हिरव्या (भाग १)

Submitted by कल्पेश. on 14 July, 2018 - 09:19

.

ग्रीष्मातला ओका बोका पिवळ्या डोंगर आता एकदम गर्द पाचू रंगाचा भासत होता. श्रावण सुरु व्हायच्या आधीच त्याचा इंचनइंच भाग हिरवाईने बहरलेला दिसत असला तरी त्याच्या पायथ्याशी वसलेल्या मेर्वीत गावकऱ्यांची मने अस्वस्थ झाली होती. त्यांच्यातला सर्वात जिगरबाज शिकारी महादुच्या शरीराची लक्तरे गावच्या वेशीवरल्या पिंपळाला लटकलेली दिसल्यापासून आजतागायत त्यांनी श्रावणमासात जंगलाकडे फिरकण्याचे कटाक्षाने टाळले होते. खरं तर शाळजीव, लावा, तितर, लांडोर, ससे, भेकर अश्या विविध रूचकर वन्यजीवांची पारध करणे आणि त्या मांस विक्रीतुन पोटाची खळगी भरणे हाच त्यांचा पिढ्यानपिढया व्यवसाय होता अन् उपजीवीकेचे एकमात्र साधनसुद्धा ! शेतीसाठी तिथे ना पुरेशी मोकळी जमीन होती ना बारमाही पाण्याचा काही स्त्रोत होता. सगळीकडून जंगल असल्याने गवतावर चरणाऱ्या प्राण्यांपासून पिकाची नासधुस होण्याचीच शक्यता जास्त असायची म्हणून त्या गावातील प्रत्येकजण लहानपणापासून जंगलाकडेच मोठ्या आशेने बघायचा आणि शिकार करण्यात आपसुकच तरबेज व्हायचा. वयात आलेल्या मुलांपासून म्हातारे कोताऱ्यापर्यन्त सर्वच जातिवंत शिकारी असल्याने जंगल आणि रानटी प्राणी ह्याबद्दल कोणालाच कधी भिती वाटत नसे. अपवाद फक्त हां एक महीना, ज्यामध्ये शिकार तर दुरची गोष्ट राहिली पण जंगलात पाय ठेवायलाही जो तो घाबरु लागला होता.

महादुच्या दणकट सहा फूटी देहाला चिंध्या झालेल्या अवस्थेत तरी पाहायला मिळाले मात्र त्याच महिन्यात गेलेले बाकीचे आठ जण हवेत विरुन जावेत तसे त्या अजस्त्र जंगलात गायब झाले होते. पाच वर्षापूर्वीचा तो श्रावणाचाच एक आठवडा होता अन् शोधायला गेलेल्या चौकड़ीला भरपूर झटापटीच्या खुणा आणि रक्ताच्या सड्याव्यतिरिक्त कसलाच मागमुस लागला नव्हता. त्या जंगलात लांडगे, अस्वले, बिबट्यापासून ते पार अगदी ढाण्या वाघापर्यन्त अनेक हिंस्त्र प्राणी असले तरी दिसून आलेल्या झटापटीच्या खुणांमधील पंजे ह्या कुठल्याच प्राण्याशी मेळ खात नव्हते. पावलांवर जावे तर ती कधी वाघासारखी वाटत तर कधी भरपूर लांब नखे असलेल्या वानरासारखी वाटत. पण त्यांच्या आकारावरुन एक नक्की समजत होतं की ते जे काही होतं ते फार वजनदार अन् थोराड अंगाचं प्रचंड ताकदीचं जनावर (!) होतं.

ह्या गोष्टीला सुरुवात होवून आता हे सलग पाचवे वर्ष होते तरी कोणाचेही जिगर तेथे पाय ठेवायला तयार होत नव्हतं. नाही म्हणायला गेल्यावर्षी लांबच्या शहरातून आलेले तीनजण घुसले होते जंगलात, त्यांच्या मोठाल्या रायफल घेवून. पण शेवटी झालं काय ! तिघापैकी दोनतर जमिनीत गुडुप व्हावे तसे काहीही थांग न लागता गायब झाले, आणि एकाची फक्त अर्धी फुटलेली कवटी अन् वाकड़ी झालेली बंदूक काय ती शोधायला गेलेल्या त्यांच्या दोस्त लोकांना सापडली. तरी नशीब की ही शोधणारी लोकं जंगलात पोचली तेव्हा श्रावण संपून दुसरा महीना सुरु झालेला. त्यामुळेच कदाचित हे परत जीवंत त्या जंगलातून बाहेर येवू शकले. ह्या ताज्या आठवणी मनात साठलेल्या असताना गावकऱ्यांची भीती दूर करायला नव्या सरपंचानी आज सभा बोलावली होती. दरवर्षीप्रमाणेच आजच्या सभेचाही विषय होता ― हिरव्या.

हो, सर्वांनी त्याच्या न दिसणाऱ्या अस्तित्वाला हेच नाव ठेवले होते. जेथे जेथे जंगलात माणसे गायब झालेली त्या प्रत्येक ठिकाणी एक पातळ चीकट हिरवा स्त्राव पाझरलेला आढळून आलेला म्हणून त्या जनावराला / पिशाच्चाला लोकं हिरव्या बोलू लागले होते....

क्रमशः

― कल्पेश

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या वहिल्या ह्या कथेला माझ्या सारख्या नवशिक्याच्या लेखन चुका पदरात घालून आपण स्वीकारले त्यासाठी सर्वांचे मन:पूर्वक आभार Happy
ही कथा ना किंगकॉन्ग ना अरनोल्डवाला प्रिडेटर आहे पण थोड़ा थरार थोड़ा सस्पेन्स राहु दे म्हणून इतक्यात मुख्य संकल्पना उलगडून सांगता येणार नाही.
५ व्या भागानंतर बराचसा उलगडा होईल, तेव्हा थोडं सबुर लोकहो !
धन्यवाद Happy