जागीर

Submitted by पायस on 20 July, 2018 - 02:28

१९८१ साली इंडियाना जोन्स अ‍ॅन्ड रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क आला आणि अचानक खजिना-शोध या जॉनरला नवचैतन्य प्राप्त जाहले. त्याला फॉलो अप म्हणून स्पीलबर्गने १९८४ साली टेंपल ऑफ डूम रिलीज केला. एवढे होत असताना बॉलिवूडने मागे राहणे हे बॉलिवूडच्या शान के खिलाफ असल्याने कोणीतरी हे फेकलेले गाँटलेट उचलणे गरजेचे होते. त्यात प्रश्न आंतरराष्ट्रीय दर्जाचा असल्याने आंतरराष्ट्रीय प्रेक्षकाला रुचेल असा सिनेमा बनवण्याचा अनुभव असणेही गरजेचे होते. म्हणून "लव्ह इन टोकियो" मधून जपानी लोकांना आशा पारेख जपानी आहे हे पटवून देण्याचे महान कार्य करणार्‍या प्रमोद चक्रवर्तीने त्याच वर्षी जागीर नामे चित्रकलाकृती निर्मिली. या महान कार्याचा आढावा घेण्याकरता हा चिरफाड, आपलं रिव्ह्यू प्रपंच!

१) रम्य ही स्वर्गाहून जागीर

मांगा इन थिअरी अ‍ॅन्ड प्रॅक्टिस या अप्रतिम पुस्तकामध्ये प्रसिद्ध लेखक हिरोहिको अराकी सांगतो की तुमच्या कथेचा मुख्य मुद्दा कथा सुरू झाल्या झाल्या स्पष्ट झाला पाहिजे. जेव्हा अराकी त्याची उमेदवारी करत होता तेव्हाच्या काळात सुद्धा आमच्या चक्रवर्तीकाकांच्या डोक्यात हा मुद्दा पक्का होता. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता ते आपल्याला खजिना दाखवून मोकळे होतात. कारण खजिना किती आहे हे महत्त्वाचे नाही. तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास महत्त्वाचा आहे. मग खजिन्याबद्दल रहस्य निर्माण करून काय फायदा?

तर कमल कपूर (अमिताभच्या डॉनमधला नारंग) शूरवीर सिंह म्हणून अंजानगढचा राजा दाखवला आहे. ज्याला इंग्रजीत प्लूम्ड टर्बन म्हणतात आणि ज्याला आपण पीस खोवलेला फेटा म्हणतो असा फेटा, जोधपुरी सूट आणि गळ्यात मोत्यांच्या माळा असल्याने त्याच्या राजेपदावर शिक्कामोर्तब होते. राजा असूनही बिचार्‍याकडे एक जागीरच काय ती असते. त्याचे राज्य नक्की कुठे असते असे भौगोलिक प्रश्न व्यर्थ आहेत. कारण तो कोणत्या तरी मोठ्या शहराच्या जवळ राहत असतो ज्याच्यापासून थोड्याच अंतरावर नदी, जंगल, माळरान, डोंगर, दर्‍या सर्व काही असते यापेक्षा जास्त माहिती चक्रवर्तीकाका आपल्याला देत नाहीत. याच डोंगर दर्‍यांमध्ये कुठेतरी त्याचा राजवाडा असतो. तिथेच कुठेतरी एक पहाडी असते. त्या पहाडीच्या खाली शाही खजिना असतो.

सिनेमा सुरु होतो तो कमल कपूर खजिन्याच्या खोलीत उभा राहून शंकराच्या मूर्तीशी गप्पा मारत असतो. टेंपल ऑफ डूम ला उत्तर द्यायचे असल्याने खजिन्याच्या खोलीला मंदिराचे स्वरुप दिलेले आहे. त्याच्या दरवाज्यावर सात घंटा टांगलेल्या आहेत. खजिना म्हणून जेवढं मध्यम वर्गीय बंगाल्याला सुचू शकतं तेवढं दाखवलेलं आहे. इथे वाचकांनी नोंद घ्यावी की याच व्यक्तीने धर्मेंद्राचा अलिबाबा और चालीस चोर बनवला होता. असो, तर कमल कपूर सांगत असतो की त्याला हार्ट अ‍ॅटॅक येऊन गेलेला असल्यामुळे तो आता खजिन्याची जबाबदारी राजकुमारावर सोपवण्याच्या विचारात आहे (इथे मूर्तीच्या चेहर्‍यावर बरी ब्याद टळली असे भाव). तर त्याला आशीर्वाद दे इ. इ. मूर्तीच्या मनातही बहुधा प्रेक्षकाच्या मनात चमकून जातो तोच प्रश्न येतो - ते आशीर्वाद देतो मी पण ज्याला द्यायचा तो राजकुमार कुठे आहे? याला उत्तर म्हणून कमल कपूर घंटा वाजवतो आणि कुठून तरी एक गरुड पैदा करून बाहेर पडतो.

हिंदी सिनेमात प्राणी-पक्षी अमर्यादित प्रमाणात चतुर असल्याने कमल कपूर सारासार विचार करून राजकुमार खजिन्याची जबाबदारी घेईपर्यंत त्याच्या रक्षणाची जबाबदारी बाजबहादूर शमशेर असे भरभक्कम नाव असलेल्या त्या गरुडावर टाकतो. त्याला हे माहित नसते की आपल्या गरुडावर कोणीतरी नजर ठेवून आहे. तो असतो डाकू लाखन सिंह अर्थात अमरीश पुरी. अमरीश पुरीला या खजिन्यात रस असतो पण अंजानगढचा भूगोल समजायला फारच क्लिष्ट असल्याने त्याला दुर्बिणीतून ती पहाडी दिसत असूनही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी नकाशाची गरज असते. शूरवीर सिंगचा भाऊ दिगंबर सिंग (सुब्रतो महापात्रा, सत्यम शिवम सुंदरम मधला शास्त्री) हा अमरीश पुरीला जाऊन मिळालेला असतो. तो खजिन्याच्या अर्ध्या हिश्श्याच्या बदल्यात नकाशा कुठे आहे हे सांगायला तयार होतो. नकाशा एका लॉकेटमध्ये असतो जे कमल कपूर घालून फिरत असतो. अमरीश पुरी लगेच ते लॉकेट ताब्यात घेण्यासाठी अंजानगडाच्या हवेलीकडे कूच करतो.

2) प्राणिमात्रांचे ऋण

2.1) शाही उपसर्गाची संकल्पना

दिगंबरच्या दगाबाजीची कल्पना नसलेला कमल कपूर निवांतपणे प्राणशी गप्पा मारत असतो. प्रत्येक शाही खानदानाचा नोकर असलाच पाहिजे या नियमानुसार प्राण मंगलसिंग नावाने शाही नोकर दाखवला आहे. राजकुमार मोठा होईपर्यंत शाही खजिन्याचे रहस्य आणि नकाशावाल्या ‘लाकट’ ची जबाबदारी कमल कपूर प्राणवर सोपवतो.
याची नोंद घेणे अत्यावश्यक आहे की अशा सिनेमात जर शाही हा उपसर्ग नावामागे लावला असला तर तो/ती बाय डिफॉल्ट भारी आणि मरणार नाही हे फिक्स असते. म्हणून राजकुमार कधी मरत नसतात कारण उनके रगों में शाही खून दौडत असते. दुसरं म्हणजे जोवर उघड उघड शाही हा उपसर्ग प्रयुक्त होत नाही तोवर शाही उपसर्गाची सुरक्षा प्राप्त होत नाही. तिसरं म्हणजे या उपसर्गाची प्रयुक्तता तुम्ही स्वतःकरिता करून उपयोग नाही. अन्यथा आत्मप्रौढीचा नियम या उपसर्गाच्या सुरक्षाचक्राचा भेद करतो. चौथे म्हणजे जर तुमच्याकडे एखाद्या शाही वस्तूची जबाबदारी असली तर तुम्ही शाही राजदार बनून तुम्हाला हा नियम लागू होतो. कमल कपूर शाही राजा नसल्याने तो मरणार, दिगंबरमध्ये शाही खून असले तरी त्याचा प्रत्यक्ष उल्लेख न झाल्याने तो मरणार आणि प्राणकडे शाही खजिन्याचा नकाशाचे शाही रहस्य सोपवले असल्याने तो जगणार हे नक्की झाले.

2.2) मूर्ख राजाकडे नोकरी करू नये

कमल कपूर अशक्यप्राय मूर्ख दाखवला आहे. अमरीश पुरी राजवाड्यात येतो. त्याला ते लाकट हवे असते. कमल कपूर विचारतो की तुला कोणी सांगितलं, लगेच मागून दिगंबर सिंग म्हणतो की मी. त्या दिवशी तू मला ५००० रुपये द्यायला नकार दिलेला आता मला अमरीश पुरी 5 कोटी देणार आहे. थोडं गणित करूयात. सिनेमा १९८४ चा. यानंतर तरी पंचवीस तीस वर्षे निघून जातात (ही कमीच आहेत. प्रत्यक्षात धर्मेंद्र पन्नाशीचा दिसतो). दिगंबरला खजिन्याचा अर्धा हिस्सा मिळणार म्हणजे खजिन्याची तेव्हाची किंमत १० कोटी रुपये. सध्याच्या भावाने तरी ५०० कोटी रुपये. हा आकडा नंतर कामी येईल.

५००० हजार देऊन जे टाळता आले असते ते न टाळल्याचा मूर्खपणा लपवण्याकरिता कमल कपूर विषय दगाबाजीकडे वळवतो. त्यावर अमरीश पुरी म्हणतो "आज के जमाने में वफादारी की उम्मीद तो आजकल सिर्फ कुत्ते से की जा सकती हैं. फिर ये तो इन्सान हैं."

इथे मौका देख के संकलक चौका मारतो. कट टू वफादार प्राण. प्राण तिकडे राजकुमारच्या गळ्यात ते लाकट टाकून त्याला चेतक नावाच्या घोड्यावर बसवून जायला सांगतो. इथे राजकुमारचे नाव प्रताप ठेवून पोएटिक जस्टिस साधण्याची संधी दिग्दर्शक दवडतो. चेतकला एस पी साबचे घर ठाऊक असल्याने प्राण सर्वकाही समजावणारी चिठ्ठी देण्याचे काम घोड्याला सांगतो. घोडासुद्धा समजूतदारपणे मान हलवतो. मग राजकुमार आणि घोडा एस पी इफ्तेकारच्या घराच्या दिशेने पळतात. इथे प्राणच्या मुलाकडे घोड्याइतका समजूतदारपणा नसल्याने तो फक्त चड्डी घालून हिंडत असतो. मग प्राण त्याला राजकुमारचे भरजरी कपडे घालायला देतो.

इकडे लॉकेट देत नसल्याने लाखन आणि दिगंबर राजावर बंदूक ताणून उभे असतात. तेवढ्यात प्राण मध्ये पडतो. प्रजा का सबसे बडा खजाना कमल कपूर असल्याचे सांगून तो तसेच गरुडाच्या आकाराचे नकली लॉकेट देतो. कधीतरी महाराज आपल्याला त्यांच्या गळ्यातले लॉकेट देतील आणि ते शत्रूला हवे असू शकते म्हणून नकली लॉकेट बनवून ठेवावे एवढा अंतर्यामी प्राण असतो. म्हणून दिगंबर आपण राजा शूरवीर सिंगचेच बंधुराज असल्याचा पुरावा देत केवळ ते गरुडाच्या आकाराचे आहे म्हणून खरे लॉकेट असल्याचे छातीठोकपणे सांगतो. लाखन मात्र अधिक हुशार असल्यामुळे तो आधी नकाशा चेक करायचे ठरवतो. तेव्हा प्राण थातुर मातुर कारण देऊन ते टाळतो.

इथे कमल कपूर मूर्खपणा नंबर दोन करतो. अमरीश पुरीचे समाधान झालेले असल्याने तो घरी जायला निघालेला असतो तर विनाकारण कमल कपूर त्याच्या सोबत असलेल्या सुब्रतो महापात्रावर गोळी चालवतो. दिगंबर जरी शाही खानदानाचा असला तरी उपरोक्त नियमानुसार त्याच्यासाठी शाही उपसर्ग थेट प्रयुक्त झाला नसल्याने त्याला संरक्षण मिळत नाही आणि तो मरतो. इंटरेस्टिंगली कमल कपूरच्या दुनळी बंदूकीत दोन गोळ्यांची जागा असताना त्याने एकच गोळी भरलेली असते कारण तो एकच चाप ओढतो आणि एकाच गोळीचा आवाज होतो. जर दोन गोळ्या असत्या तर त्याला अमरीश पुरीला मारायचा चान्स होता. या सिनेमात अमरीश पुरी जरा उसुलों वाला व्हिलन असल्याने तो दिगंबरची शेवटची इच्छा (मेरे बेटे रणजीत को अपने बेटे की तरह पालें) तो पार पाडतो तसेच त्याने सांगितल्याप्रमाणे तो राजा आणि राजकुमारला मारायला तयार होतो. चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच की नाव रणजीत असल्यावर मोठा होऊन तो रणजीत खेरीज इतर कोणी होऊच शकत नाही.

"मिळाल्या मालकासी व्हावे प्रोटेक्टर" मंत्र असलेला प्राण एवढे सगळे होऊनही मध्ये पडतो. चाहो तो मेरी जान लेलो पर महाराज को छोड दो चा धोशा तो लावतो. तेवढ्यात प्राणच्या मुलाला राजकुमार समजून अमरीश पुरीच्या गँगमधला एक चिल्लर डाकू घेऊन येतो. महाराज ऐवजी राजकुमारचा बळी जाणार असे ठरते. प्राणही हे बलिदान द्यायला तयार होतो. अजूनही कमल कपूरला गप्प बसण्याचे सुचत नाही. तो म्हणतो की हा राजकुमार नसून प्राणचा मुलगा आहे. सुदैवाने अमरीश पुरीला त्या मुलाला "बाळा तुझे बाबा कोण ते सांगतोस का?" विचारायचे सुचत नाही. तो त्या मुलाला तलवारींवर नाचवून फेकण्याचा आदेश देतो. वफादार नोकराचा मुलगा असल्या कारणाने त्याचे जिस्म फौलादी असावे. कारण एकही तलवार त्याच्या पाठीत घुसत नाही. त्याला कॅच कॅच खेळल्यासारखे करून खिडकीतून खाली फेकतात. "आज जरा आडरस्त्याने जाऊयात" असा विचार करून चाललेल्या एका भटक्या दांपत्याच्या घोडागाडीत जाऊन नेमका तो पडतो. इथून तिथून, न जाणे कुठून आलेल्या घोडागाडीत पडलेला तो मुलगा पुढे जाऊन मिथुन होणार हे नक्की होते.

एवढे होऊनही कमल कपूरचे समाधान होत नाही. तो एक सुरा फेकून अमरीश पुरीला मारतो. त्याने खांद्याला किरकोळ जखम होण्यापलीकडे काही होत नाही. मग मात्र बिचार्‍याचा निरुपाय होतो आणि तो एकदाचा कमल कपूरला गोळी घालतो. कमल कपूर हार्ट अ‍ॅटॅक आल्याचा अभिनय करून मरतो. इकडे भर उन्हात बिन चार्‍याचे पळवल्याबद्दल चेतक राजकुमारला नदीत पाडतो. शेवटी वफादारी की उम्मीद फक्त कुत्तोंसे की जा सकती हैं घोडोंसे नही. सर्वकाही लक्षात आल्यानंतर अमरीश पुरी प्राणला बांधून फटके देत असतो. प्राणची जुबान काटण्याची धमकी दिल्यानंतर प्राण म्हणतो की मेरी जुबान के दो टुकडे करोंगे तो आवाज दुगुनी होगी, चार टुकडे चौगुनी. प्राणच्या हे लक्षात येत नाही की तुकडे जीभेचे होणार आहेत, स्वरयंत्राचे नाहीत. फार फार तर तो दुप्पट बोबडा किंवा चौपट बोबडा होऊ शकतो. अमरीश पुरीला मात्र एव्हाना या लोकांचा मूर्खपणा असह्य झालेला असतो. त्यात राजकुमार आणि लॉकेट निसटल्यामुळे तो आधीच त्रासलेला असतो. इतके होऊन सुद्धा तो फक्त प्राणचा उजवा हात कापून त्याला सोडून देतो. मूर्ख मित्रापेक्षा शहाणा शत्रू परवडला याचे यापेक्षा अधिक चांगले उदाहरण ते काय?

२.३) घोड्याने पाडले, ससाण्याने तारले

इफ्तेकार प्राणची चौकशी करायला राजवाड्यावर येतो. कधीतरी कमल कपूरने व्यक्त केलेल्या इच्छेनुसार आपल्या मुलीचे, सीमाचे लग्न मोठे झाल्यावर राजकुमारशी लावून द्यायचे मान्य करतो. तेव्हा कळते की राजकुमार इफ्तेकारकडे पोचलाच नाही. मग तो गेला कुठे? बाकी सर्वांनी हलगर्जीपणा केला असला तरी शमशेरने केलेला नसतो. इतका वेळ ठिपकेदार गरुड असलेला शमशेर अचानक बहिरी ससाणा बनतो आणि आजूबाजूला कुठेही मंदिर नसताना पूजेची थाळी घेऊन फिरत असलेल्या आशालताचे लक्ष वेधून घेतो. नदीत वाहत आलेला राजकुमार आशालताला सापडतो आणि ती त्याचा सांभाळ करण्याचे मान्य करते. सहसा कंटिन्यूटी मिस्टेक्स कपड्यांमध्ये होतात. इथे पक्ष्यांमध्ये झाली आहे.

३) वेस्टर्न सिनेमा बनवण्यासाठी दिलवाले नायक हवेत

३.१) धनाच्या पेटीपाशी चावरे विषारी नाग असलेच पाहिजेत.

असा हा राजकुमार मोठा होऊन धर्मेंद्र बनतो. गळ्यात असलेल्या लॉकेटमुळे लगेच त्याची ओळख पटते. तिथल्याच कुठल्यातरी जंगलात तो खड्डा खणत बसलेला असतो. कुठून तरी त्याला कळलेले असते की इथे खजिन्याची पेटी गाडलेली आहे. इथे आपल्याला कळून चुकते का हा सिनेमा वेस्टर्नच्या अंगाने जातो. वेस्टर्नमध्ये सर्वजण एक्स्प्लोरर्स असतात. त्यांना घोडेस्वारी करणे, गाडलेले खजिने शोधणे आणि गाणी म्हणणे याशिवाय काही उद्योग नसतात. तसेच प्रत्येकजण बंदूक चालवण्यात वाकबगार असावाच लागतो. इथे रॉय रॉजर्स, जीन ऑट्री वगैरेंच्या जागी धर्मेंद्र असणार हे निश्चित होते. वेस्टर्नला साजेशी हॅट आणि गळ्याला रुमालही असतो. पेटी घेऊन धर्मेंद्र निघणार इतक्यात तिथून चाललेला मिथुन ती पेटी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. चेक्सचा शर्ट, मळकट रंगाची हॅट बघून वेस्टर्न्स मधली दुय्यम हिरोची भूमिका याच्या वाटेला आली आहे हे निश्चित होते. थोडी मारामारी झाल्यावर लाक्षणिक रित्या मिथुनला धर्मेंद्र खड्ड्यात जा म्हणतो. म्हणजे लाथ मारून वेगळ्याच एका मोठाल्या खड्ड्यात पाडतो. हमरस्त्याने जायचे सोडून त्याला दोन दगडांमधल्या चिंचोळ्या वाटेतून जाण्याची हुक्की येते. आपल्या निवासस्थानापाशी झालेल्या आवाजामुळे एक नाग (खराखुरा) वैतागून बिळातून बाहेर येतो. त्रासलेला तो बिचारा जीव धर्मेंद्राला डसण्याचा प्रयत्न करतो तर मिथुन मध्ये येऊन त्याचा (धर्मेंद्राचा, नागाचा नव्हे) जीव वाचवतो.

मिथुन गारुड्यांमध्ये वाढलेला असल्याने निवांतपणे स्वतःच्याच जखमेतून विष चोखून थुंकून टाकतो. तो हे इतक्या निवांतपणे करतो की त्या नागालाही "काय ते दिवस होते, एका फूत्कारात माणसे मरायची. नाहीतर आता च्युईंग गम प्रमाणे चघळून विष थुंकणारी माणसे यायला लागली आहेत" वाटल्याखेरीज राहिले नसावे. इथे धर्मेंद्राचे नाव शंकर आणि मिथुनचे नाव सांगा असल्याचे स्पष्ट होते. मिथुन मोठ्या अभिमानाने त्याला आपल्या पाठीवरच्या तलवारीच्या खुणा दाखवतो आणि आपण प्राणचा मुलगा असल्याचे प्रेक्षकांना कळवतो. प्रत्यक्षात गंज लागलेल्या तलवारींमुळे रॅश आल्यासारख्या त्या जखमा दिसतात. याने धर्मेंद्राला भलतेच वाईट वाटते आणि तो सापडलेल्या धनाचा अर्धा हिस्सा मिथुनला देऊ करतो.

अशा सिनेमांत एक तिसरे पात्र सुद्धा लागते. सहसा हे नेटिव्ह अमेरिकन किंवा मेक्सिकन, म्हणजे हिरोपेक्षा ड्रॅस्टिकली वेगळे दिसणारे लागते. इथे डॅनीची वर्णी लागली आहे. डॅनीचे नाव डॅनीच असते. त्या पात्रांच्या नियमांनुसार डॅनी सुरेफेक करण्यात आणि कुलुपे तोडण्यात निष्णात असतो. डॅनी येऊन तीन हिश्श्यात वाटणी करण्याचा सल्ला देतो. तो सल्ला धुडकावून ते दोघे आधी दगड मारून, नंतर बाँबच्या मदती ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करतात. अखेर हार मानून ते डॅनीची ऑफर स्वीकारतात. डॅनी अत्यंत सहजतेने ती पेटी उघडतो. त्यात शंभरच्या नोटा, सोन्याची बिस्किटे आणि दागिने पाहून हा खजिना नसून स्मगलिंगचा माल असल्याचे आपल्याला कळते. हा माल ज्यांचा असतो ते लोक हा माल घ्यायला येतात. मग धर्मेंद्राला युक्ती सुचते आणि तो डॅनीला ती पेटी बंद करायला सांगतो.

३.२) मुलांची फाजील कौतुके केल्यास त्यांच्याच्याने एक काम धड होत नाही

पुढच्या सीनमध्ये कळते की तो माल अमरीश पुरीचा होता. इतक्या वर्षांमध्ये त्याचे डाकू मधून स्मगलरमध्ये प्रमोशन झाले आहे. रणजीतही मोठा होऊन रणजीत झाला आहे. रणजीत ती उपरोक्त पेटी घेऊन परत आलेला असतो. मिळालेली वस्तु योग्य आहे का नाही हे चेक न करण्याची सवय वडलांकडून रणजीतला मिळालेली असते. त्यामुळे तो पेटी न उघडताच घेऊन आलेला असतो. सोबत सुजितकुमार आणि मॅकमोहन पण असतात. या तिघांना हॅट दिलेल्या आहेत. आणखी पण एक कोणी फरकॅपवाला असतो ज्याच्या हातात काही कारणाने बिगुल दिलेले आहे. याला फक्त "बाप का बेटा, सिपाही का घोडा, बहुत नही तो थोडा थोडा" हा डायलॉग मारण्यासाठी ठेवलेलं आहे. अमरीश पुरी उगाचच रणजीतचे कौतुक करतो. रणजीतही अंजानगढ चा खजिना शोधून काढण्याच्या वल्गना करतो. ती पेटी डॅनीने बंद केलेली असल्यामुळे ती काही उघडत नाही. मग रणजीत ब्लोटॉर्चने तिचे झाकण तोडतो. झाकण उघडण्यापूर्वी शँपेन उघडली जाते आणि झाकणावर ग्लास भरले जातात. शँपेन आवडत असल्याने आत बंद केलेला नाग "घोटभर शँपेन मलाही द्या की" करून बाहेर येतो आणि फालतू कामाचा दर्जा अमरीश पुरीला कळून चुकतो.

३.३) घोड्यावरून प्रवास करताना गाणे व्हायलाच पाहिजे

१९४०-१९५० च्या वेस्टर्नचे बलस्थान होते त्यांच्या रेंजर हिरोंनी म्हटलेली गाणी. एका जीन ऑट्री एपिसोडमध्ये तर अर्ध्या तासाच्या एपिसोडमध्ये १० मिनिटाचे गाणेच होते. इथे तर बॉलिवूड वेस्टर्न आहे. हिरोंना यशश्री प्राप्त झालेली आहे. मग गाणे झाले नसते तरच नवल! तिघेही आपले घोडेस्वारीचे कसब दाखवत गाणे म्हणू लागतात "हम दिलवाले, सारी दुनिया से निराले, हम जैसा कौन हैं?" गाणे संपल्यावर धर्मेंद्राच्या घोड्याने "ओझे वाहायला मी गाढव वाटलो का रे?" हा प्रश्न प्रमोद चक्रवर्तीला नक्की विचारला असावा. डॅनीवर क्लोजअप मारून त्याचे त्रिकालदेवलाही खुश करू शकणारे हास्य बघण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. गाण्याच्या कडव्याच्या ओळी मोठ्या मनोरंजक आहेत "हम दोस्त नही हम भाई हैं, इस दौर के हातिमताई हैं" (मागून जितेंद्र कुजबुजतो, हातिमताई मी तू धरम) सतत "हम जैसा कौन हैं" विचारल्यामुळे सूर्याला सुद्धा कंटाळा येतो आणि तो अस्ताला जातो. रात्रीची विश्रांती घ्यावी म्हणून माळरानात घोडे पळवत असणारे ते तिघे थांबतात आणि गाणे संपते.

इथे माझा अल्पविराम. उरलेली चिरफाड प्रतिसादांत.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

>>हेही कळते की प्राणचे डोळे जखमांमुळे जाता जाता वाचले. पण त्यावर पट्टी बांधल्यामुळे तो भाभूचा चेहरा बघू शकत नाही आणि तो वाचतो.

मेलो मेलो Lol

७) हिरो हिरवीण जोवर एकत्र नाचत नाहीत तोवर त्यांची जोडी जुळत नाही

७.१) अजब गजब स्पर्धा
चोरी ऑफस्क्रीन होते. आमच्या सूत्रांचा अंदाज आहे की हा प्रसंग फारच थरारक असल्याने कमकुवत हृदयांच्या प्रेक्षकांचा विचार करून तुनळीवर टाकलेल्या आवृत्तीतून वगळला असावा. आता चोरी झाली याची बातमी अमरीश पुरीला मिळायला हवी. अमरीश पुरी आणि इफ्तेकारला कोण्या एका इंटर कॉलेजिएट कल्चरल काँपिटिशनला पाहुणे म्हणून बोलावलेले असते. प्रमुख पाहुणा म्हणून इफ्तेकार असतो तर बक्षीस देणारा पाहुणा अमरीश पुरी. हा सिनेमा चतुर्मिती अवकाशात घडत असल्याचा पुरावा म्हणून स्टेजवर त्या दोघांच्या मागच्या पडद्यावर "हॅपी न्यू इअर" अशी थर्माकोलची इंग्रजी अक्षरे लावलेली आहेत. या प्रसंगाचे चित्रण वास्तववादी करायचे असल्याने प्रमुख पाहुण्याचे भाषण सुरु असताना सुद्धा लोक आपापल्या जागा शोधत फिरत असतात. इफ्तेकार सांगतो की विनरला क्राऊन ऑफ द इअर मिळेल. इफ्तेकार अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याने हा क्यू घेऊन कोणी एक इन्स्पेक्टर बेधडक स्टेजवर येतो, सॅल्यूट ठोकतो आणि विजयमुकुट चालत्या ट्रेनमधून मंकीहिलजवळ चोरीला गेल्याची बातमी सांगतो. हे सर्व संभाषण चालू माईकजवळ होत असूनही फक्त अमरीश पुरीलाच ऐकू जाते. इफ्तेकार "मेरी जगह आप संभाल लिजिए" करून निघून जातो.

पुढच्या सीनमध्ये कळते की चोरी करण्यात धर्मेंद्र यशस्वी झाला असून तो नेमका या स्पर्धेच्या ठिकाणीच आलेला आहे. तो मुकुट बास्केटबॉल असल्यासारखा धर्मेंद्र निवांतपणे आपल्या काखेत धरून आय जी इफ्तेकार आणि बक्षीसाचा मुकुट घेऊन आलेल्या शोमा आनंद-रणजीतचे बोलणे ऐकतो. इफ्तेकार त्या दोघांना सांगतो की काही काम आलं आहे तर मी चाललो. धर्मेंद्र इफ्तेकारच्या जीपच्या मागे लपलेला असल्याने तो इफ्तेकारला दिसत नाही. इफ्तेकार जीपच्या फोनवर मोठमोठ्याने ओरडून सांगतो की पोलिसांना कळले आहे की मुकुट घेऊन चोर पाण्यात उडी मारून पळाला आहे आणि त्याने नारिंगी रंगाचा बॉयलर सूट घातला आहे. नाकाबंदी करा वगैरे रुटीन सूचना देऊन तो निघून जातो. हे सर्व बोलणे ऐकून धर्मेंद्राला आजवर कोणालाही न सुचलेली कल्पना सुचते. विजयमुकुट आपण या स्पर्धेच्या मुकुटासोबत बदलूयात आणि नंतर त्या स्पर्धेच्या विनरकडून तो मुकुट परत मिळवू.

या स्पर्धेचे स्टेजही सिनेमाच्या भूगोलाप्रमाणेच असल्यामुळे या मिनिटाभरात ते पूर्णपणे बदललेले असते. स्पर्धा वगैरे गेली तेल लावत, बारा वाजत आलेले असल्याने नवीन वर्षाचे स्वागत व्हायला हवे. निवेदकाला याची जाणीव असल्याने तो अस्खलित उर्दूमध्ये "नया और पुराना" या थीमवर एक परफॉर्मन्स सादर होत असल्याची घोषणा करतो. स्टेजवर चंदेरी ड्रेस घातलेली झीनत अवतरते आणि लगेचच गाणे सुरु होते "सच कहता हैं ये सारा जमाना नया नया होता हैं पुराना पुराना". इथे झीनत अमान बघून बहुधा इतर मुली "आता कसली होते आहे स्पर्धा" म्हणून घरी निघून तरी गेल्या असाव्यात किंवा ब्याकग्राऊंड ड्यान्सर बनल्या असाव्यात. स्टुडंट ऑफ द यिअर मधली डान्सची स्पर्धा निश्चितपणे या स्पर्धेवरून उचलली आहे कारण दोन्ही स्पर्धांमध्ये कोण कशासाठी नाचत आहे हे काही कळत नाही. बॅकस्टेजला सगळा गलथान कारभार असल्यामुळे धर्मेंद्र लगेच वेषांतर करून झीनतसोबत नाचायला म्हणून येतो. झीनत "नया" तर धर्मेंद्र "पुराना" गटाचे नेतृत्व करणार असे ठरते आणि हे नृत्यकुशल लोक जमेल तसे नाचतात. आता धर्मेंद्र मिशी लावून आलेला असल्याने त्याला प्रेक्षकात बसलेला अमरीश पुरी ओळखत नाही हे जरी समजून घेतले. तरी झीनत अमानला ठरलेल्या पेक्षा वेगळा डान्स पार्टनर आला आहे याचे आश्चर्य का वाटत नाही हा गहन प्रश्न अनुत्तरित आहे.

इकडे गाण्याचे शेवटचे कडवे सुरु होते आणि थोड्या अधिक सस्पेन्सची गरज भासते. १९८४ सालामध्ये अमरीश पुरीकडे केबल जोडण्याची गरज न पडणारा टेलिफोन असतो. त्याच्यावर त्याला प्रीति सप्रूचा फोन येतो. ती सांगते की जँगोला गंडवून एक लाल बॉयलर सूटवाला मुकुट घेऊन पळाला. रणजीतकडे दिव्यदृष्टी असल्याने त्याला बॅकस्टेजला जाऊन शोधाशोध करायचे सुचते आणि त्याला तो बॉयलर सूट सापडतो. क्षणार्धात त्याला सर्व परिस्थिती समजते. मग तो स्वतः लाल बॉयलर सूट घालून हिंडायला लागतो, जेणेकरून खर्‍या चोराचे लक्ष वेधले जावे आणि तो सापडावा. पण तोवर उशीर झालेला असतो. गाणे संपते आणि झीनत अमानला अमरीश पुरी विनर डिक्लेअर करतो. इथे तिचे नाव सीमा असल्याचे कळते. तिला जेव्हा मुकुट द्यायची वेळ येते तेव्हा त्याला कळते की अरे यह तो विजयमुकुट हय. तो विंगेतल्या रणजीतला डोळ्याने इशारा करतो. झीनतच्या डोक्यावर मुकुट ठेवताच दिवे जातात.

७.२) हिरोने हिरवीणची इज्जत वाचवली नाही तर काय त्या हिरोपणाला अर्थ आहे?

आपल्याला कळते की मुकुटासकट झीनतला घेऊन धर्मेंद्र पळालेला असतो. त्याने मिशी काढल्यावर ती धर्मेंद्राला ओळखते. धरमपाजी अत्यंत स्पष्टपणे सांगतात की मुकुट आणि गाडीच्या चाव्या दे. मग तू तुझ्यावाटेने जा मी माझ्या वाटेने जातो. पण भलाई का जमाना नसल्याने झीनत उगाचच वेळकाढूपणा करते आणि ही संधी बघून रणजीत आपल्या लोकांसोबत येऊन मुकुट हिसकावतो. त्याने एक आवाज देतात आजूबाजूचे बघे भारतीय जनतेचे आद्य कर्तव्य करायला पुढे सरसावतात - कोणीतरी उचकावल्यानंतर गर्दी करून एकट्या दुकट्या व्यक्तीला बदडणे. झीनत रणजीतला म्हणते की हा मुकुट मला दे, मी तो पोलिसांना नेऊन देते. रणजीत हसतो. आपल्या लोकांना काहीतरी बोनस देण्याची कॉर्पोरेट प्रॅक्टिस माहित असल्यामुळे तो झीनतला त्यांच्या हवाली करतो आणि स्वतः मुकुट घेऊन घरी जायला निघतो.

बिचार्‍या बघ्यांच्या दुर्दैवाने "गठ्ठ्याने बडवला जाणारा माणूस दिसतो कसा" हे बघायला तिथे प्राण अवतरतो. प्राण व्यवधान उत्पन्न करून धर्मेंद्राला पळून जायची संधी देतो. इथे नोंद घ्यावी की प्राणला ते लोक धर्मेंद्र चोर आहे हा खुलासा करतात. त्यामुळे आता धर्मेंद्र चोर आहे अशी त्याची समजूत झालेली आहे. मग धर्मेंद्र धावत जाऊन रणजीतला गाठतो. मुकुट आणि रणजीतची गाडी हस्तगत करून झीनतला घेऊन पळालेल्या गुंडांचा पाठलाग करू लागतो. हा पाठलाग बहुधा पाच-सहा तास चालतो कारण मध्यरात्री झीनतला विनर डिक्लेअर केल्यानंतर जेव्हा धर्मेंद्र तिला वाचवतो तोवर पहाट झालेली असते. तोवर त्या फुटकळ गुंडांच्या जीभेवर सरस्वती नाचते. "मौत तुम्हे गले लगा ले, इससे पहले मुझे तुम्हे गले लगाने दो" हा एक नमुना. पूर्वी देव लोक वरून पुष्पवृष्टी वगैरे करत असत. इथे धर्मेंद्राच्या पराक्रमावर खुश होऊन ते जलवृष्टी करतात. पावसात धर्मेंद्र त्या गुंडांना बडव बडव बडवतो. तेही त्याला जखमी होण्या इतपत फटकावतात. मुलींनी मागे का राहावे म्हणून झीनतही गुंडांची थोबाडे रंगवते. आणखे गुंड येण्याची शक्यता असल्याने धर्मेंद्र झीनतला मुकुट घेऊन पळून जायला सांगतो आणि स्वतः बेशुद्ध होतो. त्याच्या गाडीत मुकुट बघून झीनतच्या डोक्यात ट्यूब पेटते की हा मुकुट घेऊन पळून जाऊ शकत होता. पण तरी याने आपली इज्जत वाचवण्याला प्राधान्य दिले. सूज्ञ प्रेक्षकांना लगेच समजते की तकरार स्टेज पूर्ण झाली असून आता प्यार की बारी आहे आणि झीनी बेबी पाजींना उपचारांकरिता घरी घेऊन जाणार आहे.

स्वस्तातली, मळकट फेदोरा असल्यामुळे त्याच्या हेंचमनचे स्टेटसवर शिक्कामोर्तब होते.हे कळले नाही >> जुनाट सिनेमांमध्ये, खासकरून ६० च्या दशकातल्या फ्रेंच आणि इटालियन सिनेमांमध्ये माफियांचे एन्फोर्सर्स तशा टोप्या घालत असत.

काल तो चित्रपटातील सर्वात अभिनयप्रधान सीन पाहिला. धरम च्या ऐवजी रणजित लॉकेट घालून येतो आणि अमरीश पुरी धीरगंभीर रडका चेहरा करून खुलासा करतो की ये उसका बेटा नही है! रणजित आणि अमरीश दोघांचाही अभिनय खतरनाक आहे Happy

विशेष म्हणजे रणजितही खरे म्हणजे वंशज असतोच ना? म्हणजे लॉकेट का असली हकदार तो ही आहेच

विशेष म्हणजे रणजितही खरे म्हणजे वंशज असतोच ना? म्हणजे लॉकेट का असली हकदार तो ही आहेच >> म्हणून तर तो शाही संकल्पनेचा सेक्शन लिहिला आहे Happy रणजीतला इतर कोणी शाही वंशज/खून म्हणून संबोधत नाही. त्यामुळे त्याला "शाही" चे संरक्षण आणि फ्रिंज बेनेफिट्स मिळत नाहीत.

मला डॅनी च्या कॅरेक्टरबद्दल सहानुभूती वाटते. आपल्याला एखादा जुना हापिसातील सहकारी ४-५ वर्षांनंतर एकदम समोर आला तर फॅमिलिअर वाटतो आणि मग हा नक्की कोण आहे हे डोक्यातल्या डोक्यात शोधावे लागते तसे याला आजन्म होत असेल. एकदा बघितलेला चेहरा विसरणार नाही म्हणजे साधे रस्त्यावरून जाताना - "अरे हा तिसरीत आपल्या वर्गात होता, हा कालसुद्धा आपल्याच बसला होता, हा काल त्या रस्त्यावर तिकडे दिसला होता, या साइड व्हिलन ला आपण कालच मारले होते, हा काल ग्रोसरी घेताना बाजूला उभा होता त्याच्यासारखाच दिसतो पण तो नसावा..." असल्या विचारांचा सामना करत जगावे लागत असेल Happy

कोठे एका बाजूला धरमपाजींनी केवळ हॅट बदलल्याने त्याला न ओळखणारे लोक आणि कोठे डॅनी Happy

८) हिरोंना डेथ ट्रॅपमधून वाचता येत नसेल तर त्यांच्या हिरोपदाला काय अर्थ आहे?

८.१) प्रियकरासोबत जलक्रीडा करत असाल तर जास्त खोलात जाऊ नका, बुडाल.

धर्मेंद्र शुद्धीवर येतो आणि स्वतःला कॅमेर्‍यात गराड्यात सापडतो. इफ्तेकार त्याला सांगतो की आत्ता तो त्याच्या घरी आहे आणि हे फोटो पेपरात छापण्यासाठी काढले जात आहेत. झीनतने खोटेच सांगते की धर्मेंद्राने जीवावर उदार होऊन चोरांकडून मुकुट परत मिळवला. इफ्तेकार त्याचे कौतुक करतो आणि कामाला निघून जातो. जाता जाता तो झीनतला धर्मेंद्राची काळजी घ्यायला सांगतो. धर्मेंद्र निरागसपणे इफ्तेकार कोण याची विचारपूस करतो. आपला डाव पोलिसाची मुलगी आहे हे स्पष्ट होताच त्याच्या घशाला कोरड पडते. घरातले मिनरल वॉटर त्याला पचत नसल्यामुळे तो झीनतला पाणी आणायला पाठवून पळ काढायला बघतो. झीनतला किरकोळ गोष्टीत पिस्तुल काढायची सवय असल्याने तो प्रयत्न असफल होतो. गेल्या वेळेस तिचे लक्ष विचलित करून पिस्तुल हिसकावण्याची युक्ती यावेळी कामी येत नाही आणि ती धर्मेंद्राला घेऊन दिवाणखान्यात येते. तिथे भल्या मोठ्या डायनिंग टेबलवर साग्रसंगीत मेजवानीचा बेत मांडून ठेवलेला असतो. झीनत त्याला स्वतःच्या हातांनी जेवू घालणार असे डिक्लेअर करते आणि प्रश्न मिटवते.

सर्व जोड्यांचे प्रश्न इतके सोप्पे नसल्याकारणाने मिथुन आणि शोमा आनंद अजूनही अमरीश पुरीला पटवू शकलेले नसतात. सरोवर ते समुद्र यापैकी काहीही म्हणून खपू शकणार्‍या जलस्त्रोतात ते मोटरबोटीतून विहार करत असतात. शोमा आनंदची कचाकड्याची टोपी घातली आहे तर मिथुन तिला टोपी घालणार असल्याने स्वतः टोपी घालून आलेला नाही. मिथुन तिला विचारतो की तुला लग्न करून माझ्यासोबत राहायचे आहे का नाही? शोमा म्हणते हो. मिथुन त्यावर म्हणतो की मग तू माझ्यासोबत आत्महत्या करायला का तयार होत नाही आहेस?.
........ वेल दॅट एस्केलेटेड क्विकली!
शोमाचे उत्तरही कहर आहे. ती आत्महत्या करायला तयार नसते कारण तिला भीति वाटत असते. मिथुन वैतागून पाण्यात उडी घेतो. अमरीश पुरीला भूत बनून झपाटणार असे सांगून, आपण पाण्याखाली तिची वाट पाहू असे सांगून मिथुन डुबी घेतो. भावुक स्वभावाची शोमाही पाठोपाठ उडी घेते. तिला पोहता येत नसल्याने मिथुन तिला वाचवतो. प्रेमी जीवांमधली किरकोळ वादावादी झाल्यानंतर शोमा म्हणते की अमरीश पुरीने मिथुनला उद्या तिच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये बोलावले आहे. सोबत धरमपाजी आणि डॅनीलाही बोलावले आहे. नाव आशा असल्याने ती भलतीच आशावादी असते. तिला वाटत असते की उद्या अमरीश पुरी दोघांच्या साखरपुड्याची घोषणा करणार आहे. इकडे अमरीश पुरीच्या डोक्यात वेगळेच विचार घोळत असतात.
हातात दोन पिस्तुले घेऊन अमरीश पुरी डोळे वटारून बसलेला असतो. सोबत मॅकमोहन, सुजित कुमार आणि जँगो आहेत. मग तो प्रत्येकाला का मारणे आवश्यक आहे हे त्या तिघांना समजावतो. मिथुन - कारण त्याने अमरीशच्या मुलीला गटवले, धर्मेंद्र - कारण त्याने विजयमुकुट अमरीशला मिळू दिला नाही आणि डॅनी - कारण डॅनीने जँगोला ओळखले. या विषम कारणाकडे प्रेक्षकाचे लक्ष वेधले जाऊ नये म्हणून तो अप्रतिम अ‍ॅक्सेंटमध्ये इंग्रजी फाडतो - दॅट बास्टर्ड हॅज गॉट ए फोटोग्राफिक मेमरी (डायलॉग डिलीव्हरी ऐकण्यासारखी आहे). मग तो ती दोन पिस्तुले मॅकमोहन आणि सुजित कुमारला देतो आणि पार्टीमध्ये या तिघांना मारण्याचा आपला मनसुबा स्पष्ट करतो.

८.२) रात्र रात्र जागरणे करायची तर करा, पण इतरांना झोपू द्या.

वाढदिवसाच्या पार्टीत हे लोक येतात. तिथे मॅकमोहन हातावर प्लास्टर चढवून त्याच्यात आणि सुजित कुमार काठीत बंदूक लपवून तयारीत थांबतात. अमरीश पुरीही मिथुनला आशीर्वाद वगैरे देऊन नाटक छान वठवतो. ऐनवेळी कोणी गायक न मिळाल्याने प्रीति सप्रू ऑर्केस्ट्रात उभी राहून गाऊ लागते. "आज की रात रातभर जागेंगे". तिने फेदर बोआ, अर्थात पिसांची ओढणी, घातल्यामुळे ती गायिका आहे हे सर्वांना पटते. दोन जोड्या नृत्यास्वाद घेऊ लागतात. मग डॅनी मोंटूसोबत येतो. त्याच्याशी यांना काही घेणं नसतं. त्यांचं आपलं चालू आहे "हम इतनी जल्दी सुबह ना होने देंगे, सोयेंगे हम ना औरों को सोने देंगे" - अ‍ॅड्व्हान्स्ड प्लानिंग वाल्या जोड्या आहेत. आपण आपले काम करत आहोत दाखवावे म्हणून मध्ये मध्ये मॅक आणि सुजित नेम साधण्याचा प्रयत्न वगैरे करतात. इकडे डॅनीला अजूनही अमरीश अंडरएस्टिमेट करत असतो. तो वाईनचा पहिला ग्लास संपायच्या आत प्रीतिला ओळखतो - अरे ही तर तीच बाई जी मिसेस जँगो डिकॉस्टा म्हणून त्यादिवशी आपल्याला भेटली होती. मग आपले सॅक्सोफोनचे कौशल्य दाखवून तो एक कडवं सप्रूबाईंसोबत नाचून घेतो. त्यानंतर तिला जँगोचा विषय काढून कन्फ्रंट करतो. दक्ष व्हिलन अमरीश पुरी हे बघून त्याचे लक्ष डायव्हर्ट करतो आणि प्रीति काढता पाय घेते.

८.३) क्लोरोफॉर्म फवारताना कॅमेर्‍याचा आडोसा घ्यावा. अशाने तुम्ही स्वतः बेशुद्ध होणार नाही

क्षणार्धात टेलिपोर्ट होऊन प्रीति पद्मिनीतून तर आपले तीन हिरो अँबॅसेडर मधून आधी हायवे गाठतात. मग थोडावेळ घाटातून पाठलाग केल्यानंतर डॅनीकडे ओव्हरटेक करण्याचे अतुलनीय कौशल्य असल्याने ते तिला पकडण्यात यशस्वी होतात. हा पाठलाग किमान बारा तास चालला असला पाहिजे कारण रात्रीच्या पार्टीनंतर हिला पकडेपर्यंत दुपार झालेली असते. ते तिला जँगोविषयी विचारतात. तर हे लोक तिला कुठे पकडणार हे दिव्यदृष्टीने कळलेला जँगो तिथे येऊन त्यांची वाटच बघत असतो. जँगो त्यांच्या अँबॅसेडरची पुरती नासधूस करतो पण बाकी फार काही त्याला करता येत नाही. ते तिघे त्याच्यावर हावी होत आहे असे बघून प्रीति पटकन गाडीतून कॅमेरा आणि स्प्रे घेऊन येते. स्प्रे फवारताच लोक बेशुद्ध व्हायला हवेत या पुरातन लॉजिकनुसार ते बेशुद्ध होतात. मग ती जँगोच्या मदतीने त्यांना रेल्वे ट्रॅकला बांधते आणि पुराव्यादाखल त्यांचे फोटो काढते. या रेल्वे सीनमधला ब्लूपर आणि इथे झालेले ट्रोप सबव्हर्जन याविषयी फारएण्डची टिप्पणी अवश्य वाचणे.

अमरीश पुरी भयंकर खुश होतो आणि त्यांना पैसे देतो. प्रीति त्याला पुराव्याचा फोटो दाखवते. त्यावर तो मोठ्या कॉन्फिडंटली "सबूत जमा करना पुलिस का काम हैं और सबूत मिटाना हमारा काम हैं" म्हणून तो फोटोला लायटरने पेटवतो. फोटो जळणार एवढ्यात त्या अल्ट्रा एचडी, झूम एनेबल्ड फोटोमध्ये अमरीश पुरीला धर्मेंद्राच्या गळ्यातले लॉकेट दिसते. बराच वेळ हा "ये जँगो जँगो क्या हैं, ये जँगो जँगो?" ट्रॅक चाललेला असल्याने आता जागीरवर पुन्हा गोष्ट आणायची वेळ झाली आहे हे आपल्याला कळते. इकडे पायाने काचेचा तुकडा उडवून दातात पकडण्याचे आणि मग दातात ती काच धरून दोरी तोडण्याची कला धर्मेंद्राला आत्मसात असल्याने हे तिघे वाचतात. अमरीश पुरी लागोलाग फादरचा वेष धारण करून तिथे पोहोचतो. पण ते लोक तोवर निघून गेलेले असतात. जँगो म्हणतो कि त्यांना कावळ्यांनी खाल्ले असेल. अमरीश म्हणतो कि परत असा मूर्खपणा केला तर तुला कुत्रे खातील. ते तिघे जरी सापडले नसले तरी अमरीश पुरीला दोन महत्त्वाच्या गोष्टी कळतात - १) लॉकेट कोणाकडे आहे, २) ते तिघे जिवंत आहेत.

धन्य!! Biggrin

फारएन्डचीही जोरदार बॅटिंग सुरू आहे. Rofl

@पायस,
वाईट हसायलोय...कमाल लिहीताय..येवू द्या पुढची चीरफाड... Wink

९) हिरो म्हणून फारच काम पडल्यामुळे डॅनी व्हिलनगिरीकडे वळला असेल काय?

९.१) आले हिरॉईन्सच्या मना तिथे कोणाचे चाले?

अमरीश पुरी जाऊन रणजीतला सांगतो की हे बघ लॉकेट धर्मेंद्राकडे आहे. रणजीत म्हणतो की मी २४ तासांच्या आत धर्मेंद्राला जिवंत किंवा मृत आणून दाखवेल. तर अमरीश पुरी धर्मेंद्राला शाही कफन देणार असल्याची घोषणा करतो. व्हिलन साईडला कामाची वाटणी झाली असली तरी हिरो साईड अजूनही गोंधळलेलीच असते. तिन्ही हिरो आणि दोन्ही हिरवीणी एका हॉटेलात खायला आलेले असतात. लिली, जँगो आणि पाद्री या तिघांचे रहस्य त्यांच्यासाठी दिवसेंदिवस गडद होत आहे हे दर्शवण्याकरिता डॅनी पद्मिनीच्या (पक्षी: गाडी, कोल्हापुरे नव्हे) चित्रावर शेडिंग करत बसलेला असतो. त्याची मेमरी फोटोग्राफिक असली तरी चित्र फारच सुमार काढतो. हिरविणी मात्र नॉट इंप्रेस्ड मोडमध्ये असतात. लिली, जँगो आणि पाद्री शिवाय बोलायला विषयच नसल्यामुळे बिचार्‍या कंटाळलेल्या असतात. शोमा तर भलतीच संतापते आणि फणकार्‍याने तरातरा निघून जाते. डायनिंग हॉलमधून बाहेर पडते तर थेट जाऊन एका बुरखा घातलेल्या बाईला धडकते. तिचा मियां लंबाचौडा डायलॉग मारतो. तो डायलॉग इतका फालतू असतो की तो सुरु होण्याआधीच त्याचा मुलगा एंट्री घेण्याच्या तयारीत विंगेत उभ्या असलेल्या झीनतकडे टक लावून बघत असतो. या प्रसंगाचे महत्त्व थोड्याच वेळात स्पष्ट होते.

इकडे डॅनीला काय करायचे ते कळलेले असते. तो म्हणतो की ती निळी फियाट (पद्मिनी फियाटने लायसेन्स केली होती, सो हे ठीकच आहे) शोधली की लिली मिळेल. पण आता ही ब्लू फियाट शोधायची कशी? सुदैवाने डॅनीकडे फोटोग्राफिक मेमरीच नाही तर झूम एनेबल्ड डोळे पण असतात. त्यामुळे त्याला हे दिसते की या फियाटचा नंबर एम एम यू ७९३८ आहे, डाव्या बाजूची बॅकलाईट फुटलेली आहे, नंबरप्लेटच्या उजव्या बाजूला घोड्याचा नाल आहे आणि मागच्या खिडकीपाशी रंगीत ब्रेकलाईट्स आहेत. चालत्या गाडीतून हे सगळेच बघू शकतात पण लक्षात ठेवायला डॅनीची नजर लागते. आता ही गाडी शोधण्याचे काम करायला घेणार एवढ्यात धर्मेंद्रासाठी एक फोन येतो. फोनवर लिलीचे नाव घेऊन झीनत बोलत असते. लिली पाद्र्यासोबत होती म्हणजे तिचा अ‍ॅक्सेंट बॉब ख्रिस्टोसारखा असलाच पाहिजे. त्यामुळे झीनत बॉब ख्रिस्टोची मिमिक्री करण्याचा प्रयत्न करते. ती या सगळ्यांना व्हिक्टोरिया मेमोरियलपाशी तीन वाजता यायला सांगते आणि स्वतः बुरखा घालून येणार असे सांगते. आधीचा प्रसंग तिला ही कल्पना स्फुरावी म्हणून होता हे कळून चुकते. तसेच व्हिक्टोरिया मेमोरियलवरून गोष्ट सध्यातरी कलकत्त्यात चालली आहे हे कळते.

तीन वाजता त्या दोघी बुरखा घालून येतात. डॅनीला गाडीत बसायला सांगून हे दोघे आपापल्या हिरवीणीकडे जातात. इथे त्यांच्याकडून चूक कशी होत नाही हे रहस्य फेलुदाही सोडवू शकणार नाही. दर वाक्याच्या सुरुवातीला "हाय अल्ला" म्हटल्याशिवाय मुस्लिम स्त्रीचा गेटअप जमणार नाही अशी त्या दोघींची समजूत असावी. इथे लिली ख्रिश्चन आहे, किमान असा समज आहे, हे त्या सोयीस्कररित्या विसरतात. इथे शोमा आणि झीनतच्या तोंडी एका वेगळ्याच स्तरावरचे वाह्यात, न-विनोदी आणि भंगार संवाद देऊन चक्रवर्तीकाकांनी आपले गाँटलेट फेकले होते. १९८९ साली फरिश्तेमध्ये विनोद खन्नाचे दुधावरचे भाष्य येईपर्यंत वाह्यात संवादांचा मापदंड हा असावा. हे महाभयंकर संवाद झाल्यानंतर त्या दोघी गोल चक्कर मारून डॅनीच्या गाडीपाशी येतात आणि दोघांना गाडीत ढकलतात. सगळा प्रकार डॅनीला कळतो आणि तो प्रेक्षकांच्या अवस्थेवर खदाखदा हसतो. इथे गाणे सुरू होते.

९.२) किशोर कुमार ह ची बाराखडी गाणार नसेल तर त्या वेस्टर्नला काय अर्थ आहे

गाण्याविषयी बोलण्यापूर्वी डॅनीविषयी दोन शब्द बोललेच पाहिजेत. या संपूर्ण सिनेमात हिरोच्या साईडचा तो एकटाच आहे जो काहीतरी काम करताना दाखवला आहे. तरीही त्याला हिरवीण म्हणून बीना (ती सुद्धा ऑफस्क्रीन) देऊन चक्रवर्तीकाकांनी फारच मोठा अन्याय केला आहे. त्याबद्दल फारएण्ड म्हणतो तशी सहानुभूती वाटल्याशिवाय राहत नाही.

तर गाणे - शहरों मे शहर सोना शहर कलकत्ता, गली गली भूलभूलैया भूल गया रस्ता, हम खो गये देस में परदेसी हो गये - अशा लांबलचक ओळीचे गाणे सुरू होते. एक गाणे शहराविषयी टाकले की रोडट्रिप दाखवता येते. तसेच आपल्या हिरो-हिरोईन्सना गाडीत डांबून ठेवून कोरिओग्राफरचा खर्च वाचवता येतो. हे कसे करायचे याची उत्तम केस स्टडी हे गाणे आहे. बाकी या गाण्याविषयी फार काही लिहिण्यासारखे नाही. डॅनी बिचारा संपूर्ण गाण्यात वैतागलेला आहे. या लोकांची ड्रायव्हरगिरी करून करून किती करायची! अखेर तिघे "जय माँ काली" ओरडतात आणि गाणे अ‍ॅबरप्टली संपते.

९.३) जर दाढी लावूनही तुम्हाला कोणी ओळखणार असेल तर त्या दाढीला काय अर्थ आहे?

या सगळ्या गडबडीतही दक्षतेने काम करत असलेल्या डॅनीला त्या ट्रॅफिकमध्येही लिलीची गाडी दिसते. प्रीति सप्रूकडे सिनेमात दुसरी गाडी नसल्याने ती बिचारी तशीच फुटक्या दिव्याची गाडी घेऊन चाललेली असते. डॅनी तिचा पाठलाग करतो खरा पण रणजीत अधिक हुशार निघतो. चालत्या रस्त्याच्या मधोमधो ओमनी उभी करून नेम साधण्याची प्राचीन कला साध्य असल्याने रणजीत प्रीति सप्रूला मारण्यात यशस्वी होतो. चित्रपटांतील भावी करिअरचा विचार करून रक्त न येऊ देता मरण्याचे उपयोगी कौशल्य प्रीतिला साध्य झालेले असते. इफ्तेकार या घडामोडींनी भलताच अस्वस्थ होतो. तो तडक दिल्लीहून येतो आणि बॅलिस्टिक एक्सपर्टचा रिपोर्ट मागवतो. कोणत्याही डॉक्टरचा रिपोर्ट एक्सरेशिवाय पूर्ण होत नसल्याने एकजण फाईलभर एक्सरे घेऊन येतो. त्यावरून कळते की सायलेन्सर वापरून गोळी चालवली गेली होती या बिनकामाच्या माहितीखेरीज काहीही कळत नाही. तेवढ्यात तिथे अमरीश पुरी येतो. मिथुन त्याला सांगतो की खूनी रोलिंग सिगारेट पितो, त्याचे एक थोटूक सापडले आहे. अमरीश पुरी ते हसण्यावारी नेण्याचा प्रयत्न करतो.

डॅनीचे कॅरेक्टर इथे हिंदी सिनेमांच्या पूर्णपणे विरोधात जाते. अमरीश पुरी इथे दाढी न लावता आलेला असतो. त्यामुळे त्याला पाद्री म्हणून ओळखणे कोणालाही शक्य होऊ नये. पण तरीही डॅनी बरोबर सांगतो की याला दाढी लावली की तो पाद्री दिसेल. सुदैवाने हिंदी सिनेमांमधला बुजुर्ग कलाकार या नात्याने इफ्तेकार "बडों से ऐसी बातें नही करते" करून डॅनीला गप्प बसवतो. यावरून आपल्याला हेही कळते की डॅनीच्या बाबतीत ट्रोप सबव्हर्जन होऊन तो हिरोईन नसतानाही जिवंत राहणार आहे. इफ्तेकार विषय बदलून सांगतो की धर्मेंद्राला दिल्लीला जावे लागणार आहे. तिथे त्याला विजयमुकुट वाचवल्याबद्दल सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये मिळणार आहेत. कट टू अमरीश पुरी धर्मेंद्राचे विमान उडताना बघत आहे. तिथे डॅनी मोटरसायकलवर येतो, मध्यंतरी त्याने दिलगीरी व्यक्त केली असावी. हवापाण्याच्या गोष्टी करून अमरीश आपल्या वाटेने जातो. तिथे डॅनीच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून आपल्याला कळते की डॅनीचा संशय गेलेला नाही. तसेच धर्मेंद्राचा प्रवास काही सुकर होणार नाही आहे.

पायस, सुपरभन्नाट लिहिलं आहे!

तुझ्या पोस्ट-बरहुकुम एकेक सीन जाऊन पाहतो आहे. आता एकदम सुरुवातीच्या बिगिनिंगमधल्या एका (कदाचित) निसटून गेलेल्या मुद्द्याबद्दल लिहितो. हे जरा उशीरानेच आल्याबद्दल क्षमस्व.

'प्राणची अँटीकरोलरी ऑफ लायर पॅरॅडॉक्स आणि अमरीश पुरीचे चक्रावून जाणे'
हा प्रसंग जेव्हा अमरीश पुरी प्राणचा हात कापतो त्यावेळचा आहे. कट्टप्पाने बाहुबलीला का मारले हे कोडे सुटले तरी लाखनने प्राणचा हात का कापला ह्याचे समाधानकारक उत्तर अजून मिळत नव्हते. एकंदर त्याच्या मनस्थितीचे विश्लेषण खालील प्रमाणे करता येते:
१. प्राणचे 'मैं ताली बजाऊंगा, ताली' म्हणणे - हे केवळ तात्कालिक कारण वाटते. आधी 'मुझे खूनखराबा नही चाहिये' म्हणणारा उसूलों वाला लाखन केवळ प्राणने टाळी वाजवू नये म्हणून त्याचा हात तोडणे अशक्य आहे.
२. प्राणने खरा राजकुमार अजून जीवंत असून लाखनने प्राणच्या मुलाला मारल्याचे सांगणे - हे कारण थोडे सीरियस आहे. ह्यावर लाखनला नक्कीच राग येतो. पण म्हणून त्याचा हात का तोडला... त्याला ठारच का नाही मारले - हे नीट कळत नाही.
३. प्राणची अँटीकरोलरी ऑफ लायर पॅरॅडॉक्स - ह्याबद्दल आता सविस्तर सांगतो. लोकांना अनेक वर्ष ज्ञानेश्वरीची पारायणे करून त्यातील छुपे गर्भित अर्थ कळायला लागतात (इति शिरीष कणेकर) त्याप्रमाणे ह्या सिनेमाचं देखिल आहे. लक्षात घ्या, लाखन जेव्हा म्हणतो की 'तू झूठ बोल रहा है' तेव्हा प्राण म्हणतो की 'मंगल कभी झूठ नही बोलता, तू सच को झूठ समझ रहा है'. इथे लाखनच्या डोक्यात विचार सुरू होतात, की मंगलचे हे म्हणणे सत्य मानावे, तर तो कधीच खोटे बोलत नाही. मग तो आधी राजवाड्यात जेव्हा म्हणतो की हा मुलगाच राजकुमार आहे, ते देखिल खोटे नसणार, म्हणजे त्याने खर्‍याच राजकुमाराला मारले, पण मग आत्ता तो म्हणतो आहे की त्याने मंगलच्या मुलाला मारले, म्हणजे ह्यापैकी एक विधान हे नक्कीच खोटे असले पाहिजे. म्हणजे मंगल कभी झूठ नही बोलता हे विधान खरे असू शकत नाही. बरं ते विधान खोटे मानले तर त्याचा एक अर्थ होतो की मंगल कायम असत्यच बोलतो. पण मग त्याचा अर्थ ते विधानच असत्य असणार, जे स्वतःशीच कॉन्ट्रॅडिक्ट करते. अश्या सर्वच विचारांमुळे लाखन पुरता चक्रावून जातो. त्याच्या पुढच्या २-३ संवादांमध्ये चेहर्‍यावरचे हावभाव पाहिल्यास हेच विचार मनात असणार हे स्पष्ट आहे. 'मी नेहमीच असत्य बोलतो' - ह्या प्रसिद्ध लायर पॅरॅडॉक्स ची एक उलट्या प्रकारची करोलरी प्राणने मांडली आहे हा चावटपणा लाखनच्या लक्षात येतो. आता तिच्या अर्थछटेबद्दल राहते ती केवळ एकच शक्यता, ती म्हणजे 'मंगल कधी कधी खोटे बोलतो'. म्हणजे ह्या तीनपैकी एक काहीतरी अर्थ असणार आणि तो शोधायचा कसा ह्याचा विचार करत असतानाच मंगल त्याला एक संधी देतो. 'मी टाळी वाजवीन' असे त्याने म्हणल्यावर लाखनला एक युक्ती सुचते. इथे शब्द, अनुमान किंवा उपमान प्रमाण यांपैकी काहीही उपयोगाचे नसून प्रत्यक्ष प्रमाणानेच प्रचीती घेऊ असे त्याला वाटते. ते म्हणजे मंगलचे टाळी वाजवणे त्याला खरेच जमेल की नाही हे त्याचा एक हात तोडून प्रत्यक्ष ताडून बघण्यासारखे आहे जेणेकरून मंगलचे बोलणे सत्य ठरते की असत्य हे उघड होइल आणि त्याने लाखनला कोड्याचे उत्तर मिळेल. केवळ ह्या उदात्त हेतूपायी तो मंगलचा हात तोडतो.

प्राणची अँटीकरोलरी ऑफ लायर पॅरॅडॉक्स आणि अमरीश पुरीचे चक्रावून जाणे >> कहर लिहिले आहेस शंतनू Lol

हे जरा उशीरानेच आल्याबद्दल क्षमस्व >> आणि क्षमस्व काय रे! उलट इथे हेच सिद्ध होते की हा सिनेमा एका माणसाकडून अ‍ॅनॅलाईज होणे केवळ अशक्य आहे. ही संपूर्ण चिरफाड वाचल्यानंतरही रसिकांना गवसण्यासाठी अनेक मुद्दे असेच दडलेले आहेत. त्यामुळे असे आणखी काही सापडले तर आवर्जून लिहा.

गटणे मोड ऑन: असा व्यासंग करण्याची इच्छा आहे माझी >> Lol

व्यासंगेच्छुक वाचकांसाठी
तुम्हाला असा व्यासंग करायचा आहे का? जरुर करा, आमचे काही म्हणणे नाही. पण मुख्य सल्ला असा की पुन्हा विचार करा. अगदी आग्रहच असेल तर कंबर कसून तयारी करावी लागेल. पण एकदा तयारी झाली की त्याच्यासारखी दुसरी मजा नाही सांगतो. पहिली गोष्ट, कसलाही न्यूनगंड बाळगू नका आणि प्रत्येक सीनमध्ये चुका काढायला शिका. आपण कोण आहोत, आपल्याला कधी शाळेच्या स्नेहसंमेलनात सुद्धा अभिनय करायची संधी मिळाली नाही याचा अजिबात विचार न करता चूक काढता आली पाहिजे. सीन कुठलाही असो, म्हणजे आता "पक्षी आकाशात उडतो आहे" या सीनमध्ये आपण आयुष्यात पक्षी निरीक्षण केलेले नाही हे विसरून चूक काढण्याचे सुचले पाहिजे.....

हे अवांतर स्फुट पुढे कधीतरी पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करून चिरफाड पुढे नेतो.

पायस Lol दोन पोस्ट बॅकलॉग आहे माझा इथे.

तोपर्यंत हे - ती रोलिंग सिगारेट ची भानगड काय आहे? अमरीश पुरी ला ओळखण्याचा नॉन-डॅनी क्लू दिसतोय तो.

१०) बिछडे हुए यार मिलत नसतील तर त्या मैत्रीला काय अर्थ आहे?

१०.१) हिरोला बेशुद्ध करण्यासाठी अंमली पदार्थ वापरणे हा व्हिलन लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे

धर्मेंद्र काहीसा खट्टू होऊनच दिल्लीला चाललेला असतो. आता दोन कोटींचा विजयमुकुट (इफ्तेकारच्या माहितीनुसार) त्याचे इनाम मात्र १ लाख, म्हणजे केवळ अर्धा टक्का. एजंटचे कमिशन सुद्धा इतके कमी नसते आणि धरमपाजींवर मात्र हे अपमानास्पद बक्षीस स्वीकारण्याची वेळ आलेली आहे. धर्मेंद्रच्या शेजारी विमानात मॅकमोहन बसलेला असतो. इंटरेस्टिंगली धर्मेंद्र इतका फेमस झालेला असतो की केवळ विजयमुकुट परत मिळवला म्हणून चालत्या विमानात त्याची स्वाक्षरी घ्यायला शाळकरी मुले रांग लावतात. हे बघून गहिवरलेल्या प्रेक्षकाला मॅकमोहन एक मूर्खासारखा प्रश्न विचारून जमिनीवर आणतो. दिल्लीला चाललेल्या विमानात बसून तो धर्मेंद्राला विचारतो "आप दिल्ली जा रहे हैंं?"

असो, तर धर्मेंद्र स्वाक्षरी देत असताना मॅकमोहन मोठ्या शिताफीने आपल्या अंगठीतली अंमली पावडर ग्लासात टाकून ग्लासांची अदलाबदल करतो. चीअर्स करून तो ग्लासातला द्राव धरमपाजींना प्यायला लावतो. त्याचा धर्मेंद्रावर ताबडतोब प्रभाव पडतो. त्या मुलांसोबत असलेली नन भलतीच घाबरते की काय झाले. सुदैवाने विमानात डॉक्टर बनून, फ्रेंच कट दाढी लावून रणजीत बसलेला असतो. तो फ्लाईट कॅप्टनला सांगतो की धर्मेंद्राचे या अवस्थेत दिल्लीला जाणे काही ठीक नाही. रामनगरला असलेल्या नर्सिंग होममध्ये नेणे अधिक इष्ट. मी क्षणभर घाबरलो. रणजीत बस थांबवल्या सारखं विमान त्या रामनगरला थांबवायला लावतो की काय? पण त्याचा मुद्दा इतकाच असतो की वायरलेसवर मेसेज करून विमानतळावर अँब्युलन्स बोलवून घ्या म्हणजे धर्मेंद्राला थेट दवाखान्यात नेता येईल. त्याप्रमाणे "गेटवेल नर्सिंग होम" अशी इंग्रजी अक्षरे असलेली रुग्णवाहिका येते आणि त्यात धर्मेंद्राला घालून रणजीत आणि मॅकमोहन निसटतात.

१०.२) व्हिलनपण सिद्ध करण्यासाठी धूम्रपान करणे नव्हे तर केलेले वेषांतर टिकवणे गरजेचे असते.

खराब रस्त्यावरून बंडल ड्रायव्हिंग करत रणजीतचा कोणी चिल्लर गुंड ती रुग्णवाहिका मार्गस्थ करतो. थकल्या जीवाला तल्लफ येते आणि रणजीत गाडीत सिगारेट ओढायला सुरुवात करतो. तो धर्मेंद्राचे लॉकेट काढून घेण्याच्या प्रयत्नात असतो पण धूरामुळे धर्मेंद्र शुद्धीवर येतो आणि हा प्रयत्न असफल होतो. इथे रणजीत आपण दुय्यम व्हिलन असल्याचे सिद्ध करण्याकरिता एक मोठी चूक करतो - तो धर्मेंद्रासमोर आपली नकली दाढी काढतो, अमरीश पुरीने आपले काम झाल्याशिवाय अशी चूक कधीच केली नसती. मग हाणामारी सुरू होते. धर्मेंद्र मॅकमोहनला चालत्या व्हॅनच्या खिडकीतून बाहेर फेकतो. मग रणजीतच्या नरड्यावर आपल्या पायाने दाब देतो. रणजीत मोठ्या मुश्किलीने तो पाय बाजूला करतो. पाजींच्या पायातली शक्ती काय वर्णावी. एका लाथेत रुग्णवाहिकेच्या मागचे दार बिजागरीतून उखडले जाते आणि पाजी स्ट्रेचरसकट चालत्या गाडीतून पलायन करतात. रणजीत लगेच गाडी थांबवतो - इथे गाडीचा नंबर एम टी जे ४५८० बघण्याची सुवर्णसंधी!

यानंतरच्या चित्तथरारक प्रसंगात पाजी वेगाने चाललेल्या स्ट्रेचरवर असहाय असतात आणि रणजीतकडे गोळ्यांनी भरलेले पिस्तुल! रणजीतचा नेम मात्र भलताच खराब असतो. पाजी स्ट्रेचरवर असताना तो दोन गोळ्या झाडतो. एकही त्यांना लागत नाही. मग पाजी धावत सुटतात तेव्हा तो त्यांच्या मागे मागे येतो. जवळच एक नदी असते. पाजी तिच्यात उडी घेतात तेव्हा तो एक गोळी चालवतो. पाजींना तीही लागत नाही. मग तो पाण्यात एक गोळी चालवतो आणि काही सेकंद वाट बघतो. पाण्यात बुडबुडे येतात आणि त्याला वाटते पाजी मेले. प्रत्यक्षात लाल रंग येईपर्यंत थांबणे बंधनकारक असते. आता अशा फालतू चुका केल्यानंतर धरमपाजी जिवंत न राहते तरच नवल. धर्मेंद्राचा पाण्यात उडी घेण्याचा शॉट नीट बघितला पाहिजे. वरच्या उजव्या कोपर्‍यात थोडा पडझड झालेला राजवाडा स्पष्ट दिसतो. आठवा राजवाड्यातून निघालेला लहानपणीचा धर्मेंद्र घोड्यावरून नदीत पडलेला असतो. म्हणजे अंजाने में हम अंजानगढ आ चुके हैं.

१०.३) कोणालाही धोपटण्याआधी त्याची चौकशी करावी, न जाणे तो तुमचा कैक वर्षांपूर्वी हरवलेला मालक निघायचा.

धर्मेंद्र जाऊन जाऊन कुठे जाणार? त्या वीरान जागेत तेवढा राजवाडाच काय तो असतो. बिचारा वाईच तिथे टेकायला म्हणून जातो तर त्याला कमल कपूरसोबत काढलेलं लहानपणीचं स्वतःचे तैलचित्र दिसते. धर्मेंद्र इथे आठवणीत राहील असे आठवण्याचे एक्सप्रेशन देतो. पण त्याचे दुर्दैव! इतर वेळेला "हे कसे दिसते, ते कसे दिसते" बघायला गावभर हिंडणारा प्राण नेमका राजवाड्यात असतो. प्राणचा धर्मेंद्र चोर असल्याचा समज झालेला असल्याकारणाने तो धर्मेंद्राचे काही एक ऐकून घेत नाही. एका हाताने सुद्धा तो सटासट कानशीलात वाजवतो आणि धर्मेंद्राला हाकलून देतो. हाकललेला धर्मेंद्र बाहेर पडतो तर रणजीत त्याची वाटच बघत असतो. तो पिस्तुलाने त्याच्यावर नेम साधणार एवढ्यात शमशेर हवेतून झेपावतो आणि ते पिस्तुल घेऊन उडून जातो. धर्मेंद्रावरचे या ससाण्याचे ॠण मोजू तेवढे कमीच आहेत. हा ससाणा एवढा ऋणी की त्याच्या डेट्स अ‍ॅव्हेलेबल नसल्याने त्याने आपल्या जागी यांत्रिक ससाणा पाठवला पण धर्मेंद्राचे प्राण वाचवले.

१०.४) धर्मेंद्रही आवरत नसेल तर ससाण्याशी फायटिंग करायला जाऊ नये

धर्मेंद्र मात्र फारच थकल्याने बेशुद्ध पडतो. रणजीतला आपले पिस्तुल फारच प्रिय असल्याने तो धर्मेंद्राला ठिकाने लगाने की जिम्मेदारी एका चिल्लर गुंडावर टाकून ते शोधायला राजवाड्यात जातो. जाण्यापूर्वी ते लॉकेट ताब्यात घ्यायला विसरत नाही. तो पिस्तुलाला रिव्हॉल्व्हर का म्हणत असतो हे तोच जाणे. इकडे शमशेर ते पिस्तुल प्राणला आणून देतो. ते बघून प्राण बाहेर येतो तो त्याची गाठ रणजीतशी पडते. शाही खून ओळखायची अतिंद्रिय शक्ती नसल्यामुळे "ज्याच्या गळ्यात लॉकेट तो माझा राजकुमार" म्हणून प्राण रणजीतला मिठी वगैरे मारतो. रणजीतही जरा भावूक झाल्यासारखे दाखवतो.

इकडे तो गुंड धर्मेंद्राला जीपमध्ये घालून एका धबधब्यापाशी नेतो. पाजींना मारण्यापेक्षा स्टाईल मारणे अधिक महत्त्वाचे असल्याने त्याने धर्मेंद्राला धबधब्यात फेकण्याचा निर्णय घेतलेला असतो. प्राण बावळट असला तरी शमशेर नसतो. त्याने शाही खूनला ओळखलेले असते. तो येऊन गुंडाच्या कामात खोडा घालतो. धर्मेंद्र एव्हाना शुद्धीवर आलेला असतो. मग तो गुंड धर्मेंद्राला जीपने उडवण्याचा प्रयत्न करतो. धर्मेंद्र दर वेळी वाचण्यात यशस्वी होत असला तरी त्याला काऊंटर अ‍ॅटॅक करता येत नसतो. आज मालक थकलेला असल्याने फारसा जोशपूर्ण लढत नाही आहे, हे शमशेरला कळून चुकते. मग तो जीवावर उदार होऊन जीपची पुढची काच फोडून गुंडावर झेपावतो आणि त्याचे डोळे फोडतो. आंधळा गुंड तसाच कड्यावरून जीपसकट खाली पडून मरतो. कड्यावरून जीप पडली की तिचा हवेतच स्फोट होतो या त्रिकालाबाधित सत्याची आपल्याला पुनराभूति लभते. मग तो पक्षी धर्मेंद्राकडे येतो. धर्मेंद्राला त्याच्या डाव्या पंजात अडकवलेली एक सोन्याची अंगठी दिसते. इथे पंजाचा फोटो पक्ष्यांच्या फोटोशी मॅच केला असता तो ससाण्याचा पंजा असल्याचे स्पष्ट झाले. फ्लॅशबॅक - धर्मेंद्र लहान असताना त्याच्या वाढदिवशी शमशेर भलताच खुश असतो. मग छोटा धर्मेंद्र वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट म्हणून शमशेरला ती अंगठी भेट देतो. कट टू वर्तमानकाळ. धर्मेंद्राला आठवते की अरे ये तो वही पक्षी हय. मग तो पार गहिवरून जातो. त्याला गहिवरलेला बघून शमशेरही ससाण्याचा पुन्हा गरुड बनतो. दोन जुने मित्र पुन्हा भेटलेला बघता बघता प्रेक्षकांना दिसते की अजूनही पाऊण तासांचा सिनेमा बाकी आहे आणि प्रेक्षकही ढसाढसा अश्रू गाळतात.

ती रोलिंग सिगारेट ची भानगड काय आहे? >> फा तो रणजीतला ओळखण्याचा क्लू आहे. रणजीत जेव्हा बीनाकडे व्हिलनचे आद्य कर्तव्य पार पाडायला गेलेला असतो तेव्हा तो त्या सिगारेटचे थोटूक सोडून आलेला असतो. पण त्याचा वापर बहुधा केला गेलेला नाही.

हायेस्ट असं थेट इन्ग्लिशमध्ये लिहिले की हिघेस्ट असे उमटते. ती च्रप्स स्टाइल आहे. त्यातसुद्धा ते कृत्रिम आहे हे जाणवते कारण शेवटच्या टी अप्परकेसमध्ये का लिहिला ते त्यांनाच माहिती.

पायस, फारएन्ड आणि शंतनू....फार फार हसवलेत..

आपल्याला कधी शाळेच्या स्नेहसंमेलनात सुद्धा अभिनय करायची संधी मिळाली नाही याचा अजिबात विचार न करता चूक काढता आली पाहिजे. या वाक्याला डोळ्यात पाणी येईपर्यंत हसलो...!!

११) आता जवळ जवळ व्हिलन साईडकडून कोणीतरी ढगात जाण्याची वेळ झाली

११.१) अजब जबरदस्ती आहे राव

प्राण तिकडे इफ्तेकारला बोलावून घेतो. त्याला सांगतो की बघ मला राजकुमार सापडला. इफ्तेकारच्या मेंदूचे आकारमान काही मिलिमीटर^३ जास्त असल्याने त्याला किमान रणजीतला हे विचारायचे सुचते की तुला हे लॉकेट कुठून मिळाले. रणजीत खोटे बोलतो की हे लहानपणापासून माझ्याकडे आहे. मग ते अमरीश पुरीला बोलावतात. इफ्तेकार अमरीश पुरीकडून रणजीतचे जन्मरहस्य आणि ते लॉकेट कुठून आले हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. आता सर्व इतिहास माहित नसलेल्या लोकांच्या डोक्यात आणखी एक शक्यता येऊ शकते की अमरीश पुरीला ते लॉकेट कुठे तरी सापडले आणि त्याने आपल्या मुलाला ते भेट म्हणून दिले. पण प्राण असला काही विचार करत नाही. तो जवळपास अमरीश पुरीवर "रणजीत त्याचा मुलगा नाही" हे लादतो. आता ते सत्यच असल्यामुळे अमरीशच्या हे पथ्यावरच पडते. मग तो काहीबाही कहाणी बनवून सांगतो की रणजीतच राजकुमार आहे आणि मला तो जंगलात पडलेला मिळाला होता.

प्राण हे ऐकल्यावर भलताच खुश होतो. इकडे इफ्तेकारने ते लॉकेट उघडलेले असते. त्याच्यात एक कागद असतो. हा कागद म्हणजे नकाशा असतो. प्राण उत्साहात रणजीतला सांगतो की झीलपासून पुढे खजिन्यापर्यंत जायचा रस्ता या नकाशात आहे. झीलपर्यंत कसे जायचे हे प्राणला ठाऊक आहे. त्या दोघांत एक मूक संवाद सुद्धा घडतो.
प्राणः ये नक्शा खजाने का हैं. समझ रहे हो, झील से आगे जाने का रस्ता इसमें हैं.
रणजीतः झील कहां हैं?
........
.......
प्राण: झील हैं (संदर्भः https://youtu.be/BSMIFvWLRnk?t=3m12s)

इफ्तेकारचे डोके कोणत्या तरी वेगळ्याच प्रतलात धावत असते. हे सगळे चालू असताना त्याला आठवते की कमल कपूरने आपल्याला आणि आपण कमल कपूरला वचन दिले आहे की सीमा, पक्षी झीनत अमानचे लग्न राजकुमारशी होईल. मग तो, अमरीश पुरी आणि प्राण झीनतकडे जातात. झीनत म्हणते मला फक्त धर्मेंद्रच आवडतो मी नाही करणार लग्न रणजीतशी. अमरीश पुरीला रणजीत कोणाशी लग्न करतो याच्याशी काही घेणे देणे नसते. त्याला फक्त खजिन्यात रस असतो. वर उसुलोंवाला पुरोगामी व्हिलन असल्यामुळे तोच इफ्तेकारला समजावतो की तरुण पिढीवर अशा गोष्टी लादता कामा नये. प्राणला मात्र हे सहन होत नाही. तो झीनतला काही समजवणार एवढ्यात झीनत त्याला अप्रत्यक्षपणे सांगते, माझ्या बापाला प्रॉब्लेम नाही, लग्न झाल्यास होणार्‍या सासर्‍याला प्रॉब्लेम नाही तर तुला विचारतंय कोण?

११.२) हिरोंना सापळ्यात अडकवता येत नसेल तर तो व्हिलन कसला?

इकडे डॅनी आणि मिथुन धर्मेंद्रला शोधत असतात. विमानात मुलांसोबत असलेल्या ननला ते शोधून काढतात. ती सांगते की धर्मेंद्रला तर तो दाढीवाला डॉक्टर घेऊन गेला. तिला हेही आठवत असते की तो डॉक्टर रोलिंग सिगारेट पीत होता. यावरून डॅनीला कळते की तो डॉक्टर आपल्या बायकोचा खूनी असलाच पाहिजे. थोडक्यात रणजीतला ओळखायचा क्लू इथे वापरला जातो. त्यांना हे माहित नसते की खिडकीतून मॅकमोहन स्नायपरने नेम धरून उभा आहे. म्हणजे मॅकमोहन रुग्णवाहिकेतून खाली पडूनही जिवंत राहिला तर! मग तिथे धर्मेंद्र येऊन टपकतो. मित्र सुखरुप परत आल्याने ते दोघे "तू अचानक इथे कसा काय उगवलास" हा बिनमहत्त्वाचा प्रश्न विचारत नाही. धर्मेंद्राला लगेच खिडकीच्या जस्ट बाहेर म्हणजे त्यांच्यापासून हाकेच्या अंतरावर स्नायपर घेऊन उभा असलेला दिसतो. अर्थात सतर्क धर्मेंद्र त्या दोघांना सावध करतो आणि मॅकमोहन अयशस्वी होतो.

तो धावत जाऊन कब्रस्तान गाठतो. तिथे अमरीश पुरी पाद्र्याच्या वेशात त्याची वाटच बघत असतो. मॅकमोहन सांगतो की शंकरने येऊन सांगा आणि डॅनीला वाचवले. अमरीश म्हणतो की रणजीतच्या म्हणण्यानुसार तर शंकर मेला. मॅकमोहन म्हणतो की तो जिवंत आहे. एवढ्यात ते तिघे त्याच्या मागे मागे तिथे येतात. ते बघून अमरीश पुरी त्याला चर्चच्या मागच्या रस्त्याने अड्ड्यावर जायला सांगतो. आता शिकारीच्या मूडमध्ये असल्याने तो शिकारी शंभू स्टाईल टोपी घालतो. मग त्या तिघांना दिसेल अशा बेताने डेनिस पिंटोच्या कबरीचा क्रॉस फिरवून गुप्त रस्ता उघडतो आणि त्याच्यात प्रवेश करतो. हा धडधडीत सापळा आहे हे दिसत असतानाही प्रेक्षकांनी थरारक दृश्ये दाखवायची या ध्येयासक्ती खातर ते त्या सापळ्यात अडकतात.

गुप्तमार्गात प्रवेश करताच दरवाजा बंद होतो. अमरीश मुद्दामून एके ठिकाणी वेगळेच दार उघडे ठेवतो ज्याच्यात प्रवेश करताच ते सापळ्यात अडकतात. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद होतात आणि एक खिडकी फिरून त्याच्या जागी काचेमागे एक खोली दिसू लागते. तिथे पाद्री म्हणजे अमरीश पुरी असतो.

११.३) काळ कोणताही असो, ऑटोमेशन फार महत्त्वाचे

आता हिरो लोक सापळ्यात अडकलेले आहेत, खजिन्याविषयक सर्व माहिती मिळालेली आहे आणि हिरो लोकांचा काही उपयोग राहिलेला नाही याची खात्री पटलेला अमरीश पुरी दाढी हटवून आपले खरे रुप त्या तिघांना दाखवतो. आपल्या आयटमचे वडील व्हिलन आहेत हे पाहून मिथुनला फारच गहरा सदमा वगैरे लागतो अशी अपेक्षा बाळगू नये. त्या सगळ्यांत सर्वात रिस्ट्रेंड रिअ‍ॅक्शन तोच देतो. तो प्रांजळपणे सांगतो की धर्मेंद्राला मारण्याचा प्रयत्न करणारा डॉक्टर त्याचा मुलगा रणजीत होता. जँगो सुद्धा त्याचाच माणूस असल्याचे तो कबूल करतो.

डॅनी एकटाच काम करणारा हिरो असल्याने तो चपळाईने सुरा काढून अमरीश पुरीवर फेकतो. आता कोणीतरी प्रयत्न करायला नकोत? पण अमरीश पुरी समोरची काच फारच मजबूत असल्याने सुरा काही तिला भेदू शकत नाही. मग इतका वेळ न दिसलेले एक दार उघडते आणि त्यातून जँगो बाहेर येतो. या लोकांना तो फारच सहजतेने इतस्ततः भिरकावून देतो. या भिरकावण्यामागचा उद्देश असा की हे लोक कुठे आहेत ते सामान्य जनतेला कळावे. ते जिथे आहेत तिथे ते एक शस्त्रागार असून तिथे काटेरी पिरामिड्स वगैरे गोष्टींची रेलचेल आहे. जँगोकडे तीन वजनदार लोहगोल असतात. त्यांच्यात तेज वगैरेंचा निधी नसतो, चिंता नसावी. तो एक खिट्टी फिरवतो आणि आपोआप त्या गोळ्यांना जोडलेले साखळदंड येऊन धर्मेंद्राच्या कंबरेला, डॅनीच्या मनगटाला आणि मिथुनच्या घोट्याला जाऊन जखडतात. एकच खिट्टी तिन्ही गोळ्यांना संचलित करू शकत असते. आपल्याला टेन्शन की या हिरोंचे आता कसे होणार?

११.४) मुले देवाघरची फुले

तेवढ्यात आपल्याला आठवते की बरोब्बर तीन मिनिटे तेवीस सेकंदांपूर्वी जेव्हा हे लोक मॅकमोहनचा पाठलाग करतात तेव्हा मध्येच कॅमेरा ओमिनसली डॅनीच्या मुलावर दोन सेकंद मारला आहे. तो न जाणे कसा पण झीनत अमानला घेऊन त्याच कब्रस्तानमध्ये आलेला असतो. झीनतला म्हणते की मी खूप शोधले पण ते तिघे काही सापडले नाहीत तर आपण पोलिसांना घेऊन परत येऊ. मोंटू मात्र हार मानायला तयार नसतो. तो जाऊन डेनिस पिंटोच्या कबरीच्या क्रॉसला जाऊन घट्ट मिठी मारतो. इकडे आपले हिरोत्रय जँगोकडून कुत्र्यागत मार खात असतात. मोंटूचे ग्लिसरीनचे अश्रू बघून जीझस द्रवतो आणि तो क्रॉस आपोआप फिरतो. झीनत चित्कारते की तिकडे तहखाना आहे, हे लोक तिथे असतील.

इकडे हिरो लोक जँगोचीच हत्यारे, पक्षी काटेरी पिरामिड त्याला फेकून मारण्याच्या प्रयत्नात असतात. यावर जँगो कुठून तरी भलामोठा लोखंडी आणि काटेरी क्रॉस पैदा करतो आणि त्याने हिरोंना बडवण्याचा प्रयत्न करतो. हिरोंच्या हालचालींवर ते लोहगोल मर्यादा आणत असल्याने ते वैतागलेले असतात. तरीही हिरो असल्याने ते युक्ती प्रयुक्ती लावून टिकून असतात. इकडे मोंटू कुठले तरी लिव्हर फिरवतो आणि एका खोलीत अडकतो. झीनत बिचारी आता मोंटूला बाहेर कसे काढावे या गोंधळात पडते.

११.५) जँगोचा अंत

हिरो लोक घायकुतीला आल्याशिवाय चमत्कार होत नसतात. मोंटू जिथे अडकलेला असतो त्या खोलीतून एक भुयारी मार्ग या सापळ्यावाल्या खोलीकडे जात असतो. पण त्या मार्गाच्या शेवटी एक दार असते आणि दाराला कुलूप असते. पण मोंटूच्या गळ्यात क्रॉस असतो. लहान वयातच कुलुपे उघडण्याच्या कलेत महारथ हासिल केलेला मोंटू ते दार उघडतो आणि पोहोचायचा तिथे पोहोचतो. बघतो तर काय, डॅनीला त्या जँगोमुळे छातीपाशी जखम झालेली असते. मोंटूच्या भावना अनावर होतात आणि तो ओरडतो "डॅडी!"

डॅनीला कळते अरे आपल्या पोराचा आवाज परत आला आहे. पण दुसर्‍याच क्षणी जँगोचा खतरा त्याला आठवतो. मग तो मोंटूला ती खिट्टी फिरवून आपल्याला, धर्मेंद्राला आणि मिथुनला मुक्त करायला सांगतो. पण जँगो सावध असतो. तो लगेच जाऊन मोंटूला पकडतो. इकडे झीनतही दुसर्‍या मार्गाने तिथे पोहोचलेली असते. इनिएस्टालाही लाजवेल असा वन टच पास ती जँगोच्या पाठीत लाथ घालून देते. मोंटूला डॅनी व्यवस्थित झेलतो. काही सेकंद जँगो मग झीनतच्या मागे लागतो आणि डॅनी थोडावेळ भावुक होऊन घेतो. झीनतला वाचवायला पाजी साखळदंडाने जँगोचा गळा आवळायला बघतात. पण आपल्या लोखंडी दातांनी तो ते साखळदंड तोडू बघतो. या सगळ्या गोंधळात मोंटू पटकन खिट्टी फिरवतो आणि ते तिघे बंधमुक्त होतात. त्यानंतर त्यांना रोखणे जँगो के बस की बात नसते. थोडेफार फटके खाल्ल्यानंतर त्याच्या अंगावर तो काटेरी क्रॉस पडतो आणि जँगोचा अंत होतो.

Pages