

माझे अक्षर अशक्य गचाळ असल्याने मला तर अफाट कौतुक वाटायचे त्या भांड्यावर नाव कोरणार्‍या कलाकारांचे.

स्वत:ला मौका मिळाला ते ईंजिनीअरींगच्या पहिल्या वर्षाला वर्कशॉपमध्ये जॉबवर आपले नाव आपल्या हस्ते कोरायचा. तेव्हा भल्याभल्या सुवाच्यवीरांची तारांबळ उडालेली. मात्र माझे मुळातच बदक असल्याने आणखी काय बेडूक होणार म्हणत मी बिनधास्त रपारप हात चालवल्याने तुलनेत ठिकठाक नाव आलेले Happy

मायबोलीवरच कुणीतरी एक किस्सा लिहिला होता. त्यांच्या माहितीत कुणाला तरी पीचडी मिळाल्यावर घरातल्या सगळ्या भांड्यांवर असलेल्या नावा अगोदर डॉ. असे नव्याने कोरून घेतले होते.

जुन्या आठवणी जाग्या करणारा धागा Happy आपल्यापैकी बहुतेक जण कधी ना कधी भांड्यांच्या दुकानात चड्डी/फ्रोक घालून बघत उभा/उभी असणार हे नाव घालायचा टट्ररर्र्र्र ट्रर्र्रर्र्र्र कार्यक्रम सुरु असताना. Wink आजच्या काळात हि पद्धत असती तर अमॅझॉन, फ्लिपकार्ट वर भांडी घेतल्यावर चेकबॉक्स दिसला असता "टर्र टर्र नाव घालून हवे" म्हणून Biggrin

>> १९८० च्या सुमारास सगळेच एकमेकांना मिल्क कुकर देत. मग एकाच्या लग्नात त्याला एकवीस मिल्क कुकर मिळालेत असंही घडू लागलं.

मग त्याने दुध तापवायचा व्यवसायच सुरु केला असणार: "आमच्याइथे सर्व प्रकारचे दुध तापवून मिळेल" Lol

>> कुणाला तरी पीचडी मिळाल्यावर घरातल्या सगळ्या भांड्यांवर असलेल्या नावा अगोदर डॉ. असे नव्याने कोरून घेतले होते.

Lol जाम वैतागला असणार तो नाव कोरणारा. नंतरच्या एक दोन भांड्यांवर सुद्धा सवयीने डॉ लिहून गेला असेल Biggrin

बापरे... लहाणपणी मि जेव्हा-केव्हा भांड्यांच्या दुकानात आइ-बाबांसोबत जाइ त्यावेळेस तो टर्रर्रर्रर्र...र्रर्रर्रर्रर्रर्र आवाज ऐकुन मल अक्षरशः रडु येई....

मशीनचे नाव कळले. आता ते कुठे मिळते हे ही हवेय का?
भुलेश्वरमधे खंबाती आहे सगळी दागिन्यांची हत्यारे विकणारा. त्याच्याकडे हे एन्ग्रेव्हिंग मशिन पण मिळते. अर्थात ज्वेलरी एन्ग्रेव्हर आहे त्यामुळे एकदम लहान असणार मशीन आणि त्याची सुई वगैरे.

भांड्यावर नावे घालायची पद्धत आहे अजूनही. ६-७ वर्षांपूर्वी काही मोठे डबे, झाकण्या व तत्सम बरेच काय काय घेतले होते. खरेदीला बरोबर बाबा होते त्यामुळे त्यांनी नावे टाकून घ्यायचा आग्रह धरला. दुकानदाराला काडीचेही आश्चर्य वाटले नाही. त्याने लगेच काय लिहायचे ते लिहून द्या म्हणत कागद पेन सरकवले पुढे.