कांदापोहे....रविवारचा सुपरहिट नाष्टा

Submitted by राजेश्री on 8 July, 2018 - 02:54

माझे खाद्यप्रयोग (२)

नमस्कार खवय्येहो..... मी राजश्री खाद्यसम्राज्ञी(स्वघोषित) आपलं माझे खाद्यप्रयोगच्या दुसऱ्या भागात मनःपूर्वक स्वागत करतेय,तर मग आज आपण नाश्त्याला कांदेपोहे करतोय.का?असं विचारा, नाही विचारलं तरी सांगते,कारण एकतर आज रविवार आहे,घरात पोहे बनविण्यासाठीचे सर्व वाणसामान जातीने हजर आहे शिवाय बाहेर मस्त पाऊस पडतो आहे.इतक्या सकाळी, म्हणजे अर्ली मॉर्निंगला पाऊस पडायला लागला की नाश्त्याला आपल्याला चटपटीत काही खाऊ वाटत असतं, पण भजी मात्र आपण सकाळी नाहीच करत ना,तिची वेळ संध्याकाळची, मग पोह्यांचा बेत लगोलग ठरतो.मला वाटत कांदेपोहे हा आपला एकमेव खाद्यपदार्थ असेल जो तुम्ही इरी, वारी,काळ, वेळ कोणताही असो ऑल टाइम खाऊ शकताय. शिवाय कांदेपोहे आपला फारसा वेळ घेत नाहीतच आवश्यक साहित्याची तयारी करून घेतली की झाले पोहे तयार.तर मग चला कृती करूया.पोहे करीत असताना बाहेर खिडकीतून पडणारा पाऊस न्ह्याहाळा, एखाद दृश्य फोटोजेनिक असेल तर गॅस पेटवला असेल त्यावर पोह्यासाठी कढई ठेवली असेल तर तो पहिला बंद करा.मग छानसा फोटो घ्या.तो आपल्या मित्रमंडळात its rainig today अस काहीतरी capture तयार करून पाठवा, लगोलग कुणाचा रिप्लाय आला तर एखादी smily टाका पण मग नंतर किचन मध्ये या कारण आपल्याला कांदेपोहे करायचे आहेत.
कढई मघाशीच आपण गॅसवर ठेवली आहे.पण हे चूक आहे.आधी पोह्यासाठी आवश्यक सर्व साहित्य आपल्या हाताशी घ्या,कांदा छान राहिला निदान बरा चिरा, त्याचे चौकोनी तर चौकोनी नाहीतर पंचकोनी तर पंचकोनी असेच छोटे छोटे काप कापा.सारांश हा की कांदा बारीक चिरून घ्या.कांदा चिरताना डोळ्यात पाणी जमा होईल ते पुसू नका, विळती बाजूला ठेवा नायतर त्यावर पाय पडेल .मग हात स्वच्छ धुऊन फोन हातात घ्या आणि अश्रूभरल्या डोळ्यांचा एक फोटो काढून घ्या.त्या फोटोखाली
अंगणात पाऊस
मनात पाऊस
डोळ्यांवाटे ही मग वाहतो पाऊस...
अश्या कवितेच्या ओळी टाकून फोटो पोस्ट करा.like वैगेरे किती आल्या ते नंतर बघू कारण कांदा जास्त वेळ चिरून ठेवायचा नसतो.हा माझा आरोग्य सल्ला इथे नोट करून ठेवा.मग हिरवी मिरची अलवारशी चिरून घ्या,कोथिंबीर धूवून त्यातील पाणी निथळवून ती बारीक चिरून घ्या.अंगणातील ताजा कडीपत्ता आणायला बागेत जा. तिथे मोगरा फुलला असेल,आंब्याचे झाड डोलत असेल त्या सर्वांना हाय हॅलो करून पायात घुटमळणार्या मोतीला चकवा देऊन पुन्हा किचन मध्ये या.आता लिंबू राहिला,तो घ्या चिरून ,जिरे,मोहरी,हळद हाताशी घ्या.आता गॅस चालू करायला काहीच हरकत नाही.कढईत एक किंवा दीड पळी तेल घाला.मोहरी,जिरे मग कडीपत्ता अनुक्रमे त्यात धाडून तिखटाचा ठसका हवा असेल तर कांद्यापूर्वी मिरची टाका किंवा मग कमी तिखट हवं असेल तर आधी तेलात कांद्याला परता, चिमूटभर हळद टाकून मसाल्याचा डबा बाजूला ठेवा.कांदा भाजत असताना त्यात मिरची घालून घ्या.या तयारीच्या मध्यात पोहे भिजवून ताटात किंवा चाळणीत पोहे निथळवून घ्या.ते फडफडीत झाले की त्यात मीठ,एक अर्धी चिमूट साखर टाकून मिक्स करून घ्या.या मध्ये शेंगदाणे यापूर्वीच भाजून ते तेलातून थोडे शॅलो फ्राय करून घ्या.माझ्याकडे मुळात खारे शेंगदाणे असल्याने मी ती कृती वगळली आहे.आता कांदा भाजला की त्यात पोहे परतून घ्या आणि व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स झालं बघून त्यावर झाकण टाका गॅस थोडा मंद ठेऊन एक वाफ येऊन द्या.एक वाफ आली की पटपट ती वाफ निवायच्या आत पोहे प्लेट मध्ये खायला घ्या.त्यावर हलक्या हाताने कोथिंबीर पसरा,ओल्या खोबऱ्याचा किस पसरून घ्या ,लिंबाची चंद्रकोरीसारखी फोड ठेवा शेवटी.आता कांदेपोहे तयार आहेत.बाहेर पाऊस पडतोय विसरू नका पावसाच्या कंपनीत ते अवीट चवीचे पोहे स्वतःला शाबासकी देत खाऊन टाका...कारण आपण सारे खवय्ये...

©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
०८/०७/२०१८

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलं आहे.

पोह्यात खूप वेरीएशन करता येत आणि पोहे ऑल टाईम फेव्हरेट असल्याने कसे ही केले तरी आवडतातच.

जाता जाता पोह्यात तोंडली पण मस्तच लागतात.

मस्त आठवण! छान वर्णन केलस राजश्री.

आठवड्यातुन २ ते ३ वेळा आमच्याकडे पोहे होतात. मुलीला फार आवडतात पोहे. पण बापलेक पोह्यांमध्ये कांद्याशिवाय काहीच टाकु देत नाहीत, म्हणून मी बळजबरीने त्यात शे. दाणे घालते. बाकी हिरवी मिर्ची, कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबु हे दमदार आयटेम. माझ्या साबा त्यात कोबी किसुन घालतात. माझ्या मैत्रिणीने कोकणातुन आणलेले लाल हातसडीचे पोहे जबरी लागले. तसे मी बर्‍याच ठिकाणी ते शोधले पण नाही मिळाले. Sad अगदी भरत नाट्य मंदीराशेजारच्या कोकण स्पेशल दुकानात पण जाऊन आले, पण तिथेही नाही मिळाले.

कोकणातुन आणलेले लाल हातसडीचे पोहे जबरी लागले >>> मी पण घेते हे पोहे. आमच्या वरती राहतात ते कोकणचे खास आयटेम विकतात. त्यांच्याकडून.

>>>अगदी भरत नाट्य मंदीराशेजारच्या कोकण स्पेशल दुकानात पण जाऊन आले, पण तिथेही नाही मिळाले.
डोंबिवलीत ?

>> टाकु देत नाहीत, म्हणून मी बळजबरीने त्यात शे. दाणे घालते
बळजबरी करतच आहात तर वांगी, बटाटे, चिकन काय हवं ते घालून टाका. वाहत्या गंगेत... Wink

मस्त लिहिलंय.

मी पोह्यात कांदे, बटाटे (उकडलेले मोठ्या फोडी करून अथवा कच्चे पातळ चकत्या करून ), टोमॅटो आणि मटार घालतेच. कधीमधी कच्चे शेंगदाणे तळून घालते.

वांगी पोहे फार मस्त लागतात. पोह्यांत चाट मसालाही मस्त लागतो.

चिकन / मटण रस्सा, बिकानेरी शेव पोह्यांवर घालून स्वाद अधिक वाढवता येतो. सोडे घालून केलेले पोहे अ फ ला तू न लागतात.

सर्वांचेच प्रतिसाद आता वाचले पोह्यांबद्दल मला इथे खूप वैविध्य पूर्ण व आश्चर्यचकित करणारी माहिती मिळाली।
आम्ही शाकाहारी असल्याने पोहे म्हणजे एक तर दही पोहे नाहीतर कांदा पोहे एवढे try केले आहे

कढई किंवा पातेल्यात करायचे असतील तर जरा जास्त तेलाच्या फोडणीत मी वांगे टाकते आणि वाफेवर शिजवते, हवं तर जरा पाण्याचा हबका मारायचा.

पण हल्ली बरेच वर्ष मी पोहे मावेत करते त्यामुळे भिजवलेल्या पोह्यात वांगे चिरून घालते मावे भांड्यात, मग वरून फोडणी करते कढीलिंब, मिरच्या घालून, ती मिक्स करते, मीठ कोथिंबीर घालते, मी आलेही घालते, मला आवडतं. ते सर्व मावेत high power वर तीन मिनिटं ठेवते मग काढून सारखं करते, परत दोन मिनिटं ठेवते. पाच मिनिटांत होतात पण मी अजून दोन मिनिटं ठेवते करत. प्रत्येक वेळी भांडे काढून पोहे सारखे करते मोठ्या चमच्याने. अर्थात वांगी पोहे कढईतले जास्त चविष्ट होतात, फोडणीत वांगी टाकून जरा खरपूस केली तर जास्त आवडतात मला, मग पोहे टाकायचे पण हल्ली कंटाळा करते, मावेत करते. आलं लसूण मिरची ठेचा जास्त चांगला लागतो वांगी, फ्लॉवर, तोंडली, पडवळ पोह्यात. कधी तो घालूनही करते.

अंजू, वांगं शिजायला पोह्यांपेक्षा जास्त वेळ लागत असेल ना?
मायक्रोवेव्हमध्ये आधी वांगं घालून काही वेळाने पोहे घातले तर कसं होईल?

अंजू, वांगं शिजायला पोह्यांपेक्षा जास्त वेळ लागत असेल ना?
मायक्रोवेव्हमध्ये आधी वांगं घालून काही वेळाने पोहे घातले तर कसं होईल? >>> हो चालेल, करुन बघायला हवं, वांग्यावर फोडणी घालून, ठेचा चोळून आधी वांगी केली तर जास्त मस्त लागेल. मला आणि नवऱ्याला किंचित कच्चट भाज्या राहिल्या तरी आवडतात त्यामुळे सर्व एकत्र टाकते पण तुमची आयडिया मस्त आहे. वांगी, पडवळ, तोंडली पोहे करताना असे करायला हवेत.

आईला विचारुन सांगतो.. पण मला वाटतं चिंच (आणि साखर/गुळ ही) घालतात. >>> मी नाही घालत पण काहीजण चिंच गुळ आणि गोडा मसाला वांगी पोहे करताना घालतात असं ऐकलंय. माझी आई नव्हती घालत कधी.

वांगी पोह्यांची बायजवार पाकृ योजाटा बरं कुणीतरी.
मीही हा प्रकार अजून चाखलेला नाहीय. तेलात खरपूस तळलेलं, मीठ-मिरची-मसाला चोळलेलं वांग भारी लागेल असा प्राथमिक अंदाज; कृती आल्यावर करून पाहीनच म्हणा...

योकु, बैजवार कृती का बरं हवी?
जसा बटाटा घालतो आपण पोह्यात तसंच वागं घातलं की झालं ना!
(मोहोरी हिंग हळद फोडणी -> कढिपत्ता, हिरव्या मिरच्या -> भाज्यांचा मालमसाला (बटाटा, वांग्याच्या फोडी, कांदा (इफ अ‍ॅप्लिकेबल)) -> भिजवून निथळलेले, मऊ झालेले पोहे -> साखर, मीठ -> वाफ -> अजून काही बेल्स अ‍ॅण्ड व्हिसल्स असतील तर त्या म्हणजे खोबरं, कोथींबीर, लिंबू नुसतं वरून घ्यायचं की कढईतच घालून मिक्स करायचं वगैरे. हे सर्व झालं की पोहे तयार ना?)

>> मी या अर्थानी म्हटलं की इथे ती कृती राहील ना मग कुणालाही रेफ करायला
ती रेफर करायला शोधता यायला हवी ना पण? Wink
आता तूच लिहून टाक बरं योग्य ते कीवर्ड्स वापरून म्हणजे सर्च करता येईल.

रात्री जेवायला केलेले वांगी बटाटे पोहे (नवऱ्याला विचारून) चालतात आम्हाला कधी असे वन मिल डिश. आधी मनात होतं भरत यांनी आयडीया दिली ती वापरावी पण कंटाळा केला. सर्व एकत्र टाकलं मावेत. वांगी सात मिनिटांत मस्त शिजली होती. छान झाले होते, वरून रतलामी शेव. फोडणीत चार मेथी दाणे आणि तीळही टाकले. पोह्यात किंचित ओवाही टाकला होता. वरून रतलामी शेव आणि ओलं खोबरं.

मला रेसिपी लिहिता येत नाही आणि मी अंदाजपंचे दाहोदरसे करते, त्यामुळे नीट सांगताही येत नाही.

मस्तच....
आजच करणार पोहे ... चालतात संध्याकाळी पण

सुपरफूड आहे पोहे, कधीही खा.
मागच्याच महिन्यात इंदोरात हेड साहेब के उसल पोहे म्हणून भयंकर तोंपासु प्रकरण खाल्ले. उत्कृष्ट पोह्यांवर झणझणीत छोले-पनीर उसळ आणि इंदोरात कंपल्सरी असणारा शेव-चिवडा. तेल तवंग झेपत असेल तर टेस्ट बेस्ट.
P_20180603_075554_1_optimized.jpg

मागच्या आठवड्यांत घरी बरेच दिवस करून पाहायचे असलेले नागपुरी तर्री-पोहे केले होते, तर्री मस्त होते नागपुरी स्टाईल.
P_20180728_102136_1_optimized.jpg

Pages