माझा आजोळ बेळगाव २

Submitted by वेन्गुर्लेकर on 3 July, 2018 - 06:31

बेळगाव म्हटलं कि खूप साऱ्या गोष्टी माझ्या मनाभोवती रुंजी घालू लागतात. कॅलिडोस्कोप सारखा वेगवेगळ्या आठवणी,माणसं ,जागा ,चवी नॉस्टॅल्जिक बनवतात .
प्रेमळ आजी आजोबा ,आमच्याबरोबर मित्रांसारखे वागणारे आमचे मामा, मावश्या ,घरातल्यासारखे शेजारी त्यांची कानडी हेल असलेली गोड़ मराठी , आम्हा सर्व नातवंडांच्या दंगा ,मिलिटरी महादेव मंदिराची विज़िट ,शिवाजी गार्डन , गोआ वेसचा स्विमिन्ग पूल ,कपिलेश्वर मंदिर आलेपाक ,अनारसे ,पिठीसाखर भुरभुरलेले चिरोटे ,गार्डेनकडची विहीर जिच्यामध्ये पोहायला शिकलो,रविवारची कलावती मातेची बालोपासना ,खूप सारे सिनेमे ,आणि रेल्वे ब्रिज च्या जवळच्या ग्राऊंडवर भरणारे हँडीक्राफ्ट आणि फन फेअर जिथला पॉपकॉर्नचा वास अजून पण माझ्या मनात दरवळतो .
माझे आजोबा कोर्टात टायपिस्ट होते. रिटायरमेंट नंतर ते घरी टायपिंगची काम करायचे. अगदी शिस्तशीर सकाळी लवकर मॉर्निंग वॊक असायचा,आन्हिक देवपूजा आटपली कि त्यांच्या टायपिंग टेबल वर टायपिंगचं काम करत बसायचे. तेव्हा टाइपराईटर च्या कीज कडे न बघता फक्त मनुस्क्रिप्ट कडे बघत लयीत टाईप करताना बघणं मौज असायची .
माझी आजी नऊवारी नसणारी,काळ्याभोर केसांचा आंबाडा बांधणारी .खूप छान दिसायची. ती देगावची,बेळगाव जवळचा एक छोटयाश्या खेडेगावातून आलेली .सगळे राधाबाई म्हणून हाक मारायचे तिला.शेजारपाजारी ,नातेवाईक सगळ्यांना धरून ठेवणारी,माणसांची ओढ असलेली ,सुगरण असलेली,मुला नातवंडावर भरभरून माया करणारी,आम्ही लांब राहणारी नातवंड म्हणून आमच्यावर जरा जास्तच.:)तिच्याबरोबर भल्या पहाटे कुडकुडत जवळच्या बिच्चू गल्लीतल्या विठ्ठल मंदिरात काकड आरती ला जायचो ,तिथे विठ्ठलाला दह्या तुपाने आंघोळ घातलेली बघण्यासाठी .ती घरी शेवया बनवायची,पापड,कुरडया,सांडगे . दुपारच्या वेळी आजी ,माझी चुलत आजी शेजारच्या काकू ,मावश्या माजघरात बसून पापड शेवया बनवायच्या आमचं काम पापड वाळत टाकायला मदत करायचं असायचं त्याबदल्यात मस्त पापडाच्य पिठाची गोळी मिळायची .आजी संध्याकाळच्या वेळी आम्हाला गार्डन मध्ये काही खाऊ खाण्यासाठी स्वयंपाक घरातल्या फडताळातून पैसे द्यायची .मज्जा करा म्हणून सांगायची.सुट्टी संपल्यावर परत निघताना भरलेल्या डोळ्यांनी पुन्हा कधी येणार विचारायची .ती आता या जगात नाहीय हे पण अजून मन मानत नाहीय. असं वाटत कि तिथे घरात पाय टाकल्यावर समोर येईल ,मायेनी जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवेल .
आता बेळगावच झपाट्याने शहरीकरण होतंय ,ठिकठिकाणी नवनवे कॉम्प्लेक्स उभे राहिलेत ,पण मला अजून पण आठवतात ती लांबच लांब पसरलेली घर. घराचा पुढचा दरवाजा एका गल्लीत उघडणारा तर मागचा दरवाजा दुसऱ्या गल्लीत उघडणारा. बाहेरच्या बाजूला काडाप्पाचे कट्टे,जिथे लोक संध्याकाळी ,रात्री गप्पा मारत बसायचे .आजोबांच्या घरी घरापाठी मस्त लांबलचक अंगण होत ,मोठ्ठ पेरूचं झाड,जांभूळ,फणसाच झाड ,भरपूर सारी फुलझाडं ,एक काळ्याशार दगडाची झाडांच्या सावलीतली विहीर,तिच्याबाजूला त्याच दगडाची कपडे धुवायची डोण . छानसं तुळशी वृंदावन आणि त्यावर पडणारा प्राजक्ताचा सडा .
गल्लीतली सगळी घर थोड्याफार फरकाने अशाच रचनेची . काही काही घर मस्त भरपूर लाकूडसामान वापरून डेकोरेटिव्ह केलेली .काही साधी मातीची पण . काही घरात गोठा बाहेरच्या खोलीतच. कोकणात अस दिसत नसल्यामुळे ते विचित्र वाटायचं .आमची सराफ गल्ली बेळगाव मधली सर्वात रुंद गल्ली . गणपतीच्या दिवसात इतर गल्ल्या मंडपांमुळे जाम होऊन जायच्या पण सराफ गल्लीत हा प्रॉब्लेम कधी जाणवायचा नाही .
पुलंनी रावसाहेब मध्ये म्हटल्याप्रमाणे बेळगावच्या लोण्यासारखी तिथली हवादेखील आल्हाददायक . अगदी गरमीच्या दिवसात देखील संध्याकाळच्या वेळी छान गार वारा सुटायचं आणि हलक्या पावसाच्या सरी पडायच्या आणि वातावरण एक्दम थंड होऊन जायचं .
मला चित्रपट बघायची आवड हि बेळगावची देणगी.माझे मामा पण चित्रपट शौकीन अमिताभ बच्चन चे डाय हार्ड फॅन्स. तेव्हा मी मिथुनचा फॅन होतो तेव्हा अमिताभ पेक्षा मिथुन जास्त जवळचा वाटायचा आणि त्याबद्दल माझे कझिन्स माझी मस्करी पण उडवायचे त्यावरून.आपल्यातला वाटायचा .बेळगाव मध्ये तेव्हा जवळपास १०/१२ सिंगल स्क्रीन थिएटर्स होती.गार्डन जवळच स्वरूप नर्तकी कि जुळी थिएटर्स नंतर प्रकाश जिथे नंतर फक्त कन्नड चित्रपट लागायला लागले ,भातकांडे गल्ली जवळच हिरा टॉकीज ,टिळकवाडी मधलं अरुण इंग्लिश चित्रपटांसाठी फेमस ,टायटॅनिक मी तिथेच पाहिलेला असं आठवतंय .सी ग्रेड इंग्लिश सिनेमे दाखवणार ग्लोब ,कपिल टॉकीजला आई मावशीबरोबर माहेरची साडी पण बघितलेला आठवतोय .सुट्टीत बेळगावला गेलो कि झाडून रिलीज झालेले सगळे चित्रपट बघायचो . आमच्या वेंगुर्ल्यात एकच थिअटर होत आणि त्यात चित्रपट भरपूर उशिराने लागायचे .त्यामुळे सुट्टीत जास्तीत जास्त सिनेमे बघायचे असायचे .आणि त्यात सोने पे सुहागा म्हणजे मामाने काही काळासाठी व्हीसीआर आणि विडिओ कॅसेट्स भाड्याने द्यायचा सीडी बिझिनेस पण चालू केलेला. आमची तर चंगळ चालायची.
आणखी एक न विसरण्यासारखी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी शिवाजी गार्डनच्या बाहेर बांबूच्या तट्याच्या दुकानात मिळणार आलेपाक आणि उसाचा रस. आणि हा आलेपाक म्हणजे आल्याच्या वड्या नाहीत हा. हि खास बेळगावची खासियत असलेला पदार्थ आहे.पोहे शेंगदाणे,भुरभुरलेलं खोबर, वरून मस्त पिळलेला लिंबू आणि वर फुटण्याच्या पिठाचा बनवलेला छोटासा गोळा.तो गोळा कुस्करून मिक्स करायचा आणि चमचमीत आलेपाक गट्ट करून टाकायचा,आणि सोबतीला मस्त ताजा उसाचा रस. गोड़ आवडणाऱ्यांसाठी बेळगावचा स्पेशल कुंदा ,खडेबाजारातलं 'रॉयल सोडा फौंटन 'जिथल वाळा सरबत आणि बदाम थंडाई ते पण वन बाय टू कधी कधी वन बाय थ्री पण असायचं.
बेळगाव म्हटलं कि काही पदार्थ डोळ्यासमोर येतात ते म्हणजे तांदळाच्या पिठाचं आजीच्या हाथच थालीपीठ वर छान लोण्याचा गोळा ,मावशीच्या घरचे मटण आणि फळ .आता प्रश्न पडेल कि फळ कसली तर फळ म्हंजे तांदळाच्या पिठाचे उकडलेले बॉल्स जे आतून पोकळ असतात .ते अंडा भुर्जी बरोबर पण एक्दम मस्त लागायचे ,दडपे पोहे,चिरोटे,माईनमुळंच लोणचं,अनारसे.बेळगावला सुट्टीत आलं कि वजन वाढवूनच परत वेंगुर्ल्याला जायचो .....

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिताय ! मी वाटच बघत होते कि आलेपाकाचं केव्हा लिहिताय !!
पण मला आठवतं त्याप्रमाणे ते आलेपाक नसून "आलीपाक " आहे का ? कि मला चुकीचं आठवतंय ??

माझ्या आजोबांच ( बाबांचे बाबा) घर होतं शहापूरच्या बिच्चू गल्लीत.
गल्लीत प्रवेश करताना असलेल्या रामाच्या देवळावर एक श्लोक लिहिला होता . ( अजूनही आहे. ) चित्ती असो द्यावे ,सदा समाधान, आहे नारायणं जवळीच! ' तो म्हणजे माझ्या आजोबांचा ( त्यांच नाव नारायण) पत्ता आहे अशी ठाम समजूत होती लहान्पणी.
माझ आजोळ जवळच गोवा रोड वर खानापूर . शहापोरचे आजी आजोबा नंतर पूण्याला आमच्याकडे आले त्यामुळे नंतर बर्‍याच सुट्ट्या खानापूरला गेल्यात.
पण बिच्चू गल्ली लख्ख आठवते.

दोन्ही भाग वाचले. बेळगावा बद्दल काहीच माहिती नसल्याने मजा वाटली वाचायला. (कुंदा फक्त माहिताय) Happy बाकी सुट्ट्यांची मजा आजोळीच.. निवांत सुट्ट्या हल्लीच्या मुलांना कमी मिळतात.

खूप छान लिहिलंय.
बेळगावमधे वास्तव्य कधीच केले नसले तरी, बाबा लहानाचे मोठे बेळगावातच झाल्याने, तो त्यांचा सॉफ्ट कॉर्नर होता. आमच्या गावी (हलशी) जाताना, बेळगाव आलं की त्यांनी सांगितलेल्या बेळगाव बद्द्लच्या अनेक गोष्टी हमखास आठवतात. लहानपणी आमच्यासाठी बेळगावचे आकर्षण म्हणजे बाबा वर्षातून एक दिवस तरी आवर्जुन तिकडे जात आणि येताना खारी बुंदी, करदंट आणि गजाननचा कुंदा (बाकी कुठल्याही कुंद्याची चव त्यांना आणि आम्हांलाही आवडायची नाही !) घेऊन येत. Happy

मी बेळगावला कधी राहिले नाही आणि तिथे कोणी राहातही नाही. पण लंपनच्या पुस्तकांमुळे हिंडलगा, घुमटमाळ, गुंडीमठ रस्ता,‌‌‌ कॉंग्रेस विहीर, मधुमालती ग्राउंड हे इतकं ओळखीचं वाटतं, की बास!

छान लिहिलंय

मी बेळगावला कधी राहिले नाही आणि तिथे कोणी राहातही नाही. पण लंपनच्या पुस्तकांमुळे हिंडलगा, घुमटमाळ, गुंडीमठ रस्ता,‌‌‌ कॉंग्रेस विहीर, मधुमालती ग्राउंड हे इतकं ओळखीचं वाटतं, की बास!>>+१११

सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे आभार ..!
बेळगावमधे वास्तव्य कधीच केले नसले तरी, बाबा लहानाचे मोठे बेळगावातच झाल्याने, तो त्यांचा सॉफ्ट कॉर्नर होता. आमच्या गावी (हलशी) जाताना,>>>> मी राहिलोय हलशीला ,माझी मावशी तिथली. छान आहे परिसर स्पेशली रामतीर्थ,नंतर असोगा वगैरे .

पण लंपनच्या पुस्तकांमुळे हिंडलगा, घुमटमाळ, गुंडीमठ रस्ता,‌‌‌ कॉंग्रेस विहीर, मधुमालती ग्राउंड हे इतकं ओळखीचं वाटतं, की बास! >>
++११११११११११११
मी मागे एकदा बेळगावला १ दिवस राहिले होते एका मित्राकडे....तेव्हा तिथे फिरताना सतत या सगळ्या जागा कुठे दिसतात का बघत होते Happy
रेल्वे गेट नं १,२,३ पण कुठे आहे विचारलं त्या मित्राच्या बायकोला..
वाटलं की एकदम लंपन समोर आला तर कित्ती मज्जा...

छान आहे परिसर स्पेशली रामतीर्थ,नंतर असोगा वगैरे >> आसोगा मस्त आहे. इच्छा पूर्ण होणार असेल तर पिसाइतका हलका होणारा एक दगड होता तिथे . अन अस काही नस्त म्हणून मी वाद घातला होता तिथे . चौथीत असताना. आसोग्याची अजून एक आठवण म्हणजे अभिमान सिनेमाच शूटिंग झ्झल होतं तिथ. अन जया भादुडी च्या हातातली कळशी ( बिनगा म्हणातात तिथे) आमच्या एका मावशी च्या घरून नेली होती. हे इतक्या वेळी ऐकलय मावशी अन आई कडून , की नदिया किनारे , गाण ऐकल की आसोगा अन तो बिनगाच आठवत.
तुमच्या धाग्याच्या निमित्तानी माझ्ही स्मरणरंजन चालू आहे. Happy

बेळगाव, माझे आवडते शहर.

आमचे गाव सिमेलगत असल्याने अर्ध्याहुन अधिक नातेवाईक बेळगावात राहतात. त्यामुळे एक वेगळीच आपुलकी वाटते या शहराबद्दल Happy

बेळगावच्या एस टी. कँटीन मधिल उपमा, करदंत, खारी बुंदी अन सगळ्यात बेस्ट कुंदा... अहाहा. अगदी तोपासु.

बेळगावच्या एस टी. कँटीन>> कँटीन चा उल्लेख आला म्हणून ... तिथे मिळायची तशी कुर्मा पुरी परत कधीच खायला मिळाली नाही. आणि त्याबरोबर ती टिपीकल, एक पसरट आणि एक उभं अश्या दोन भांड्यांच्या जोडीत मिळणारी फिल्टर कापी ! पुण्याहून आम्ही नेहमी रात्री १० की ११ ची बस पकडून बेळगाव ला जायचो, जी सकाळी ६:३०-७ ला पोचायची. तेव्हा ही कुर्मा पुरी आणि कापी वाटच बघत असायची. मग पुढची लगेच मिळेल ती बस पकडून हलशी !
गेल्या १-२ वर्षांतल्या एका भेटीत त्या जुन्या बस स्थानकाचा पूर्ण कायापालट झालेला दिसला.. फलाटांच्या रचनेसकट ! आणि मग जाणवलं की त्या नवीन बांधकामाच्या गर्दीत ते जुनं कँटीन गायब Sad

कधीपासून इथे प्रतिसाद देईन म्हणत होते. आज मुहूर्त लागला. बेळगाव म्हणजे माझ्याही जिव्हाळ्याचा विषय. आईचं माहेर. एप्रिल-मेची सुट्टी लागली की दादरवरून सुटणार्‍या महालक्ष्मीने आम्ही बेळगावला जायचो. तेव्हा पहाटे मिरजेला गाडी बदलावी लागायची. मग तिथे 'चाय वडा कॉफीये कॉफी कॉफीये' असं तालात ओरडणारा आमची झोप उडवून जायचा. कधीही काहीही खायचे दिवस होते ते Happy मग बेळगावच्या आधी सुलढाल, सुलेभावी वगैरे स्टेशन्स लागायची. मातीचा रंग तांबडाभडक झालेला असायचा. एक किल्ला (कुठला होता देव जाणे!) दिसायला लागला की 'किल्ला आला, किल्ला आला' अशी हाकाटी व्हायची आणि ट्रंका, हॉल्डॉल नामक एक बोजड सामानविशेष दरवाज्यात नेऊन ठेवायला एकच गर्दी व्हायची. सगळे सामनाभोवती उभे. गाडी स्टेशनात शिरली की आजोबा रुमाल हलवत घ्यायला आलेले दिसायचे. हमालांची सामान उतरवायची धांदल. तेव्हा रिक्षा हा प्रकार आम्ही फक्त बेळगावात पाहिलेला असायचा. त्याचंही अप्रूप होतं. ठळकवाडीतलं घर भाड्याचं पण ऐसपैस. दारात लिची, फणस, जांब ही झाडं होती. सकाळच्या चहासोबत खास बटर बिस्किटं (जिरं असलेली नव्हेत) मिळायची. गव्हाची खीर (आजीकडे रगडा होता म्हणून. गहू मिक्सरमध्ये भरडून घ्यायची ट्रीक आईला बेळगाव सुटल्यावर कळली), बेसनाच्या गोळ्यांची आमटी हे खास पदार्थ जेवणात असायचे. जांभळं, करवंदं, झालंच तर धामणं,चारं, चुरणं हीही फळं मिळत. आता धामणं, चुरणं बहुतेक इतिहासजमा झाली असतील. मिलिट्री महादेव, बेळगावकरच्या दुकानाजवळ असलेल्या आइसक्रीम पार्लरमधलं ३-इन-१, बेळगावचे खास गोडसर ब्रेड, लेले ग्राउण्ड अश्या किती आठवणी आहेत......रात्री ट्रेनचा आवाज आला की मागच्या दारी जाऊन अंधारात का होईना पास होणारी गूडसट्रेन पहायला आमची धडपड चालायची. आणखी एक बाग होती ज्यात कासवाची प्रतिकृती होती त्यात एका बाजूने आत जाऊन दुसर्‍या बाजूने बाहेर यायची मौज होती. ती बाग कुठली ते कोणाला आठवत असेल तर तेव्हढं सांगा.

बेळगावला जाऊन यायचं ही अनेक वर्षांपासूनची पंचवार्षिक योजना मागच्या महिन्यात शेवटी फलद्रूप झाली. शहर खूप बदललं असेल म्हणून आधीच मनाची तयारी करून गेलो होतो. जुन्या घराजवळ जाऊन आलो. पुढचा भाग मालकाने विकल्यामुळे भलंथोरलं अंगण गायब झालंय. अंगणाबाहेरचे दोन दगडी ओटेसुध्दा नाहीत आता. घरासमोरचा रस्ता आकसलाय. पण परसदार आणि तिथून जाणारा बोळ अगदी तस्सेच आहेत. अगदी तस्सेच. मला एकदम टाईम मशिनमध्ये बसून मागे गेल्याचा भास झाला. पाय निघता निघेना तिथून. Sad

लहानपणी खाल्लेल्या बटर बिस्कीटासाठी खडेबाजारातल्या सगळ्या बेकर्‍या शोधल्या. शेवटी ओळखीतल्या एका कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे किर्लोस्कर रोडजवळच्या शंकर बेकरीत ती एकदाची मिळाली. आनंदीआनंद झाला! बेळगावकरच्या दुकानाच्या थोडं पुढे असणार्या पुरोहितकडे कर्दन्ट आणि कुंदा मिळाले. मायबोलीकर साधनाच्या माहितीतून मारुती गल्लीतल्या एका दुकानात मांडे आणि कडबोळी मिळाली. एका फळवालीकडे चारं मिळाली. मिलिट्री महादेवला जाऊन आलो. लेले ग्राउंड मिळालं नाही. बहुतेक तिथे आता एक शाळा आली आहे. व्हॅक्क्सीन डेपोकडे जाणारा रस्ताही बराच बदललाय.

ह्या लेखामुळे पुन्हा एकदा बेळगाव आठवलं. माझ्या आठवणींत ते नेहमी राहील. काश वो दिन वापस आते!

मस्त लिहिलं आहे एकदम.
इन्ना >>गल्लीत प्रवेश करताना असलेल्या रामाच्या देवळावर एक श्लोक लिहिला होता . ( अजूनही आहे. ) चित्ती असो द्यावे ,सदा समाधान, आहे नारायणं जवळीच! ' तो म्हणजे माझ्या आजोबांचा ( त्यांच नाव नारायण) पत्ता आहे अशी ठाम समजूत होती लहान्पणी.>> Lol

स्वप्ना मस्त लिहिलयस!
मी पण लहानपणीचे कानेकोपरे शोधते प्रत्येक वेळी गेल्यावर. आमचे भरपूर नातेवाइक अजूनही आहेत बेळगावात त्यामुळे वर्ष दोन वर्षात चक्,कर पण होतेच.

मला बहीण /मुलगी नाही. पण मला बेळगाव बद्दल, सासरी सासुरवास सहन करत रहाणार्‍या बहीणी/ मुलीबाबत भावा/पित्याला जे वाटू शकते तसे वाटते. तिथल्या मराठी भाषिकांवर होणारी जुलुम-जबरदस्ती बद्दल आणि महाराष्ट्र एकीकरण समिती बद्दल बरेच काही ऐकले आहे.

एकदा बेळगावला जायचंय.

ती बाग कुठली ते कोणाला आठवत असेल तर तेव्हढं सांगा.>>>टिळकवाडीमधल्या वाघ सिह गार्डन मध्ये आहे वाटत ते कासव .

लहानपणी खाल्लेल्या बटर बिस्कीटासाठी खडेबाजारातल्या सगळ्या बेकर्‍या शोधल्या. शेवटी ओळखीतल्या एका कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे किर्लोस्कर रोडजवळच्या शंकर बेकरीत ती एकदाची मिळाली. >>>>आणि कोरे गल्ली आणि कचेरी गल्ली च्या इंटरसेकशन वर विजय बेकरी आहे तिथले मसाला टोस्ट पण भारी असतात .

हर्पेन , तो काल्बाह्य झाला रे आता मुद्दा! माझे आजोबा , मामा खंदे पूरस्कर्ते होते पण आता आम्च्या पिढीतली अन त्यांची पोरं बाळ , मराठी मातृभाषा अन एरवी कानडीत व्यवहार करतात . एकूणात महाराष्त्रातल एक लहानस शहर होण्यापेक्षा कर्नाटकात चांगला मान राखून आहे !

Stockholm syndrome is a condition that causes hostages to develop a psychological alliance with their captors as a survival strategy during captivity.[1] These feelings, resulting from a bond formed between captor and captives during intimate time spent together, are generally considered irrational in light of the danger or risk endured by the victims. Generally speaking, Stockholm syndrome consists of "strong emotional ties that develop between two persons where one person intermittently harasses, beats, threatens, abuses, or intimidates the other."[2] The FBI's Hostage Barricade Database System shows that roughly eight percent of victims show evidence of Stockholm syndrome.[3]

https://en.wikipedia.org/wiki/Stockholm_syndrome

धन्यवाद.

ह्म्म्म......आम्हालाही लोक मराठीत बोलतात की नाही ही धास्ती होती. पण सुदैवाने सगळे लोक मराठी बोलणारे भेटले. त्यामुळे कुठे काही अडलं नाही. नाहीतर 'कन्नडा इल्ला' वगैरे तयारी करून गेलो होतो Proud

वेंगुर्लेकर, काय मौज आहे पहा. आम्हीसुध्दा लहानपणी त्या कासवाच्या बागेला वाघसिंहाची बागच म्हणायचो. पण त्याचं काहीतरी फॉर्मल नाव असेल ना? तिथे वाघ-सिंहाच्यासुध्दा प्रतिकृती होत्या का? ती बाग आहे का अजून? कोणाला माहित असेल तर सांगा ना.

इन्ना धन्यवाद Happy बेळगाव एकदम लाडका विषय ना.