भारतीय लोकांमुळे इतर जनतेला बसणारे कल्चरल शॉक अर्थात ओरांग इंडिया तमाशा.

Submitted by विक्रमसिंह on 2 July, 2018 - 02:13

प्रवास करताना किंवा परदेशी रहाताना किंवा भारतातच असताना आपल्या मुळे इतर जनतेला किती धक्के आणि त्रास आपण देत असतो याची कल्पनाच न केलेली बरी. इंडोनेशियात असताना आम्ही आपल्या अशा टिपिकल भारतीय पद्धतीला ओरांग इंडिया तमाशा (ओआयटी) म्हणजे भारतीय लोकांचा तमाशा म्हणायचो. ओआयटीची किती तरी उदाहरणे देता येतील

- कुठेही शिस्तीत रांग न लावता एकदम गर्दी करणे, जसा काही जन्माला येतानाच देवाने आपल्याला कायम रांगेत पुढे रहाण्याचा मान दिला आहे. दुकानामधे दुसर्‍या गिर्‍हाइकाशी दुकानदार बोलत असताना आपलेच घोडे पुढे दामटणे हे त्याचे दुसरे रूप.
- परदेशी विमानतळावर भारतात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार व इतर देशात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार यात शिस्तीच्या बाबतीत जमीन अस्मानाचा फरक दिसतो.
- सार्वजनिक अस्वछता आणि स्वछतेच्या आपल्या कल्पना.
- आपल्या मसाल्यांचा घमघमाट. कित्येक ठिकाणी म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना घरे भाड्यानी देताना अटी घातल्या जातात.
- मला ईंडोनेशियात लोक विचारायचे. तुमच्या बायका पोट उघड का टाकतात. (साडी घातलेल्या). बघण्याचा दृष्टीकोन वेगळा पण हाही त्यांच्या साठी शॉकच ना. (हा नुसता शॉक , पण ओआयटी नाही)

बर्‍याच वेळेला आपल्या गावीही नसते की आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होतोय.
तुम्ही पण असे शॉकलेले लोक पाहिले असतील. ओआयटी (त्रास देणारे शॉक) अनुभवले असतील.

टीप : मला आपल्याबद्दल टिका करायची नाही. आपले (भारतीयांचे) कित्येक गुण आवडल्याचे लोक आवर्जून सांगतात. त्याबद्दल वेगळा एक धागा काढायला हरकत नाही. पण बर्‍याच वेळेला आपल्याकडून अनाहूत पणे चुका होउ नयेत ही इच्छा. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मध्यंतरी स्वित्झर्लंड मधे माऊंट टिटलीस जवळ आलेले काही देसी अनुभव:

काऊंटर पाशी कॉफी घ्यायला उभ्या असलेल्या माणसाच्या आणी काऊंटरच्या मधे असणार्या फूटभर अंतरातून घुसून नोट पुढे नाचवत, स्वतःची ऑर्डर दामटणे. तयार - प्री-पॅक्ड सँडविच घेतल्यावर ते मायक्रोवेव्ह मधे गरम करून मागणे आणी ते न मिळाल्यावर काऊंटर वरच्या मुलीशी हुज्जत घालणे. त्या शाहरुख-खान-काजोल कटआऊट पाशी फोटो काढायला मधे घुसणे आणी मागच्या माणसांनी रांगेत या असं सांगितल्यावर, रांगेतच होतो, जरा बाजूला गेलो होतो वगैरे मखलाशी करणे. पब्लिक बाथरूम अत्यंत घाण करून ठेवणे. तिथेसुद्धा रांग मोडून पुढे घुसणे. स्नो-ट्युबिंग च्या वेळी स्वतःची ट्यूब तशीच खाली सोडून येणे (ती सरकत्या पट्ट्यावरून वर आणून देणं अपेक्षित आहे आणी तसं सांगितलं सुद्धा जातं). लिफ्ट आल्यावर पुढच्या घोळक्यामधून मुसंडी मारून, मागून पुढे घुसणं वगैरे प्रकार उद्विग्न करणारे होते. ह्या प्रकारांची गरज नाहीये. मुबलक प्रमाणात गोष्टी उपलब्ध आहेत. जसं आर्थिक सुबत्ता आल्यावर परदेश प्रवास करायला भारतीय लोकं - आपली लोकं शिकली आहेत, तसंच ह्या साध्या, मुलभूत सौजन्याचे शिष्टाचार पाळणं शिकायला हरकत नाहीये. मागे कुणीतरी म्हट्ल्याप्रमाणे, लहानपणी कुणालाही पाय लागल्यावर नमस्कार करायला वगैरे जसं शिकवतात, तसं हे शिकवायला हवं. १०० पैकी २० मार्कांचं असणारं 'नागरिकशास्त्र' सिरियसली घ्यायची गरज आहे.

हाब +१
काम होई पर्यंत मॅनेजरने फिजिकली थांबणे गरजेचे नसतेच, पण काही डिसिजन हवा असेल, कंसल्ट करायचे असेल तर मेलला काही मिनिटात रिप्लाय मात्र आला पाहिजे. लोकं खोळंबल्येत ही स्टेज आली तर कामगाराने ही मेल लिहुन घरी जावे.
मायक्रोमॅनेजर नसेल की बहुतेक रिस्पॉन्सिबल टीम असते आणि बिनबोभाट कामं होतात.
फेफ +१
सॉरी थँक्यु म्हणायला शिकवा हे सांगितलं तरी बहुतेक भारतीय लोकांना राग येतो. धागे ही निघतात.

हैद्राबादमध्ये हॉटेल, दुकान, हॉस्पिटल कोणत्याही काऊंटरवर जा तिथे "रांग" नसते "घोळका" असतो. पहिल्यांदा गेलो होतो तेंव्हा कल्चरल शॉक होता. कॉम्पुटर सायन्स मध्ये डेटा स्ट्रक्चरमध्ये "क्यू" आणि "ट्री" असे दोन स्ट्रक्चर असतात त्याची आठवण झाली होती. इतरत्र सामान्यतः "क्यू" असतो पण यांच्याकडे मात्र "ट्री" स्ट्रक्चर. विशेष म्हणजे "घोळका" पद्धती असूनही तिथे कधी "माझ्याआधी तू कसा/कशी" अशा प्रकारची भांडणे नाही पाहिली. हा अजून एक कल्चरल शॉक.

फेफ +१

काऊंटर पाशी कॉफी घ्यायला उभ्या असलेल्या माणसाच्या आणी काऊंटरच्या मधे असणार्या फूटभर अंतरातून घुसून नोट पुढे नाचवत, स्वतःची ऑर्डर दामटणे. >>>हे सगळ्यात डोक्यात जाते. तेथे ३-४ लोक आधी उभे असले तरी एरव्ही कुत्र्याला हाड म्हणायची हिंमत नसलेले लोक तेथे त्या विक्रेत्याला उसन्या जरबेच्या आवाजात "ए आपले हे दोन दे रे..." टाइप बोलतात तेव्हा राग यावा की हसू यावे कळत नाही. अशिक्षित, कोणत्याही अशा प्रसंगांशी एक्स्पोज न झालेल्या लोकांचा एक मिनीट राग आला तरी निदान समजू शकतो. पण उच्चशिक्षित आणि मध्यम/उच्चवर्गीय लोकही असे करतात. विमानतळावरही पूर्वी हे व्हायचे. आजकाल कमी झाले आहे.

आपले एक लहानपणीपासून जे अनुभव येतात त्यावरून कंडिशनिंग झालेले आहे - एखादी गोष्ट दुसर्‍याने मिळवायच्या आत पुढे घुसून मिळवायची. रांगेत बिंगेत थांबून बावळटासारखी वाट बघायची नाही. हे कंडिशनिंग परदेशात पूर्ण बदलावे लागते. स्वतः डिग्निफाइड वागायचे (काउण्टरवरच्या माणसाने बोलावल्याशिवाय जायचे नाही, समोरची व्यक्ती व आपण यात जवळजवळ फूटभर अंतर ठेवून उभे राहायचे ई.) आणि तीच डिग्निटी/कर्टसी दुसर्‍याला द्यायची (आपण दार उघडले पण तेव्हढ्यात समोरून कोणी येत असेल तर त्याला आधी जाउ द्यायचे, गाडीत वगैरे शिरताना "पहले आप" लॉजिक लावायाचे ई) - हे मुख्य लक्षात ठेवावे लागते. इथे येउन अनेक वर्षे झालेले बहुतांश सगळेच यातून गेले असतील.

यावरून एक अनुभव आठवला. मुंबई विमानतळावर बॅगेज क्लेम मधे उभा होतो. तेथे ही पब्लिक टेरिटरियल होते. त्या पट्ट्याचा एक दीड फुटाचा भाग अडवून ठेवतात मालकी हक्क असल्यासारखा. जैस देस वैसा भेस लॉजिक ने मी ही जरा मोकळी जागा होती तेथे जाउन थांबलो. हळुहळू माझ्या बाजूला एक खेडुत किंवा लहान गावचे वाटतील असे कुटुंब आले. आधी चिकटून उभे राहिले. मी अमेरिकन लॉजिक ने थोडा बाजूला झालो. तेथे मोकळ्या झालेल्या काही इंच जागेत त्यांचे आणखी लोक आले. असे करत करत ३-४ जण तेथे लोकल च्या दारात उभे राहतात तसे आले. मी जरा अगदी तु.क. नाही तरी वैतागाने बघू लागलो.

मग जाणवले. ते लोक पहिल्यांदाच परदेशातून परत येत होते का कल्पना नाही, पण आविर्भाव तसा होता. अगदी जोरदार हास्यविनोद चालले होते. नातेवाइकांची वाट पाहिल्यासारखी बॅगांची वाट बघत होते. एखादी दिसली की त्यावर जोरदार काहीतरी बोलत. बॅगांना रंगीबेरंगी डिझाइन्स, मोठ्ठ्या अक्षरातील पत्ते आणि हॅण्डल्सना झिरमिळ्या वगैरे. आजूबाजूला आम्ही पांढरपेशे लोक काहीही कारण नसताना दुर्मुखलेल्या चेहर्‍यांनी कोणाशीही न बोलता तेथे उभे होतो पण यांची धमाल सुरू होती. त्या नादात आजूबाजूच्यांना धक्के लागत आहेत वगैरे कल्पनाच नव्हती - पण ते धक्के म्हणजे आपल्याकडे कोणत्याही रेल्वे, बस च्या प्रवासात बसतात तितपतच होते. त्यांची बॅग आली की जो कल्ला व्हायचा तो नंतर मीही हसून वगैरे सामील होउन बघू लागलो.

In future I will prefer them around me anytime instead of other educated idiots like me Happy

एकच रुमाल दिवसभर वापरण अनहायजेनीक आहेच <<< सीमा, यावर थोडं विचार्मंथन केल्यावर असं वाटलं की दिवसातले एवढे तास कपड्यांच्या एकाच सेट मध्ये राहाणेही तसे अनहायजेनीक! Proud>>
गजानन , विनोद करताय ? बरोबर ना ? Happy
रुमाला अनहायजेनिक का आहे कारण मोस्ट ऑफ दि टाईम बघितलय कि रुमाल सतत हातात बाळगायची सवय असते(बायांना एस्पे).आपल्या हातावर सगळ्यात जास्त जंतु असतात. तुम्ही समजा हात पुसले आणि थोड्या वेळाने त्याच रुमालाने तोंड पुसले तर जंतुचा संसर्ग अगदी सहज सगळीकडे स्प्रेड होतो. कागद कामी वापरा वाटल्यास. टेड टॉक वर व्हिडीओ आहे त्यात दाखवलय कि हात अगदोअर सिंक मध्ये ५ वेळा झाडून मग कागदाने पुसले तर एका कागदात हात पुसून होतात. छान आहे ते लेक्चर. मला तो उपाय उत्तम वाटतो. रुमाल वापरण्यापेक्षा.
पण शेवटी ज्याने त्याने ठरवायच. Happy

विक्रेत्याला उसन्या जरबेच्या आवाजात "ए आपले हे दोन दे रे..." टाइप बोलतात

.. ह्याचे मूळ घरकडच्या विक्रेत्यान्च्या वाग्न्यत आहे का? दरडावल्याशिवाय ग्राहकाकडे लक्षच द्यायचे नाही असे काही नियम आहेत जणू आपल्याकडे. पुलं म्हणालेत तसं. त्यामुळे विक्रेता आपल्याला बोलावेल हा प्रकार आपल्याकडे होतंच नाही. त्याचे हे पडसाद आहेत. यात चांगले वाईट हे कल्चरल आहे.

मागे कुणीतरी म्हट्ल्याप्रमाणे, लहानपणी कुणालाही पाय लागल्यावर नमस्कार करायला वगैरे जसं शिकवतात, तसं हे शिकवायला हवं. १०० पैकी २० मार्कांचं असणारं 'नागरिकशास्त्र' सिरियसली घ्यायची गरज आहे.
Submitted by फेरफटका on 10 July, 2018 - 23:02

मुळात त्या नागरिकशास्त्रामध्ये नागरिक म्हणून वागणूक कशी असावी हे शिकवतच नाहीत! उलट त्यात विधानसभेत किती आमदार, लोकसभेत किती खासदार, निवडणूक लढविण्यासाठी काय पात्रता हवी हे शिकवतात. हा विषय खरेतर 'राज्यशास्त्र' या नावाने ठेवून तो ऐच्छिक करायला हवा, आणि 'नागरिकशास्त्र' या विषयात समाजात (खासकरून शहरी भागात) नागरिक म्हणून वावरताना कोणत्या संकेतांचे पालन करावे हे शिकवावे आणि हा विषय सक्तीचा असावा.

आपल्या हातावर सगळ्यात जास्त जंतु असतात. तुम्ही समजा हात पुसले आणि थोड्या वेळाने त्याच रुमालाने तोंड पुसले तर जंतुचा संसर्ग अगदी सहज सगळीकडे स्प्रेड होतो.

---- मी विचार करतोय की आपला सदैव जंतुंनी बरबटलेला भयंकर अनहायजेनिक हात तोंडाकडे जाऊच नये यासाठी हे हा.कॉ. लोक काय करत असावेत?

>> नागरिकशास्त्रामध्ये नागरिक म्हणून वागणूक कशी असावी हे शिकवतच नाहीत
आपल्याकडे शिक्षण च्या नावाखाली जे सुरु आहे त्याला "प्रशिक्षण" (Training) हा योग्य शब्द आहे. नोकरी मिळण्यासाठी ट्रेन करतात बस्स. शिक्षण खूप वेगळी गोष्ट आहे. असो. वेगळा विषय.

'नागरिकशास्त्र' या विषयात समाजात (खासकरून शहरी भागात) नागरिक म्हणून वावरताना कोणत्या संकेतांचे पालन करावे हे शिकवावे आणि हा विषय सक्तीचा असावा.

-- शाळेपेक्षा हा घरातल्या संस्कारांचा विषय नाही का? संस्कृतीचा विषय आला की सोयिस्करपणे शाळेवर का ढकलले जाते? शाळेत असे नेमके काय काय शिकवतात ज्यांचा प्रचंड प्रभाव पडून माणूस मूळ विचार सोडून नविन विचार अंगिकारतो? इतके छान विज्ञान शिकवतात व त्याचे मार्कही चांगले मिळवतात लोक, अभ्यासही चांगला करतात. तरीही कोण्यातरी बुवाबाबाच्या नादी लागतात, नवसयास करतात, अंधश्रद्धा पाळतातच ना?

सदैव जंतुंनी बरबटलेला भयंकर अनहायजेनिक हात तोंडाकडे जाऊच नये यासाठी हे हा.कॉ. लोक काय करत असावेत? >> सॅनिटायझर लावतात

नागरिकशास्त्र हा शब्द एक metaphor होता. अगदी शब्दशः शाळेच्या अभ्यासक्रमात असणारं नागरिकशास्त्राचं पुस्तक असा अर्थ नव्हता. 'सिव्हिक सेन्स' ह्या अर्थानं लिहीलय मी ते.

त्याचे हे पडसाद आहेत. यात चांगले वाईट हे कल्चरल आहे. >>> यस नक्कीच. तेच कंडिशनिंग म्हणत होतो.

आमच्या इथे जेवणाच्या रांगेच्या इथे सॅनिटायझरचा डिस्पेंसर ठेवलेला असतो.. आणि संसर्ग टाळण्यासाठी जेवण वाढण्याच्या चमच्यांना हात लावण्यापुर्वी हे चोळा अशी पाटी. तिकडे न लावणं इज नो नो.
डॉ. च्या हापिसात पण लावावा.. चुकुन जंतूला हात लागला Proud आणि गेला तोंडात (आधी हात आणि मग जंतू) तर हापिसला सुट्टी आणि मग घरात डे केअर चालवायला लागतं. नको रे बाबा. थोडं अल्कोहोल लागलं हाताला तरी भोकं पडत नाहीत.
स्वत:ला सर्दी झाली असेल, आणि ती इन्फेंक्शन वाली नाही... अ‍ॅलर्जीवाली आहे माहित असेल तरी दुसर्‍यांच्या क्युब मध्ये जाउन की बोर्डवरची बटणं दाबण्यापुर्वी (जे करुच नये... पण काहीही करण्यापुर्वी) 'अ‍ॅलर्जी आहे सॅनिटायझर लावलाय' हे स्मॉल टॉक जरुर करावे.

सिरियसली?? आपण भारतात वाढलोय आणि ह्या सगळ्या बारक्यासारक्या जंतूंना इम्युन आहोत असं मला वाटतं. स्वतःला सर्दी झालेली असल्यास इतरांना आजारी न करायची काळजी नक्कीच घ्यावी पण काही मंडळी ओसीडी असल्यासारखी सतत सॅनिटायझर वापरत असतात ते बघून फॅड वाटायला लागल आहे.

मलाही ते डेली वापराकरता असणे हे फॅडच वाटते. नुसते साधे हात धुणे सुद्धा पुरेसे असावे. पण अनेक ठिकाणी बाथरूम्स च्या व्यतिरिक्त नुसते बेसिन/सिंक नसते म्हणूनही करत असावेत. बाकी कमर्शियल ठिकाणी आपल्याला ग्राहकांची किती काळजी आहे दाखवायला ठेवून देत असतील.

चुकुन जंतूला हात लागला Proud आणि गेला तोंडात (आधी हात आणि मग जंतू) तर हापिसला सुट्टी आणि मग घरात डे केअर चालवायला लागतं. >>> हे अमितने बहुधा इथल्या मेन्टॅलिटी बद्दल लिहीले असावे, त्याचे स्वतःचे मत म्हणून नव्हे.

एकदा भारतात कुठल्याशा कामासाठी विम्याच्या ऑफिसात जायची वेळ आली. बर्‍यापैकी रांग होती. माझा जेव्हा दुसरा नंबर आला तेव्हा अमेरिकेच्या सवयीप्रमाणे (केवळ अनवधानाने) काउंटरवरील व्यक्तीच्या १ फूट मागे उभा राहिलो. क्षणार्धात एक इसम मधे घुसला. मी त्याला हटकले तेव्हा तो उलट डाफरुन म्हणाला "मग लायनीत का नाही उभा तू?" मग डोक्यात प्रकाश पडला. काउंटरवरील सेवा घेत असलेल्या इसमाच्या खांद्याला खांदा लावून उभे रहायचे असते ही अस्सल भारतीय पद्धत तत्काळ स्वीकारता झालो!

पण मला तरी अमेरिकन (कदाचित पाश्चात्य) पद्धत आवडते. ज्याचे काम चालू आहे त्याला थोडी उसंत देऊन, प्रायव्हसी देऊन त्याला काम करु देणे सुखकारक वाटते. अमेरिकन वकिलातीत हा प्रकार सर्वप्रथम पाहिला आणि मला तो प्रचंड आवडला!

मी नाही हाताला लावत येता जाता हौशीने. पण चारचौघांसारखे वागावे बेमट्या अशा पीअर प्रेशरने आजुबाजूच्या लोकांनी केले की करतो. डेस्क वर एक प्युरेलची बाटली आहे.
रांगेत प्रायव्हसी बद्दल +१

>>
नागरिकशास्त्र' या विषयात समाजात (खासकरून शहरी भागात) नागरिक म्हणून वावरताना कोणत्या संकेतांचे पालन करावे हे शिकवावे आणि हा विषय सक्तीचा असावा.

-- शाळेपेक्षा हा घरातल्या संस्कारांचा विषय नाही का? संस्कृतीचा विषय आला की सोयिस्करपणे शाळेवर का ढकलले जाते? शाळेत असे नेमके काय काय शिकवतात ज्यांचा प्रचंड प्रभाव पडून माणूस मूळ विचार सोडून नविन विचार अंगिकारतो? इतके छान विज्ञान शिकवतात व त्याचे मार्कही चांगले मिळवतात लोक, अभ्यासही चांगला करतात. तरीही कोण्यातरी बुवाबाबाच्या नादी लागतात, नवसयास करतात, अंधश्रद्धा पाळतातच ना?
<<
शाळेच्या ज्ञानाचा नक्कीच काही प्रमाणात उपयोग होतो. घरातील संस्कार वेगवेगळे असू शकतात. परंतु शाळेचा अभ्यासक्रम सर्वमान्य समजला जातो. मी जे नागरिक शास्त्र शिकलो त्यात राष्ट्रपतीची निवडणूक, राष्ट्रपती, राज्यपाल ह्यांचे अधिकार, त्यांचे मानधन किती वगैरे अत्यंत निरर्थक गोष्टी भरलेल्या होत्या. एक चांगला नागरिक म्हणून काय करावे हे शिकवले असते तर जास्त उपयोगी पडले असते. बस, रेल्वे, सार्वजनिक बागा, पर्यटनस्थळे इथे जबाबदारीने वागावे कारण तुमच्या आईबापांच्या करातून हे सगळे चालते. ह्याची नासधूस कराल तर सरकारचे म्हणजे आपलेच नुकसान आहे. स्वच्छता, सचोटी हे निव्वळ शोभेकरता नसतात. त्याचे दूरगामी परिणाम होतात असे शिकवले असते तर निदान त्यातले काहीतरी, काही लोकांच्या डोक्यात राहिले असते.

बस, रेल्वे, सार्वजनिक बागा, पर्यटनस्थळे इथे जबाबदारीने वागावे >>
तुमच्या आईबापांच्या करातून हे सगळे चालते >> हे शिकवलेलं की नागरिक शास्त्राच्या पुस्तकात. अगदी नाक शि़करताना/ खोकताना रुमाल ठेवावा हे ही शिकवलेलं. संडासात कार्यभाग उरकल्यावर साखळी ओढावी. यात वर साखळीचं चित्र असलेला फोटो ही आठवतो. कागद/ कचरा पेटीत टाकावा, मल मूत्र विसर्जन उघड्यावर करु नये... सगळं सगळं शिकवलेलं, पण लक्षात कोण घेतो!
राष्ट्रपतीची निवडणूक, गाव, स्टेट, आणि केंद्र अशी तीन पदरी रचना प्रत्येकाचे कार्य, अधिकार... याही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं.
हल्ली गणित शिकवलं काय उपयोग झाला? डेरिव्हेटिव्ह शिकवले कशाला? विज्ञान शिकवलं.. भाषा शिकवल्या.. इतिहास शिकवला. काय फायदा, काही वापरत नाही अशा पोस्ट WA वरुन पुढे ढकलायचं फार फॅड आहे. मी कोडिंग करतो पण मी रोबॉट नाही. मला बाकी आयुष्य आहे, आणि एक चांगली व्यक्ती बनायला मला हे सगळं शिकवलं त्याकरता माझ्या शाळेचा मी अत्यंत ऋणी आहे. (जरी मला माझी शाळा तेव्हा आणि आत्ता ही अजिबात आवडत नाही)

In future I will prefer them around me anytime instead of other educated idiots like me

congratulations sire. it takes certain sense of propriety to deal with chaos with such pleasant attitude.

India aint Meluha, India is Svadweep I think. but, thats fine, to one his own.

आला तेव्हा अमेरिकेच्या सवयीप्रमाणे (केवळ अनवधानाने) काउंटरवरील व्यक्तीच्या १ फूट मागे उभा राहिलो. क्षणार्धात एक इसम मधे घुसला>>>>>>

हे अगदी असेच माझ्याबरोबर झालंय साधारण 13-14 वर्षांपूर्वी, भरतातल्याच एका एअरपोर्ट वर एक फिरंग खाण्याच्या काउंटर समोर थोडे अंतर सोडून उभा होता, मी डायरेक्ट काउंटर वर ला चिकटलो, वर त्याच्याच कडे 'कसे अधेमध्ये उभे राहतात' टाईप कटाक्ष टाकला, आणि ऑर्डर दिली,
फिरंग भडकला, am i invisible म्हणाला,
तो कशावरून भडकला आहे हे कळायला मला 30 सेकंड लागली,
निमूट सॉरी म्हणून ऑर्डर घेऊन बाजूला झालो.

फिरंगबोलीच्या एखाद्या धाग्यांवर त्याने हा अनुभव लिहिला असेल कदाचित ;P

Pages