स्फुट - मनविक्रय

Submitted by बेफ़िकीर on 29 July, 2018 - 12:11

स्फुट - मनविक्रय

सर्वांच्या तक्रारींची संततधार,
मनाचा करते कौमार्यभंग
नित्यनेमाने!

शिव्याशाप, दोषारोपांचे वीर्य,
उधाणते मनाच्या प्रत्येक कपारीतून!

सुकुमार, प्रामाणिक ध्येयांचे स्त्रीबीज,
आक्रसून घेतले जाते
निराशेच्या समर्थ धोरणांकडून!

मनाचे सर्व अवयव,
रक्ताळलेले, कुस्करलेले,
मनावरचे मुखवट्यांचे कपडे,
लक्त्तरलेले!

हे रोज होऊनही,
मी तो दिवस पुन्हा जगायला निघतो!

मनावरच्या बलात्काराला,
अट्रोसिटी लागू होईल का,
हे बघतही बसत नाही!

वडील नावाचा वकील म्हणतो,
केस करू नकोस,
सगळे विसरून जा!

चेहऱ्याच्या वर्तमानपत्रात आलेल्या,
सर्व बातम्या आणि फोटो लपवत,
मी हिंडू बघतो,
उजळ माथ्याने!

उद्ध्वस्त झालेल्या प्रामाणिक ध्येयाच्या स्त्रीबीजांच्या आशा,
पुन्हा पल्लवीत होऊन बघतात!

बदनामी विसरत,
मन धावते पुन्हा काहीतरी , कुणाचेतरी, निरपेक्षपणे बरे करायला!

दुपारी कळते..........

काळ अर्धवट सुचू पाहत असलेल्या गझलेची,
पाळी चुकली!

संध्याकाळी दिवस नावाचा डॉक्टर सांगतो,
मूल आतल्याआत मेले आहे!

पण तोवर,
एखाद्या लहान ध्येयाची पूर्तता झालेली असते!

मनही वेडेच,
मृत मूल कौतुकाने प्रसवते!!

जगही कीव येऊन,
खोटी खोटी वाहवा करते!

बारश्याला मुलाच्या पार्थिवासाठी 'स्फुट' हे नांव निश्चित होते!

मग ठोसर पागेत,
जमा होतात दाद, वाहवा वगैरे शाब्दिक सांत्वनकार!

नंतर बारमध्ये,
एक आर्त पण नीरव टाहो फुटतो!

मन क्षणभरच नागडे होते,
पुन्हा कपडे घालते,
दुसऱ्या दिवशी,
पुढचा बलात्कार सहन करायला!

पूर्ण झालेली, होत असणारी ध्येये,
पुन्हा ताठ, राकट आणि पिसाट होऊ लागतात उद्यासाठी!

मनांची बुधवार पेठ किंवा कामाठीपुरा असता,
तर सगळ्या खोल्या ओस पडल्या असत्या,
रांग असती,
फक्त माझ्या खोलीबाहेर!!!!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users