गझल - पर्जन्या

Submitted by बेफ़िकीर on 10 July, 2018 - 03:58

गझल - पर्जन्या
========

कशाला घालतो आहेस आता गस्त पर्जन्या
पिके तर आत्महत्यांनीच केली फस्त पर्जन्या

तुला ना मोल वेळेचे, भुकेची जाणही नाही
तुझे येणे... न येणेही करे... उद्ध्वस्त पर्जन्या

इथे भेगाळत्या एकात्मतेची शुष्कता व्यापे
निधर्मी सर तुझी धाडून कर आश्वस्त पर्जन्या

नव्या हसर्‍या ऋतूंची गुप्त संस्था स्थापतो आहे
तिथे होशील का आजीव तू विश्वस्त पर्जन्या

कुणाची चोरली आहेस कांती आज चंदेरी
कुणाला भिजवुनी झालास तू मदमस्त पर्जन्या

उन्हाळाभर तिच्यावाचून होते मन जसे माझे
तिलाही कर तसे तू आज अस्ताव्यस्त पर्जन्या

कुणाच्या चाहुलीचा घ्यायला आलास कानोसा?
युगे केव्हाच सारी पावली ती अस्त पर्जन्या

तुझ्यावाचूनही ती राहिली आजन्म ओलेती
तुला भेटूनही मी राहिलो सन्यस्त पर्जन्या

तुला आवेग आला की उदासी वाढते माझी
प्रमाणच ठेवले आहेस अपुले व्यस्त पर्जन्या

तिच्या डोळ्यांतुनी वाहायला बंदी कुणी केली
जरासा 'बेफिकिर' हो एकदा भयग्रस्त पर्जन्या

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह् व्वा वा! सुंदर गझल!
उध्वस्त,मदमस्त,सन्यस्त... शेर विशेष आवडले!

>>>तुला आवेग आला की उदासी वाढते माझी
प्रमाणच ठेवले आहेस अपुले व्यस्त पर्जन्या>>> क्या बात है!