कांदापोहे....रविवारचा सुपरहिट नाष्टा

Submitted by राजेश्री on 8 July, 2018 - 02:54

माझे खाद्यप्रयोग (२)

नमस्कार खवय्येहो..... मी राजश्री खाद्यसम्राज्ञी(स्वघोषित) आपलं माझे खाद्यप्रयोगच्या दुसऱ्या भागात मनःपूर्वक स्वागत करतेय,तर मग आज आपण नाश्त्याला कांदेपोहे करतोय.का?असं विचारा, नाही विचारलं तरी सांगते,कारण एकतर आज रविवार आहे,घरात पोहे बनविण्यासाठीचे सर्व वाणसामान जातीने हजर आहे शिवाय बाहेर मस्त पाऊस पडतो आहे.इतक्या सकाळी, म्हणजे अर्ली मॉर्निंगला पाऊस पडायला लागला की नाश्त्याला आपल्याला चटपटीत काही खाऊ वाटत असतं, पण भजी मात्र आपण सकाळी नाहीच करत ना,तिची वेळ संध्याकाळची, मग पोह्यांचा बेत लगोलग ठरतो.मला वाटत कांदेपोहे हा आपला एकमेव खाद्यपदार्थ असेल जो तुम्ही इरी, वारी,काळ, वेळ कोणताही असो ऑल टाइम खाऊ शकताय. शिवाय कांदेपोहे आपला फारसा वेळ घेत नाहीतच आवश्यक साहित्याची तयारी करून घेतली की झाले पोहे तयार.तर मग चला कृती करूया.पोहे करीत असताना बाहेर खिडकीतून पडणारा पाऊस न्ह्याहाळा, एखाद दृश्य फोटोजेनिक असेल तर गॅस पेटवला असेल त्यावर पोह्यासाठी कढई ठेवली असेल तर तो पहिला बंद करा.मग छानसा फोटो घ्या.तो आपल्या मित्रमंडळात its rainig today अस काहीतरी capture तयार करून पाठवा, लगोलग कुणाचा रिप्लाय आला तर एखादी smily टाका पण मग नंतर किचन मध्ये या कारण आपल्याला कांदेपोहे करायचे आहेत.
कढई मघाशीच आपण गॅसवर ठेवली आहे.पण हे चूक आहे.आधी पोह्यासाठी आवश्यक सर्व साहित्य आपल्या हाताशी घ्या,कांदा छान राहिला निदान बरा चिरा, त्याचे चौकोनी तर चौकोनी नाहीतर पंचकोनी तर पंचकोनी असेच छोटे छोटे काप कापा.सारांश हा की कांदा बारीक चिरून घ्या.कांदा चिरताना डोळ्यात पाणी जमा होईल ते पुसू नका, विळती बाजूला ठेवा नायतर त्यावर पाय पडेल .मग हात स्वच्छ धुऊन फोन हातात घ्या आणि अश्रूभरल्या डोळ्यांचा एक फोटो काढून घ्या.त्या फोटोखाली
अंगणात पाऊस
मनात पाऊस
डोळ्यांवाटे ही मग वाहतो पाऊस...
अश्या कवितेच्या ओळी टाकून फोटो पोस्ट करा.like वैगेरे किती आल्या ते नंतर बघू कारण कांदा जास्त वेळ चिरून ठेवायचा नसतो.हा माझा आरोग्य सल्ला इथे नोट करून ठेवा.मग हिरवी मिरची अलवारशी चिरून घ्या,कोथिंबीर धूवून त्यातील पाणी निथळवून ती बारीक चिरून घ्या.अंगणातील ताजा कडीपत्ता आणायला बागेत जा. तिथे मोगरा फुलला असेल,आंब्याचे झाड डोलत असेल त्या सर्वांना हाय हॅलो करून पायात घुटमळणार्या मोतीला चकवा देऊन पुन्हा किचन मध्ये या.आता लिंबू राहिला,तो घ्या चिरून ,जिरे,मोहरी,हळद हाताशी घ्या.आता गॅस चालू करायला काहीच हरकत नाही.कढईत एक किंवा दीड पळी तेल घाला.मोहरी,जिरे मग कडीपत्ता अनुक्रमे त्यात धाडून तिखटाचा ठसका हवा असेल तर कांद्यापूर्वी मिरची टाका किंवा मग कमी तिखट हवं असेल तर आधी तेलात कांद्याला परता, चिमूटभर हळद टाकून मसाल्याचा डबा बाजूला ठेवा.कांदा भाजत असताना त्यात मिरची घालून घ्या.या तयारीच्या मध्यात पोहे भिजवून ताटात किंवा चाळणीत पोहे निथळवून घ्या.ते फडफडीत झाले की त्यात मीठ,एक अर्धी चिमूट साखर टाकून मिक्स करून घ्या.या मध्ये शेंगदाणे यापूर्वीच भाजून ते तेलातून थोडे शॅलो फ्राय करून घ्या.माझ्याकडे मुळात खारे शेंगदाणे असल्याने मी ती कृती वगळली आहे.आता कांदा भाजला की त्यात पोहे परतून घ्या आणि व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स झालं बघून त्यावर झाकण टाका गॅस थोडा मंद ठेऊन एक वाफ येऊन द्या.एक वाफ आली की पटपट ती वाफ निवायच्या आत पोहे प्लेट मध्ये खायला घ्या.त्यावर हलक्या हाताने कोथिंबीर पसरा,ओल्या खोबऱ्याचा किस पसरून घ्या ,लिंबाची चंद्रकोरीसारखी फोड ठेवा शेवटी.आता कांदेपोहे तयार आहेत.बाहेर पाऊस पडतोय विसरू नका पावसाच्या कंपनीत ते अवीट चवीचे पोहे स्वतःला शाबासकी देत खाऊन टाका...कारण आपण सारे खवय्ये...

©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
०८/०७/२०१८

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोंपासु.
इंदुरात कुठे आहे हे हेड साहेब?

गुगल मॅपवर आहे, मला तिथली फारशी माहिती नाही, मॅप बघत गेलो, जवळच होते हॉटेलच्या>>>>> आता हॉटेल कुठलं ते लगोलग सांगुन टाका. मी दहावीत असतांना माझ्या आत्येबहीणीचे लग्न इंदोरला झाले होते, त्यानंतर कधी जाणे झालेच नाही. पुढे नक्कीच जाणार, बाकी पोहे मस्त.

@ भरत, अमेय२८०८०७, रश्मी..,

ते 'हेड साहब के पोहे' इंदोरच्या जुना पलासिया भागात आहे, अपना स्वीट्स ह्या सुप्रसिद्ध दुकानाजवळ.

'हेड साहब' हे मजेशीर नाव पण त्याच्या मूळ मालकामुळे पडले आहे - तो मध्य प्रदेश पोलीस विभागात हेड कॉन्स्टेबल होता म्हणून Happy

बाकी इंदोरी खानपान म्हणजे चंगळ Happy

Pages