अ‍ॅझ्टेक किन्वा बोल

Submitted by तृप्ती आवटी on 11 December, 2014 - 09:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

किन्वा, मक्याचे दाणे, ब्लॅक बीन्स (भिजवून शिजवलेले किंवा कॅनमधले), अननस, कांदा किंवा कांद्याची पात, केल, टोमॅटो, मीठ, बारीक वाटलेली ताजी/ओली लाल मिरची किंवा मेक्सिकन हॉट सॉस, ऑलिव्ह ऑइल, लसणाच्या पाकळ्या

क्रमवार पाककृती: 

चौदाव्या ते सोळाव्या शतकात अ‍ॅझ्टेक संस्कृती मध्य मेक्सिकोमध्ये अस्तित्वात होती. हे अ‍ॅझ्टेक लोकं जिरायती, बागायती आणि घरगुती शेती करत. मका हे मुख्य पीक आणि अवाकाडो, बीन्स, तांबडे भोपळे, रताळी, टोमॅटो, मिरच्यांचे प्रकार आणि राजगिरा ही इतर पिकं. पुढे दिलेल्या पाककृतीचा आणि अ‍ॅझ्टेक संस्कृतीचा काही संबंध असावा असं मला तरी वाटत नाही. पण किन्वा बोल बनवण्यासाठी लागणार्‍या जिन्नसांपैकी बरेच जिन्नस या अ‍ॅझ्टेक लोकांच्या रोजच्या आहाराचा भाग असल्यानं आणि शिजवलेला किन्वा शिजवलेल्या राजगिर्‍यासारखा दिसत असल्यानं या पदार्थाला 'अ‍ॅझ्टेक किन्वा बोल' असं जरा 'अ‍ॅन्टिक' नाव दिलं गेलं असावं. तर....

१ वाटी (होय, एक वाटी) ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात ७-८ लसणाच्या पाकळ्या अख्ख्या टाकाव्यात. साधारण गुलाबी झाल्या की आंच बंद करून कढई तशीच ठेवावी. हे तेल आधीच तयार करून ठेवावं.

साधारण १ कप होईल इतका किंवा खाणार्‍याच्या भुकेच्या अंदाजाने किन्वा शिजवून घ्यावा. भाज्या चिरून हलक्या हातानं मिसळून ठेवाव्यात, त्यातच बीन्स घालून ठेवावेत. लोखंडी कढईला हलका तेलाचा हात लावून गरम करायला ठेवावी. चांगली कडकडीत तापली की त्यावर पाण्याचा हबका मारून सगळ्या भाज्या एकदम टाकाव्यात आणि भराभर हालवावं. आंच मोठीच असू द्यावी. भाज्यांच्या पाठी शेकून काळसर झाल्या की आधी तयार करून ठेवलेलं तेल १-२ चमचे घालावं, आपल्या कुवतीनुसार हॉट सॉस किंवा वाटून ठेवलेली लाल मिरची, किन्वा आणि मीठ घालावं. या स्टेपला थोडी टोमॅटो प्युरे सुद्धा घालू शकता. सगळं पुन्हा भराभर हालवत अर्धा मिनिट परतावं आणि पानात वाढावं. हेल्दी खाल्ल्याचा गिल्ट येऊ नये म्हणून सोबत टॉर्टिया चिप्स घ्याव्यात.

जेवायला एकापेक्षा जास्त माणसं असतील तर त्या प्रत्येकासाठी नव्यानं किन्वा बोल बनवावा. पहिला घाणा झाला की कढईवर पाण्याचा हबका मारून पुसून घ्यावी. आवडत्या व्यक्तीसाठी सगळ्यात शेवटी बनवावा कारण कढई भरपूर तापलेली असते त्यामुळे भाज्यांना मस्त खरपूस जळकट चव येते.

aztec.JPG

वाढणी/प्रमाण: 
एक किंवा अनेक
अधिक टिपा: 

_भाज्या अजिबात शिजवायच्या नाहीत, कच्च्या राहिल्या पाहिजेत
_भाज्या आपल्या आवडीप्रमाणं कमी-अधिक-वेगळ्या घेऊ शकता
_यात ग्रिल्ड चिकन किंवा श्रिंप पण चांगलं लागत असावं कारण अनेक लोकांना तशी ऑर्डर देताना बघितलं आहे
_हॉट सॉसऐवजी एन्चिलाडा सॉस, Tomatillo Salsa Verde इ. घालू शकता
_लागणारा वेळ ३० मिनिटे दिला आहे कारण 'चला जेवायला जावं' टाइप करून प्रतिसाद सेव्ह करून खुर्चीवरून उठून किन्वा स्टेशनवर पोचून किन्वा बोलची ऑर्डर देऊन पैसे चुकते करून पुन्हा डेस्कपाशी तडमडायला तेवढाच वेळ लागतो

माहितीचा स्रोत: 
हापिसातला कॅफेटेरिया
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो!
कढईला जर्रासा तेलाचा हात पुसून पाणी शिंपडलं तर मस्त चुर्र स्मोकी इफेक्ट येईल. मी किन्वाच्या ऐवजी पास्ता/ भात घालून करणार.

प्रतिसादही छान सात्त्विक आहेत.

धन्यवाद कृती वाचून प्रतिसाद दिल्यासाठी.

सिमंतिनी- सॉरी कशाला म्हणताय, इथे सगळं अवांतरच सुरू आहे Happy

मंजूडी, लसणीच्या पाकळ्या एवढ्या तेलात मुरवल्यावर सात्विकपणा येणारच Wink

Pages