रात्रंदिन तिला युद्धाचा प्रसंग

Submitted by nimita on 16 July, 2018 - 05:53

१३ डिसेंबर २००१…
जर गुगलवर ही तारीख टाईप केलीत तर त्या दिवशी घडलेली एक खूप महत्वाची घटना आठवेल तुम्हांला… हो, त्या दिवशी दिल्लीमधे आपल्या देशाच्या पार्लमेंटवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. तुम्ही सगळ्यांनी ही बातमी वाचली असेल. त्यानंतर काही दिवस मीडियामध्ये त्यावर खूप चर्चाही झाली. आणि नेहेमीप्रमाणे इतर नव्या ‘breaking news’च्या ओझ्याखाली ही बातमी दबून, लोकांच्या विस्मरणात गेली.
पण कितीतरी घरांमधे या एका घटनेचे पडसाद नंतर जवळजवळ एक दीड वर्षं ऐकू येत होते….आणि आमचं घर हे त्यातलंच एक होतं!
ज्या दिवशी पार्लमेंटवर हल्ला झाला त्यानंतर पुढच्या २-३ दिवसांत आपल्या सैन्याला पाकिस्तान बॉर्डरवर तैनात होण्याचा आदेश मिळाला. आणि क्षणाचाही विलंब न करता त्याची अंमलबजावणीही करण्यात आली. त्या वेळी जे सैनिक आपलं घर, परिवार सोडून बॉर्डरच्या दिशेनी रवाना झाले त्यात माझा नवराही होता.
त्यावेळी आम्ही सिकंदराबादमधे होतो. नितीन (माझा नवरा) ११ डिसेंबरला एका official dutyसाठी राजस्थानला गेला होता आणि ४-५ दिवसांनंतर परतही येणार होता. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे mobilisationचे आदेश आले आणि आमच्या सिकंदराबाद आर्मी स्टेशनमधल्या तमाम ऑफिसर्स आणि जवान यांना राजस्थान बॉर्डरवर हलवण्यात आलं. त्यामुळे नितीनदेखील परत न येता तिथेच थांबला. खरं तर त्यानी दगदग करून घरी येऊन लगेच परत त्याच जागी जाण्यापेक्षा तिथेच थांबणं हे योग्य आणि प्रॅक्टिकलच होतं, पण आमच्या दोघी मुलींसाठी तो एक मानसिक धक्काच होता. कारण त्यांच्या हिशोबानी ‘बाबा एक आठवड्यात परत येणार होते’, आणि अचानक त्यांना कळलं की बाबा तिकडेच राहणार आहेत. त्या दोघींनी मला विचारलं,” आई, आता कधी येणार बाबा?” चेहेऱ्यावर उसनं हसू आणत मी म्हणाले,” लवकरच येतील, आपण रोज देवाकडे प्रार्थना करूया त्यांना लवकर घरी घेऊन येण्यासाठी!”
त्या लहानग्या जीवांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात नव्हतं आलं (त्या वेळी माझी मोठी मुलगी ऐश्वर्या साडे सहा वर्षांची होती आणि छोटी सृष्टी अवघी सव्वादोन वर्षांची!), पण ‘बाबा आता परत गावाला गेले’ या विचारानी दोघी खूप डिस्टर्ब झाल्या. आणि त्याला कारणही तसंच होतं. जून १९९९पासून ते सप्टेंबर २००१पर्यंत नितीनची फील्ड पोस्टिंग आली होती- rajouri मधे -कश्मीर बॉर्डरवर !
फील्ड पोस्टींग असल्यामुळे आम्हांला त्याच्याबरोबर rajouriमधे राहण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे मी आणि मुली जम्मूमधे राहात होतो. In fact, सृष्टीचा जन्म जम्मू मधेच झाला. त्यामुळे ती दीड-पावणे दोन वर्षांची होईपर्यंत तिला तिच्या वडिलांचा सहवास मिळालाच नाही.
नितीनचं फील्ड tenure संपल्यानंतर सप्टेंबर २००१मधे आम्ही सिकंदराबादमधे पुन्हा एकत्र राहायला लागलो होतो. म्हणजे जेमतेम दोन अडीच महिने झाले होते मुलींना त्यांच्या बाबांबरोबर राहून… तेवढ्यात आता परत त्यांना लांब राहावं लागणार होतं.. त्यांचं मन खट्टू होणं स्वाभाविक होतं.
नितीनच्या आधीच्या प्रोग्रॅमनुसार तो फक्त ४-५ दिवसांचे कपडे आणि इतर सामान घेऊन गेला होता. पण आता त्याचा मुक्काम तिथे किती दिवस राहील याची काहीच कल्पना नसल्यामुळे युनिटमधल्या इतर ऑफिसर्सबरोबर त्याचे बाकीचे युनिफॉर्मस, woollens, आणि इतर आवश्यक सामान पाठवून दिलं.
आता पुन्हा एकदा आम्हाला तिघींना नितीनशिवाय एकटं राहायची सवय करायला लागणार होती. कशी मजा आहे बघा… खरं म्हणजे ‘एकटा’ नितीन होता.. घरापासून, आमच्यापासून लांब! आम्ही तर तिघी होतो एकमेकींबरोबर !! पण तरी नेहेमी हेच यायचं मनात की ‘आता तिघींना ‘एकटं ‘ राहायचं आहे’...
खरं तर आमच्यासाठी हा ‘एकटं राहण्याचा अनुभव’ काही नवीन नव्हता. पण हे लिहिणं जितकं सोपं आहे ; आचरणात आणणं तितकंच कठीण होतं..आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे नितीनच्या कामाचं स्वरूप! त्या वेळची situation खूपच गंभीर होती. बॉर्डरवर दोन्ही देशांच्या फौजा आमोरासमोर तैनात होत्या…. आणि त्याही युद्धाच्या पूर्ण तयारीनिशी!
मनात कायम एक प्रकारचं टेन्शन असायचं. पण माझी ही मनःस्थिती मुलींना कळू नये यासाठी त्यांच्याशी वागताना अगदी normal राहायला लागायचं.
माझी नोकरी,मुलींच्या शाळा, त्यांच्या extra curricular activities, त्यांचे annual day/sports day, त्यांची दुखणी खुपणी.. … आणि या सगळ्याच्या जोडीला माझ्या आर्मी च्या commitments !
पण या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यासाठी नवीन नव्हत्या, All this had now become a part of my life. मी आधीही बऱ्याचवेळा हे सगळं अनुभवलं होतं.
In fact, प्रत्येक सैनिकाची बायको कधी न कधी या सगळया दिव्यांतून गेलेली असते! आणि बहुतेक म्हणूनच आम्ही सगळ्याजणी अशा testing times मधे एकमेकींची support system बनतो.
नितीन दर रविवारी आम्हाला फोन करायचा.पण ५-१० मिनिटांपेक्षा जास्त बोलता यायचं नाही कारण त्याच्या प्रमाणेच इतर ऑफिसर्सनासुदधा त्यांच्या घरच्यांशी बोलायचं असायचं. त्यामुळे प्रत्येकजण वेळेचं बंधन पाळून असायचा.
त्यामुळे आम्ही फोनपाशी एक नोटपॅड आणि पेन ठेवलं होतं- कायमचं.. रविवारी नितीनला जे काही सांगायचं असेल ते आम्ही त्या नोटपॅडमधे लिहून ठेवायचो. म्हणजे काही विसरायला नको, कारण जर विसरलो तर मग पुढच्या रविवारची वाट बघायला लागायची. आणि मुलींची लिस्ट तर खूपच मोठी असायची… म्हणजे अगदी ‘होमवर्कमधे गोल्डन स्टार मिळाला’, किंवा ‘ काल भेळ खाताना तुमची खूप आठवण आली’ अशा गप्पांपासून जे बोलणं सुरू व्हायचं ते ‘ परवा बागेत आईला साप दिसला होता’ किंवा ‘ आम्ही उद्या घरीच पिकनिक करणार आहोत’ या मार्गानी जात शेवटी’ ‘बाबा तुम्ही कधी येणार? लवकर या, मग आपण सगळे खूप मजा करू.’ या समेवर येऊन थांबायचं.
त्यामुळे माझं आणि नितीनचं बोलणं एक दोन वाक्यांत संपवायचो आम्ही, मुलींना जास्त वेळ बोलता यावं म्हणून! आमचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं ठरलेली होती.. ‘सगळं ठीक आहे ना? काळजी घे.’ एवढी दोन वाक्यच आम्हांला पुरेशी असायची.
प्रत्येक रविवारी एक प्रश्न मात्र माझ्या मनातच राहायचा.. rather मी मुद्दामच नाही विचारायची, कारण मला माहीत होतं की माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर द्यायची नितीनला परवानगी नाहीये...मग उगीच प्रश्न विचारून त्याला धर्मसंकटात कशाला टाकायचं!आणि तो प्रश्न होता..’तू नक्की कुठे आहेस? त्या जागेचं/गावाचं नाव काय आहे?” हो…. मला माहीतच नव्हतं की माझा नवरा नक्की कुठल्या जागी आहे? त्या वेळची परिस्थिती जितकी गंभीर होती तितकीच नाजूक ही होती. म्हणूनच आपल्या सैन्याच्या हालचाली आणि त्यांचं exact लोकेशन या आणि अशा गोष्टी गुप्त ठेवण्यात आल्या होत्या. अगदी आम्हां घरच्यांना सुद्धा नव्हतं माहीत!
नितीन राजस्थान ला गेल्यावर ४-५ महिन्यानंतर एक दिवस आमच्या युनिट मधले एक JCO (Junior Commissioned Officer) घरी आले . ते काही कामानिमित्त सिकंदराबाद ला आले होते आणि दोन दिवसांनंतर परत राजस्थान ला जाणार होते. “अगर साब के लिए कुछ सामान भेजना होगा तो तैय्यार रखीये मेमसाब। मैं कल आके ले जाऊंगा।” एवढं सांगून ते गेले. पण ते गेल्यानंतर अचानक आमच्या घरी अक्षरशः लगीनघाई सुरू झाली. ऐश्वर्या आणि सृष्टी ला जेव्हा कळलं की उद्या बाबांसाठी सामान पाठवायचं आहे तेव्हा त्यांचा उत्साह बघण्यासारखा होता… दोघीनी नितीन ला लांबलचक पत्रं लिहिली. त्याच्यासाठी Greeting cards बनवली. मी पण त्याच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ बनवले. त्या दुपारी मी मुलींचे खूप फोटो काढले….त्या दोघी अभ्यास करताना, खेळताना,, त्यांचा आवडता कार्टून शो बघताना…....कारण नितीन नी मुलींना प्रत्यक्ष बघून ४-५ महिने झाले होते. आणि म्हणूनच निदान फोटो मधून तरी त्याला मुलींना बघता यावं म्हणून माझी सगळी धडपड चालू होती.
संध्याकाळी तो कॅमेरा रोल develop करायला दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळे फोटो, मुलींची पत्रं, greetings आणि इतर सगळं सामान नीट पॅक करून ठेवलं आणि त्या JCO ची वाट बघत बसले.
ठरल्या वेळेला ते आले. मी नितीन चं नाव घातलेलं पॅकेट त्यांच्या हवाली केलं. नंतर चहा पिता पिता इकडच्या तिकडच्या गप्पा देखील झाल्या. आणि साधारण अर्ध्या तासाने ते निघून गेले.
पण त्या संपूर्ण संभाषणात आम्ही दोघांनीही एकदाही नितीन च्या ठाव ठिकाण्या बद्दल एक शब्द ही नाही उच्चारला… मी विचारलं नाही आणि त्यांनी सांगितलं नाही. कारण ते नियमांनी बांधलेले होते आणि मी एका सॅनिकपत्नीच्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहायचं ठरवलं होतं. त्या दिवसांत रोज रात्री दोघी मुली झोपल्यावर मी tv वर फक्त न्युज चॅनेल्स पहायची.. कुठून बॉर्डरवरच्या परिस्थिती बद्दल काही कळतंय का ते बघण्यासाठी..
जर कधी अवेळी फोन वाजला तर क्षणभर छातीत धस्स व्हायचं.. म्हणतात ना ‘मन चिंती ते वैरी न चिंती…’
त्या काळात माझे काका काकू पुण्याहून माझ्याकडे राहायला आले होते.माझ्या काकांनी जेव्हा हे सगळं बघितलं तेव्हा त्यांनी एक कविता लिहिली होती- तमाम वीरपत्नीना उद्देशून!
कवितेचं शीर्षक आहे -
रात्रंदिन तिला युद्धाचा प्रसंग
युद्धावरी गेले पती, राखे घर वीरपत्नी
आघाड्यांवरी वेगळ्या, दोघेजण लढताती ।
सांभाळीतो शूर वीर , फक्त युद्धाची आघाडी
एकावेळी पत्नी मात्र किती आघाड्या लढवी ।
घर, मुले, शाळा, बँक, वाणी, धोबी, घरगडी
स्वयंपाक, नोकरी नी पाहुण्यांची उस्तवारी ।
नक्की शत्रू कोणता ते, शिपायाला पक्के ठावे
बायकोला त्याच्या मात्र, शत्रू असती किती रे ।
हट्टी मुले, खाष्ट सासू, कामचुकार नोकर
मत्सरी मैत्रिणी आणि मानभावी नातलग ।
सर्व साधन सामग्री, सैनिका मिळे सहज
मात्र साध्या गोष्टींसाठी, पत्नी फिरे वणवण ।
गॅस मिळे ना वेळेत, वीज नाही, पाणी बंद
गाडी गेली दुरुस्तीला, गडी माणसांचा संप ।
शस्त्रे किती प्रकारची, असती त्या सैन्यापाशी,
निशस्त्र ती पत्नी मात्र, फक्त तोंडच चालवी ।
गोड बोलुनी मुलांशी, सासूपुढे लीन होई,
खरडपट्टी गड्यांची काढुनी ती सर्वां जिंकी ।
मनोधैर्य उंचावण्या , देश सारा सैन्यापाठी
एकटीच वीरपत्नी, लढे धैर्याची लढाई ।
पती आहे कोठे कसा, जाळी चिंता पदोपदी,
अश्रु गिळूनी स्वतःचे, साऱ्यांना ती धीर देई ।
युद्ध जिंके वीर, त्याचा होई सर्वत्र सत्कार
पती सुखरूप येता, पत्नी जिंके सारे जग ।

या अशा परिस्थितीत एका दुपारी नितीनचं पत्र आलं. मी हातातली सगळी कामं सोडून ते वाचायला घेतलं. वरची तारीख बघितली.. पत्र लिहून ४-५ दिवस होऊन गेले होते. खरं म्हणजे त्याआधीही बऱ्याच वेळा नितीननी आम्हांला पत्रं लिहिली होती, पण का कुणास ठाउक, मला हे पत्र उघडतानाच काहीतरी वेगळं वाटत होतं.. नितीनचं अक्षर नेहेमीसारखं नव्हतं, पत्र खूप घाईत लिहिल्यासारखं वाटत होतं. वरच्या कोपऱ्यात वेळ लिहिली होती.. 0200 hrs… म्हणजे पहाटे दोन वाजता!! त्यावरून मला नितीनच्या तेव्हाच्या मनस्थितीची कल्पना आली. मी पत्र वाचायला सुरुवात केली. पत्र बरंच मोठं होतं, पण जर एका शब्दात सांगायचं तर ते पत्र ‘निर्वाणीचं’ होतं. ज्या दिवशी त्यानी हे पत्र लिहीलं होतं त्या दिवशी बॉर्डरवरची स्थिती खूपच गंभीर होती. अगदी ‘eye ball to eye ball’ अशी situation होती. कुठल्याही क्षणी सैन्याला ‘आगे बढो’ च्या ऑर्डर्स मिळण्याची शक्यता होती. आणि अशा परिस्थितीत नितीनच्या मनात जे जे आलं ते सगळं त्यानी कागदावर उतरवलं होतं. त्यामधे ‘जर त्याचं काही बरं वाईट झालं तर मी पुढे काय आणि कसं करावं याबद्दलचे त्याचे विचार त्यानी लिहिले होते.पत्रातल्या सगळ्यात शेवटच्या दोन ओळी होत्या… “मुलींना चांगले संस्कार दे आणि आईबाबांची काळजी घे.”
पत्र वाचल्यावर थोडा वेळ मन बधीर झालं. पण मग एकदम लक्षात आलं की हे पत्र लिहून आता ४-५ दिबस होऊन गेलेत. जर तसंच काही ‘अघटित’ घडलं असतं तर आत्तापर्यंत युनिटमधून मला तसा निरोप आला असता… आर्मीमधे एक मान्यता आहे-’ No news is good news’, कारण जर ‘तशी’ काही news असेल तर ती सगळ्यात आधी घरच्यांना कळवतात. त्या परिस्थितीतही आशेचा एक किरण दिसला आणि मी त्या दिशेनी विचार करायला सुरुवात केली.
संध्याकाळी देवापुढे दिवा लावत असताना अचानक सृष्टी पळत आली आणि मला म्हणाली,” आई, तुला माहितीये का?? अगं, बाबा पाकिस्तानमधे आहेत.” माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी तिला समजावत म्हणाले,” नाही बेटा, पाकिस्तान नाही.. राजस्थानमधे आहेत बाबा.” पण ती पुन्हा ठामपणे म्हणाली,” अगं आई, मी खरंच सांगतीये, बाबा ना पाकिस्तानमधे आहेत,” आणि जशी आली तशीच धावत खेळायला निघून गेली. पण तिचं ते बोलणं ऐकून मी मात्र मुळापासून हादरले.
अचानक आठवलं, माझी आजी म्हणायची की “ दिवेलागणीच्या वेळी आपण जे बोलतो ते खरं होतं.” आणि मी तर असंही ऐकलंय की लहान मुलांच्या तोंडून देवच बोलतो.. त्या क्षणी हे आणि अश्याच प्रकारचे नको नको ते विचार मनात गर्दी करायला लागले.
सृष्टी म्हणाली तसंच झालं असेल तर ? नितीननी पत्रात लिहिल्याप्रमाणे जर खरंच सीमेलगत काही घडामोडी झाल्या असतील आणि त्यात जर खरंच नितीन शत्रूच्या तावडीत सापडला असेल तर????
मी ‘युद्धकैदी आणि त्यांच्याशी केला जाणारा व्यवहार’ याबद्दल बरंच काही वाचलं आणि ऐकलं होतं… आणि ते सगळं खूपच भयावह, अंगावर काटा आणणारं होतं.
मी खूप सकारात्मक विचार करायचा प्रयत्न केला पण म्हणतात ना की आपल्या माणसांबद्दल नेहेमी मनात प्रथम वाईट विचारच येतात.
पण माझ्या मनातलं विचारांचं हे तांडव share करायला त्यावेळी माझ्याजवळ कोणीच नव्हतं. माझी नजर समोर देव्हाऱ्याकडे गेली आणि नकळत माझे हात जोडले गेले.
तसं पाहिलं तर माझी जरी देवावर अपार श्रद्धा असली तरी माझा उपास-तापास व्रत-वैकल्य या सगळ्यांवर फारसा विश्वास नाहीये.पण तेव्हा मात्र मी ऐनवेळी जेवढया देवांची नावं लक्षात आली त्या सगळ्यांना साकडं घातलं, नवस बोलले, उपास करायचे संकल्प सोडले. मनातलं वादळ मुलींना जाणवू नये म्हणून त्यांच्यासमोर अगदी नॉर्मल वागत होते.
बॉर्डर वरून काही कळलंय का हे विचारायलाआमच्या युनिटच्या commanding ऑफिसरच्या बायकोला फोन केला, पण no reply….त्या घरी नसाव्या बहुतेक .
ती रात्र मी कशी काढली ते माझं मलाच माहीत! नजर दाराकडे आणि कान फोनकडे लागलेले…कुठूनच काही कळेना. जीव टांगणीला लागला होता.
दुसऱ्या दिवशी रविवार होता. मी सकाळपासून फोनशेजारी बसून होते. साधारण दहाच्या सुमाराला फोन वाजला, मी पहिल्या रिंगमधे उचलला.. पलीकडून नितीनच्या आवाजात ‘हॅलो’ ऐकलं आणि रात्रीपासून डोळ्यांना घालून ठेवलेला बांध फुटला. स्वतःला सावरलं आणि मुलीच्या हातात receiver सोपवला. मुलींना त्यांच्या बाबांशी मनमुराद गप्पा मारताना, हसताना बघितलं आणि देवाचे खूप खूप आभार मानले. ऐश्वर्या म्हणाली,” आई, तुला बोलायचं आहे का बाबांशी?” मी तिला म्हणाले,” नको बेटा, आज तुम्ही दोघीच बोला.”
त्याक्षणी माझ्यासाठी नितीनच्या आवाजातलं फक्त तेवढं एक ‘हॅलो’ पुरेसं होतं….

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरसरून काटा आला अंगावर!

आज घरी जाऊन हे बायकोला वाचायला देणार. तिला सांगणार बघ आपण किती सुरक्षित आहोत, कारण नुसतं नितीन सर बॉर्डरवर असणे नाही तर निमिता मॅमनी त्यांना दिलेला खंबीर सपोर्ट आहे. सॅल्युट, त्रिवार सॅल्युट तुम्ही सगळे लोक खूप महान आहात.

युट्युब वर एक आर्मी फॅमिली वर आधारित डॉक्युमेंट्री पाहिली होती, त्यात एका कर्नल साहेबांचा मुलगा म्हणाला होता

"whenever I see my Dad in uniform I feel that HE IS THE THOR"

HEARTFELT SALUTE TO THE MEN IN UNFIORM

वाचताना अंगावर काटा आला. विचारच करू शकत नाही कशा परिस्थितीत कशा तणावात असाल.
छान लिहिलं आहे.

सरसरून काटा आला अंगावर! +१११११११११११११
लिखाण आणि कविता खूप आवडली.
तुम्हा सार्‍या तमाम वीरपत्नींना एक कडक सॅल्युट +!१११११११११ _/\_

शब्द च नाहीत....मला च रडू येतंय वाचून.... तुम्हाला एक सॅल्युट....>>>>>> +1111111111111111

_________________/\________________

खरोखर डोळ्यात पाणी आणलेत. सीमेवर लढणारे आणि देशसेवेला प्राधान्य देऊन आपले ठिकाण आपल्या धर्मपत्नीलासुद्धा न सांगणारे तुमचे पती आणि त्या परिस्थीचे गांभीर्य लक्षात घेऊन फोनवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडेसुद्धा त्याबद्दल विचारपूस न करणाऱ्या तुम्ही, या दोघांनाही प्रणाम. तुम्ही दोघेही एक आदर्श पती पत्नी आहात.

वाचताना अंगावर काटा आला. विचारच करू शकत नाही कशा परिस्थितीत कशा तणावात असाल.
छान लिहिलं आहे.<<<+++११११

लहान मुलांना एकटे वाढवावे लागणे, सर्व आघाड्यांवर एकटे तोंड देणे हे समजू शकते. पण त्याच वेळेस नवरा फक्त ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर असणे आणि देश्याच्या संरक्षणासाठी जीव तळहातावर ठेवून, प्राण पणाला लावून लढाईच्या आघाडीवर असणे ह्यात असलेल्या जमीन -अस्मानाच्या अंतरामुळे, ह्या सर्व कष्टाना , प्रसंगांना तोंड द्यायला किती धेर्य असावे लागते हे एक वीरपत्नीचं जाणे !

अश्या सर्व वीरपत्नींना शतशः नमन !!

शब्द नाहीयेत सैनिकपत्नी चे कौतुक करायला. कविता वाचली आणि एकदम लक्षात आले कि असा विचार तर आपण कधी केलाच नाही. तुम्हाला परत एकदा सलाम नमिता. लिहीत राहा प्लिज हि स्वार्थी विनवणी

कडक सॅल्यूट तुमच्या सारख्या तमाम सैनिक, सैनिकपत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांना _/\_
ती कविता पण फार भिडणारी आहे !

अप्रतिम लिहिलेय. __/\__
---
ते तुम्हाला आलेल्या पत्रावरुन, १९९९च्या कारगील युद्धात, शहिद झालेल्या कॅप्टन विजयंत थापर यांनी तोलोलिंग, खानोली व थ्री पिंप्पल्स शिखरे कॅप्चर करण्यासाठी निघायच्या आधी त्यांच्या घरच्यांना लिहिलेल्या शेवटच्या पत्राची आठवण झाली.
---
शेवटचे पत्र -

कडक सॅल्यूट तुमच्या सारख्या तमाम सैनिक, सैनिकपत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांना _/\_
ती कविता पण फार भिडणारी आहे ! >>>> + 9999

___________/\__________

___/\__

खरंच डोळ्यांत पाणी आलं. खूप छान. तुमच्या दोन्ही मुलींसाठी lots of love आणि तुमच्यासाठी lots of strength.
नितीन सरांसाठी सॅल्युटखेरीज काय देऊ शकतो आम्ही. Hats-off.

काय लाईफ आहे.. हॅटस ऑफ !
त्या व्हॉटसपवर येणारया देशभक्तीचे ओवरडोस पाजणारया पोस्ट वाचून जीव उबगतो.. हे असे वाचले आणि छान वाटले.. लिहीत राहा, आपले अनुभव शेअर करत राहा..

छानच लिहिलय!
वाचताना माझाच जीव अर्धा झाला होता. सॅल्यूट तुम्हाला!

Pages