ज्येष्ठ नागरिक आणि व्हाट्सऍप

Submitted by सई केसकर on 3 August, 2018 - 04:05

एक काळ असा होता की आई वडिलांना तंत्रज्ञान निपुण (टेक्नोसॅव्ही) करणे हा एक व्यवस्थित वेळ ठेऊन करण्याचा उपक्रम असायचा. त्यातही, "आम्हाला नको बाई तसलं स्काईप बीप. आपण सरळ साध्या फोनवर बोलू", असले शरणागतिचे उद्गार निघायचे. फेसबुकवरील उलटे प्रोफाइल फोटो (ते रोटेट नक्की फोनमध्ये करायचे का फेसबुकमध्ये?), एखाद्याचा फोटो आवडल्यावर तो लाईक करून सोडून न देता स्वतःच्याही प्रोफाईलवर शेअर करणे, सेल्फीचा जमाना आल्यावर परवेज मुशर्रफ ते गांधींजी असे कुणीही वाटावे, अशा व्यापक श्रेणीत बसणारे सेल्फी फेसबुकवर टाकणे; या आणि अशा कित्येक लीला गेल्या पंधरा वर्षांमध्ये पाहिल्या आहेत.
पण ज्येष्ठ नागरिकांनी जर कुठलं माध्यम अगदी घट्टपणे आपलंसं केलं असेल तर ते आहे व्हाट्सऍप. पंधरा वर्षांपूर्वी, "चुलीत घाल तो फोन! त्यामुळेच केटी लागली", वगैरे वाक्य (घरात चूल नसताना) म्हणणारी आई आता टोमणेसुद्धा व्हाट्सऍपवरून मारू लागली आहे. नातेवाईकांमध्ये आता अपरिहार्यपणे एका फॅमिली ग्रुपची स्थापना झालेली असते. त्यात पूर्वी लोक "लेकी बोले सुने लागे" हे जे अनालॉग करायचे ते आता डिजिटल करू लागले आहेत.
"इतना मत भागो दौलत के पीछे मेरे दोस्त,
के अपनो का साथ ही छूट जाये"
असा मेसेज आला की सगळ्यांना वाटतं की उरलेले सगळे एक होऊन आपल्यावर जळतायत. एखादी जळकुंडी व्यक्ती तुमचे नवीन घर बघायला (मुद्दाम) आली नाही असे वाटले असता, घराच्या भूमिपूजनापासून ते सुतारकामापर्यंत सगळे फोटो गटात धडाधड टाकून त्या व्यक्तीला जेरीला आणणे. आपल्या नातवंडांच्या बडबडगीतांचे पंधरा पंधरा मिनिटांचे व्हिडियो टाकणे असे अनेक प्रकार फॅमिली गटांमध्ये होत असतात. त्यामुळे यदाकदाचित कधी हा गट भौतिक जगात भेटला, तर काय बोलावे हेच कळेनासे होते.

आरोग्य हादेखील व्हाट्सएपीय चर्चेचा एक महत्वाचा मुद्दा आहे. व्हाट्सऍप्पवरील आपल्या आहारपद्धतीची झालेली ओढाताण बघून जगन्नाथ दीक्षित नक्कीच रडकुंडीला येतील. पंचावन्न मिनिटांच्या खिडकीमध्ये (विंडोमध्ये) काहीही खाल्लेले चालते याचा कसा कसा अर्थ लागू शकतो हे मी काही ज्येष्ठ नागरिकांच्या व्हाट्सएपीय चर्चेतून अनुभवले आहे. एक डायबेटिक काकू २ पोळ्या, भात, वगैरे संपूर्ण जेवण झाल्यावर जिलबी खाऊ लागल्या. "अहो काकू ही जिलबी आहे" असं शक्य तितक्या नॉन जजमेंटल टोनमध्ये सांगितल्यावर त्यांनी माझ्या नाकासमोर जगन्नाथ दीक्षितांचा तो कधीही न संपणारा व्हाट्सऍप संदेश नाचवायला सुरुवात केली. काहीही न करता वजन कमी करायचे शे-दीडशे मार्ग व्हाट्सऍप वर अस्तित्वात आहेत. आणि हे "व्हाट्सऍपवर असतं". कुणी पाठवलं वगैरे काही तपशील महत्वाचा नसतो. "माझ्या व्हाट्सऍपवर आहे. थांब तुला दाखवतो", असं म्हणून अनेक ग्रुप धुंडाळले जातात. त्यातून मग तो संदेश येतो.
वजन कमी करायचे आहे?
काहीही करू नका.
रोज सकाळी एक काकडी कापून १ लिटर पाण्यात घालून फ्रिजमध्ये ठेवा. दिवसभरात हे सगळं पाणी प्या. वजन आपोआप कमी होईल"

"काका तुम्ही हे करून बघितलंय का?"
"नाही. काकडी पित्तकर असते" (असं दुसऱ्या कुठल्यातरी भारतीय आयुर्वेदिक मेसेजमध्ये सांगितलं असावं).

मध्यंतरी मल्ल्यानी पळून जायच्या आधी बीजेपीला दिलेला (फक्त) पस्तीस कोटींचा चेक ज्येष्ठ नागरिक व्हाट्सऍप गटांमध्ये फिरत होता. त्याला उत्तर म्हणून पलीकडच्या कॅम्पमधून राहुल गांधी (ऐन गर्दीच्या ठिकाणी) फोनवर एका बिकिनीतील महिलेचा फोटो बघत आहे असा फोटो आला. आणि या दोन गोष्टींचं निमित्त साधून पुन्हा भाजप ज्येना विरुद्ध काँग्रेस ज्येना अशी जुंपली. स्वत:च्या वडिलांना मी कधी "तुम्ही असल्या फालतू चर्चेत कशाला वेळ घालवता" असे म्हणीन असे मला वाटले नव्हते. पण ती वेळ व्हाट्सऍपने आणल्याबद्दल मी त्याची आभारी आहे.

एकदा आईने अगदी आश्चर्याने मला एक फॉरवर्ड दाखवला. २०१८ मधून तुमचे जन्मसाल वजा करा. उत्तर तुमचे वय असेल. असे फक्त १००० वर्षांतून एकदा होते. एका हातात फोन आणि दुसऱ्या हातात कॅलक्युल्टर घेऊन बसलेली माझ्या आईची ती निरागस मूर्ती पाहिली आणि मला भडभडून आलं. कदाचित मी सतरा अठरा वर्षांची असताना, सकाळी पांघरुणातच फोन घेऊन एसेमेस करताना पाहून तिलाही असंच भरून येत असेल. कोथिंबीर आण, भाजी चिरून दे, कुकरखालचा गॅस बंद कर (जो कधीच केला जायचा नाही) असल्या सूचना सांगताना माझी फोनमध्ये लागलेली तंद्री बघून तिलाही असंच होत असेल. डायल अपच्या काळात नेट सर्फिंग करायसाठी घरचा फोन तीन तीन तास एंगेज ठेवायचे तेव्हा त्यांना असेच हताश वाटत असेल. त्या सगळ्या सगळ्या आठवणी आता आई बाबा एकमेकांसमोर बसून आपापले फोन बघत जेवतात तेव्हा येतात. हे वाईट आहे असे मला बिलकुल म्हणायचे नाही. नवरा बायकोच्या नात्यात फोनचे थोडे बफर असायला काहीच हरकत नाही.

पण "तुमची मुलं अशी वागतील तेव्हा कळेल", या शापाची वाट बघावी लागली नाही. कारण आई बाबांनीच व्यवस्थित तसं वागून दाखवलं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>९३% च्या खाली जाऊ दिला नाही!!

बापरे!! मी १६ % वर ५-६ तास काढते. शक्यतो फोन बंद व्हावा असेही प्रयत्न करते.
फोन मेलाय. चार्जर घरी/ऑफिसमध्ये विसरलाय, किंवा फोनच विसरलाय अशी वेळ अली की फार मस्त वाटतं.

९३% मिनिमम अपेक्षा असणे म्हणजे नक्कीच आमच्या पिढीचे आई बाबा असणार.

प्रतिसादांसाठी आभार!

माझ्या बाबांकडे आता 3-4 वर्षे झाली व्हाट्सऍप वापरतायत त्याला. रोजच्या रोज मोबाईल क्लीन करण्याकडेच भर असतो. डिलीट करून मोबाईल ची स्पेस व्यवस्थित ठेवणे . घरात तर म्हणतात व्हाट्सऍप बघणं कमी डिलीट च सगळं वेळ करतात

माझ्या आईची ती निरागस मूर्ती पाहिली आणि मला भडभडून आलं.
असे होण्याच्या वेळा हल्ली माझ्यावर वरचेवर येतात >>>>>>१

रोजच्या रोज मोबाईल क्लीन करण्याकडेच भर असतो. >>> अगदी अगदी. माझे वडील तर १-१ मेसेज डिलीट करत बसतात. त्याना क्लिअर चा ऑप्शन सान्गुनहि पटत नाही,

मस्त लेख !!
नवीन नवीन फेबुवर आल्यावर साबाईंनी कोणाकोणाचे फोटो शेअर केलेले ते आठवलं. ठोकला लाईक , केला शेअर, ठोकला लाईक , केला शेअर !

मला एक काका आठवले ज्यांनी मला अमेरिकेतल्या एका शास्त्रीय संगीत ग्रुप बद्दल बरीच मेल केली. मी संगीताच्या (आमच्या साबांचं पण नाव बरं का) बाबतीत असुर असल्याने एकदा त्यांना कळवळून विचारलं की तुम्ही ही मेल्स मला का पाठवता. तेव्हा कळलं की काका ८९ वर्षांचे आहेत आणि माझं नाव आडनाव इमेल आयडी एका चांगल्या गायिका बाईंशी समरुप आहे. तेव्हापासून ती मेल आली की उघडून नाही पाहिली तरी ८९ वर्षाचे काका ती पाठवतात या कल्पनेने छान वाटतं.

मला सिंहगड रोड वरच्या एका बाईंनी ऑर्डर केलेली खेळणी इन्व्हॉइस, सिं रो वरच्या एका ४८ वर्षांच्या बाईंचे ब्रेन स्कॅन चे रिपोर्ट, चेन्नई च्या एका सोसायटी मध्ये राहणार्‍या माझ्या नावाच्या बाईंना आलेले सोसायटी मिटिंग अहवाल, ठाणे इथे राहणार्‍या बाईंना कोणीतरी केलेली धोकादायक झाडाची तक्रार, शिवरायांचा लेख लिहून अपमान केल्याबद्दल धमकी (हा औरंगाबादच्या एक इतिहास पी एच डी विदुषींनी लिहीलेला लेख मी शोधून मिळवून वाचला बरं का. एकतर फारसा समजला नाही, जो समजला त्यात ओब्जेक्शनेबल कंटेंट काय ते समजले नाही त्यामुळे ऑप्शन ला टाकला.), मिरज येथे डोळे डॉ कडे काम करणार्‍या एका बाईंना काँटॅक्ट लेन्स वाल्यांनी पाठवलेली बिलं, एका बाईंनी चुकवलेली व्होदाफोन ची बिलं, शेवटच्या बाईंना एजन्सीने पाठवलेलं ऑनलाईन तिकीट इतकं सगळं येतं. त्या मानाने ८९ काकांची मेल बरीच वेलकमिंग म्हणायला हरकत नाही. (गुगल ने किंवा मेल पाठवणार्‍यांनी माती खाल्लीय. या सर्वांना दरवेळी 'ती मी नव्हेच' सांगून झालंय.ते शांतपणे 'मग तुम्ही इग्नोर करा' म्हणून मेल चा रतीब चालू ठेवतात. Happy )

मस्त ..
फॅमिली ग्रुप मधले जेना फार पीळ मेसेज पाठवतात ..
आपल्या सुनाना , ना सांभाळणार्या मुलांना उद्देशून मेसेज ..
गोड मिट्ट थॉट्स ..
आमच्या वेळी अस असं नव्हतं टाईप मेसेज..
बघा एकदा विचार करा .. जीवन फार सुंदर आहे.. एकदातरी वाचाच.. फॉरवर्ड केल्याशिवाय पुढे जाणार नाही अशा सुरुवात शेवट असणारे मेसेज ..
लहानपणापासून एकेलेले जोक्स परत नव्याने. ..
मजा येते बऱ्याचदा वाचून

लेख छान आहे.
आई वडील स्मार्ट फोन वापरत नसल्याने हे काही रीलेट झालं नाही.
पीळ मेसजेस +१
हे कुठेही कुणीही पाठवतं . दवणीय.

या मेसेजेस ची अजून एक वर्गवारी आहे. यात एक तरुण सुंदर मुलगी रात्री एकटीच चाललेली असते,तिच्या मागे ५ पावलांचे आवाज येतात. ती खूप घाबरते. मग ती मुलं(माणसं) येऊन तिला अश्युअर करतात की 'आम्ही तुला भगिनी प्रमाणे मानतो.घरी सोडायला येतो.अमुक अमुक जातीचा माणूस जीव देईल पण आपल्या भगिनीला असं एकटं सोडणारच नाही.'
(या अमुक तमुक च्या जागी ३-४ नावं वाले मेसेज सेम ग्रुप वर आलेत शाळेच्या.शिवाय यातलं निर्जन लोकेशन पण सतत बदलत राहतं.)
हीच केस त्या दुबई ला पोहचलेल्या मित्राची आणि त्याला सोडायला गेलेला अजून बाणेर्/हिंजवडी चौक्/वरळी ब्रिज ला अडकलेल्या मेसेज ची.

मस्त.

मस्त झालाय.
अनु, तुझा प्रतिसाद वाचून पण लय म्हणजे लयच हसले. बरेच दिवसात तुझं पण नवीन काही वाचलं नाहीये

वरदा ☺️☺️☺️
एक प्राणी जीवन लेख लिहिला होता पण नॉटपड मध्ये लिहून न ठेवता डायरेक्ट लेख विंडो मध्ये लिहायला घेऊन चुकीचे बटन दाबले जाऊन गेला.
नागाचे विष गेल्यावर त्याला ते उगवायला थांबावे लागते तसेच माझा लेख लिहिण्यात एनर्जी गेली आणि तो वाया गेला त्यामुळे नवा लेख उगवेपर्यंत शक्तीची जोपासना ☺️☺️

नागाचे विष गेल्यावर त्याला ते उगवायला थांबावे लागते तसेच माझा लेख लिहिण्यात एनर्जी गेली आणि तो वाया गेला त्यामुळे नवा लेख उगवेपर्यंत शक्तीची जोपासना>> इच्छाधारी नागिणीची आठवण झाली अनु ताई, Light 1 घ्या

>>>एक प्राणी जीवन लेख लिहिला होता पण नॉटपड मध्ये लिहून न ठेवता डायरेक्ट लेख विंडो मध्ये लिहायला घेऊन चुकीचे बटन दाबले जाऊन गेला.
नागाचे विष गेल्यावर त्याला ते उगवायला थांबावे लागते तसेच माझा लेख लिहिण्यात एनर्जी गेली आणि तो वाया गेला त्यामुळे नवा लेख उगवेपर्यंत शक्तीची जोपासना
हा हा!!

लवकर येउदेत!!

काही ज्ये.ना. एक पाउल पुढे असतात याची नम्रपणे नोंद करू इच्छितो. :).
अनेक ज्ये.ना. मागच्यास ठेच पुढचा शहाणा या तत्वाचे असतात याचीही या इथे नोंद व्हावी. Happy

मजा. Proud
काही रिलेट झाले.
आमच्या ओळखीचे एक ज्येना होते. त्यांनी माझे प्रोफाइल फोटो चारपाचवेळा शेअर केले होते. डोके आपटले होते मी त्यांना अ‍ॅड केल्याबद्दल.

अनु, नागीण आणि विष... Lol

हे सगळे मेसेज बिन जेष्ठांनाही लागू होतात आणि फुकट वेळ घालवणे पण . पूर्वी ऑफिस मध्ये सार्वजनिक फोन वरून बाया मुलांवर लक्ष ठेवायच्या आता हातात फोन आल्यावर मेसेज पाठवून पाठून मुलांना हैराण करतात वरती मेसेज वाचला कि नाही ते पण समजत आणि डायरेकट फोन पण लावता येतो कारण मुलानांच्या हातात पण स्मार्ट फोन आणि आयांच्या हातात पण . मुलांना काय काय मेसेज येतात हे लपून छपून बिन जेष्ठ पालकांकडून बघितलं जात Happy

अगदी अगदी झालेय लेख वाचून ... माझी आई ओव्हरॉल या सगळ्यापासून लांब आहे बरंय Wink ना स्मार्टफोन, ना व्हॉटसॅप, ना फेबु.

पण साबा साबु आहेत दोघं.. साबु एवढे अ‍ॅक्टीव नाहित. मधेच २-३ जोक्स पाठवतात. परत काही महिने शांत.
साबांना फारच आवडतं व्हॉटसॅप. सतत काहीतरी ढकलत राहतात पुढे. धार्मिक, उपदेश देणार्‍या गोष्टीच जास्त. त्यांच्या माहेरकडच्या ग्रुप मधे सतत देवाधर्माच्या पोस्टींचा मारा.. बर्‍याचदा न बघता क्लीअर चॅट करून टाकते.
दुसरा मामा मावश्यांचा ग्रूप आहे तिथे तर जणू काय व्हॉट्सअ‍ॅप चे ऑफिसच थाटून बसलेत आणि अ‍ॅडमिन असलेला मामा-मावशी म्हणजे बॉस बॉसीण अशा आर्विभावात. आपल्या ग्रुपचा असा नियम, तसा नियम... बाहेर निघालं तरी परत अ‍ॅड करतात Lol

Pages