मीठ, मीठा, मराठी आणि पुणे मुंबई!

Submitted by निमिष_सोनार on 20 July, 2018 - 10:35

मला काही दिवसांपूर्वी कोळशावर कणीस भाजणारा एक जण दिसला. गाडीवाला. पावसाळयात नेहमी दिसतात तसाच एक!

मी: "एक कणीस भाजून दे!"

मला सर्दी आणि खोकला झाला असल्याने पुढे म्हणालो, "फक्त मीठ लावा, लिंबू तिखट नको!"

पण त्याचे जवळ एका भांड्यात तिखट मीठ एकत्र केलेले होते आणि एकच लिंबाची फोड त्यात अगदी मनसोक्त बुडालेली दिसत होती. बहुदा त्याचेजवळ तो एकच लिंबू असावा जो तिखट मिठात पुन्हा पुन्हा बुडवून प्रत्येक ग्राहकाच्या कणीसाला चोपडत असावा, असो पण येथे तो विषय नाही...

"फक्त मीठ लावा" असे म्हटल्यावर तो कणीस वाला निर्विकार पणे म्हणाला, "हां साब, सब मिठा ही हैं!"
(त्याला म्हणायचे होते की सगळी कणीस गोडच आहेत!)

मी म्हणालो, "मराठी मे नमक को मीठ बोलते है, मैं बोला सिर्फ नमक लगाना! निंबु मिरची नहीं! मराठी नहीं समजता क्या?"

तो, "सिरफ नमक नहीं हैं! सब मिक्स हैं!"

मी: "राहू द्या, नुसतं कणीस भाजून द्या, त्याला काहीच लावू नका!"

कणीस: "मतलब?"

मी: "उपर कुछ मत लगाना. वैसे ही देना!"

पुण्यात असूनही मी "मराठी बोलणारा एलियन" असल्याची जाणीव पुन्हा एकदा मला झाली. मराठी बोलणारे लोक महाराष्ट्रा च्या सांस्कृतिक राजधानी पुण्यात एलीयन सारखे झालेत असे वाटण्यासारखी अनेक उदाहरणे मला अस्वस्थ करतात.

मग पुन्हा तोच प्रश्न मला सतावून गेला:
वर्षानुवर्षे पुण्यात व्यवसाय करूनही मराठी विना हे लोक कसे तरून जातात? त्यांना मराठी बोलण्याची गरज का वाटत नाही?

पुन्हा तेच उत्तर डोक्यावर दणका देऊन गेलं:
मराठी माणसं स्वतःच बाहेर कुठेही संभाषणाची सुरुवात हिंदीतून करतात आणि मराठी बोलायचा कंटाळा करतात किंवा कमीपणा समजतात म्हणून समोरच्याला सुध्दा वाटतं की मराठी विना पुण्यात रहाणे सहज शक्य आहे. चूक आपली आहे, त्यांची नाही!

आपणच जर मराठीचा आग्रह धरला तर त्यांच्या व्यवसायासाठी ते मराठी शिकतीलच!!

मराठी माणसच जर का पुण्यात मराठी बोलणार नसतील तर मग दुसरं कोण बोलणार?
आपण बोलल्याशिवाय दुसरे इतर राज्यांतील लोक तरी कशाला आणि का म्हणून मराठी बोलतील?

उदाहरण घ्यायचे तर हे घेता येईल:
भाजीवाला मराठीत ओरडत असतो, "भाजी घ्या, टमाटे वांगे! लसूण, आलं घ्या!" आणि मराठी माणूस त्याला विचारतो, "भैय्या अद्रक कितने का दिया?"
काय म्हणावं याला आता?

मराठीत ताईची दीदी झालीया
आणि आल्याचं अद्रक झालंया
मराठीचं तुफान आता संपलंया
त्याचं वारं बी वाहनं बंद झालंया

तसेच इतर राज्यांतील माझ्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी किंवा मित्रांशी बोलताना मी नेहमी असे म्हणतो:

"और फिर, पुणे कब आ रहें हो?"

"When are you coming to पुणे?"

एकदा नाव बदलल्यावर परदेशातील लोक सुध्दा योग्य उच्चार करतात, मोडके तोडके का होईना पण ते "मुंबाय" म्हणतात तरी! फक्त मराठी माणसांनाच का पुणे आणि मुंबई म्हणायला लाज वाटते? जणू काही तो पर राज्यातील मित्र तुम्ही पुणे म्हटलं तर तुमच्याशी मैत्री तोडणार आहे!

पण बहुतेक मराठी माणसं स्वतःच "पूना कब आ रहें हो?" असे म्हणतात.
काय त्यांना पूना म्हणण्यात आनंद आणि भूषण वाटतं काय माहिती? हीच गोष्ट मुंबईसाठी!

हिंदी भाषिकांशी बोलताना मी नेहमी असेच बोलतो, "मुंबई में भारी बारिश हुई" पण आपली मराठी माणसंच जास्त करून बॉम्बे म्हणण्यात धन्यता मानतात!

आपणच आपल्या शहरांचा चुकीचा उच्चार करणार तर इतरांकडून कशाला बरोबर उच्चारही अपेक्षा करायची?

हाच मान मी दक्षिणेकडील राज्यांच्या शहरांना सुध्दा देतो जसे, बंगळूरू, चेन्नई याप्रमाणे उच्चार करून!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाऊ द्या हो.
या मायबोलीवरच, मायबोली चालू झाल्यापासून देवनागरी लिपी नि मराठी भाषा यावर बरीच चर्चा झाली. आता नादच सोडला.
मराठी भाषा इतकी बदलली आहे की त्यात इंग्रजी, हिंदी शब्दच जास्त झाले आहेत. सर्वजण इंग्रजी माध्यमातून शिकतात, मराठी वाचतच नाहीत. मराठी शब्द कसे त्यांच्या तोंडी येतील? त्यातून हिंदी सिनेमे जास्त लोकप्रिय, त्यातली भाषा जास्त ऐकलेली.
आपण मराठी बोललो तर शब्दांचे अर्थ इंग्रजीतून सांगितल्याशिवाय बर्‍याच मुलांना कळतच नाही.

मराठी असे काही उरलेच कुठे?

आपण लिहिलेला अनुभव मुंबईत सुद्धा असाच येत असतो. त्यासाठी मी संभाषणाला सुरवात मराठीतून करतो.आणि त्याच वेळेला समोरच्या व्यक्तिच्या चेहर्‍यावर कशी प्रतिक्रिया उमटते ते पहातो. बोललेलं त्याला समजत नाही असं वाटलं तर हिंदीतुन बोलतो. पण बोलण्याच्या ओघात जर तो मराठी आहे असं लक्षात आलं तर यथेच्छ सुनावून देतो. पुलेशु.

मी म्हणालो, "मराठी मे नमक को मीठ बोलते है, मैं बोला सिर्फ नमक लगाना! निंबु मिरची नहीं! मराठी नहीं समजता क्या?"
<<

त्या भुट्टा विकणार्‍या भैय्याने जे केले ते केले ! तुम्ही वेगळे काय केलेत ?
तुम्हाला इतकाच मराठीचा अभिमान होता तर त्या भय्याच्या तोंडावर, तो घेतलेला मका फेकून "साल्या भय्या महाराष्ट्रात राहतो तरी तुला मराठी येत नाही" असे शुद्ध मराठीत सांगून तुम्ही निघून जायला हवे होते मात्र तुम्ही काय केले, तर त्याला मराठी येत नाही म्हणून स्वत:चा मराठी बाणा विसरुन तुम्ही त्या भय्याशी हिंदीतून संवाद साधलात.
--
जर तुमच्या सारख्या मराठी भाषेवर नितांत प्रेम करणार्‍या लोकांनी या दिडदमडीच्या भैय्या लोकांसमोर नमते घ्यायला सुरुवात केली तर इतर सर्वसामन्य लोकांची काय मजाल !

हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. हिंदी बोलण्यात काही गैर नाही.
ईंग्लिश ही परकीय भाषा आहे. ऑफिसमध्ये कामकाजाला ठिक आहे. पण उगाच ईतरवेळी बोलू नये. तसेच संभाषणात शक्य तितके शब्द मराठी वापरावेत.

त्या कणीस विकणारया माणसाचे हिंदी खटकत असेल तर मोठाल्या हॉटेल, मॉल मध्ये ईंग्रजी बोलणारया कर्मचारयांचे बोलणेही खटकायला हवे. बाकी काही नाही, उगाच आजही ईंग्रजांच्या गुलामगिरीत असल्याची भावना मनात दाटून येते.