वांग-पावटा एक भन्नाट युती

Submitted by राजेश्री on 18 July, 2018 - 13:11

माझे खाद्यप्रयोग (६)

वांग-पावटा एक भन्नाट युती

युती करायची तर ती दोघांना सोयीस्कर अशी असली पाहिजे. एकाच अस्तित्व झाकोळायच आणि दुसऱ्याने उठावदार व्ह्यायच याला युती नाही म्हणता येणार.युती म्हणजे दोघांनाही समसमान न्याय.दोघांच्या अंगभूत गुणांना समान वाव.एकमेकांच्या अस्तित्वाचा एकमेकांना फायदा होणं म्हणजे युती.एकमेकांबरोबर राहताना एकमेकांचे पाय ओढण म्हणजे काही युती नाहीच.एकमेकांना पाठिंबा देत दोघांचीही प्रगती घडवून आणणे म्हणजे युती.मी इथे स्पष्ट करते की मी राजकारणाबद्दल नाही बोलत आहे.युती फक्त राजकारणातच होते अस थोडीच आहे युती तर दोन भाज्यांमध्येही होतेच.या युती इतक्या मजबूत असतात की kkhh मध्ये शाहरुख कसं अंजली म्हंटल्यावर शर्मा म्हणतो तस वांग असं म्हंटल की सारे पावटा अस म्हणत असतात.
वांग आपल्याबरोबर बटाट्याला कुठेही घेऊन जायला तयार असेल पण वांग्यात पावट्याला जेवढं वेटेज मिळत तेवढं वेटेज बटाट्याला नाहीच मिळत कारण बटाट्याचे स्वतःचेही एक वेटेज असतच.आणि हो सारखा बटाटा खाऊन आपलं वेटेज वाढत असत ते वेगळंच.बटाट्याचा विषय निघाला आहे तर सांगते,बटाटा हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे आपण त्याचा विषय नकोच काढायला.आपण वांग पावट्याबद्दल बोलत होतो.
नुसते वांग आणि नुसता पावटा दोहोंचीही आमटी भारीच लागते. आमिर खानचा कसा एकट्याच्या जीवावर पिक्चर चालतो.आणि सलमान च्याही तसंच एकंदरीत हे प्रकरण आहे.पण वांग पावटा एकत्रित आले तर क्या बात है.वांग खरेदी करण्यापासून आपण आज या प्रकरणात लक्ष घालणार आहोत.देशी वांगी असतील तर ती चविष्ट असतात.आमच्या कृष्णाकाठाची वांगी गाभ्याने मऊ आणि गोडच असतात.वांगी काटेरी असतील तरीही ती चविष्ट असण्याची शक्यता बळावते.आमच्या इकडे काळ्या रंगाची वांगी सहसा नसतातच.आमच्याकडे गडद वांगी कलरची पण वांगी नसतात.फेन्ट वांगी कलर आणि मध्ये पांढरे पट्टे अशी,क्वचितसा हिरव्या पणाकडे झुकलेला रंग.वांग्याची आमटी आणि मसाले वांगी करायची असतील तर ती उभट आकाराची आणि जास्त कोवळी ही नाही आणि जुनं ही नाही अशीच खरेदी करावीत.मात्र वांग्याचे भरीत करायचे असेल तर मग ते जून,बी असलेले चालते. पावटा घेतानाही शेंगेवरून पावटा जास्त कोवळा की जुन आहे ते कळत.चविष्ट पावटा कोणता ही ओळखायची आहे एक खूण ती म्हणजे आतील पावट्याचे दाणे काटाला पांढरे असतात.मला पावटा सोलताना आमच्या शाळेत असलेला चिवटे या आडनावाचा मुलगा हमखास आठवतो,मी त्याला चिवट्या-पावट्या अस चिडवायचे चौथीत असताना.असो
तर वांग पावटा निवडणे ही झाली प्रयोगाची पूर्वतयारी.आता आपण प्रत्यक्षात कृती करूयात.वांगी स्वच्छ धूऊन घ्या.वांगी करताना डोळ्या पाणी दाटायचा काहीच प्रश्न नाहीये कारण वांग्यात कांदा घालत नसतात.वांगी चिरून आणि पावटा सोलून घेतला की ,गॅसवर पातेले ठेऊन त्यामध्ये तेल तापत ठेवायचे.गॅस मंदच हवा.तेल तापले का बघायला वांग्याचा छोटा तुकडा तेलात टाकायचा चर्र असा आवाज आला की तेल तापले असे समजायचे.मग एकामागोमाग एक सगळे काप तेलात सोडायचे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं. मग त्यामध्ये पावटा टाकून वांग पावटा एकत्र हलवून भाजून घायचा.त्यावर किंचित हळद टाकली तरी चालेल भाजताना.आता मीठ,चटणी आणि शेंगदाण्याचे कूट घालून ते सर्व मिश्रण एकत्र करून त्यामध्ये एक ग्लास कोमट पाणी शिजायला ओतायचे.आणि झाकण टाकून वांग पावटा शिजण्याची वाट बघायची.
या दोहोंचीही चव एकत्र मिसळून आमटी किंवा भाजीला एक वेगळीच स्वादिष्ट अशी चव येते.वांग पावटा भाकरी बरोबर खाण्यात सुख आहे तर चपाती बरोबर खाण्यात आनंद.वांग पावटा आणि भात पण भारीच लागतो.कोणतेही जास्तीचे व्याप करायला न लागता वांग पावटा लगेच तयार होत असतो.पावसाळ्याच्या दिवसात वात असलेले पेशंट टाळतात बहुदा वांगी खाणं पण वांगे पावटा हिवाळा या ऋतूत मस्तच लागतो.वांग पावटा माझी तर फारफार फेव्हरिट डिश आहे.पदार्थाची मूळ चव बिघडू न देता त्यांची मूळ चव जाणवावी म्हणून कमीत कमी मसाल्यात वांग पावटा ही डिश तयार होते.मस्त लागते.तर मग तुम्हीही करून पहा... मस्त खा..स्वस्थ्य रहा... आपण सारे खवय्ये...

©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
१८/०७/२०१८IMG_20180717_080854.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वांग-पावटा एक भन्नाट युती >> शीर्षकात वांगं/वांगे/वांगी काहीतरी करा. बांग/टांग सारखं वांग फार विचित्र वाटतं वाचायला.

कोल्हापुरला चटणी म्हणजे मसाल्याचे तिखट.
मसाल्याचे तिखट म्हणजे, ब्याडगी मिरचीचे तिखट आणि त्यात सगळा मसाला (चक्रीफुल, जायपत्री , दगडफुल वगैरे एक्झोटीक गोष्टी) घातलेला असतो. काही लोकांकडे त्यात कांदा लसूण असतो काहींकडे नसतो. माझ्या घरी कांदा लसून असत नाही कारण चातुर्मासात घरी आजी वगैरे कांदा लसून खायची नाही,
चटणी हे एक मोठ प्रकरण असत आमच्याकडे. आई अजुनही सहज ७-८ किलोची चटणी वर्षभरासाठी करून ठेवते.
मिरच्या वाळवायच्या. मंद गॅस वर सगळे मसाले, खोबर भाजून घ्यायच. कांडून आणली कि अगदी निगुतीने ते सगळ मोठ्या बरण्यात भरून ठेवायच.
कोल्हापुर च्या आसपास खेड्यात गेलात कि संध्याकाळी शेतावरून आलेल्या भाजीची अशी चटणी टाकून केलेल्या भाजीचा वातावरणात एक टिपिकल मस्त वास येत असतो . विकतची चटणी कांदा लसूण शिवाय मिळण जरा कठीण आहे. पण मिळाली तर ती जरूर ट्राय करा. कमी उग्र असते कांदा लसणापेक्षा.

ज्यांना ही भाजी करायची आहे त्यांनी तात्पुरती काळा मसाला आणि प्लेन तिखट घालून करा. चव अगदी तशीच येणार नाही. पण मुळात पावटा आणि वांग काँबो छान लागत त्यामुळ आवडेल.
कोरडी भाजी केली तर यातच गाजर, वाटाणे अ‍ॅड केले कि भोगीची भाजी.

अगदी अस्सल चव बाजारी मसाल्याला नाहीच येत. इथे ऑफिस कलीग्जचे डबे चाटून साफ होतात माझ्याकडून. अजिबात तिखट नसतं कालवण तरीही एक वेगळाच झणका, मसाला असा जाणवतो.
इथे एक कृती आहे.
यील्ड - १२ किलो सांगतेय. अर्थातच, तेल, मीठ इ असल्यानी वर्षभर सहज टिकेल...
आणि हाच सगळा कुटाणा घरी करायचा कंटाळा म्हणा, वेळ नसतो म्हणा पण काही केल्या जात नाही, असो...

लेखिकाताई म्हणजे

साहित्य : असे लिहून चार वांगी, एक मुठी पाव टे दोन चमचे काय तो मसाला मीठ तेल असे आधि लिहा मग

कृती: असे लिहून कसे बनवले ते लिहायचे. खास टिप्स असतील त्या शेवटी लिहा बाकी सर्व ललित पार्ट नंतर लिहा किंवा प्रतिसादात. युअर चॉइस. म्हणजे तुमच्या वाचक वर्गाला सोयीचे जाते घरी बनवायला.

राजेश्रीची खाद्ययात्रा मी ललित म्हणूनच वाचते. त्यातला पाककृती हा भाग फारसा महत्वाचा नसतो माझ्यासाठी. साहित्य, कृती,टिप्स, फोटो वगैरे साच्यात बसणाऱ्या कित्येक पाककृती उपलब्ध आहेत. राजेश्रीने ही मालिकादेखील त्याच मार्गाने नेऊ नये असे मला वाटते.

Ami + 1.
पकाऊ पाक कृत्या फार आहेत माबो वर. लेखिका चांगलं लिहितायत.

पाककृती 'पकाऊ'च हवी ना? Wink Proud
ललित हवं तर ते ही लिहा की. ते वाचायला ही आवडेलच. पण घटक आणि कृती नीट असेल तर त्यानुसार बनवता येतं. दोन मोठ्या परिच्छेदातून घटक, मग पायऱ्या शोधा आणि त्यात काही तरी राहणार अशी कृती मला फॉलो करता येत नाही.
अर्थात तुमची मर्जी. पटतंय का बघा.

सीमा चटणीबद्दल छान माहिती दिलीत तुम्ही, thank u. मी सरसकट कांदा लसूण मसाला असतो त्यालाच कोपुकर चटणी म्हणतात हे समजत होते.

@अमितव
चटणी म्हणजे तिखट पूड जी आम्ही घरी वर्षभराची करून ठेवत असतो.
इतर मसाल्यामध्ये तुम्ही कोथिंबीर,ओल खोबर आणि लसूण वाटून घालू शकता
बेडेकर किंवा एव्हरेस्ट गरम मसाला असतो तो घालतात
आणि शेंगदाणे च कूट करून घालायचं

Pages