मी वास्तुपुरुष!

Submitted by आर के जी on 4 July, 2018 - 12:30

आज सगळं शांत झालं! गेला महिनाभर कित्येक लोक खपत होते माझ्यासाठी. ह्या घरासाठी, जमिनीसाठी, झाडांसाठी.. त्याच्या स्वप्नांसाठी.. तो! ज्यानी हे सगळं घडवलं. वाढवलं. तो माझा सोबती दोन महिन्यांपूर्वी देवाला जाऊन मिळाला. इतके वर्ष त्याच्या एकटेपणाला मी आधार होतो आणि माझ्या जगण्याला तो. त्या दिवशी जेव्हा तो गेला, त्या दिवशी मी खऱ्या अर्थानी एकटा पडलो.

आधी एक जमीन असते, एकाकी. त्यावर कोणी एक येऊन घर बांधू पाहतो, आणि बघता बघता माझ्यासारखा एक वास्तुपुरुष त्या वास्तूत प्रवेश करतो. तिथलाच होऊन जातो. वास्तूचं, तिथल्या लोकांचं रक्षण करतो. मात्र सगळ्या लोकांमध्ये आमचं जमतं कोणा एकाशीच. कोणी एक तो किंवा कोणी एक ती! त्या वास्तूवर ज्याची परमोच्च माया असते, त्याचं आणि माझं मन एक होतं. तो माझा आणि मी त्याचा होऊन जातो. असाच हा एक. काही वर्षांपूर्वी आला तेव्हा म्हणे नुसती जमीन होती. आणि त्यावर काजूची काही रोपं. त्याचं घर दुसरीकडेच होतं. पण ह्या भागाबद्दल त्याला अफाट प्रेम. इथे घर बांधायचा चंगच बांधला होता त्यानी. मला लख्ख आठवतो तो दिवस. त्या दिवशी तिथे काही लोक जमले होते. त्यांनी जमिनीची पूजा केली आणि पहिली कुदळ मारली. त्या पूजेनी मला अस्तित्व दिलं. माझ्या जाणीवा जागृत झाल्या आणि मी पाहिलं. विस्तृत जमीन, त्यावर इवली रोपं आणि तिथे ठेवलेलं पूजेचं सामान, मन अगदी प्रसन्न झालं हे सर्व पाहून.

मग तो नियमित येत गेला. घराचा पाया खणला. बांधकाम सुरु झालं. इकडे रोपंही वाढू लागली. ह्या सगळ्या धामधुमीत मला जाणवायचं ते त्याचं प्रेम. माझ्या बद्दलचं! ह्या वास्तूबद्दलचं! रोज सकाळी तो गाडीवरून यायचा, गाडी अंगणात लावायचा आणि अतिशय मायेनी सगळ्यावरून नजर फिरवायचा. त्याची अनेक स्वप्न त्याच्या डोळ्यात मावायची नाहीत. भरभर लोकांना सूचना देत मग तो पुढचे आराखडे तयार करायचा. हे काम मोठं किचकट आणि अंत बघणारं असतं. इतक्या लोकांचा काम एकत्र बांधणं म्हणजे एखादा पर्वत चढून जाण्यासारखं आहे. सुरवात अत्यंत उत्साहाने होते. हळू हळू त्या उत्साहाची जागा चीडचीड, त्रागा घेतात. काही जण मध्यावरच कंटाळतात. तर फार कमी जण हे काम तेवढ्याच जिद्दीने शेवटपर्यंत नेतात. माझा सोबती त्या दुसऱ्या प्रकारातला होता. जेव्हा तो उत्साहात असायचा तेव्हा मला तो मित्र वाटायचा. जेव्हा तो काही अडचणी त्याच्या हुशारीने सोडवायचा तेव्हा मला त्याचा अभिमान वाटायचा. कधी अतिशय निराश होऊन बसला की त्याच्याविषयी ममता वाटायची. कधी फार चिडला, हट्टीपणा करू लागला की अगदी लहान मूल वाटायचा. पण ह्या प्रत्येक रूपात तो मला आपला वाटायचा.

घर बांधून झालं तसे अनेक लोक राहायला येऊ लागले. तो एक दिवस मी कधीच विसरणार नाही. घर सर्वार्थाने सजलं होतं. आणि कोणी एक गुरुजी याग करत होते. माझ्यासाठी मोठीच पूजा मांडली होती. फुलांच्या माळा घराला सुशोभित करत होत्या. बाहेर मोठा मंडप घातला होता. त्या दोघांनी डोक्यावर कलश घेऊन घरात प्रवेश केला आणि मलाच कृतकृत्यतेचा अनुभव आला. घरात शिजलेल्या सुग्रास अन्नाचा नैवेद्य माझ्यापुढे आला आणि मी अगदी तृप्त झालो. त्या दिवशी त्याच्या बोलक्या डोळ्यातले ओसंडून वाहणारे भाव माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते.

ह्या धामधुमीनंतर काही दिवस अगदी शांत गेले. तो काही दिवस इथे तर काही दिवस दुसरीकडे असायचा. त्याच्याबरोबर कधी त्याची बायको रहायची. ती आली की दारात रांगोळी सजायची, तुळशीत दिवा तेवायचा आणि घर तिच्या हातच्या चविष्ट अन्नाच्या सुवासाने भरून राहायचं. कधी तो एकटाच रहायचा. झाडांमध्ये, इथल्या लोकांमध्ये रमायचा. तो आला की माझ्यात चैतन्य यायचं. तो आला की झाडं आनंदानं डोलायची. नवीन नवीन झाडं लावण्याचा त्याला फार नाद होता. एके काळी रिकामी दिसणारी बाग हळू हळू झाडांनी भरली. सगळी झाडं त्याच्या प्रेमानी सुखावून डावी उजवी विस्तारली. आणि त्याच्यावर फुलं फळांचा वर्षाव करू लागली. तो सगळ्या झाडांची मुलांसारखी काळजी घ्यायचा. खत, औषध, माती, पाणी कशाची म्हणून ददात नव्हती इथे. जे प्रेम झाडांना तेच घराला. भिंतींना सतत तरतरीत रंगात रंगवून टाकायचा. त्याच्या ह्या कष्टांपुढे माझा आशीर्वाद मला अगदीच फिका वाटे. काही लोकांच्या कर्तृत्वाला कोणाच्या आशीर्वादाची गरज नसते. ते त्यांच्याच हिमतीवर सर्व संकटांवर मात करतात. तसंच काहीसं वाटायचं मला.

लोकांची त्याला फार आवड. आजूबाजूच्या गावातले कित्येक जण इथे येऊन पाहुणचार घेऊन जायचे. त्याची मुलं तर रहायला यायचीच पण बाकीचे कित्येक परिचित इथे येऊन राहायचे. त्यांच्या वास्तव्याने हे घर अगदी भरून जायचं. जेव्हा एकटा रहायचा तेव्हा दिवसा कोणी कोणी त्याला भेटायला म्हणून आलेलं घरात असायचं. संध्याकाळ झाली की मात्र तो हळवा व्हायचा. जेवण झालं की किती तरी वेळ झोक्यावर बसायचा. मागे शांत आवाजात एखादं गाणं चालू असायचं. ती शांतता कधी त्याला टोचायची, तर कधी हवीहवीशी वाटायची. पण हे मात्र निश्चित होतं की त्याचे सगळे आप्त दुसरीकडे असले तरी त्याला मात्र इथेच करमायचं.

त्या दिवशी तो देवाकडे गेला. माझ्याच कुशीत असताना. छातीत दुखण्याचं निमित्त काढून देवानी त्याला बोलावून घेतलं. परत एकदा घर भरून गेलं पण वेगळ्या कारणासाठी. लोक आले, लोक गेले. आज माझ्याविषयीची काळजी मला खूप डोळ्यांमध्ये दिसते आहे. पण मला मात्र दत्तक गेल्यासारखं वाटतंय. त्याच्याबरोबर जुळलेले ऋणानुबंध माझ्यात भरून राहिले आहेत. दुसऱ्या नात्यासाठी आत्ता तरी माझ्या मनात जागाच नाही. पण मला हे माहितीये की असं चालणार नाही. त्यानी काळजीने उभारलेलं हे छोटं विश्व ह्यापुढे नीट जपायचं आहे. आणि त्यासाठी मी तयार आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी सुरेख लिहिलंय! Happy कल्पना मस्त आहे. आवडली. Happy वास्तुपुरुषाच्या भावभावना अगदी यथायोग्य मांडलेल्या आहेत. Happy

वाह! खुप सुरेख लिहिले आहे. अगदी आवडले.
माझे काकाही घरासाठी खुप राबले आणि वास्तुशांतीच्या दुसऱ्याच दिवशी गेले. तो प्रसंग आठवला अगदी. त्यावेळी अगदी हेच विचार मनात आले होते.
लिहा अजुन. वाचायला आवडेल.

तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. घरातला आत्मा ओळखून त्यावर प्रेम करणारी माणसं काही वेगळीच असतात..

खूप सुंदर लिहिलंय.डोळे पाणावले.
प्रत्येक घराला असाच एक प्रेम करणारा मनुष्य आणि त्याचं प्रेम जाणून आपला आशीर्वादाचा हात कायम ठेवलेला समजूतदार वास्तुपुरुष लाभो.