ग्रुप ऍडमिन ची गर्ल फ्रेंड

Submitted by रोहिणी निला on 23 July, 2018 - 06:26

मला कळायला लागल्यापासून आम्ही जायचो तेव्हा तेव्हा ती त्या घरात असायचीच. खरं तर असं म्हणायला ती कुणी त्रयस्थ नव्हतीच. ते घर तिचंच तर होतं. म्हणजे काही अंशी होतंच म्हणायचं. नटण, मुरडण, आरशात बघणं, सिनेमाची थिल्लर गाणी म्हणणं ह्या सगळ्या सगळ्या गोष्टींना ज्या बाळबोध घरात मज्जाव होता तिथं ती ह्या सगळ्या गोष्टी मुद्दाम करत असल्यासारखी वागायची.

कधी ती मोठ्या माणसांसारखी वाटायची तर कधी आमच्याशी भांडायला लागली की आमच्यापेक्षाही लहान आहे की काय अशी वाटायची. कधी शेजाऱ्या पाजाऱ्यांशी जास्तच व्यवस्थित आणि आदराने वागायची आणि कधी आई, मावशी यांना नको नको तसं बोलून त्यांच्या डोळ्यात पाणी काढायची.

तिच्या डोळ्यांत जो भाव मध्येच चमकायचा आई आणि मावशीसाठी ... ज्यावेळी तिचा चेहेरा वेगळ्याच व्यक्तीचा वाटायचा ..... त्याला असूया म्हणतात हे खूप नंतर कळालं. कधी उगीचच ह्या काना पासून त्या काना पर्यंत हसायची अजिबात आवाज न करता तर कधी आम्ही खालच्या अंगणात खेळत असलो की जोरजोरात ओरडून घरात बोलवायची आणि हात पाय धुवून देवाला नमस्कार करून ओळींने बसायला लावायची.

आम्ही नाराजीनेच तिथं बसायचो आणि तिचं लक्ष नाहीसं बघून तिच्याबद्दलच खुसपुस करायचो. आणि तेव्हा ती मात्र रेशमासारख्या मऊसूत पोळ्या करून जेवायला वाढायची. त्या पोळ्या माझ्या घशाखाली उतरायच्या नाहीत. बरेच वेळा ती सुट्टी लवकर संपवून आपल्या घरी जावं असं मला खूप वाटायचं. पण आईला हे सांगायची हिम्मत व्हायची नाही.

मामाचं लग्न होऊन एक छान सुंदरशी मामी त्या घरात आली. स्वतःचे आई वडील लहानपणीच गमावलेली ती मुलगी नातेवाईकांकडे वाढली होती. तिला ह्या भरल्या घरात येण्याचं कौतुक होतं.

कार्यालयातून आल्यावर रात्री सर्वजण झोपी गेल्यावर 'ती' मात्र अचानक उठून धुसफूस करायला लागली. सारखी सारखी नव्या मामीबद्दल वाटेल ते बोलायला लागली. मामीला तिच्या दिसण्याचा गर्व आहे, तिनं माझा अपमान केला, कार्यालयात मला उगीच हिणवत होती. मामा पण लगेच तिच्या पुढं पुढं करायला लागलाय वगैरे वगैरे. तिचा आवाज ऐकून मामा खोलीतून बाहेर आला. ती मामालाच विचारायला लागली की ती जास्त सुंदर आहे की मामी. आत हे सगळं मामीला नक्कीच ऐकू जात असणार हे वाटून सर्वांनाच मेल्याहून मेल्यासारखं झालं.

आत गेल्यावर मामाने मामीला काय आणि कसं समजावलं ते माहिती नाही पण त्या क्षणापासून मामी त्या घरात दबावाखाली असल्यासारखीच वावरू लागली. तिच्या ह्या असंख्य तुकड्यांना जवळून पाहिलेल्या मामीची तब्येत पुढे आयुष्यभर नाजूकच राहिली. पण जेवढी काही राहिली तेवढी बरीच म्हणायची.

उन्हाळ्यात शाळेला सुट्टी म्हणून आनंद होण्याआधी तिकडे जायचं म्हणून टेंशन यायचं मला. पण आईला मात्र शक्य तितक्या लवकर जायचं असायचं. ती आजी आजोबांची सर्वात मोठी मुलगी असल्यामुळे आम्ही गेलो की ते सगळेजण बऱ्याच महत्वाच्या गोष्टी ठरवायचे. मग दुसऱ्या गावाहून मावशी आणि तिची मुलं पण यायची.

एकदा अशाच एका सुट्टीत काहीही कारण नसताना म्हणजे तिनं खूप आक्रस्ताळेपणा केला. आरडा ओरडा, आदळ आपट केली. आणि मामाला सांगितले की तुझ्या बायकोला घराबाहेर काढ. ती सारखा माझा अपमान करते. तेव्हाच मामा स्वतःही मामीबरोबर बाहेर पडला आणि वेगळा राहू लागला.

त्यावेळी आम्ही भावंडं थोड्या कळत्या वयात होतो. तिचा प्रॉब्लेम काय आहे? का सगळे तिचं विचित्र वागणं सहन करतात? मामानं तिलाच का घराबाहेर जायला सांगितलं नाही? आजोबांनी तिच्या मुस्कडात का लावली नाही? याची चर्चा आम्ही त्या भाड्याच्या घराच्या कॉमन गच्ची वर दबक्या आवाजात केली.

आपल्याकडे एक वेडगळ समज खूप पूर्वीपासून आहे, अमक्याचं लग्न झालं की सुधारेल. मग एक दिवस तिचं पण लग्न केलं गेलं. आम्हाला ज्याच्याबद्दल फार काहीच वाटू शकणार नाही अश्या एका माणसाचा कुटुंबात नावापुरता प्रवेश झाला. पण कुणाला कल्पना होती की हे लग्न म्हणजे संधी नसून विग्रह होता.

आणखी तुकडे.... मग एक दिवस ती परत आली. किती तुकडे गोळा करून कसेतरी चिकटवून तिला पुन्हा उभी केली. पण एकदा जे चुकलं ते पुढं आणखी आणखी चुकतंच गेलं. आई आणि मावशी फोनवर बोलायच्या दबक्या आवाजात तेव्हा काहीतरी अर्धवट ऐकू यायचं. कधी असं की तोच विचित्र होता. तिच्याशी खूप वाईट वागायचा.... आता ह्या वाईट मध्ये काय काय असू शकतं हे कळायचं ते वय नव्हतं.

तर कधी असं की हिला समजुतीनं घ्यायचं कळतच नाही. लग्न झाल्यावर काही गोष्टी बदलणारच वगैरे वगैरे.

मध्ये कधीतरी आईनं तिला जरा बदल म्हणून आमच्या घरी काही दिवसांसाठी आणलं. ते सर्व दिवस मी प्रचंड तणावाखाली घालवलेले मला अजूनही आठवतात.

ती मग उगीचच मोत्याची माळ घालून नटायची, आरशात स्वतःला बघून तिचं ते टिपिकल हसू हसायची. कुठल्या तरी रद्दड सिनेमातल्या गाण्याची मधलीच कुठली तरी संदर्भहीन ओळ मोठ्याने म्हणायची. मग आईशी कुठल्या तरी फालतू गोष्टीवरून प्रचंड भांडली. एकटीच निघाली होती तिच्या तिच्या घरी. पण आईच नेसत्या साडीवर तिला एस टी ने आजोबांच्या घरी सोडून आली.

आजोबांनी दुसऱ्या एका गावात .... खरं तर गावाबाहेर बांधलेल्या 3 खोल्यांच्या घरात ती आजी आजोबांसोबत राहायला लागली. त्यानंतर त्या घरी मोजून २ वेळाच जाणं झालं. एरव्ही एकटी आईच जाऊन यायची अधे मध्ये. एकदा आमच्या एका उन्हाळी सुट्टीत गेलो. तिच्या सर्व भावंडाना एकत्र काही निर्णय घ्यायचे होते. माझ्या पोटात ते सर्व दिवस भयंकर गोळा येत रहायचा. घास घशाखाली उतरायचा नाही.

मग एक दिवस एक गाडी आली. मामा, आजोबा आणि मावशीचे मिस्टर त्या हॉस्पिटल च्या साड्या नेसलेल्या बायकांसोबत तिला घेऊन गेले आणि रात्री परत आले. मग सगळे अनिच्छेनेच जेवले आणि मुलं झोपायला लागल्यावर बोलत बसले. खोली कशी आहे, डॉक्टर काय म्हणाले, शॉक ची गरज आहे का वगैरे वगैरे. मला तिच्या अनुपस्थितीने बरं वाटायला हवं असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात पोटातला गोळा काही जात नव्हता.

मध्ये काही वर्षं गेली. तिचं अस्तित्व पण माझ्या मनावरून पुसलं गेलं. मध्येच कानावर आलं की आजोबा तिला परत घरी घेऊन आले आहेत. कारण शॉक ट्रीटमेंट चा थोडा चांगला परिणाम होऊन ती जरा बरी झाली होती. खरं तर इतक्यात तिला न आणण्या बद्दल आजोबांना सर्वांनी समजावून पण त्यांनी तिला आणलंच. त्यांचं मन तिच्या त्या अयशस्वी लग्नामुळे त्यांना खात होतं. माझ्या पोटात घरात बसल्या बसल्या गोळे यायला लागले.

मग त्यानंतर मात्र एक दुःखद गोष्ट घडली म्हणून आम्ही त्या घरी गेलो. कुठल्याश्या कारणाने आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना मुसळधार पावसाच्या रात्री तिनं घराबाहेर काढलं. रात्रभर वाऱ्या पावसाच्या माऱ्याने आजी तापाने फणफणली. पहाटे घराबाहेरच तिला एक मोठा हार्ट अटॅक आला आणि ती तिथेच गेली.

सुन्न अवस्थेत सगळे तिथं पोहोचल्यावर सर्व विधी कसेबसे पार पाडले. ती तुकड्या तुकड्यात कधी आईची आठवण काढून गळा काढायची तर कधी उगीच आरशात बघून आवरल्या सारखे करून बाहेर जाऊन ४-५ तासांनी परत यायची. दिवस होते म्हणून घरचे सगळे तिथेच राहिलो होतो. मामी तर ती तिथं नाही ते बघून तेवढ्या वेळात येऊन गेली. थांबलीच नाही. आई आणि मावशी स्वयंपाकाचं बोलत होत्या तर आईवर धावून गेली की इथं माझी आई मेली आहे आणि तुम्हाला जेवणं सुचताहेत. यावेळी मात्र मी हिम्मत करून आईला लगेचच आमच्या घरी जायला भाग पाडलं.

नंतर काही वर्षात आजोबा पण गेले. त्या घरात ती एकटीच वावटळीसारखी नांदायला लागली. आता कुणाशी स्पर्धा नाही. कसली असूया नाही. सगळेच दुरावलेले. नंतर मामाला तिकडच्या कुण्या शेजाऱ्या कडून कळले ते म्हणजे ती अशीच कधीही घरी येते. कधी दिवसेंदिवस घराकडे फिरकत नाही. कुणाला ओळखत नाही. उगीच हसत राहते. स्वतःशी बडबडत असते.

आता मोठं झाल्यावर असं वाटतं की ते तुकडे तिचे होते की ती मुळातच तुकड्यांची बनली होती. उशिरा उमगलेल्या आणि नंतर नीट उपचार न झालेल्या मनोविकारानं तिचं आयुष्य तर उध्वस्त केलंच पण एका पूर्ण कुटुंबाला न सुटणारं कोडं घालून अपयशाच्या गर्तेत लोटलं.

मग काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सऍपवर एका ग्रुपवर ती दिसली.... 'ग्रुप ऍडमिन ची गर्ल फ्रेंड सापडली' ह्या शीर्षका खालील फोटोत. तिचे काळे पांढरे कसेतरीच कापलेले केस, भेसूर पणे लावलेलं पावडर कुंकू, मेणचट आणि फाटके कपडे. कुण्या विकृत व्यक्तीने तिच्या हातात एक घाणेरडा झाडू देऊन केवळ मनोरंजनासाठी तो फोटो काढला असावा. त्यावेळी मात्र मला तिच्याबद्दल प्रचंड वाईट वाटलं. एक माणूस म्हणून तिची ती विटंबना पाहून पहिल्यांदाच पोटात तुटलं. गोळा नाही आला.

ती मात्र तिच्या त्या हसण्याने बघणाऱ्याच्या मन:शांतीचे तुकडे करत होती.

Group content visibility: 
Use group defaults

छान उतरवलं !
शेवटी विषण्ण झालो...
पुलेशु !

बाप रे!!
ओघवत लिहिलयं !+१११
आवडलं मला पण!

चांगले लिहिले आहे.
तुमचे दोन्ही लेख वाचून आता तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. शुभेच्छा!

त्रयस्थ व्यक्तीला वाईट वगैरे वाटू शकत तिच्याबद्दल. पण अशा एकाच abnormal ने बाकी कित्येक normal व्यक्ती असलेल्या अख्या कुटुंबाला वेठीस धरलेल असतं. एनिवे आता मनोरुग्णाबद्दल जागरूकता वाढू लागली आहे. पण उपचार सापडत नाही तोपर्यंत यांना आयसोलेटच करायला हवं. इतर काही पर्याय नाही.

अवघड आहे हे सर्व.
आणि तीचा फोटो काढून असा उपयोग करणारी वृत्ती किती विकृत म्हणायची!
एकुन मेंदुचे व्यापार फार अगम्य हेच खरं.
लिहीलय अगदी अकृत्रीम त्यामुळे जास्तच त्रासदायक वाटलं.
भारी लिहीलय!

schizophrenia चे क्लासिक उदाहरण आहे या कथेतील "ती". काल्पनिक आहे की सत्यकथा याने फरक पडत नाही. अशा व्यक्तींचे वागणे कसे असते हे फार छान भाषेत शब्दांकीत केले आहे. दुर्दैवाने असे लोक बरे होत नाहीत ,रिलॅप्स होत राहतात. over synaptic pruning असे काही तरी होते अश्या लोकांच्या बाबतीत,मेंदू हार्डवायर्ड होताना होते असे . आनुवांशिकता आणि एन्व्हारमेंटल फॅक्टर असतात यामध्ये. प्रेम आणि आपुलकीने जवळ घेतले तर बरेच आटोक्यात रहातात नाहीतर कुठेतरी जिर्ण मेणचट अंगाला प्रचंड दुर्गंधी येत असलेल्या अस्वस्थेत मरणाची वाट बघत हातवारे करत पडलेले असतात.
एखाद्या चांगल्या माणसाचे मन कसे छिन्न होऊ शकते याचे क्लासिक लिखाण आहे हे.

@केशव तुलसी

तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने हा प्रकार समजावून सांगितला.

छान लिहीले आहे.
तीचे वाईट वाटले..
ग्रुप ऍडमिन ची गर्ल फ्रेंड सापडली << हे कळलं नाही

सुन्न करणारं आहे हे... का कुणास ठाऊक पण whatsapp वरचे असे फोटो ना कधी विनोदी वाटले, ना कधी फॉरवर्ड करावेसे वाटले

Pages