लातूर ते पंढरपूर वारकरी एक्स्प्रेस :1927 ते 2007

Submitted by सदानंद कुलकर्णी on 9 July, 2018 - 01:44

कुsssक अशी दमदार आरोळी ठोकून डोक्यावरच्या चिलीमितून दगडी कोळशाचा जोरदार झुरका सोडून रेलवे पुढे निघते. गाडी हलली की डब्या-डब्यातून पुंडलिक वरदे हाsssssरी विठ्ठल चा स्टेशन दणाणून सोडणारा गजर होतो. ढेरपोट्या काळ्याकभिन्न इंजिनने वेग पकडताना भसाभसा सोडलेले धुराचे ढग डब्या डब्यात शिरतात. दगडी कोळशाच्या धुराचा उग्र दर्प क्षणभर सगळ्यांनाच कासावीस करून जातो. पण कोणाची कसली तक्रार नाही. रेल्वे कासवाच्या गतीने रांगत रांगत संथ गतीने एकेक स्टेशन घेत पुढे निघालेली. सगळे डबे वारकर्यांनी भरलेले. बहुतेक प्रवासी पांढरट-पिवळट धुवट सदरे, मळखाऊ धोतर, ढगळ पायजमे, फेटे, पटके, गांधी टोप्या, सहावारी, नउवारी इरकल लुगडी अशा वेशात. क्वचित छापील साडी अन शर्ट प्यांट. कपड्यांना धुरकट, घामट वास. उन्हातानात रापलेले काळे, सावळे, तपकिरी चेहरे पण सगळे अस्सल करकरीत/. शहरी ओशटपण औषधालाही नाही. पुरुषांची दाढीची वाढलेली खुंटे, तेलापाण्यावाचून आबाळ झालेले डोईचे केस, पण कपाळी गोपीचंदन, बुक्क्याचा रेखीव टिळा आणि बायकांच्या कपाळी ठसठशीत कुंकू. क्वचित कापली भरलेला लांबरुंद मळवट. जागा मिळेल तिथे कशीही कोंबलेली बोचकी, गाठोडी. बियाण्यांच्या प्रिंटेड पिशव्यामध्ये प्रवासी सामान भरलेले. पिशवीतले सामान बाहेर पडू नये म्हणून तोंडाशी घडी घालून खोचून ताणून बसवलेला टॉवेल. डब्यात साईड ला मिळेल तिथे वीणा, टाळ, मृदंग, पताका अडकवून, बांधून ठेवलेल्या.

मध्येच एखाद्याला सुरसुरी आली की तो अडकवलेला मृदुंग मांडीवर घेऊन सहज थाप मारतो आणि त्याचा मान राखण्यासाठी भलताच कोणीतरी लयकारी करत गळा साफ करतो. अवघा डबा त्यांना दाद देतो. ‘तुकोबारायांचा एखादा अभंग होऊन जाऊ द्या माउली’ अशी कोणीतरी लांबूनच फर्माईश करतो. मग मुक्त मैफल सुरु होते हुकाला अडकवलेले टाळ खाली येतात. काही जण टाळीवर ठेका पकडतात आणि बघता बघता सगळेच झिंगून जातात. या सगळ्यांना साथसंगत करायला सुरु असतो तो झुक-झुक गाडीचा अव्याहत विलंबित लेहरा. सगळे प्रवासी जगाच्या व्यवहाराशी फारकत घेतेलेले, आपल्याच मस्तीत असलेले. वेगळाच उन्माद चढलेले आणि उत्साहाने फसफसून आलेले. कुठून कुठून आलेले पण एकाच ओढीने सगळे एकाच दिशेने निघालेले. सगळेच मदहोश होण्यापूर्वीच्या चेकाळलेल्या अवस्थेत पोचलेले. जागेसाठी वाद नाही तंटा नाही की सहप्रवाशासोबत फाजील बढाया मारणे नाही. मने सताड उघडी असल्याने समोरच्या अनोळखी माणसासाठी सहजपणे पान तंबाखूच्या चंच्या उघडणारी. दशम्या सोडल्या की ‘घ्या माउली’ म्हणणारी. समोरची माउली सुद्धा ‘घ्या देवाचं नाव’ म्हणून त्याचा मान राखण्यासाठी त्यातला एखादा घास घेणारी.

म्हणाल तर सगळा गोंधळ म्हणाल तर मंतरलेला अदभूत माहोल.

या सगळ्या बारदान्यात आम्ही शाळकरी भावंडे अंग चोरून मामासोबत बसलेलो. अख्या डब्यात शहरी तोंडावळा असलेले आम्ही चौघेच. आम्हीही सुट्ट्यात पंढरपूरलाच निघालेलो.

एक मे, महाराष्ट्र दिनी शाळेचा निकाल लागला की आम्हा भावंडाना लातूरहून पंढरपूरला मामाकडे जाण्याचे वेध लागायचे. प्रवासाचे साधन वर्षानुवर्षे ठरलेले, लातूर मिरज या नॅरो गेज मार्गावर धावणारी इतिहास प्रसिध्द बार्शी लाईट रेल्वे. तिला आमच्या भागात वारकरी एक्स्प्रेस या नावानेच जास्त ओळखले जायचे. मुळात त्याकाळी लातूरहून दोनच गाड्या सुटायच्या आणि त्याही पंढरपुरलाच जायच्या. १९८० ते ८८ पर्यंत अगणित वेळा या रेल्वेने आम्ही प्रवास केला आहे.

मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कर्नाटक, आंध्र या भागातील वारकर्यांची ही रेल्वे लाईन हक्काची होती. या भागातले वारकरी बाहेर पडले की माहूरची रेणुका, वेरूळचा घृष्णेश्वर, परळीचा वैजनाथ आणि अंबेजोगाईची योगेश्वरी, किंवा बिदरचा झरणी नृसिंह, हुमनाबादचे माणिकप्रभू अशी ठिकाणं करून चहूबाजूने लातूरला डेरेदाखल व्हायचे. या मार्गावरचे लातूर हे शेवटचे म्हणा किंवा उलटे म्हणाल तर पहिले स्टेशन. त्याकाळी आजच्या सारखे वाहन ठरवून प्रवास करण्याची पद्धत नव्हती. आपापल्या मार्गाने एस टी ने प्रवास करून वारकरी इथे पोचायचे. कारण लातूरहून पंढरपूरला थेट रेल्वे असायची आणि तीही अतिशय स्वस्त. १० ते पंधरा रुपयात लातूर ते पंढरपूर प्रवास व्हायचा. लातूर रेल्वे स्थानक सर्वांचे टर्मिनल होते. वर्षभर केंव्हाही जा कोणत्याही डब्यातील चित्र थोड्या फार फरकाने तेच. रेल्वेतले बहुतेक प्रवासी वारकरीच. कारण या मार्गावर या शिवाय दुसरे काही नव्हतेच.

आमची शाळा स्टेशन पासून जवळच होती. वारीच्या काळात यात्रा स्पेशल गाड्या सोडल्या जायच्या. वारकऱ्यांचे जथे शाळेजवळ असलेल्या मैदानात उतरायचे. तिथेच तीन दगडांची चूल मांडून ते स्वयंपाक करायचे. शाळेतली टारगट पोरं त्यांना ‘पंढरपूरचे वारकरी शिळे तुकडे पार करी’ म्हणून ओरडून चिडवायची. वारकरी सुद्धा हसायचे. शांतपणे म्हणायची ‘माउली असं म्हणू नगा. शाळेत जाताव ना? शाळेत हेच शिकवत्यात का?’

या गाडीला रिझर्वेशन नाही, स्लीपर कोच नाही, माणसांची वर्गवारी करणारे क्लास नाहीत, एसीचे नाव सुद्धा या प्रवाशांना माहिती नाही. जाड पुठ्ठ्याचे पंच केलेले तिकीट काढायचे आणि मिळेल त्या जागेवर बसायचे एवढा साधा सरळ मामला असायचा. बसायला लाकडी पट्ट्यांची सरळसोट बाके. कुठेही प्रवाशांच्या सोयीचा विचार नाही पण कुणाची तक्रारही नाही.

संध्याकाळी सहा वाजता सुटलेली गाडी पंढरपूरला दुसऱ्या दिवशी सहा वाजता पोचणे अपेक्षित असायचे पण कधी दहा, कधी बारा सुद्धा व्हायचे. अवघे दीडशे किलोमीटर अंतर पार करायला तिला एवढा वेळ लागायचा. साधारण ताशी दहा किलोमीटर या वेगाने हा प्रवास व्हायचा. पण या वेगाविषयी कुणाचीही तक्रार नसायची. गाडीत बसलो आहोत आणि गाडी सुरु आहे म्हणजे पोचणारच. दोन-चार तास मागे पुढे एवढा ऐसपैस विचार या मंडळींचा असायचा.

या प्रवासात रामलिंग नावाचा छोटा घाट लागायचा. घाट पार करायला मागे आणखी एक इंजिन गाडीला लावले जाई. दहा किलोमीटरचा घाट पार करायला दोन तास लागायचे. उगाच गम्मत म्हणून घाटात लोक चालत्या गाडीतून उतरून गाडीसोबत चालत येत आणि परत चढत असत. घाट संपला की पांगरी नावाचे स्टेशन लागे. इथे मागचे इंजिन काढण्यासाठी आणि पुढचे इंजिन थंड होण्यासाठी गाडी तास-दीडतास थांबायची. गाडीचा ड्रायव्हर मागचे इंजिन काढून एक दीड किलोमीटर अंतरावर पार्क करून चालत यायचा आणि मगच गाडी पुढे निघायची. पांगरीचे बटाटेवडे खूप प्रसिध्द होते. दुकानातले सगळे बटाटेवडे विकले गेल्याशिवाय ड्रायव्हर गाडी सोडत नाही असे लोक म्हणायचे.

बार्शीला या दिंडीमध्ये आणखी वारकरी सामील व्हायचे. पुढे गाडी कुर्दुवाडीलाही तीन तास थांबायची. कारण काय होते माहित नाही पण कोणीही त्रागा करत नसे. गाडी आपल्या गतीनेच जाणार पण पंढरपूरला नक्की सोडणार याची खात्री असायची.

लातूर ते पंढरपूर या दरम्यान बार्शी आणि कुर्डूवाडी सोडले तर सगळी लहान खेडेगावं आहेत. गाडीला कोळशावर चालणारे वाफेचे इंजिन (लोकोमोटिव्ह) होते. पंढरपूर जवळ आले की सकाळी सकाळी उकळलेले पाणी बोईलर मधून बाहेर सोडले जायचे. स्टेशन ला गाडी थांबली की आसपासच्या लोकांची हे गरम पाणी घेण्यासाठी झुंबड उडायची. काही वारकरी सुद्धा हेच पाणी घेऊन स्टेशनवरच दगडावर अंघोळ उरकून गाडीत येऊन हरिपाठ म्हणत बसत असत. इंजिन मधल्या भट्टीचे निखारे सुद्धा काढून टाकले जायचे हे धगधगते निखारे स्वयंपाकासाठी लोखंडी टोपलीत खेडूत लोक घेऊन जायचे. प्रत्येक स्टेशनवर हे वाटप सुरु असायचे. ड्रायव्हर आणि त्याचा सहायक यांच्या देखरेखीखाली का सगळा कारभार व्हायचा. कोणाला मिळाले, कोणाला नाही हे पाहणे त्यांची जबाबदारी. हे इतके अंगवळणी पडलेले की थोडे मागे पुढे झाल्यानंतर लोक हक्काने ड्रायव्हरला भांडायचे. हे खेडूत लोक मग ड्रायव्हरला घरून चहा पाणी नाश्ता आणून द्यायचे. अशा पद्धतीने चालणारी ही भारतातील एकमेव रेल्वे असावी.

एवरार्द कॅलथॉर्प या ब्रिटीश रेल्वे अभियंत्याने १८८६ साली बार्शी लाईट रेल्वे कंपनी सुरु केली होती. यामागे सांगली, मिरज, बार्शी आणि लातूर या व्यापारी पेठा एकमेकांना जोडणे हा हेतू होता. १९१७ साली पहिली रेल्वे या मार्गावर धावली. पुढे मात्र या मार्गावरच्या सगळ्याच गाड्या वारकऱ्यांच्या गाड्या म्हणूनच ओळखल्या गेल्या. नव्वदी मध्ये कोळशाऐवजी डीझेल इंजिन आले पण लौकिक तोच राहीला. २००६-२००७ मध्ये हा मार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने बंद केला गेला. आज ब्रॉडगेज आणि मार्गाचे विस्तारीकरण झाल्यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्या या मार्गावर धावत आहेत. मुख्यत्वे मालवाहतूक करण्यासाठी हा मार्ग वापरला जातो. वारकरी अजूनही हाच मार्ग वापरतात मात्र आता अनेक वाटेकरी या मार्गावर उभे आहेत. वारकऱ्यांची रेल्वे ही ओळख हळूहळू पुसट होत चालली आहे.

तब्बल नव्वद वर्षे विठूमाउलीच्या लेकरांची जिने सेवा केली, करोडो वारकरी जिच्या अंगा-खांद्यावरून आले-गेले त्या एका परंपरेला सन्मानाने विराम देण्यात करण्यात आला. ही केवळ निर्जीव रेल्वे नव्हती तर प्रदीर्घ काळ वारकरी संप्रदाय आपल्या परीने प्रवाहित ठेवणारी जिवंत लोकवाहिनी होती. त्याचे प्रतीक म्हणून एक लोकोमोटिव्ह रेल्वे इंजिन पंढरपूर स्थानकावर सध्या सन्मानाने उभे करण्यात आले आहे. पांडुरंगाच्या नगरीत, त्याच्या चरणाशी त्याला हक्काची जागा दिली गेली आहे. निर्जीव वस्तूंच्या वापरानुसार त्यांच्या पाप-पुण्याचा निवडा करण्याची व्यवस्था देवाच्या दरबारात असेल तर बार्शी लाईट रेल्वेला पांडुरंगाच्या चरणी कायमची जागा नक्की मिळाली असेल.

© सदानंद कुलकर्णी .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरारा बार्शी लाइट.. लै वैताग अनुभव आहेत या गाडीचे.. आम्ही सुलटे म्हणजे मिरज - पंढरपूर प्रवास करणारे कधीमधी

हा प्रवास हुकालाच माझा. गेज बदलल्यावर गेलो होतो.
लेख आवडला.
त्यावेळी पंढरपूर स्टेशन नदीपलीकडे पुर्वेला होतं ही माहिती एका जुन्या पुस्तकात सापडली. नदी पार करून इकडे यावं लागे. ( धागा node/46258 )