लक्ष आहे पूर्णतः माझ्याकडे

Submitted by सुप्रिया जाधव. on 18 July, 2018 - 07:26

ह्याचसाठी बोट मी धरते तुझे
एक आहे तान्हुले माझ्यामधे

एवढ्यासाठीच मी उरते खुजी
वाढले की वस्त्र पडते तोकडे

ठेंगणा केलास दरवाजा तुझा
सांग ना वाकू कितीदा सारखे ?

का असा बघतोस तू माझ्याकडे ?
काय केलेले तुझे मी वाकडे ?

थांबला आहेस का दारामधे ?
आत ये किंवा मला कर मोकळे

सांगते आहे तुझे दुर्लक्ष हे
लक्ष आहे पूर्णतः माझ्याकडे

पकडली नाहीस तू जागा तुझी
मोकळे होते कधीचे बाकडे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुरेख पण

पकडली नाहीस तू जागा तुझी
मोकळे होते कधीचे बाकडे

हा शेर नसता तरी चालले असते.

ठेंगणा केलास दरवाजा तुझा
सांग ना वाकू कितीदा सारखे ?

थांबला आहेस का दारामधे ?
आत ये किंवा मला कर मोकळे

खास!!

सांगते आहे तुझे दुर्लक्ष हे
लक्ष आहे पूर्णतः माझ्याकडे

हा सुरेख!
कमी श्ब्दात गझल बांधणे हे एक खास कौशल्य आहे.
आवडली गझल.