हुलग्याची (कुळीथाची) शेंगोळी

Submitted by हरिहर. on 25 July, 2018 - 12:50

मायबोलीवर ही माझी पहिलीच पाककृती आहे. फोटो मागील महिन्यातील आहेत. तसेच या अगोदर मिपावर ही पाकृ टाकली होती. येथे अनेकवेळा प्रयत्न करुनही पाकृ टाकता येत नव्हत्या त्यामुळे प्रथम ही टाकतो आहे. व्यवस्थीत टाकता आली तर बाकीच्या नविन पदार्थांच्या पाककृती टाकेन.

हुलगे, याला कुळीथही म्हणतात. कोकणातले कुळीथ लालसर रंगाचे असतात. त्याचं पिठलं छान होतं. पण आमच्या मावळपट्ट्यात मात्र काळसर रंगाचे हुलगे होतात. त्यांना ‘मांजे’ म्हणतात. बरड माळरानावर, डोंगरऊतारावर यांची जोमाने वाढ होते. एकेकाळी जनावरांना खावू घालायचे हे हुलगे पण आजकाल हे बरेचसे दुर्मीळ झालेत. या हुलग्यांची आमच्याकडे शेंगोळी होते. काही भागात वेगवेगळ्या पिठांची करतात पण त्यांना हुलग्याची (कुळीथ) मजा नाही. हुलग्याच्या पिठाचे पावसाळ्यात, हिवाळ्यात माडगंही करतात. बऱ्याच भागात शेंगोळीचं कालवण करतात वाटलेला मसाला घालून पण खरा खाणारा दर्दी मात्र शेंगोळीला दाद देतो. ज्यात अंगाबरोबर रस्सा केला जातो आणि रस्साही फक्त पाण्याचा असतो. कोणताही मसाला किंवा फोडणी न देता हा प्रकार केला जातो. जो काही मसाला असतो तो पिठ मळतानाच टाकलेला असतो. यातही परत दोन प्रकार आहेत. आजकाल कुणाला हातावर शेंगोळी करणे जमत नाही. म्हणजे दोन तळहाताच्या मध्ये छोटासा पिठाचा गोळा घेउन, मांडीवर ठेवलेल्या परातीमधे याचे वेढे तयार करायचे. सोऱ्या वापरुन चकली करतात तो प्रकार. पण हे फार कौशल्याचं काम असतं. बऱ्याच गृहिणी जमत नाही म्हणून पोळपाटावर हाताने लाटून मग त्याला गोल आकार देतात. अर्थात खाणारा जर जाणकार असेल तर पहिल्याच घासात ओळखतो की आज्जीच्या हातची आहे की सुनबाईच्या. आमच्या जुन्नर भागात जर शेंगोळी किंवा मासवडीचा बेत असेल तर सामिष आहाराकडे कुणी ढुंकूणही पहात नाही. तसं पाहीलं तर मासवडीचं रुपडं तसं मोहक. छान तर्रीचा तवंग असलेला झणझणीत रस्सा, कांदा, लसूण आणि तिळाचा भरपुर वापर केलेला मसाला पोटात भरलेली नाजूक मासवडी, खरपुस पापुद्रा सुटलेली पातळ भाकरी, मिठाच्या पाण्यात टाकलेला कांदा, लिंबाच्या फोडी आणि सोबत इंद्रायणी भात. वा! पण शेंगोळीचं मात्र तसं नाही. दिसायला थोडी वेगळी, रंगरुप जवळ जवळ नाहीच. शेंगोळीचं प्रेम रक्तातच असावं लागतं. ते मागच्या पिढीतून पुढच्या पिढीकडे वारश्यानेच येतं. तुमच्या घराला जर शेंगोळीची परंपरा नसेल तर तुम्ही कितीही टेस्ट बड डेव्हलप केले तरी तुम्हाला त्या चविची आवड निर्माण होईलच असं काही नाही. नविन माणसाने पहिल्यांदा शेंगोळी पाहीली तर हमखास नाक मुरडणारच. आम्ही एकदा शेजारी रहाणाऱ्या गुजराथी कुटूंबाला शेंगोळी दिली होती. पण डिशकडे पाहुनच त्या गुजराथी भाबीने “ई ऽ हे क्काये?” म्हणत असे काही तोंड केले की वाचारु नका. त्यामुळे नविन पाहूण्यासाठी हा खास मेन्यू करायचं टाळलं जातं. ईतर वेळीही हा पदार्थ घरी होतोच पण जेंव्हा सणाचे पुरणा-वरणाचे किंवा गोडाचे जेवण होते त्याच्या दुसऱ्या दिवशी हमखास हा पदार्थ घरी होतोच होतो. हे हातावर वेढे वळायचं कौशल्य बायकोला नुकतेच साधलय. त्यामुळे या पाकृ मधील वेढे मी केलेले आहेत. (घरात हातावर वेढे करणे फक्त आई आणि मलाच येत असल्याने बहुतेकदा ही जबाबदारी माझ्यावरच असते. मला आवडतेही करायला.) तर पाहूयात ही पारंपारीक ‘शेंगोळी’ कशी करतात ते.

साहित्य:
हुलग्याचे पिठ - दोन वाटी
भाजलेले शेंगदाने - अर्धी वाटी
कोथिंबीर - मुठभर
जिरे - १ टी स्पुन
हिंग- पाव टी स्पुन
लसुण- दिड ते दोन कांदे
मिठ- चवीनुसार
लाल तिखट (मिरची पावडर)- दोन मोठे चमचे
भरपुर तेल (शक्यतो शेंगदाना तेल)

कृती:
पिठ आणि तेल सोडून बाकी सगळे साहीत्य थोडे पाणी टाकून मिक्सरमध्ये अगदी गंधासारखे बारीक वाटून घ्यावे. ही पेस्ट हुलग्याच्या पिठात टाकून पिठ घट्ट मळावे. गरजेपुरते पाणी टाकावे. पिठ घट्टच मळावे. सैल झाले तर वेढे पाण्यात विरघळतील किंवा जास्तच घट्ट झाले तर शिजणार नाहीत. हा अनुभवाने येणारा भाग आहे.
१.
sngl1.jpg
२.
sngl2.jpg
३.
sngl3.jpg

आता या पिठाचे लहाण लिंबाएवढे गोळे (पेढे) करुन घ्यावेत. येथून पुढील भाग बराच ट्रिकी आणि प्रॅक्टीसचा आहे. तळहाताला थोडे पाणी लावून एक गोळा दोन्ही तळहातांच्या मध्ये हलकेच धरावा. मग दोन्ही तळहात दाब देत मागेपुढे करत (रवीने ताक घुसळतो तसे) सोऱ्यातुन चकली जशी बाहेर पडते अगदी त्याच प्रमाणे आणि तेवढ्याच जाडीचे पिठ हलके हलके खाली येवू द्यावे.
४.
sngl4.jpg

ते तुटू न देता खालील ताटात चकली प्रमाणे आकार द्यावा. हा बऱ्याच सरावाचा भाग असल्याने पहिल्यांदा सरळ पोळपाटावर शेंगोळीला लांब आकार देवून मग वेढे केले तरी चालतील. (चवीत थोडासा फरक पडतो पण नकळण्या इतपतच.)
५.
sngl5.jpg

हे वेढे करत असताना गॅसवर चार वाट्या पाणी ऊकळायला ठेवावे. त्यात दोन चमचे तेल आणि मिठ टाकावे. पाण्याला खळखळून ऊकळी आली की एक एक करत सगळे वेढे पाण्यात सोडावे. ज्या ताटात पिठ मळले असेल ते धुवून, पिठाचा एक पेढा पाण्यात कुस्करुन ते पाणी टाकावे. गॅस मंद करावा आणि जरा खोलगट झाकण ठेवावे. त्यात थोडे पाणी टाकावे. साधारण चाळीस मिनिट न हलवता शिजवावे.
(तयार पदार्थाचा फोटो मुद्दाम दिला नाही. नविन व्यक्तीला थोडा विचित्र वाटेल आणि 'एकदा करुन पाहूयात' हा विचार डोक्यातून वजा होईल. प्रतिसादात देइन नंतर)

या पदार्थाला कोणत्याही सजावटीची गरज नाही. गरमागरम वाढावे, वरुन कच्चे तेल घ्यावे आणि बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा तसेच खावे. तोंडी लावायला कांदा हवाच. शेंगोळी जर ऊरलीच तर सकाळी लोखंडाच्या तव्यावर गरम करावी. अप्रतिम लागते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंक साठी धन्यवाद योकु. मी पाहिला धागा. साहित्य बरेचसे सारखे असले तरी कृतीत फरक आहे खुप. वरील प्रकार शक्यतो मावळ भागात केला जातो. ज्यात फोडणीला कुठेही स्थान नसते. तसेच याचे जिलेबीसारखे वेढे केले जातात, कडबोळ्याप्रमाणे आकार देत नाही. त्यानेही चवित बराच फरक पडतो. तुम्ही दिलेल्या लिंकमधली पाकृ देखील सुरेखच आहे.

तोंपासु.
शालीजी तुम्ही सजावट नाही म्हणालात. पण कोथिंबीर चांगली लागते.

दिसायला थोडी वेगळी, रंगरुप जवळ जवळ नाहीच. शेंगोळीचं प्रेम रक्तातच असावं लागतं. ते मागच्या पिढीतून पुढच्या पिढीकडे वारश्यानेच येतं. तुमच्या घराला जर शेंगोळीची परंपरा नसेल तर तुम्ही कितीही टेस्ट बड डेव्हलप केले तरी तुम्हाला त्या चविची आवड निर्माण होईलच असं काही नाही.>>> +१
गरमागरम शेगोळ्या आणी वर तुप मस्त बेत असतो, हिवाळ्यात खावी, उन्हाळ्यात गरम पडतात.

कृपया या पुढे पाक़कृती प्रकाशीत करताना "लेखनाचा धागा" हा पर्याय न निवडता " पाककृती" हा पर्याय निवडावा ज्यामुळे पाककृतींचे आपोआप वर्गीकरण सोपे होते.
recipe_option.jpg

अरे वा! मस्तच!
मासवडीचीही तुमची खास पाकृ असेल तर लिहा ना. नारायणगावला असताना मासवडीचं खूप नाव ऐकलं होतं पण एक-दोन वेळा खाल्ली ती खूपच मसालेदार वाटली.

<ते तुटू न देता खालील ताटात चकली प्रमाणे आकार द्यावा. > हे भारीच जमलंय तुम्हांला.

पाणी पूर्ण आटेपर्यंत शिजवायचेत का?

बघू जमतंय का ते.

दिसायला थोडी वेगळी, रंगरुप जवळ जवळ नाहीच. शेंगोळीचं प्रेम रक्तातच असावं लागतं. ते मागच्या पिढीतून पुढच्या पिढीकडे वारश्यानेच येतं. तुमच्या घराला जर शेंगोळीची परंपरा नसेल तर तुम्ही कितीही टेस्ट बड डेव्हलप केले तरी तुम्हाला त्या चविची आवड निर्माण होईलच असं काही नाही.>>> +१

आम्ही याच पद्धति ने बनवतो.

चकल्या मस्त पाडल्या आहेत..
ते मागच्या पिढीतून पुढच्या पिढीकडे वारश्यानेच येतं. << आमच्या कडे मागची पिढी अगदी प्रेमाने खायची पण ह्या पिढीत कोणीच खात नाही...

तोंडाला पाणी सुटले.
शाली, या एकदा गावी. फक्कड शेंगोळीचा किंवा मासवडीचा बेत करु.

तुमचा लेख वाचताना, पाट्या वरवंट्या वर वाटलेला मसाला , चुलीवर उकळणारे शेंगोळीचे आधण आणि डोक्यावरील पदर सावरत परातभर मस्त नाजूक शेंगोळीचे आढे वळणारी माझी आज्जी डोळ्यासमोर आली.

IMG-20181101-WA0001.jpgIMG-20181101-WA0000.jpg

आज केले. पण शालीजींच्या प्रमाणे नाही जमले.

धन्स

मातोश्रींची कृपा.
पाटावरच्या शेवयांसारखे केले आहेत. हातावर जमले नाही.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे वाटण घालून पीठ कालवले. झक्कास चव येते. हे आमच्या साठी वॅल्यू अॅडीशन होते. धन्यवाद शालीजी