माझी सैन्यगाथा (भाग १३)

Submitted by nimita on 6 August, 2018 - 21:41

देवळाली च्या त्या एक वर्षाच्या कालावधीत मी खूप काही शिकले, नव्या मैत्रिणी मिळाल्या...त्याच बरोबर आमच्या वैवाहिक जीवनात देखील नव्या पर्वाची सुरुवात झाली. मार्च १९९४ मधे आमची मोठी मुलगी ‘ऐश्वर्या’ जन्माला आली.
देवळाली ला आमच्याबरोबर कोणीही मोठी आणि अनुभवी स्त्री नव्हती आणि माझ्या माहेरीही तीच परिस्थिती असल्यामुळे मी डिलिव्हरी साठी माझ्या सासरी-सिकंदराबाद ला जायचं ठरवलं
पण नितीन कोर्स करत असल्यामुळे त्याला सुट्टी मिळणं अशक्य होतं.त्यामुळे माझ्या डिलिव्हरीच्या वेळी तो सिकंदराबाद ला येऊ शकला नाही. एक आठवड्या नंतर कुठलीतरी official सुट्टी होती, आणि लकिली ती सुट्टी रविवारला जोडून आली होती. त्यामुळे नितीन ला दोन दिवसांसाठी का होईना पण येता आलं.
त्या दोन दिवसांत जास्तीत जास्त वेळ त्यानी आमच्या बाळासोबत घालवला, कारण त्यानंतर आम्ही एकदम दोन महिन्यांनंतर भेटणार होतो.
पावणे दोन महिन्यांच्या छोट्या ऐश्वर्याला घेऊन मी मे महिन्यात देवळाली ला परत गेले. दरम्यानच्या काळात आम्हांला आमचं permanent accommodation मिळालं होतं. नितीन नी त्याला जसं आणि जेवढं जमेल तसं बरंचसं सामान लावून ठेवलं होतं. आठवड्या भरातच आम्ही (मी आणि ऐश्वर्या) नवीन घरात स्थिरस्थावर झालो.
घरकामासाठी बाई मिळाली होती. आमच्याच ब्लॉक मधल्या एका ऑफिसरच्या घराच्या सर्व्हंट क्वार्टरमधे राहत होती ती. पण बाळाच्या मालिश आणि अंघोळीकरता कोणी तयार होत नव्हत्या. एक दोन दिवस वाट बघून शेवटी मीच ते काम करायचं ठरवलं. इतक्या लहान बाळाची मालिश आणि खास करून अंघोळ घालायचा अनुभव नसल्यामुळे पहिल्या दिवशी थोडी धाकधूक होती मनात! पण मग मी विचार केला,’जर एक बाहेरून येणारी परकी बाई हे काम करू शकते तर मग मी तर त्या बाळाची ‘आई’ आहे. मलाही नक्कीच जमेल हे सगळं. In fact, मी जास्त प्रेमानी आणि काळजीपूर्वक करीन माझ्या बाळाची मालिश आणि अंघोळ! या नुसत्या विचारानीच सगळं टेन्शन नाहीसं झालं.
रोज सकाळी नितीन त्याच्या क्लासेस करता गेल्यावर मग मी एकीकडे ऐश्वर्या शी गप्पा मारत तिची मालिश करायची. खूप मजा यायची … माझी ती एकतर्फी बडबड ऐकताना अधून मधून ती पण हुंकार भरायची, तो अर्धा पाऊण तास हा फक्त आमच्या दोघींचा असायचा.आजकाल च्या भाषेत ज्याला ‘quality time’ म्हणतात ना तोच! अंघोळ घालताना मात्र सुरुवातीला काही दिवस मी बाथरूम मधे खाली एक जाड टर्किश टॉवेल घालून ठेवायची- precaution म्हणून. मस्त गरम पाण्याच्या अंघोळीनंतर मऊ, उबदार दुपट्यात गुरफटून झोपून जायची ती.
लहान बाळांना ‘bundle of joy’ म्हणतात ना- ते अगदी योग्य असल्याचं जाणवायचं तिला तसं झोपलेलं बघून!
त्या काळात माझं दिवसाचं रुटीन, माझी घरातली, बाहेरची कामं, झोपणं- उठणं .. सगळं सगळं त्या छोट्याश्या जीवाच्या तालावर चालायचं. घरात मदतीसाठी, बाळाकडे लक्ष ठेवण्यासाठी दुसरं कोणीच नसल्यामुळे शक्यतो ती झोपलेली असतानाच मी माझी बरीचशी कामं उरकून घ्यायचे. पण प्रत्येक वेळी ते शक्य नसायचं.. अश्या वेळी मग मी डायनींग रूम मधे खाली जमिनीवर एक मोठ्ठी चादर अंथरून ऐश्वर्या ला त्यावर ठेवायची. आजूबाजूला तिची खेळणी ठेवली की तासन् तास ती न रडता खेळत राहायची.
एकदा अशीच मी स्वैपाकघरात बिझी होते .. त्या रात्री आम्ही काही ऑफिसर्स आणि त्यांच्या बायकांना जेवायला बोलावलं होतं. म्हणजे मी सिकंदराबाद ला असताना नितीनला ज्या ज्या लोकांनी जेवायला बोलावलं होतं त्या सगळ्यांना आम्ही एक एक करून आमच्या घरी बोलावत होतो…. मी आधी सांगितल्याप्रमाणे…. to return the meals…
तर त्या दिवशीही असेच काही जण येणार होते डिनर साठी!
मी माझ्या कामात मग्न होते, अधून मधून ऐश्वर्या शी गप्पा मारत होते, तीदेखील तिच्या ‘आ,उऊं’ च्या भाषेत बडबड करत होती..एकीकडे खेळण्यांचेही आवाज येत होते. पण अचानक माझ्या लक्षात आलं की बऱ्याच वेळापासून तिचा आवाज बंद आहे! मी पळत डायनींग रूम मधे गेले. पाहते तर काय.. मॅडम भिंतीच्या दिशेला तोंड करून काहीतरी खात होत्या...पण मी तर अगदी दोन दोनदा फरशी स्वच्छ पुसून घेतली होती आणि तीही डेटॉल च्या पाण्यानी! मग हिला काय सापडलं असावं ?
जवळ जाऊन बघितलं तर ती ‘Good Knight’ चं मॅट चघळत होती!
तिला खाली डास चावू नयेत म्हणून मी नेहेमीच ते मशीन ऑन करून ठेवायची, आणि तेही तिच्या पासून लांब साईड बोर्ड च्या खाली भिंतीजवळ ! पण त्या दिवशी कशी कोण जाणे - त्या मशिनची वायर ओढून तिनी ते बाहेर ओढलं होतं.. या सगळ्या उपद्व्यापात बहुदा ते मॅट मशीन मधून बाहेर पडलं आणि आमच्या राणीसाहेबांनी बाल्य स्वभावाला अनुसरून ते उचलून तोंडात घातलं.
मी सगळ्यात आधी तिच्या तोंडातून ते मॅट बाहेर काढलं….किती वेळापासून चघळत होती काय माहीत...पण ते मॅट पूर्ण ओलं झालं होतं. आणि अगदी पांढरं झालं होतं…..बाप रे! म्हणजे यातलं औषध तिच्या पोटात गेलं असणार!! मी त्या क्षणी तिला उचलून घेतलं आणि डॉक्टरकडे जायला निघाले. पण कशी जाणार? स्कूटर तर नितीन घेऊन गेला होता (आणि तेव्हा आमच्याकडे कार नव्हती). आणि हॉस्पिटल पण बरंच लांब होतं. आता काय करावं?? मी दोन मिनिटं शांत डोक्यानी विचार केला आणि मला उत्तर मिळालं… मी सरळ तिला घेऊन स्वैपाकघरात गेले. एका ग्लास मधे प्यायचं पाणी घेतलं, त्यात खूप मीठ घातलं आणि तिला चमच्यानी पाजायला लागले. पण साहजिकच इतकं खारट पाणी ती काही केल्या प्यायला तयार नव्हती. मग मी सरळ तिला माझ्या मांडीवर झोपवलं, ती हात पाय झाडून मांडीवरून उतरून जायला लागली, म्हणून एका पायानी तिला दाबून ठेवलं. पण ती तोंड उघडेल तर शप्पथ! मग मी अक्षरशः तिचं नाक दाबून , तिला तोंड उघडायला लावलं आणि जबरदस्तीनी ते पाणी तिला पाजत राहिले. ती जोरजोरात रडत होती पण त्यावेळी मला दुसरं काही दिसत किंवा ऐकू येत नव्हतं… फक्त एकच गोष्ट कळत होती.. ती म्हणजे- ऐश्वर्या ला उलटी व्हायला हवी.. कारण त्यावेळी तिच्या पोटातलं औषध बाहेर काढायचा तो एकमेव उपाय होता माझ्याकडे. जवळजवळ अर्धा ग्लास पाणी पोटात गेल्यावर एकदाची तिला उलटी झाली.. आणि त्यामधे तिनी थोड्या वेळापूर्वी प्यायलेलं सगळं दूध उलटून पडलं. ते बघितलं आणि मी सुटकेचा श्वास सोडला.
अचानक माझं लक्ष तिच्या रडव्या चेहेऱ्याकडे गेलं आणि मी तिला घट्ट जवळ घेतलं! ती पण माझ्या कुशीत हळू हळू शांत झाली आणि बघता बघता झोपून गेली. खूप दमली असावी बिचारी रडून रडून.. कदाचित माझं ते रौद्र रूप बघून घाबरली पण असेल.. पण मी तरी काय करणार- कधी कधी मुलांच्या भल्यासाठी आई वडिलांना कठोर व्हावं लागतं!
जानेवारी १९९५ मधे नितीनचा कोर्स संपला. त्याची पोस्टिंग बसोली ला झाली. पंजाब आणि जम्मू-कश्मीर च्या सीमेजवळ वसलेलं कश्मीर मधलं एक छोटंसं गाव आहे बसोली. तिथे रेल्वे स्टेशन नसल्यामुळे पठाणकोट पर्यंत ट्रेन नी जाऊन पुढे by road जावं लागायचं.
बसोली हे एक छोटंसं गाव होतं, त्यामुळे आम्हांला हॉस्पिटल, बँक वगैरेंच्या कामानिमित्त बऱ्याचदा पठाणकोट ला जावं लागायचं. त्या दिवसांमधे एक गोष्ट मला प्रकर्षानी जाणवली. पठाणकोट च्या रस्त्यांवर, सिग्नलच्या चौकांवर, एवढंच काय पण रेल्वे स्टेशन वर सुद्धा मला कधीच एकही भिकारी नाही दिसला. मला या गोष्टीचं जेवढं कौतुक वाटलं त्यापेक्षाही जास्त आश्चर्य वाटलं… कारण तिथला प्रत्येकजण सुखवस्तू होता असं नाही.. बरेच लोक आर्थिकदृष्ट्या कमकुवत दिसत होते, पण प्रत्येक जण काही ना काही काम करताना दिसायचा… रस्त्याच्या कडेला बसून येणाऱ्या जाणाऱ्या समोर हात पसरणारे कोणीही नाही दिसले तिथे!
याबद्दल जेव्हा मी आमच्या युनिट मधल्या एका सिनियर पंजाबी लेडी ला विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या,” हो, तुझं निरीक्षण बरोबर आहे. भीक मागून जगणं इथल्या लोकांना मान्य नाही. जो भी खाएंगे, अपनी मेहनत से कमाके खाएंगे।”
हे सगळं बघून आणि ऐकून मला स्वतःचीच लाज वाटली.. आम्ही कॉलेज मधे असताना जेव्हाही ट्रेक्स किंवा NCC च्या कॅम्पस् करता जायचो तेव्हा टाईमपास साठी म्हणून गाणी, गप्पा, जोक्स च्या मैफिली व्हायच्या.. आणि त्यात जोक्स मधे अर्ध्यापेक्षा जास्त जोक्स हे ‘सरदारजी’ वर असायचे.
पण आता जेव्हा मला त्यांच्यातला हा गुण समजला तेव्हा मला जाणवलं की ‘आम्ही भलेही त्यांच्यावर जोक्स मारून हसत होतो, पण खरे हास्यास्पद तर आम्हीच होतो.’
काही दिवसांपूर्वी whatsapp वर एक पोस्ट वाचली आणि मला बसोली मधला माझा हा अनुभव आठवला.. ती पोस्ट काहीशी अशी होती...एकदा एका सरदारजींच्या टॅक्सीत बसून २-३ मित्र जात होते. त्यांच्या गप्पा, चेष्टा मस्करी चालू होत्या. नकळत गप्पांचा सूर बदलला आणि ते सगळे मित्र ‘ सरदारजींच्या जोक्स’ कडे वळले. टॅक्सी ड्रायव्हर सरदारजी आहे हे माहीत असूनही मुद्दाम त्याला खिजवत जोक्स वर हसणं चालू होतं. तो ड्रायव्हर काही न बोलता शांतपणे सगळं ऐकून घेत होता. शेवटी टॅक्सी मधून उतरताना एका मित्रानी त्यांना विचारलं,” आम्ही तुम्हांला इतकं चिडवलं, तुम्हाला राग नाही आला?” त्यावर सरदारजी म्हणाले,” यात तुमची काही चूक नाहीये. तुम्ही अजून आम्हांला ओळखलंच नाहीये!” त्यांनी त्या मुलाच्या हातात एक रुपयाचं एक नाणं ठेवलं आणि म्हणाले,” तुम्हांला जो पहिला सरदार (sikh) भिकारी दिसेल त्याला हा रुपया द्या.” एवढं बोलून ते निघून गेले.. आणि आश्चर्य म्हणजे, अजुनही ते नाणं त्या मुलाकडेच आहे.
ही सत्य घटना आहे का काल्पनिक आहे हे मला माहित नाही, पण त्यातून मिळालेली शिकवण मात्र अगदी पुरेपूर सत्य आहे.
असो, आता परत बसोली मधल्या आमच्या वास्तव्याकडे वळूया!
ऐश्वर्या चा पहिला वाढदिवस आम्ही बसोली मधे साजरा केला. त्यानंतर काही दिवसांनी नितीनला काही कामासाठी दीड महिना बाहेरगावी जावं लागणार होतं. त्या दिवसांत मीदेखील पुण्याला माझ्या बाबांकडे जाऊन राहायचं ठरवलं. आम्ही दोघी (मी आणि ऐश्वर्या) नितीनला see off करायला पठाणकोट ला गेलो होतो. जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्म वर आली तेव्हा नितीनच्या कडेवर बसलेल्या ऐश्वर्याला त्यानी माझ्याकडे सोपवलं आणि तो ट्रेन च्या बोगीत चढला. काही मिनिटांत ट्रेन सुरू झाली. दारात उभा राहून नितीन हात हलवत ऐश्वर्या ला म्हणाला,” बाय बेटू!” तिनी पण अगदी हसत हसत दोन्ही हात हवेत उडवत त्याला बाय केलं. पण जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून निघाली आणि तिचे बाबा हळूहळू लांब जायला लागले, तेव्हा तिनी जी रडायला सुरुवात केली ती काही केल्या थांबेना. तिला समजायला लागल्यापासून पहिल्यांदाच नितीन तिला सोडून गेला होता.
परत येताना रस्त्यावरच्या गमतीजमती दाखवून मी तिला कसंबसं शांत केलं, पण त्यानंतर काही दिवस जेव्हाही ती टीव्ही वर किंवा एखाद्या पुस्तकात ट्रेन बघायची, तेव्हा ‘बाबा, बाबा’ म्हणत रडायला लागायची.
नितीन गेल्यानंतर काही दिवसांनी ठरल्याप्रमाणे मी आणि ऐश्वर्या पुण्याला गेलो. जवळजवळ एक महिना मी पुण्यात होते. नितीन जेव्हा बसोली ला परत येणार होता तेव्हाच मीही पुण्याहून परत जायचं, असं ठरलं होतं.
ठरल्याप्रमाणे मी आणि ऐश्वर्या पुण्याहून निघालो. ऐश्वर्या तेव्हा जेमतेम सव्वा वर्षाची होती. तिला घेऊन इतका लांबचा प्रवास करणं अवघड झालं असत, म्हणून मी मधे ग्वाल्हेर ला ब्रेक जर्नी करायचं ठरवलं. ग्वाल्हेर ला नितीनच्या मावशींकडे दोन दिवस राहून मग मी झेलम एक्सप्रेस नी पुढे पठाणकोट ला जायला निघाले. पण त्या दिवशी पुण्याहून येणारी झेलम तब्बल ७ तास उशिरा रात्री 11 च्या सुमाराला आली. आम्ही आमच्या जागेवर स्थिरस्थावर झाल्यावर मी आजूबाजूला पाहिलं….. माझ्या कंपार्टमेंट मधे , माझ्या शेजारच्या बर्थवर अजून एक स्त्री झोपली होती. तिच्या बरोबर तिचा ५-६ वर्षांचा मुलगा पण होता वरच्या बर्थवर. मी माझं सामान ठेवायला म्हणून लाइट ऑन केल्यामुळे तिला जाग आली. त्यांना पण पठाणकोट ला जायचं होतं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर आम्ही झोपलो. पहाटे नेहेमीच्यावेळी मला जाग आली. बर्थवर माझ्या कुशीत शांतपणे झोपलेल्या ऐश्वर्या कडे माझं लक्ष गेलं. खरंच, लहान मुलं झोपलेली असतात तेव्हा किती निष्पाप, निरागस दिसतात नाही! तिला न्याहाळत असताना माझ्या मनात उगीचच एक विचार आला,” किती गोंडस आहे ही! खूपच cute… पण नाक थोडं नकटं आहे.” तिची आजी गमतीनी म्हणायची,” नाकावर दिला काय म्हशीनी पाय!”
वाटलं, ‘ हिचं नाक अजून थो..डं सरळ असतं तर अजून गोड दिसली असती.’
थोड्या वेळानी पँट्री कार मधून चहा, कॉफी वगैरे विकणाऱ्यांची गडबड सुरू झाली आणि हळूहळू लोक जागे व्हायला लागले.
माझ्या शेजारच्या बर्थ वरची ती स्त्री पण उठुन बसली. आम्ही दोघी जनरल गप्पा मारत होतो तेवढ्यात तिच्या बर्थवर पांघरुणात काहीतरी हालचाल जाणवली. ‘अच्छा, म्हणजे ती पण तिच्या लहान बाळाला कुशीत घेऊन झोपली होती तर!
मी तिला त्याबद्दल विचारणारच होते, इतक्यात तिनी पांघरूण बाजूला केलं… आणि तिच्या बाळाला एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळवून परत झोपवलं…. ते सगळं बघून मला मात्र एक जबरदस्त झटका बसला होता... कारण इतका वेळ मी ज्याला छोटं बाळ समजत होते तो साधारण ३-४ वर्षांचा मुलगा होता पण मला झटका लागण्याच कारण वेगळंच होतं… त्या मुलाकडे बघताक्षणीच लक्षात येत होतं की तो शारीरिक आणि मानसिक रित्या abnormal होता. माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून त्याच्या आईनीच सांगायला सुरुवात केली…..” हा माझा मोठा मुलगा आहे.”
मोठा मुलगा?? माझ्या चेहेऱ्यावर अजून एक प्रश्नचिन्ह झळकलं असावं…..कारण लगेच तिनी सांगितलं,” हो, हा माझा मोठा मुलगा आहे - ७ वर्षांचा.
जेव्हा ह्याचा जन्म झाला तेव्हा सगळं व्यवस्थित होतं. इतर बाळांसारखा हा पण नॉर्मल होता. पण तिसऱ्या दिवशी त्याला कावीळ झाली. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण काही उपयोग नाही झाला. कावीळ वाढतच गेली आणि त्याचा परिणाम म्हणून बाळाच्या ब्रेन चा बराचसा हिस्सा कायमस्वरूपी निकामी झाला. त्यामुळे त्याची शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटली आहे. तो स्वतः काहीही करू शकत नाही. एखाद्या लहान बाळासारखं त्याचं सगळं काम दुसऱ्यांना करावं लागतं….त्याला खायला घालण्यापासून ते त्याची शु-पॉटी स्वच्छ करण्यापर्यंत….सगळं काही ! आता आयुष्यभर हा असाच राहणार… हे सगळं ऐकतानाच मला इतका मानसिक त्रास होत होता…..तर सगळं सांगताना त्या आईचं काय होत असेल? नुसत्या कल्पनेनीच मी हादरून गेले होते.. तेवढ्यात तिचा वरच्या बर्थवर झोपलेला मुलगा उतरून खाली आला आणि ती स्त्री त्याच्या सरबराई मधे गुंग झाली.
मी मात्र अक्षरशः बधीर झाले होते. हे सगळं किती भयानक होतं. माझ्याही नकळत मी शेजारी झोपलेल्या ऐश्वर्या ला माझ्या कुशीत कवटाळून घेतलं... अगदी घट्ट !
मला माझ्याच विचारांची लाज वाटायला लागली.. काही वेळापूर्वी मी माझ्या बाळाच्या नकट्या नाकाबद्दल तक्रार करत होते…..खरंच, किती स्वार्थी आणि अल्पसंतुष्ट असतो माणसाचा स्वभाव! जे चांगलं आहे ते सगळं आपण गृहीत धरतो आणि नसत्या कारणासाठी कुरकुर करतो..
त्या क्षणी मी ठरवलं - जे नाहीये त्याच्याबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा जे आहे त्यात धन्यता मानली पाहिजे.
मनोमन देवाची प्रार्थना केली, त्याला म्हणाले,” देवा, तुझी कृपादृष्टी अशीच कायम राहू दे आमच्यावर!
क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा ही भाग मस्त. त्या दुसऱ्या मुलाबद्दल तर अगदी अगदी असं झालं..
ऐश्वर्या ने मॅट चघळली त्याचा काही त्रास वगैरे नाही न झाला??? माझ्या रेहा ने काजल स्टिक खाल्लेली. अगदी घशात चिकटून बसलेली अर्धा इंच स्टिक. मी ही असंच पॅनिक झालेले....

छान लिहीलंय.
मीठाच्या पाण्याच्या स्टमक वॉश ची कल्पना एकदम शहाणपणाची.नाहीतर उपचार होईपर्यंत वेळ गेला असता.

छान लिहिलं आहे!
अगोदरचे भाग वाचायला हवेत आता. येथे लिंक्स दिल्या असत्या तर बरे झाले असते.

छान Happy