कांदापोहे....रविवारचा सुपरहिट नाष्टा

Submitted by राजेश्री on 8 July, 2018 - 02:54

माझे खाद्यप्रयोग (२)

नमस्कार खवय्येहो..... मी राजश्री खाद्यसम्राज्ञी(स्वघोषित) आपलं माझे खाद्यप्रयोगच्या दुसऱ्या भागात मनःपूर्वक स्वागत करतेय,तर मग आज आपण नाश्त्याला कांदेपोहे करतोय.का?असं विचारा, नाही विचारलं तरी सांगते,कारण एकतर आज रविवार आहे,घरात पोहे बनविण्यासाठीचे सर्व वाणसामान जातीने हजर आहे शिवाय बाहेर मस्त पाऊस पडतो आहे.इतक्या सकाळी, म्हणजे अर्ली मॉर्निंगला पाऊस पडायला लागला की नाश्त्याला आपल्याला चटपटीत काही खाऊ वाटत असतं, पण भजी मात्र आपण सकाळी नाहीच करत ना,तिची वेळ संध्याकाळची, मग पोह्यांचा बेत लगोलग ठरतो.मला वाटत कांदेपोहे हा आपला एकमेव खाद्यपदार्थ असेल जो तुम्ही इरी, वारी,काळ, वेळ कोणताही असो ऑल टाइम खाऊ शकताय. शिवाय कांदेपोहे आपला फारसा वेळ घेत नाहीतच आवश्यक साहित्याची तयारी करून घेतली की झाले पोहे तयार.तर मग चला कृती करूया.पोहे करीत असताना बाहेर खिडकीतून पडणारा पाऊस न्ह्याहाळा, एखाद दृश्य फोटोजेनिक असेल तर गॅस पेटवला असेल त्यावर पोह्यासाठी कढई ठेवली असेल तर तो पहिला बंद करा.मग छानसा फोटो घ्या.तो आपल्या मित्रमंडळात its rainig today अस काहीतरी capture तयार करून पाठवा, लगोलग कुणाचा रिप्लाय आला तर एखादी smily टाका पण मग नंतर किचन मध्ये या कारण आपल्याला कांदेपोहे करायचे आहेत.
कढई मघाशीच आपण गॅसवर ठेवली आहे.पण हे चूक आहे.आधी पोह्यासाठी आवश्यक सर्व साहित्य आपल्या हाताशी घ्या,कांदा छान राहिला निदान बरा चिरा, त्याचे चौकोनी तर चौकोनी नाहीतर पंचकोनी तर पंचकोनी असेच छोटे छोटे काप कापा.सारांश हा की कांदा बारीक चिरून घ्या.कांदा चिरताना डोळ्यात पाणी जमा होईल ते पुसू नका, विळती बाजूला ठेवा नायतर त्यावर पाय पडेल .मग हात स्वच्छ धुऊन फोन हातात घ्या आणि अश्रूभरल्या डोळ्यांचा एक फोटो काढून घ्या.त्या फोटोखाली
अंगणात पाऊस
मनात पाऊस
डोळ्यांवाटे ही मग वाहतो पाऊस...
अश्या कवितेच्या ओळी टाकून फोटो पोस्ट करा.like वैगेरे किती आल्या ते नंतर बघू कारण कांदा जास्त वेळ चिरून ठेवायचा नसतो.हा माझा आरोग्य सल्ला इथे नोट करून ठेवा.मग हिरवी मिरची अलवारशी चिरून घ्या,कोथिंबीर धूवून त्यातील पाणी निथळवून ती बारीक चिरून घ्या.अंगणातील ताजा कडीपत्ता आणायला बागेत जा. तिथे मोगरा फुलला असेल,आंब्याचे झाड डोलत असेल त्या सर्वांना हाय हॅलो करून पायात घुटमळणार्या मोतीला चकवा देऊन पुन्हा किचन मध्ये या.आता लिंबू राहिला,तो घ्या चिरून ,जिरे,मोहरी,हळद हाताशी घ्या.आता गॅस चालू करायला काहीच हरकत नाही.कढईत एक किंवा दीड पळी तेल घाला.मोहरी,जिरे मग कडीपत्ता अनुक्रमे त्यात धाडून तिखटाचा ठसका हवा असेल तर कांद्यापूर्वी मिरची टाका किंवा मग कमी तिखट हवं असेल तर आधी तेलात कांद्याला परता, चिमूटभर हळद टाकून मसाल्याचा डबा बाजूला ठेवा.कांदा भाजत असताना त्यात मिरची घालून घ्या.या तयारीच्या मध्यात पोहे भिजवून ताटात किंवा चाळणीत पोहे निथळवून घ्या.ते फडफडीत झाले की त्यात मीठ,एक अर्धी चिमूट साखर टाकून मिक्स करून घ्या.या मध्ये शेंगदाणे यापूर्वीच भाजून ते तेलातून थोडे शॅलो फ्राय करून घ्या.माझ्याकडे मुळात खारे शेंगदाणे असल्याने मी ती कृती वगळली आहे.आता कांदा भाजला की त्यात पोहे परतून घ्या आणि व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स झालं बघून त्यावर झाकण टाका गॅस थोडा मंद ठेऊन एक वाफ येऊन द्या.एक वाफ आली की पटपट ती वाफ निवायच्या आत पोहे प्लेट मध्ये खायला घ्या.त्यावर हलक्या हाताने कोथिंबीर पसरा,ओल्या खोबऱ्याचा किस पसरून घ्या ,लिंबाची चंद्रकोरीसारखी फोड ठेवा शेवटी.आता कांदेपोहे तयार आहेत.बाहेर पाऊस पडतोय विसरू नका पावसाच्या कंपनीत ते अवीट चवीचे पोहे स्वतःला शाबासकी देत खाऊन टाका...कारण आपण सारे खवय्ये...

©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
०८/०७/२०१८

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.
तोंडाला पाणी सुटलंय.पण उशीर झालाय आता कांदापोहे करायला. Uhoh
उद्या नक्की. Happy

छान लिहिलेय.
---
कांदा पोह्यात दोन वस्तू आणखी टाकल्यास त्याची चव अगदी भन्नाट होते.
१. वांगे
२. बटाटे.
वांगे व बटाट्याच्या बारिक चकत्या किंव्हा फोडी करुन पोहे बनवायच्या अर्धा तास आधी पाण्यात भिजवून ठेवाव्या. जिरे, हिंग, मोहरीची फोडणी टाकून झाल्यावर त्यात हळद टाकून, थोड्या वेळाने वांगे, बटाटा टाकून गॅस कमी करावा व थोडावेळ शिजू द्यावा व मग बाकिचे जिन्नस टाकून नेहमी पोहे करतो तसे करुन, खायला घ्यावे. कय ती चव मात्र ह्यात मिरच्या थोड्या जास्त हव्यात व साखर, शेंगदाणे टाईप आयटम वगळावे.

अनिरुद्धजी पोह्यात वांगे आणि बटाटे देखील घालतात हे आजच समजलं
तुम्ही संहितलेल्या पद्धतीने नक्की करून बघेन

कांदा पोह्यात दोन वस्तू आणखी टाकल्यास त्याची चव अगदी भन्नाट होते.
१. वांगे
२. बटाटे.
>>> बटाटा ठीक आहे पण वांगे .. nooooooo

मस्तच वर्णन.

वांगी पोहे मस्त लागतात. मी तर फ्लॉवर मटार, तुरीच्या शेंगा मिळतात तेव्हा ते दाणे टाकून पण पोहे करते. आवडतात आमच्याकडे जसे कांदे पोहे, बटाटे पोहे आवडतात तसेच. पडवळ पोहे पण आवडतात मला पण बरोबर कांदाही घालते.

साखर नाही घालत मी. शेंगदाणे मला नाही आवडत पण नवऱ्यासाठी घालते कधीतरी.

मी मावेत पोहे करते, अगदी पाच किंवा सात मिनिटांत होतात.

पोह्यात शेंगदाणे? नाहि घालत.. एक खोबरं असतं कि परत शेंगदाणे कश्याला.. अन वांग.. नाहि घालत.. बटाटा एकवेळ ठिक..
पण गोड - तिखट - अन आंबट चविने पोहे मात्र छान लागतात. Happy

मी याचिदेही याचि डोळा पोह्यात लसूण घालणारा माणूस (माझा भाऊ आणि बाबा) पाहिले आहेत.त्यामुळे पोह्यात काहीही घालता येईल, उद्या कोणीतरी चॉकलेट पोह्याची रेसिपी शोधेल याबद्दल विश्वास आहे Happy

मला वाटत पोह्यांची रेसिपी घरनिहाय बदलत जातेय इतके वैविध्यपूर्ण प्रतिसाद आहेत इथे.पण चटकन हाताशी येणारा आणि चवीने खाल्ला जाणारा असाच आहे हा पदार्थ

खुप छान लिहील आहे. माझीही हिच सवय आहे. मध्येच फोटो आणि कढीपत्ता आणायला बाहेर जाणे.
पुढच्या लिखाणाच्या प्रतिक्षेत.

पोह्यात शेंगदाणे? नाहि घालत.. एक खोबरं असतं कि परत शेंगदाणे कश्याला..
>>. आमच्याकडे शेंगदाणे घालतात. खोबरं घातलेलं पोहे अजून नाही खाल्ले कधी.

पोह्यात शेंगदाणे ही देशाकडची पद्धत असावी आणि खोबरं ही कोकणातली. ज्या भागात जे मुबलक ते घालून करत असणार. आम्ही दोन्ही घालतो. इनफॅक्ट माझ्या पोह्यांमध्ये कांदा, बटाटा, हि. मिरच्या, कढिपत्ता, शेंगदाणे, कोबी, टोमॅटो, खोबरं, कोथिंबीर, लिंबू हे सगळं मस्ट आहे.

ये ब्बात... मलाही पोह्यांमध्ये सगळा मालमसाला घालून खायला आवडतात. फ्लॉवर घालूनही पोहे सुंदरच होतात. वरच्या लिस्टीत मायनस टमाटू आणि प्लसात फ्लॉवर + मटार अ‍ॅडायचं. वर रतलामी, लसूणी शेव असेल तर बहार... Happy
पोह्यांवर नागपुरी पद्धतीचा सावजी मसाला घालून टोमॅटो + काळ्या चण्याचा झणझणीत रस्सा लई भाव खातो.

छान लिहिलेय.
पोहे माझ्याही आवडीचे. माझाही त्यावर एक लेख होता.

मात्र मला पोह्यात भाज्या वगैरे आवडत नाहीत. ईतरवेळी बटाटा आवडीचा असूनही पोह्यात नकोसा वाटतो. भाज्याच घातल्या तर त्याला पोहे कश्याला म्हणायचे, पुलावच घोषित करून टाकायचे Happy

त्यापेक्षा पोह्यांवर चिकनचा रस्सा बेस्ट ! तसेही रविवारच्या मेनूत तो उपलब्ध असतोच. आणि माझी उठायची वेळ होईस्तोवर ईतरांची जेवायची वेळ झाली असल्याने तयारही झाला असतो Happy

बाहेरचे चिकनपोहे कधी खाणे झाले नाहीत. पण येस्स, आमच्याकडे जो मटण खीमा बनतो तो पोह्यावर टाकून भारी लागतात. बरेचदा आमच्याकडे खीमासोबत कलेजीही शिजवतात. ती सुद्धा कुस्करून टाकतो. लिंबू पिळायचा यावर छान आणि जास्त.. खीम्याचा भडकपणा कमी करायला आणि कुरकुरीतपणा यायला बारीक पिवळी शेव टाकायची.

नालासोपारा इथे बरेच वर्ष राहून मला ते भुजिंग माहीती नाही, ते शाकाहारी नसतं का. वाचलंय पण ना सो सोडल्यावर, भुजिंग प्रकार जास्त नॉनव्हेज असतात का, तेच वाचनात आलेत.

पोह्यात शेंगदाणे ही देशाकडची पद्धत असावी आणि खोबरं ही कोकणातली. >>
आम्ही शेंगदाणे घालतोच छान खमंग आणि वरून कोथींबीर आणि ओल्या नारळाचा चव भरपूर असा मस्त एकदम!

आम्ही शेंगदाणे आणि डाळे घालतो. मला स्वतःला डाळे जास्त आवडतात पोह्यात.
ओलं खोबरं मात्र आवडत नाही. उपम्यासोबत ठिकय. पण एकंदरच नारळ आवडत नाही.

Thank u योकु.

शेंगदाणे पद्धत पुण्यातल्या सासरच्या नातेवाईकांकडे बघितली जास्त, फो भात, फो पोळी, पोहे सर्वात शेंगदाणे हवेत. माहेरी नाही टाकत शेंगदाणे ज्यात त्यात.

Pages