जाईल मान खाली

Submitted by निशिकांत on 18 July, 2018 - 03:20

( तरही गझल. मिसरा आदरणीय भूषण कटककर यांचा. )

दंगे करावयाला मिळते जरी दलाली
लाजून भारताची जाईल मान खाली

कायमरुपी दिलेल्या जपतोय आठवांना
होती कधी अचानक जाण्या क्षणेक आली

देवास मानतो हा आभास निर्मिण्याला
गझलेस प्रार्थनेच्या मी लावल्यात चाली

एस्कॉर्ट नाव गोंडस, पैसे दिल्यास जेथे
असते तयार सजुनी, शबनम, लिसा, मिताली

तारुण्य धुंद जगलो माझ्या मना प्रमाणे
पण आज प्राक्तनाच्या झालोय मी हवाली

हा मूळ प्रश्न आहे, येते वयात जेंव्हा
का बंधने तिच्यावर? मोकाट का मवाली?

श्रीमंत संकुलांचा सल वेगळाच आहे
क्षण एक झोपडीतिल नसते इथे खुशाली

विकलो कधीच नाही, जमले तसाच जगलो
खुश राहिलो, भुकेची केली जरी हमाली

"निशिकांत" सांजवेळी अंधारले तरीही
पूर्वा कशी मनीची, उधळी प्रभात लाली?

चुकून कविता विभागात पोस्ट झाली. क्षमस्व.

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users