दुधी ची सुकी भाजी - दाक्षिणात्य चवीची

Submitted by योकु on 25 July, 2018 - 09:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- अर्धा किलो दुधी (कोवळा पाहून घ्यावा, जून असेल तर शिजायला वेळ लागतो आणि खूप बिया असतात)
- एक मध्यम मोठा बटाटा (भाजी जरा मिळून येण्याकरता)
- तिखटपणानुसार हिरवी मिरची (कमी घेतली तरी चालेल पण वगळू नका)
- कढिलिंबाची १०/१२ ताजी हिरवीगार पानं
- आवडत असेल तर थोडं लाल तिखट
- मोहोरी आणि जिरं पाव-पाव चमचा
- मीठ
- हळद
- थोडी साखर
- एम-टी-आर ची सांबार पावडर (कुठल्याही ब्रँडचा सांबार मसालाही चालेल)
- बारीक चिरलेली कोथिंबीर, वरून घालण्याकरता

क्रमवार पाककृती: 

- दुधी आणि बटाटा सोलून बाईट-साईज च्या चौकोनी फोडी करून घ्याव्या
- तिखटपणानुसार हिरवी मिरची मोडून किंवा बारीक चिरून घ्यावी
- लोखंडी कढई तापत ठेवावी आणि जरासं तेल घालावं
- यात क्रमानी मोहोरी; ती तडतडली की जिरं; ते जरा फुललं की हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं घालावी; यावर हळद घालून चिरलेली भाजी घालावी आणि व्यवस्थित परतून घ्यावं.
- तेल मसाला नीट माखला भाजीला की वर झाकण घालून अगदी मंद आचेवर एक वाफ येऊ द्यावी
- नंतर मीठ, साखर आणि वापरणार असाल तर लाल तिखट घालून परतून भाजी पूर्ण शिजवावी
- सर्वांत शेवटी मोठा चमचाभर सांबार पावडर घालून नीट हलवून आच बंद करून टाकावी आणि झाकण घालून भाजी मुरू द्यावी १० मिनिटं तरी.
- मस्त लाल रंग आलेली तरीही मधून मधून दुधीच्या हिरव्या फोडी दिसणारी भाजी तयार!
- वरून कोथिंबीर घालून सजवावी आणि वाढून घेऊन तूप लावलेल्या फुलक्यांबरोबर चापावी Happy

हा मारकांकरता फटू (यात कोथिंबीर नाही, विसरलो घालायला पण त्याचे मारकं कापायचे न्हायीत)
IMG_0082.JPG

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे, तीन/तीन लोकांकरता पुरावी
अधिक टिपा: 

- सांबार मसाला/पावडरीत मिरची असतेच सो वरून हिरवी मिरची, लाल तिखट घालतांना जरा जपून
- ही भाजी जरा झणझणीतच चांगली लागते
- पाणी अजिबात वापरायचं नाहीय, तेल-वाफेवरच भाजी शिजते चांगली
- साखर वापरून गोडूस चव आणायची नाहीय, जस्ट दुधीचा जरा अंगचा कडसर पणा लपेल एवढीच साखर वापरायचीय
- आवडत असेल तर थोडं ओलं खोबरं ही वापरता येईल यात

माहितीचा स्रोत: 
फ्रीज आवरतांना सांबार पावडर सापडली, ती सांबार करायला नक्कीच पुरली नसती, तर या भाजीत ढकलली आणि अफलातून चव साधली
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपि. डिशचा फोटो आहे पण कढईचा फोटो अजूनही टाकला नसल्यामुळे मार्क कापावे का? तुमची रेसिपी वाचून मला लोखंडी कढई घ्यायची आहे हे परत एकदा आठवले.

दुधीला एवढे चांगले सादर केल्यावर कोण मार्कस कापेल?

आपण बटाट्याच्या काचऱ्या करतो ना कढईत परतून तशाच दुधी,टेंढा किंवा काकडी ( मोठी, गोकुळाष्टमीला बाजारात येते ती) यांच्या करायच्या. शेवटी थोडं तांदळाचं पीठ मारायचं. पावात घालून खायचं. पोट भरते - डाइबेटिसवाल्यांसाठी उत्तम.
तशी इतरही खाऊ शकतातच.

मला वाटलं 'ऑथेंटिक' दाक्षिणात्य .... तर जरा निराशा झाली Proud
मी नेहेमीच कच्ची पपई, स्क्वाश, दुधी अशा भाज्यांचे रस्से करायचे असतील तर थोडी सांबार किंवा रसम पावडर घालते, बरेचदा कसुरी मेथीही थोडीशी घालते. फार लाड करायचे असतील तर टोमॅटो, कसुरी मेथी किंचित आलं असं मिक्सरमधून गंध वाटून घेऊन त्यात रसम/सांबार पावडर घालून फोडणीत परतते.... याला कढीपत्त्याची फोडणी अत्यावश्यक आहे.

कसुरी मेथी किंचित आलं असं मिक्सरमधून गंध वाटून घेऊन त्यात रसम/सांबार पावडर घालून फोडणीत परतते.... याला कढीपत्त्याची फोडणी अत्यावश्यक आहे.>>>>> वरदा, तुमची हि टीप खूप छान आणि उपयोगी आहे खूपच टेम्पटिंग असेल याचे ओउटकम.

वा योकु नक्कीच वेगळा प्रकार दिलात.

दूधी तसा फारसा आवडत नाही. त्यामुळे त्याचे मुठीये व खीर करणे इतपत ठीक. पण ही भाजी या पद्धतीने नक्कीच करणार. धन्यवाद! फोटो पाहुनच तोंपासू.

एक नंबर भाजी.
परवा दिवशीच दुधी खाल्लाय, नाहितर लगेच करून खाल्ला असता. अता पुढच्या आठवड्यात.
मारकं धा पैकी साडेधा.

वाह सुंदर आणि सोपी, फोटो पण मस्त.

मी आमच्या सासरी वेसवार करतात ज्याची चव सांबार मसाल्याला जवळची असते, ते टाकून करेन. वेसवार असते घरात म्हणून मुद्दाम सांबार मसाला आणत नाही.

'ऑथेंटिक' दाक्षिणात्य - म्हणजे नारळाचे दूध घालणे. सर्वात शेवटी फोडणी असते दाक्षिणात्य.

नक्की करून पाहा ही भाजी, सुरेख झणझणीत चवीची होते.
जरा आंबट चव हवी असेल तर चिंचेच्या एखाद्या बुटकानं काम झक्क होईल...

सोलून, शिजवून त्यातलं रसायन निकामी होतं... (का?)>> नाही होत. पहिली गोष्ट म्हणजे दुधी चिरतानाच एखाद्या फोडीची चव घ्यायची. दुधी कडसर असेल, तर चिरतानाच तो थोडा काळसर दिसतो, एरवी आतला गर पांढराशुभ्र असतो. ती कडसर लागत असेल, तर ताबडतोब तो टाकून द्या. बर, हे करायला विसरलात, तर भाजी शिजल्यानंतर एक फोड खाऊन बघा. कडू दुध्याची भाजी काळसर दिसते, लोखंडी कढई वापरली तरी फरक कळतो. कडू लागत असेल, तर मनावर दगड ठेवून ती भाजी फेकूनच द्या. शक्यतो आपण अन्न फेकून देत नाही, पण नो रिस्क्स विथ दुध्या!

योकुटल्या, कसला भारी स्वयंपाक करतोस रे तु.
जबरी दिसत आहे भाजी एकदम. करणार या पद्धतीने. मी नारळाच दुध , हिरवी मिरची घालून बीडाच्या तव्यात खरपुस भाजून करते बरेचदा.
वरदाच्या टिप्स पण खुप मस्त आहेत आणि srd ची काचर्‍याची पण.

धन्यवाद सीमा (आईचं ही नाव Happy ).
बाहेरचं खाऊन तब्ब्येत अती बिघडल्यावर विंटरेस्ट घेऊन शिकून घेतलं होतं आता आवडीचं झालं हे सगळं करणं...

मला आपली साधी कोवळ्या दुधीची भाजी प्रचंड आवडते. पण ही भाजी आणि वरदाने सांगितले तशी भाजी दोन्ही छान लागतील असं वाटतंय! मस्त पाकृ Happy

मस्त!
अजून एक प्रकार म्हणजे कांदा आणि टोमॅटोच्या फोडी फोडणीत घालून परतायच्या, दुध्याच्या फोडीही घालून परतायच्या, वाफेवर भाजी शिजवून घ्यायची आणि मग सांबार मसाला घालायचा. अशीपण छान लागते.

मी सांबार मसाला घालून दुधीची भाजी करताना , कडीपत्ता आणि आख्ख्या लाल मिरचीची फोडणी करते. त्यात थोडी भिजवलेली हरभरा डाळ, धण्याची पूड सांबार मसाला आणि भरपूर ओला नारळ घालते.

आता एकदा अशी ही करून बघेन.

योकू तुझ्या पद्धतीने आता भाजी केलीये
जबरदस्त झाली.
साखर घातली नाही अजिबात.
सगळं परफेक्ट. फक्त अर्ध तेल आणि अर्ध साजूक तूप असं केलं आणि हिंग घातला.
फोटो अपलोड होत नाहीये इथे

काल या पद्धतीने केली भाजी. घराजवळच्या इं ग्रो मधे श्रीलंकन करी पावडर मिळते ती घातली . सांबार मसाल्यापेक्षा थोडी जास्त तिखट असते पावडर आणि घटक अंमळ जास्त रोस्ट केलेले असतात. मस्त खरपूस चव आली. आ स्व पू च्या धबडग्यात केल्याने फोटो काढायचा राहिलाच. नॉन स्टिक कढईत करुन देखील छान कोरडी पण मिळून आली भाजी.

पुढच्या वेळेस फोडणी मधे उडीद आणि चणा डाळ घालणार

मस्त आहे रेसिपी. दुधी बराच होता त्यामुळे मूळ रेसिपी मधला बटाटा मी स्किप केला आणि चिंच घातली थोडी. भाजी आवडली Happy

गेल्या 2 आठवड्यात 2 वेळा केली ही भाजी आमच्याकडे,
सगळ्यांना आवडली,
वर मेधा म्हणल्यात तसे मसाल्याबरोबर प्रयोग करायला हरकत नाही, मालवणी मसाला, किंवा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालून.

योक्या हा धागा वर आला ते बेस झालं, परवा परत एकदा ही भाजी करून खाल्ली. मागच्या वेळी साम्बार मसाला मी भावनेच्या भरात बहुधा जास्ती घातला होता, या वेळी सगळं पर्फेक्ट. मुख्य म्हणजे या वेळी गुळ घातला होता.

Pages