भांड्याला भांडं

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 July, 2018 - 03:33

आज स्वयंपाक करता करता अचानक मनात विचार आला तो स्वयंपाक घरातील भांड्यांचा. आपल्या स्वयंपाक घरात भांडी एकमेकांच्या साथीने, गुण्यागोविंद्याने चविष्ट आणि कलात्मक पदार्थ बनवण्यासाठी किती संगठित होऊन काम करत असतात. त्यातील काही ठरलेल्या जोड्या म्हणजे पोळीपाट-लाटणं, तवा-कालथा, कढई-झारा, खल-बत्ता, चमचा-वाटी. थोड्या आधीच्या काळात गेलो तर कप-बशी, पाटा-वरवंटा, तांब्या-पेला, उखळ-मूस ही भांडी किंवा साधनेही कायम एकमेकांच्या साथीनेच काम करायची.

तसं पाहील तर प्रत्येक भांड्याला धडपड करावी लागते अस नाही, जसं की वाटी-चमचा. वाटीतील पदार्थाचा आस्वाद देण्यासाठी चमच्यालाच धावाधाव करावी लागते. पण वाटी तो पदार्थ सांडू न देता आपल्या उदरात त्या पदार्थाला मावून घेत स्थिर ठेवते म्हणूनच चमचा खात्रीशीर पदार्थ उचलू शकतो.

पोळीपाट स्वतः मजबूत आणि स्थिर राहून लाटण्याला आपले काम करून देत चपातीला भक्कम आधार देतो त्यामुळे लाटणे पोळीपाटाच्या आधारे चपातीला गोल गरगरीत बनवते. तवा-कालथ्याचेही तसेच. तवा गॅसवर स्वतः आगीवर तळपत चपातीला शेकवत असतो तर कालथा ती चपाती योग्य प्रमाणात शेकून निघावी ह्यासाठी संयमाने चपातीची किंवा भाकरीची उलथा पालथं करतो. जर तवा तापला नाही तर चपाती किंवा भाकरी शेकणार नाही आणि जर कलथ्याने उलथापालथ नाही केली तर त्या चपातीचा किंवा भाकरीचा कोळसा होऊन जाईल अथवा करणार्‍या व्यक्तीला चटके सहन करावे लागतील. कढई झार्‍याचे सुद्धा हेच नाते. उकळत्या तेलात कढई आणि झार्‍याच्या भरवशावर पुरी कशी टम्म फुगते. तसेच इतर गोड तिखट अनेक तळण्याचे पदार्थांचा चटपटीतपणा ह्या कढई झार्‍याच्या सहवासात तयार होत असतो.

खलबत्त्यात आपण काही ठेचतो तेव्हा खल स्थिर राहून बत्त्याचे वार सहन करतो आणि बत्त्यालाही प्रतीमार लागतोच की. पण त्यातूनच वेलचीचा सुगंध दरवळतो, लसूण खमंग फोडणीसाठी ठेचून तयार राहतो, आल्याचा, मिरीचा औषधी गुण कुटल्यामुळे द्विगुणित होतो. ठेच्याची लज्जतही ह्या साधनांमुळे जिभेवर रेंगाळत राहते.

हे झाले जोडप्यांची संगत. पण चपाती/भाकरी, पुरी किंवा इतर तळणीचे पदार्थ पूर्णत्वास जाण्यासाठी चपातीच्या भांड्यांचं कुटुंब किंवा तळणीच्या पदार्थाच कुटुंबच राबत असत. चपाती तयार होण्यासाठी स्वयंपाक घरात पिठाचा डबा, परात, तेलाची वाटी, मळण्याच्या पाण्याच भांड, गॅसची शेगडी, पोळीपाट-लाटणं, तवा-कालथा आणि चपाती ठेवण्याचा डबा एवढ्या भांड्यांचं एक कुटुंब राबत असतं. अशा बर्‍याच पदार्थांसाठी विशिष्ट भांड्यांचं टीमवर्क स्वयंपाक घरात चालतं.

ही भांडी नक्कीच पदार्थ बनवत असताना एकमेकांशी संवाद करत असणार. रोज स्वयंपाक करत असणार्‍या चाणाक्ष सुगरणीला त्या प्रत्येक भांड्याचा आवाजही माहीत असतो जसे तवा कालथ्यावर पडल्यावर होणारा आवाज, चमचा-वाटी चा संवाद, खल-बत्त्याची काथ्याकूट, भाकरी थापताना योग्य वळण घे सांगणार्‍या परातीच्या आवाजातील संदेश, एखादा भांड हातातून सटकून किंवा कोणत्याही कारणाने पडलं तर आवाजावरून कोणत्या भांड्याने थयथयाट केला आहे हे स्वयंपाक घरातील मालकिणीला अचूक समजत. एकमेकांत अनेक जिन्नसांची चव एकरूप होऊन कशी रुची वाढते हे मिक्सरची घरघर सांगत असते. कुकराची शिट्टी पदार्थ झाल्याची सूचना घरभर पोहोचवते. ह्या भांड्यांमध्येही राग-लोभ, रुसवे-फुगवेही होत असतील अशी कल्पना करूया. तसेच भांड्याला भांड लागण हे ह्या भांड्यांवरूनच तर बोललं जातं.

भांड्यांमध्ये पदार्थ आले की तेही भांड्यांसोबत संवाद साधू लागतात. जसं की फोडणीचा चुर्र आवाज सांगत असतो आज पदार्थ नेहमीपेक्षा स्पेशल झाला पाहिजे. आमटी-रश्शाची रटरट घाई करा भुका लागल्यात सगळ्यांना सांगत असावी. दूध किंवा चहा उकळून येणारा फस्स आवाज सांगतो धावा गॅस बंद करा नाहीतर मी पडलोच.

जेवणं उरकली की आपण स्वच्छ कधी होतोय ह्याची घाई लागते भांड्यांना. साबण-घासणीच्या तालावर आणि पाण्याच्या खळखळाटात न्हाऊन निघाली की पुन्हा कशी राबलेली भांडी गोरी-गोमटी होतात आणि शिस्तीत आपल्या मांडणी, ट्रॉलीत, आपल्या नेहमीच्या जागेवर जाऊन स्थिर होतात.

तर अशा प्रकारे भांड्यांचे हे नित्य कर्म जोडीने किंवा टीम वर्कनेच पदार्थात योग्य रूप, रुची, रंग, खमंगपणा आणतो हा सहजीवनाचा किती मोठा धडा मिळतो ह्या स्वयंपाक घरातील भांड्यांमधून.
सौ. प्राजक्ता प. म्हात्रे.

वरील लेख दिनांक ०७/०७/२०१८ रोजीच्या लोकसत्ता वास्तुरंग पुरवणीत प्रकाशित झालेला आहे.
कृपया कुठेही शेयर करताना लेखिकेच्या नावाने शेयर करा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय जागूताई Happy
शिर्षकातील शेवटच्या ड वरती अनुस्वार द्या नं राहून गेलाय...

तुमचं नेहमीचं लेखन खुप आवडतं म्हणुन तुमचा चाहता झालो आहे.
दुर्दैवाने हा लेख फारच घिसापिटा आणि म्हणुनच कंटाळवाणा वाटला.

तुमच्या पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत....

वर्षू, मंजूताई, पवनपरी, मामी, किल्ली, शाली धन्यवाद.
व्यत्यत हा लेख काल्पनिक असल्यामुळे असेल.
पवनपरी केल एडीट. धन्यवाद.

खूप ओव्हर थिंकिंग व दव्णीय आहे. किचन सोडा बरे काही दिवस. मस्त लेडीस स्पेशल टूर वर जाउन या.
मी तर अर्धी भांडी डोनेट केली. माझा एक म्हातारा बॅचलर मित्र पोळी खायची हुक्की आली की धुतलेल्या रिकाम्या बीअर बाटलीने ओट्यावरच लाटतो पोळी काही अडत नाही. कणीक तेल त्याम्च्या पाकिटा तून वापरता येते. कप बशी सोडून जमाना झाला. मग नाहीतर पितळी सुद्ध्हा चालते चहा प्यायला. भांड्याला भांडे लागणे ह्याचा आपल्याक डे वेगळा अर्थ आहे म्हणजे घरातल्या दोन व्यक्तींचे एकत्र राहिले की कधीतरी खटके उडतातच. टीम वर्क वगैरे एचार ला ठेवा. सहजीवन....... काहीही.

वरचा लेख भांड्यांबद्दल आसक्तीचा नाही. मी स्वतः ती ठेवत नाही. ती एक कल्पना आहे.
अमा - लेडीज स्पेशल ट्रेक आत्ताच झाला. इथे आहे. https://prajaktamhatretarangmaniche.blogspot.com/2018/07/blog-post.html

अमा, तुमची पोस्ट अस्थानी वाटली.

प्रत्येकाचं आपलं एक वेगळं आयुष्य असतं. आनंदनिधानं वेगवेगळीअसतात. जागू एका एकत्र कुटुंबात राहते. शेतकरी पार्श्वभूमी आहे तिची. तिचं घर, परिसर, कुटुंब, गोतावळा हे सगळं फार संपन्न आहे. तिचे अनुभव यातूनच आले आहेत.

बियरची बाटली घेऊन पोळ्या लाटल्या तरी ती वापरली लाटण्यासारखीच ना. मग? लाकडी लाटणं वापरलं तर ते जास्त चांगलं ना? घरी रोजचा स्वयंपाक करणार्या गृहिणींचा असतोच जीव भांड्यावर.

मामी यांच्याशी सहमत.
मी रोज ठराविक डिशमध्येच जेवतो. का? सहज. आई ज्यात वरण करायची ते भांडे (आम्ही तवली म्हणतो त्याला) मी आईकडून मागून आणले हट्टाने. त्याच भांड्यात डाळ शिजते माझ्याकडे. का? सहज.

मामी +१
लेख आवडला नाही तर तसे जजमेंटल न होता लिहिता येते. प्रेमाने स्वयंपाक करणे, स्वयंपाकाशी निगडीत गोष्टीबद्दल आत्मियता बाळगणे हा एखाद्या व्यक्तीचा छंद असेल तर त्याबद्दल एवढे जजमेंटल कशासाठी? केवळ लेख लिहिणारी व्यक्ती स्त्री आहे म्हणून ? तिला लेडीज स्पेशल टूरचा सल्ला देणे म्हणजे टू मच! हे म्हणजे चौकट मोडण्याचा आव आणत परत चौकटीतच बसवणे झाले. निराशाजनक!

बियर्/वाईन बॉटल ही अडून राहू नये म्हणून तात्पुरती बघितलेली सोय झाली. पाय करायची हुक्की आली तर पोळी लाटायला ठीकठाक. पुरणपोळी /तेलपोळी लाटायला सवयीचे लाटणेच हवे. आईने /सासूने वापरलेली भांडी जेव्हा तुमच्या कडे येतात तेव्हा ती नुसती भांडी नसतात तर त्यासोबत अनेक आठवणी, गुजगोष्टी, अनुभवाचे बोलही येतात.

जागू मस्त!

मला वाटलेलं की शेवटी तुम्हाला हा प्रश्ण पडेल की भांडी एकत्र काम करतात तर भांड्याला भांड का बरं म्हणत असतील?

रच्याकने, भांड्यांची एक गंमत.

नवरा लहान होता तेंव्हा आईबरोबर दुध आणायला एक छोटी चरवी घेऊन जायचा. पुढे बाटल्या आल्या नि मग पिशव्याच आल्या. ती चरवी गेली माळ्यावर. आईला ती टाकवेना. मला लेक झाली तेंव्हा आईने ती चरवी आम्हाला दिली. आम्ही पण त्याचं काय करणार? त्यानंतर कधीतरी दिडवर्षाच्या लेकीने फॅन्सी ड्रेसमध्ये गवळी बनून ती चरवी वापरली, तेंव्हा आईला भरून आलं. तिला तिचा छोटा बाळच आठवत होता. आता ती चरवी आमच्या माळ्यावर आहे. Happy

मामी +१
जागू खूप छान लिहिलेस ग.

भाकरी थापताना योग्य वळण घे सांगणार्‍या परातीच्या आवाजातील संदेश, >>
या इथे स्वयंपाक फक्त उदरभरण ना राहता कला होऊन जातो!!!

Happy

तिला लेडीज स्पेशल टूरचा सल्ला देणे म्हणजे टू मच! हे म्हणजे चौकट मोडण्याचा आव आणत परत चौकटीतच बसवणे झाले. निराशाजनक! >>>> विसंगती बरोबर पकडली आहे. शिवाय भांड्याला भांड लागण्याचा जो संदर्भ आहे त्याच चालीवर लेख आहे.