वर्तुळ

Submitted by सरिविना on 5 July, 2008 - 08:59

नेहेमीप्रमाणे जवळच्या किल्लीने तिने दरवाजा उघडला. त्याची काहीच चाहूल लागली नाही. तिला आश्चर्य वाटलं. खरं तर ती आज जरा लवकरच आली होती. अजून त्याचं रेकॉर्डिंग चालु असेल ह्या विचाराने तिने दारही अलगद उघडलं. तो बेडरूममधे नव्हता. टेपरेकॉर्डेर टेबलावर होता पण नेहेमीप्रमणे कागद आणि पेन नीट रचून ठेवलेले नव्हते. ती जरा हबकली. गेल्या दोन वर्षांत असं झालं नव्हतं. त्याला शोधत ती गॅलरीत गेली. तो गॅलरीत फेर्‍या मारत होता. ती गॅलरीच्या दारात उभी होती पण रोजच्यासारखी त्याला तिची चाहूल लागली नव्हती. आज पहिल्यांदाच तिला खाकरावं लागलं होतं. तो एकदम दचकला. कोण?? अरे तू? ...

अजुन रेकॉर्डिंग व्हायचयं का? की आज काही सुचलं नाही?
नाही तसं नाही. मी जरा समोरच्या बागेतुन फिरुन येतो. तू कागद घे कपाटातुन...
तो तरातरा चालायला लागला. तो दारापाशी पोचला आणि ती पळत आली. सर, काठी..
हो खरंच की..... तो थांबला.. काठी घेऊन जिना उतरायला लागला आणि अचानक तिच्या कानावर शब्द आले. हो.. काठीशिवाय आंधळा म्हणजे अगदी बिन कपड्यातला माणूस, नाही? ती चमकली. हा जोक होता की सरकॅस्टिक शेरा. जाउदे. ही लेखक मंडळी अशीच लहरी असायची.. असा विचार करत तिने कागद पेन हातात घेतले आणि टेप ऑन केला......

...ही कथा आहे, आत्मचरित्र की स्फुट हे मला सांगता येणार नाही. पण बहुदा हे माझं शेवट्चं लिखाण असेल्..कदचित हे धगधगतं सत्य लिहिण्याआधी सराव म्हणूनच मी आधीचं लिखाण केलं असेल. मी "कदचित" ह्यासाठी म्हणतोयं की माणसाचा एक कप्पा त्यालाही अनभिज्ञ, अनोळखी असाचं असतो. गेली पाच वर्ष मी प्रयत्न करतोयं... माझ्या ह्या कप्प्याची ओळख व्हावी.. किमान तिथल्या प्रकाशाचा, अंधाराचा अंदाज यावा ह्याची..

आंधळ्याला प्रकाश दिसेल? हा आतला प्रकाश कसा असेल?बाहेरच्या उजेडापेक्षा वेगळा? 'उजेड'... मी शब्द फक्त लिखाणात वापरू शकतो... पण माझ्या अंतरात प्रकाश आहे की तिथेही फक्त अंधार खोल, गुढ.. एखादी तिरिप प्रकाशाची दिसावी म्हणून कसून शोध घेतोय मी गेले पाच वर्ष..

मला स्प्ष्ट ऐकू येतात.. अजूनही तिचे चित्कार. नाही.. नाही मला जाउदे. नाही जमणार मला..एकदम ओरडलो होतो मी. का? पैसे फेकतोयं मी.. तोच धंदा आहे ना तुझा?.... सॉरी व्यवसाय म्हणायला हवं होतं ना, मी कडवटपणे म्हणालो. ती रडत भेकत राहिली. पण मी माझी पकड सैल नाही केली.. त्यानंतर जे घडलं.. समागम, शरीरक्रिया की बलात्कार..?

बलात्कार.. एका कॉलगर्लवर्..एका आंधळयाने केलेला बलात्कार... ह्याचसाठी केला होता अट्टहास...ज्यासाठी जीवाचं रान केलं, रात्र न् रात्र जागून काढली. तो अनुभव हवाच्.. असा का बरं अट्टहास होता माझा? खूप विचार केला मी.. हो.. माझं पौरुष मला सिद्ध करायचं होतं.. आंधळा ही पुरुष असतो हो..ओरडून सांगायचं होतं मला जगाला..का कदाचित मी आहे ह्याचीच मला कोणालातरी तीव्र, वेदनामय जाणीव करुन द्यायची होती? सूड घ्यायचा होता मला सगळ्या जगाचा.. मला नाकारणार्‍या..माझी कीव करणार्‍या पण जवळ येऊ न देणार्‍या..

तारुण्यसुलभ उत्सुकता होती सुरुवातीला..पण रेवतीने नाकारल्यानंतर.. मी अंध व्यक्तीबरोबर पूर्ण आयुष्य काढू शकत नाही सांगितल्यावर मी डिवचला गेलो होतो. मग तो अनुभव हवाच आणि तोही डोळस व्यक्तीबरोबर.. जणु ध्यासच घेतला मी. खूप विचार केला, बरेच मार्ग पडताळून पाहिले. शेवटी एका मित्राकडून एका कॉलगर्लचा नंबर मिळवला..तिला पत्ता दिला...

आणि आणि असा हाता तोंडाशी आलेला घास मी ती नाही म्हणतीये म्हणून सोडू? मी आंधळा आहे म्हणून नाही म्हणते? स्स्..संतापाने अधिकच् आंधळा झालो मी. भान हरपलं होतं माझं. मी इतका वाईट माणूस होतो? माझ्यातल्या सैतानाने माणसाचा ताबा घेतला, इतक्या सहज? मी निपचित पडून होतो. थोड्या वेळात ती उठली आणि मुसमुसत दाराकडे निघाली. मला चाहूल लागली. ते पैसे ठेवले आहेत तिथे, टेबलवर.. मी ओरडलो. दाराचा आवाज आला. मी तसाच पडून होतो. त्याही स्थितीत विचार आला, ती पोलिस कम्प्लेंट करेल का? कॉलगर्ल आणि पोलिस कम्प्लेंट? परिणामांच्या विचारांनी माझी मला लाज वाटली. धिक्कार असो माझा.. स्वतःला सृजनशील, सहृदय समजतो मी. असं घडू शकतं माझ्या हातून?... पण ती कॉलगर्ल होती आणि आपण त्यासाठीच बोलावलं होतं तीला.. तीही राजीखुषीने आली. मी मनाची समजूत काढत होतो.. आणि हो.. पैसे मोजले आपण.. तिने सांगितले त्यापेक्षा दुप्पट.. पाकीट जागेवर ठेवायला म्हणून मी टेबलवर हात फिरवला. पैसे तिथेच?? ती पैसे न घेता गेली? आंधळ्याचे पैसे नको म्हणून कि मी बळजबरी केली म्हणून? अस्वस्थता संपण्यासाठी मला तो अनुभव हवा होता अन् तो आयुष्यभरासाठी अस्वस्थता पदरी देउन गेला.. का केलं मी असं? तिला काय वाटलं असेल? पुन्हा संपर्क साधण्याची माझी हिम्मत झाली नाही. मी अंतर्बाह्य हबकलो होतो. माझा मलाच मी अनोळखी झालो होतो. कधी कधी पेटून उठायचो. तिनेही आपला अपमान करावा? वर पैसे ही न घेउन? चीड यायची.. सगळ्या जगाची.. अन् मग स्वतःचीही... मी इतक्या थराला जाऊ शकतो की माझ्याकडून बळजबरी व्हावी?

दरम्यान माझं लिखाण प्रसिद्ध होतच राहीलं अन् माझं नावही होत होतं. केवळ माझं लिखाणच मला सृजनशील, सहृदय, संवेदनाशील व्यक्ती सिद्ध करू शकत होतं. मी झपाटल्यासारखा लिहित होतो. एका पातळीवर माझा शोध चालुच होता.. आतल्या प्रकाशाचा.. आता मात्र मी थकलो. एकही तिरिप दिसली नाही मला अजुनही.. त्या घटनेच्या विचारांनी अजुन मी तितकाच अस्वस्थ होतो. माफ नाही करु शकत मी स्वतःला. म्हणूनच हा सृजनशील लेखकाचा मुखवटा असह्य होतंय मला.. आता बस्स !!!

कॅसेट संपली.. खट्ट आवाज आला अन् ती दचकली. विमनस्क अवस्थेत ती किती वेळ बसून राहिली तिचे तिलाही भान नव्हते. यांत्रिकपणे ती उठली. तिने कॅसेट उलटी केली. ती बाजू कोरीच होती.. त्याने तेवढेच रेकॉर्ड केले
होते तर...कुठल्याशा आवेगात तिने 'रेकॉर्ड' चे बटण दाबले.

..... हो.. नाही घेतले पैसे मी.. तो प्रसंग जीवघेणा, असह्य होता माझ्यासाठी.. माझ्या स्त्रीत्वाचा अपमान केला होतास तू. मला मान्य आहे शरीरविक्रय धंदा होता माझा. पण त्यातून मन हा फॅक्टर मी पूर्णपणे वजा करु शकत नव्हते. तू फोन केलास तेंव्हा मला कल्पना नव्हती की तू अंध आहेस्..तुला पाहिल्यावर मात्र मला अस्वस्थ वाटू लागलं होतं. मला पूर्ण पुरूष हवा होता. जो 'तू' आहेस असं त्याक्षणी तरी मला वाटलं नाही. हो, अगदी शरीरविक्रयाच्या त्या क्रियेतूनही स्वसुखाची माझी अपेक्षा होतीच. आणि म्हणूनच मी माझा नकाराचा अधिकार बजावला.

नंतर जे घडलं ते आक्रित होतं. कधीही न पुसला जाणारा ओरखडा.. जमेल त्या प्रकारे तुला संपवावं असही वाट्लं मला. पण मान्य करते.. नंतर मलाही तुझी कीव आली. मी निघुन गेले पैसे न घेताच्. कारण तो एक व्यवहार होता हे समाधान मला तुला मिळू द्यायचं नव्हतं. अस्वस्थ होते मी.. त्या प्रसंगाच्या आठवणींना कसं सामोरं जावं हेच कळत नव्हतं. राग, तिरस्कार, अपमान ह्याच भावना सुरुवातीला प्रबळ होत्या. मग हळूहळू तुझी जास्तीच कीव येऊ लागली. मी तुला काहीही इजा न करता निघुन आले तेव्हापेक्षाही जास्त.. का केलं असावसं तू असं? हे मला अचानक जाणून घ्यावसं वाटू लागलं. त्याच वेळी एका पातळीवर माझा नकार बरोबर की चूक हाही विचार चमकून गेला. हळूहळू मी त्रयस्थ होउन त्या घटनेचा, आपल्या दोघांच्याही भूमिकांचा विचार करू लागले..

अन् एकदा पेपरमधे ती जाहिरात दिसली. तोच पत्ता.. एका अंध लेखकाला लेखनिक हवी होती. पहिला विचार चमकून गेला.. प्रतिशोधाचा..पण मग शांत झाले. वाटलं जर तू मला तुझी लेखनिक म्हणून निवडलंस तर मला तूला थोडफार समजून घेण्याची संधी मिळेल, सहवासाने माझ्या अपमानाची धारही थोडी बोथट होईल, कदाचित.. म्हणून मग मी तुला भेटले. तू म्हणालासही की हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय.. नंतर आपलं रुटीन सेट झालं. सुरुवातीला तू दिसलास की चीड यायची, जाब विचारावासा वाटायचा. पण मग माझ्या नकाराचं स्पष्टीकरण ही द्यावं लागलं असतं जे मलाही पूर्णपणे पटत नव्हतं.

तो ओरखडा अजुनही आहेच..तितकाच तीव्र.. खोलवर.. पण आज मी त्याकडे एक अपघात म्हणून बघते. अरे, आपण दोघेही समदु:खी. जगाने नाकारलेले.. तुझी समाज कीव करतो अन् माझा धिक्कार.. मी तुला नकार दिला अन् तू पेटलास.. माझं स्त्रीत्व, माझा नकाराचा अधिकार यांना तू नाकारलसं... दोन्ही नकार एकमेकांना भिडले आणि तो अपघात घडला. पण आज त्याही पलिकडे एक सृजनशील, संवेदनाशील कलाकार म्हणून मी तुला ओळखते. तो ओरखडा तिथेच राहिला तरी आसपास स्वच्छ प्रकाश दिसतोय मला..

मला वाटतं आता बस्स.. आपलं वर्तुळ आता पूर्ण झालयं. आता आपण दोघही एकमेकांचा निरोप घेऊया.. एका नव्या वर्तुळाच्या शोधात..

गुलमोहर: 

एकदम वेगळ्या दृष्टीकोनातून लिहिलेली कथा. लेखनशैलीही खिळवून ठेवणारी आहे, आवडली.
पुढील लेखनाला शुभेच्छा.

मस्त लिहिली आहे कथा... आवडली.

कधा आवडली

साधना

खूपच छान... एकदम वेगळी कथा, सुरेख मांडणी... आवडली कथा एकदम...

छान कथा, आवडली !
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

कथाबीज छान. व्यक्तिरेखांचे डिटेलिंग केलेस तर एक सशक्त दीर्घकथा होऊ शकेल असे वाटते. अर्थात हे माझे मत. प्रत्येक लिहिणार्‍याचा स्वतःचा कथा कोणत्या अंगाने जावी याबद्दलचा ठरवलेला फॉर्म असतोच. एकंदरित कथा छान.

धन्यवाद साजिरा. अशा प्रतिक्रियांचीच वाट पहात होते. लघुकथा हा फॉर्म ठरवताना विचार असा होता की माणूस कोणत्या परिस्थितीत कसा वागेल हे कधी कधी त्याचं ओव्हरऑल व्यक्तिमत्व, जडणघडण ह्या सार्‍यापेक्षा वेगळं असू शकतं. म्हणून ज्या प्रसंगात असं घडलं त्याच प्रसंगावर कथा केन्द्रित ठेवली. दुसरं एक कारण असं की दीर्घकथा केली की फोकस हलु शकतो. मग ती पठडीतली कथा होण्याची भीती होती. कारण मी काही सिद्धहस्त लेखक नाही. मला फोकस मला आयुष्यात असे 'अपघात' घडतात आणि त्यापलिकडे ही आयुष्य असतं ह्यावर ठेवायचा होता. अर्थात कदाचित माझा हा दृष्टिकोन चुकीचा असू शकेल..

अप्रतिम कथा Happy
खूप आवडली Happy

एकदम अंतर्मुख व्ह्यायला झालं, खुपच छान आणि विषय एकदमच नविन.

खूपच छान... एकदम वेगळी कथा, सुरेख मांडणी...

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. आता लिहायला हुरूप आलाय...

सरिविना (असंच लिहायचं का?), सुंदर कथा. अतिशय सशक्त कथाबीज. वेगळा विषय आणि तुमची मांडण्याची पद्धतही विशेष आहे. त्यामुळेच अगदी दीर्घ कथा नाही, पण अजून थोडी फुलवली असती तर बहार होती. (हे म्हणजे आमच्या कोकणात म्हणतात तसं- पडजिभेन खाल्ली नी जिभेन बोंब मारली... असं वाटतय.)
"मी काही सिद्धहस्त लेख नाही" - असं का म्हणताय कळलं नाही.... मला तर उलट वाटतय!
अजून लिहा... वाट बघते.

दाद धन्स. अगं मी तर तुझ्या लिखाणाची फॅन आहे (अहो नको म्हणूस गं). खुप डिटेल्स घालत बसले तर पंच निघुन जाईल असं वाटून मी फार फुलवली नव्हती. पण तू, साजरा असे दिग्गज म्हणताय तर पुन्हा एकदा विचार करते ते कसं करता आलं असतं त्याचा... तुझ्या प्रतिक्रियेमुळे खरचं आणखी लिहावं असं वाटायला लागलं... खुप दिवसांत तुझी कथा आली नाही... लवकर लिही.....

सरिता, मस्तच लिहिलीस... शेवटी अपेक्षित धक्का आहे पण तरीही वाचुन सुन्न झाले.
-प्रिन्सेस...

जबरदस्त कथा!!!
मला ही लघुकथाच जास्त छान वाटली...
डीटेल्स दिले असते तर मजा गेली असती. कथा संपल्यानंतर मनाल अएक हूरहूर लागणं कथेचे वैशिष्ट्य. Happy
सरिविना लिहत जा
--------------
नंदिनी
--------------

धन्स नंदिनी, प्रिन्सेस, कल्पना. तुम्ही सगळे वाचतायं तर आता लिहायला हुरुप आलायं..

खुपच छान. छोटी आहे म्हणुन परिणामकारक. नाहीतरी सध्या जमाना २०-२० चा आहे. पण म्हणुन साहित्य मुल्य कमी होत नाही. खरच, खास करुन कोणावर तरी हक्क गाजवुन रोज आपण असे किती जणांचे नकार चिरडुन टाकतो.

नितीनला अनुमोदन. फारच सुरेख!!!!!!

कथा फार आवडली. कुठेही फापटपसारा न होता खिळवून वाचायला लावणारी. कथाबीज सशक्त!

नमस्कार,

फार छान्..कथा प्रत्यक्ष पाहतोय असे वाटले.

धन्यवाद. मित्रहो. अगदी मनापासुन.. तुम्हा सगळ्यांच्या प्रोत्सहनामुळे इतकं छान वाटतयं.. खरं तर एका सकाळी नकाराचा अधिकार आणि त्या अधिकाराला समोरच्याने नाकारणं असं काहीतरी डोक्यात घुमलं आणि कागदावर खरडलं तेही पुढच्या ३०-३५ मिनिटांत. ती डायरी कुठेतरी ठेवली गेली. थोड्या दिवसांपूर्वी काही लिहित नाहीस वगैरे विनाच्या शिव्या खाताना हे लिहिलेलं आठवलं आणि परत वाचुन पाहीलं. काही बदल करावे वाटले नाहीत तेव्हा म्हटलं की हे पोस्टुया आणि तुम्हा सगळ्याना कसं वाटतयं पाहुया.. चला म्हणजे अजुन खर्डेघाशी करायला हरकत नाही......

हो खरच , तु करच खर्डेघाशी Happy
आवडली कथा , मस्तच लिहिल आहेस Proud
~ Do not Wish to be anything but what you are. ~

Pages